Sunday, June 14, 2020

मानवाला गरज धर्माची नव्हे; तर सम्यक विचारांची...



            .......................................................?





सर्वाना सस्नेह नमस्कार,

         बरेच दिवसापासून विविध मुद्द्यांवर लिहावं अशी अपेक्षा काही मित्रांनी व्यक्त केली. त्या सोबतच माझ्या डोक्यातही विविध मुद्द्यांवर गोंधळ चालूच होता. त्यापैकी काही मुद्दे घेऊन आजच लिखाण करत आहे. तुमच्या वाचनाच्या सवयीनुसार लिखाण खूप विस्तृत झालं असेल. पण मुद्दे स्पष्ट करण्यासाठी ते गरजेचे होते. म्हणून ते आपल्यासमोर मांडणार आहे. तरी आपण आपला वेळ काढून अवश्य वाचावे..... 
           जगातील व देशातील कोरोनाचा प्रवास आपण अनुभवत आहात. त्याचा जगासह आपल्यावर सुद्धा खूप परिणाम झाला आहे. त्यात प्राणी,पक्षी व निसर्गातील सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्याबद्दलची आकडेवारी न देता त्याबद्दलची समीक्षणात्मक माहिती या माध्यमातून लिहिणार आहे.
        जगातील विविध देशांनी कोरोनाचा संसर्ग टळावा म्हणून लॉकडाऊन ची घोषणा केली. त्यातून मानव प्राणी आप-आपल्या घररूपी पिंजऱ्यात बंदिस्त झाला. जंगलातील ईतर प्राणी मनसोक्त पणे बागडायला लागेल. म्हणजेच आपण जे निसर्गावर अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण काही महिन्यांपुरत कमी झालं. व निसर्गाची वाटचाल मनसोक्त पणे चालू झाली.
      त्यात ओझोन च्या थरातील छिद्र सुद्धा नष्ट झाल्याची बातमी ऐकण्यात आली.हवा प्रदूषण खूप प्रमाणात कमी झाले. ओझोनच्या थरातील छिद्र असो किंवा दिल्लीच्या प्रदूषणाचे प्रमाण 130 वरून 35 पर्यंत कमी होणे असो . हे प्रमाण कमी होण्याचं कारण म्हणजे शहरातील वाढते वाहतुकीचे प्रमाण, कारखानदारी हे मुख्य करणे होत. या कारणामुळं वातावरणात रासायनिक वायूचे प्रमाण वाढत गेले. त्यातून निसर्ग चक्रात अडथळे येऊ लागले.
     नदी मध्ये कारखान्यांमार्फत होणारा दूषित पाण्याचा विसर्ग कमी झाला, तिर्थक्षेत्रांच्या नावाखाली नदीत केले जाणारे अस्थी विसर्जन, नदीत केली जाणारी पूजा विधी, आदींसह नदीचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत सर्व घटक बंद होते. त्यामुळं नदीच्या स्वच्छतेचे प्रमाण कमी झाले. पण म्हणावे तसे कमी झाले नाही. कारण बहुतांश नदीतील पाणीसाठा हा प्रवाहित नाही. नांदेड येथील गोदावरी नदीतील मासे किनाऱ्यावर दिसून येणे. हे दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळं पाण्याची पातळी खालावल्या गेली. त्यातून नदीचा प्रवाह बंद झाला. बंद प्रवाहामुळे पाणी स्थिर राहिले व नदीच्या प्रदूषणात घट दिसून येत आहे. यामुळं जलसंपत्तीत वाढ होण्यास मदत झाली.
      ध्वनी प्रदूषण : विविध शहरातील वाहनांची वर्दळ थांबली, त्यातून आवाज, हॉर्नचे आवाज बंद झाले. कारखानदारी बंद त्यातून कर्ण-कर्कश सायरन बंद झाले. यामुळं ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. विविध शहरांसह देशाचे प्रदूषण कमी होण्यास यातून मदत झाली. यातून बरेच मानवाने चालवलेली निसर्गाची हानी काही काळासाठी ती थांबली. त्यातून निसर्गातील अन्य सजीव आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.
      त्याचे परिणाम मानव जातीसह अन्य सजीवांना सुद्धा भोगावे लागत आहेत. पण कर्म माणसाचे, त्याचे फळ मात्र इतर प्राण्यांना का ?
        असा विविध बाजूने चांगला परिणाम निसर्गावर या लॉकडाऊन चा झाला. पण या लॉकडाऊन नंतर काय होणार ? हा प्रश्न आपल्यासमोर आहे. अनलॉक नंतर हि परिस्थिती कशी रहावी याबद्दलची काळजी घेणं आमची गरज आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन मध्ये काही काळ शिथिलता दिल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची व नागरिकांची वर्दळ पाहिल्यानंतर भविष्यातील भीषण स्थिती लक्षात येते. मग अशा वेळी काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
           अनलॉक करत असताना नांगरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. "मानवाने कोणत्या ठिकाणी कसे वागावे, हे समजून घेऊन वावरण्याची जिम्मेदारी उचलली असती तर आज देशाला लॉकडाऊन ची गरज पडली नसती." हि विचारप्रणाली बुद्धांनी आपल्या आयुष्यात सुख-वस्तूंचा त्याग करून. आयुष्यातील सहा वर्षे कठोर परिश्रम घेऊन देण्याचं काम केलं. पण त्या शिकवणीस धर्म या व्याख्येत बंदिस्त करून आम्ही आमच वाटोळं करून घेत आहोत.
         तथागतांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश मानवी जीवन सुखी बनवणे. त्यासाठी विविध बंधने (मी त्यांना बंधने समजणार नाही. पृथ्वीतलावरील प्रत्येकाचे आयुष्य आनंदी करण्यासाठी माणसाने कसे वागावे याबद्दलच्या सूचना आहेत.) सांगितली आहेत. पण ही बंधने आहेत का याचा आपण नक्की विचार करावा.
      कारण, बुद्ध निसर्गातील प्रत्येक घटकाला महत्व देतात, पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाला किंमत देतात. त्यातून एक-मेकांना काहीही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याची शिकवण देतात. प्रत्येकावर प्रेम करायला सांगतात. मानवी आयुष्यात तुमचा संपर्क येणाऱ्या प्रत्येक घटकांवर बुद्ध प्रेम करायला सांगतात. मग तो घटक सजीव असो अथवा निर्जीव. जर आपण प्रत्येक घटकावर प्रेम करत राहिलो तर आपली तृष्णा कमी होते. एक-मेकांतील आपुलकी वाढते. सीमावाद,प्रांतवाद, जातीवाद अशा प्रकारचे वाद थांबतात. त्यातून मानवाचे एक-मेकांशी घट्ट नाते जुळतात. मानवाचे एक-मेकांशी जर घट्ट नाते जुळले तर माणूस माणसाचा दुष्मन होत नाही. त्यातून हा आपला कोरोना आपल्यासमोर आला नसता.(खरंच जर प्रयोग शाळेत तयार झालेला असेल तर.) व आपण या संकटात सापडलो नसतो.
       बुद्धांच्या विचारतील ताकद हि मानवाला पृथ्वी तलावरील प्रत्येक घटकांशी प्रेम करायला शिकवते. मग तो घटक जिवंत असो किंवा मृत. केरळ मधील हत्तीच्या निधनानंतर खूप मिम्स व दुःख व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. पण याचा फायदा काय ? त्या प्राण्याने आपला जीव गमावला. असे कित्येक प्राण्यांचे आपण जीव घेता त्याबद्दल का कळवळा येत नाही. काल हत्तीण व तिचा न जन्मलेलं मूल मारल्यागेल म्हणून आम्ही शोक व्यक्त केला. पण येथे वर्षानुवर्षे देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून प्राण्यांचा बळी दिला जातो, शेतात प्राण्यांनी धुमाकूळ घालू नये म्हणून शेताच्या सीमेवर विजेचे कुंपण घालतो. अशा प्रकारे हजारो प्राणी मारले जातात. शौक पूर्ण करण्यासाठी म्हणून प्राण्यांची शिकार केली जाते. जिभेची चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांची हत्या केली जाते. त्या हत्त्येबद्दल बोलणार आहात का नाही ? त्या हत्त्येबद्दल तुम्हाला काहींच वाटत नाही. निसर्गातील कोणत्याही जीवाची हत्या केली तर आम्हाला काहीच वाटत नाही पण या हत्तीच्या वेळेसच एवढा कळवळा का ? ईथे जात,संपत्ती, प्रेम, द्वेष यातून माणसांची हत्त्या केली जाते. त्या हत्येचा निषेध करत असताना त्याची बाजू पाहून निषेध केला जातो (तो जर स्वधर्मीय असेल, त्याच्या हत्येच कारण आपली मानसिकता नसेल). हत्तीच्या निधना दरम्यान नागपूर च प्रकरण घडलं त्यानंतर पुण्याच, पिंपरी चिंचवड असे प्रकरण घडले पण या प्रत्येक वेळी निषेध नोंदवणारा समुदाय बदललेला दिसला. असे का ?
       त्यात जो कोणी अन्यायग्रस्त होता त्याच्या समुदायातील किंवा समर्थनातील व्यक्तींनीच  त्याचा निषेध केला. आरोपींविरुद्ध आवाज उठवला. मग अशाने आपल्यात मानवता शिल्लक आहे हे कशावरून मान्य करायचे ? प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला चांगली शिकवण देतो, अन्यायाविरुद्ध लढायला सांगतो असं म्हणतो मग आता कुठं आहे तुमच्या धर्मातील चांगली शिकवण ? कोणत्या धर्मात काय सांगितलंय याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही धर्माचं समर्थन किंवा विरोध करत नाही. पण मानव म्हणून जगत असताना ज्या बाबी करायला हव्यात त्या करण्यासाठी जर काही अडथळे येत असतील आणि त्यासाठी विशिष्ठ विचारधारा कारणीभूत असेल तर त्या विचारधारेच्या विरोधात मी नेहमी बोलत राहणार. मग ती विचारधारा एखाद्या धर्माची असेल तरी सुद्धा मला काहीही अडचण नाही. कारण मित्रानो तुम्ही म्हणता कि धर्म माणसाला, माणसाशी, माणसा सारखे वागायला शिकवतो. तर मग जाती आधारित हत्या करायला कोण शिकवते ? जातिआधारीत हत्या करायला कोणता धर्म शिकवत असेल तर त्या धर्माची हत्या करणं गरजेचं आहे माणसाची नाही. एखाद्या धर्मात,माणूस  नीच आहे म्हणून त्याच्याशी नाते जोडू नये, अशी सांगणारी शिकवण असेल. तर मग यात कुठली  आली माणुसकी. हा मानवाच्या हिताचा धर्म होऊच शकत नाही. ते सगळं थोतांड आहे. व ते मान्य करत जगणं म्हणजे आपण आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात.
       निसर्गनियामानुसार स्त्री आणि पुरुष हे दोन भेद आहेत. या दोन्ही घटकांना विशिष्ट रचना निसर्गामार्फत प्राप्त झाली आहे. त्यातून ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला.(याबद्दल काही बोलायचं असेल तर शेवटी माझा नं दिला आहे. सम्यक चर्चेसाठी अवश्य कॉल करू शकता. तुमची वायफळ बडबड किंवा अन्य गोष्टी ऐकवायच्या असतील तर कॉल न केलात तर चांगलंच राहील.) जात हा अभिमानाचा मुद्दा असेल तर प्रेम सुद्धा त्यांच्या जगण्याचा मुद्दा आहे. मग या प्रकरणात अडथळा आणलात तर त्याची सजा तुम्हाला नक्कीच भेटेल.
      ज्या जातीचा आपण अभिमान बाळगतोय ती आहे तरी काय ? माणसापेक्षा ती जास्तीची महत्वाची आहे का ? हा गर्व निर्माण होण्यास कारणीभूत घटक कोणते आहेत ? तर इथली समाजव्यवस्था. या समाजव्यवस्थेला तुम्हाला नाकारणं शक्य नाही, म्हणून तुम्ही तिचे गुलाम बनून राहता. हत्येच प्रकरण जर तुमच्या घरात घडलं तर काय वाटेल ? याबद्दल कधी डोक्यात तुमच्या विचार येईल का ? यावर प्रतिप्रश्न कराल कि कनिष्ठ जातीतील मुलांसोबत प्रेमप्रकरन असेल तर समाज काय म्हणतो याची जाणीव मला आहे का ? तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरात एवढंच सांगायचं कि,"हा गर्व महत्वाचा का माणूस ?" हि मानसिकता निर्माण होण्यास कारणीभूत घटक ओळखा आणि असे प्रकरण थांबवा. म्हणजे प्रमाला विरोध करण्यास बळ देणारी मानसिकता बदला. मग काहीही त्रास होणार नाही. आपण एखाद्या गोष्टी करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नये. असं आपण म्हणतो. कारण, लोक काय लोकांना फक्त बोलता येते. तसेच इथेही समजा ना. लोकांना काय फक्त बोलता येते.
       अशा विचारांना रोखण्याची ताकद फक्त बुद्ध विचारातच आहे. हे मी सांगणार नाही. ते तुम्हीच मान्य कराल जर, बुद्धाला समजून घ्याल तर. बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा त्यांच्या शिकवणीचा प्रसार वाढत चालला तसे तसे अनुयायी वाढत गेले. पण बुद्धांच्या अनुयायांत विशिष्ठ धर्मियांनी च यावे असं कोणत्याही प्रकारच बंधन न्हवत. म्हणजेच बुद्धाच्या शिकवणीचा जर अंगीकार करायचा असेल तर क्षत्रिय कुळातील, ब्राह्मण, वैश्य आदिपैकी एखाद्या वर्णाला परवानगी होती असे नाही. तर त्यात कोणत्याही वर्गातील व्यक्ती, स्त्री ती शिकवण अंगिकरू शकत होता. म्हणजेच तथागतांनी भेदरहित मानव तयार करण्याचा प्रयत्न केला. पण हा भेदरहित मानव आपल्याला मान्य नाही असे दिसतोय व त्यातून असे प्रकरण घडत जातात.
        जगातील प्रत्येक समस्या निर्मितीच मूळ बुद्धांनी जाणलं होत. ती निर्माण होऊ नये यासाठी त्यावर मार्ग सुद्धा सांगितला आहे. ते अंगिकरलो तर खूप समस्या नष्ट होतील. तो आचरणात आणत असताना आपनास संकटाचा सामना करावा लागतो. पण जेव्हा सामुदायिक आचरण होते त्यावेळी कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होत नाही.
        कोरोना संपला नाही तरीसुद्धा सरकार टप्प्या-टप्प्यांत अनलॉक करत आहे. यातून निर्माण होणारा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडे काहीही नियोजन नाही. अशावेळी शासनाला दोष देत बसाल तर नुकसान आपलेच आहे. त्यामुळं शासनासोबत आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायला पाहिजे. तरच आपण व आपला परिसर सुरक्षित ठेऊ शकतो. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हे आम्हाला कळलं आहे. तो कसा पसरतो हे सुद्धा आम्हाला माहित झालं आहे. मग या कोरोनाला हरवण्यासाठी स्वतः खंबीर व्हा. म्हणजेच आपण "अत्त दीप भव" या वाक्याचा अंमल करा. नक्कीच आपण प्रत्येक बाबीत पुढं जाऊ. देश म्हणजे दुसरं तिसर काहीच नाही. तर देश म्हणजे आपण स्वतः आहोत. स्वतः प्रत्येक गोष्टीत सक्षम बनलो तर देश नक्कीच सक्षम बनेल. 
        या निमित्ताने लिहिलेल्या प्रत्येक बाबीचा आपण नक्कीच विचार करावा. कोरोना आपल्याला बरंच काही शिकवून गेला असं म्हणतोय पण परिस्थिती बदलली कि आपण शिकलेल्या कोणत्याही गोष्टीला महत्व देत नाही. त्यामुळं कोरोना नंतर आपण पुन्हा आप-आपले वाद काढत बसतो. नंतर काय कोरोना काळातच आपण हे केलेलं आहे. पुण्यातील बहीण भावाचा खून, प्रेम प्रकरणातून झालेलं पिंपरी तील खूप प्रकरण, नागपुरातील जातीय द्वेषातून झालेला अंत. या सर्व बाबी आपल्याला दाखवून देतात कि, आम्ही मानव म्हणून कधीच सुधारणार नाही. आमच्या मनात जे येईल तेच आम्ही करू. तुमच्या मनात नेहमी सम्यक संकल्प व विचार येण्यासाठी बौद्ध विचारांची कास धरण्याची सद्बुद्धी तुम्हाला सुचो. हि अपेक्षा....

   @ जी.संदीप (गोणार,नांदेड)
                9552803980

Friday, June 12, 2020

एक बालकामगार


 


एक बालकामगार....




साहेब ! 
आज आमच्याबद्दल
दुःख व्यक्त केलात,
त्याबद्दल आपले
खूप-खूप आभार.
पण साहेब !
ही वेळ कोणामुळं अली हो ?

माझा बाप आणि माय
करतात शारीरिक
कष्टाचे काम
तुमचे आयुष्य राहते
सुखी आणि समाधानी
असे असते ते काम
पण तरीही त्याचा मोबदला
देता तुम्ही कमी,
एखादा अडी-अडचणीत
नडलेला आला जर घरी,
राबवून घेता त्याला
स्वतःची अडचण सांगून
पाठवून देता माघारी.
त्यामुळं साहेब !बालकामगार
म्हणून राबतो आम्ही.

आमची माय करते घरात तुमच्या
धुणीभांडी आणि साफसफाई
व बाप करतो अवजड कामे,
सुखवस्तूंचा पुरवठा व नालेसफाई.

या कामांना बौद्धिक
ताकदीच्या बळावर
लेखून तुम्ही कमी
ठरवता त्यांना हीन
त्यातून देता मानधन
सुद्धा कमीच.

साहेब ! एका दिवसासाठी ती कामे
करून पहा स्वतः तुम्ही
देतो आम्ही तेवढेच मानधन
जेवढे सध्याच्या कामाचे घेता तुम्ही

मग समजेल तुम्हालाही
आई-बाबांच्या कष्टांची किंमत
त्यातून बदलावी तुमची मानसिकता
व मिळू शकेल आवश्यक ती किंमत.

मग काय ! साहेब.
राहणार नाही हा दीन बालमजूर
त्यातून येणार नाही वेळ
साजरा करण्याची दिन बालमजूर.

पण खरंच साहेब तुम्हा
आम्हा बालमजुरांची कीव येते का ?
बालमजूर व बालदिनीच दाखवता पुळका
बाकी 362 दिनी आपले डोळे बंद का ?

@ जी.संदीप(गोणार,नांदेड.)
        9552803980

Saturday, June 6, 2020

राजकारण आणि शासन....


"राजकारण आणि शासन"



       बरेच वेळा मित्रांसोबत किंवा काही वाचकांसोबत चर्चा करत असताना शासनाच्या निर्णयावर जेव्हा मी बोलत असतो तेव्हा ते ऐकून घेतात. पण जेव्हा त्यांना विचारतो कि, तुम्हाला काय वाटते तेव्हा ते सरळ म्हणतात,'राजकारणापासून मी दूरच राहतो, त्याच्याशी माझा काही संबंध नाही.' त्यामुळं माझ्या तमाम वाचकांना व मित्रांसाठी  आजचा लिखाणाचा हा प्रपंच. 
      सुरुवातीला आपण राजकारण आणि शासन या बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. राजकारण आणि शासन या दोन वेग-वेगळ्या संकल्पना आहेत असं मला वाटत.
           शासन हे तुमच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित निर्णय घेते. ते सर्वांसाठीच हितकर असतात असं नाही. देशातील काही ठराविक समुदायाला लक्षात घेऊन काही वेळा निर्णय घेतले जातात. अशावेळी शासनाने घेतलेल्या निर्णयावर बोलणे आपले कर्तव्य नाही का ? या अनुषंगाने शासनाच्या कार्यप्रणालीचे काही उदाहरणे सुद्धा पाहूया. तत्पूर्वी शासन आणि राजकारण.
राजकारण :-
        यात निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहणे, मत मिळवण्यासाठी विविध आश्वासने देणे, सत्तेतील शासन किती चुकीचे निर्णय घेते, हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे, आम्ही जर सत्तेत आलो तर, सामन्यासाठी कसे काम करू हे पटवून देणे. साडी-चोळी वाटणे, मटण-दारू वाटणे, पैसे वाटणे, एवढ्यावर सुद्धा जर मतदार अपल्याबाजूने वळत नसतील तर, मतदानाच्या बूथ वर गुंडांच्या टोळ्या ठेवणे, त्याचप्रमाणे अन्य कोणतेही गैर मार्ग अवलंबून सत्तेत येण्यासाठी धडपड करणे.
         थोडक्यात राजकारण म्हणजे 'लोकशाही मार्गाने सत्तेत येण्यासाठी नैतिक व अनैतिक पणे केलेली धडपड.' 

शासन :- 
         देशातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आवश्यक गरजा व सुविधा मिळवून देण्यासाठी, देशात, राज्यात, जिल्ह्यात, नगरात,गावात जे नागरिकांचे प्रतिनिधी असतात त्यांचा समावेश या शासनात होतो. हे शासन सामान्य नागरिकांना आवश्यक सेवा देण्यासाठी असते. त्यात घरे, वीज, पाणी, रस्ता, आरोग्यसाठी दवाखाने, शिक्षण, रोजगार आदी बाबी कोणताही भेदभाव न करता संविधानिक नियमानुसार द्याव्या लागतात.
        थोडक्यात सांगायचे म्हणजे,"शासन हे आपण आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियुक्त केलेले नोकर होत.

    वीज : शासन सध्या दूरदर्शन वरून शिक्षण देण्याची अमलबजावणी करत आहे. पण मला सांगा देशात,राज्यात अशी कित्येक गावे (उदा:धारणी,चुरणी जिल्हा अमरावती) आहेत जिथे विजेची सोय नाही, राज्यतील काही गावात आजसुद्धा रॉकेलचे दिवे लावून रात्र काढली जाते. अशा गावात विद्यार्थ्यांनी हे असले प्रयोग कसे पहायचे ? विजेची सोय नाही म्हणजे गावात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन उपलब्ध नाही. जिथे वीज नाही तिथे तुमचा विकास कसा पोहचेल ?
        आधुनिक तंत्रज्ञान नाही वापरले तर देश कसा विकसित होईल असा प्रश्न केला जातो. मग हे आधुनिक तंत्रज्ञान देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याची जबाबदारी शासनाचीच आहे ना ? 
             मग अशावेळी नागरिक म्हणून तुमची काय भूमिका आहे ?
       रस्ते:  दोन गाव, शहर जोडण्यासाठी रस्त्यांची गरज असते. शहरांचा गावाशी संपर्क वाढला तर विकास काय आहे हे जनतेला लक्षात येते. पण या सुविधा यांच्याकडून पुरवल्या जात नाहीत. कित्येक गावे पावसाळ्यात संपर्कात नसतात. त्या गावाला बस सेवा जात नाही. किंवा शासनाचा कोणताही प्रतिनिधी कधीच जात नाही. गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती सारख्या  जिल्ह्यातील काही गावे पावसाळ्यात संपर्कापासून दूर असतात. त्या गावात कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर तिथेच जडीबुट्टीचा उपचार केला जातो. बाबा आमटेंच्या कार्याचा आढावा घेत असताना तिथल्या नागरिकांची रस्त्याविना काय परिस्थिती होती हे लक्षात येते. 
         काही वर्षांपूर्वी शिवनगर तांडा( ता.भोकर, जिल्हा नांदेड) येथे अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने जाण्याचा योग आला तिथं पोहचन्यापूर्वी असं वाटतं की, खरंच या रस्त्यावर कोणतं गाव असेल का ? गावात राज्यातील पहिली iso शाळा व डिजिटल शाळा आहे. तिथे वर्ग 1-4 व शिक्षण फक्त दोन शिक्षकांमार्फत दिले जाते. दोन पैकी एक शिक्षक दहा वर्षे झाली तिथं आपली सेवा देतायत. त्यांची बदली झाली तेव्हा नागरिकांनी विरोध करून बदली रद्द करायला प्रशासनास भाग पाडले. या गावाला जाण्यासाठी तेव्हापर्यंत रस्ताच न्हवता. नंतर स्थानिकांच्या मदतीने कच्चा रस्ता तयार केला गेला. पावसाळ्यात त्यागावाकडे कोणीही फिरकत नसे, पण आपली ड्युटी करायची व गावाशी जुळलेली नाळ म्हणून शिक्षकांना जावे लागायचं. शिक्षक नियमितपणे जायचे पण पावसाळ्यात त्या रस्त्याने गाडी घेऊन जाण शक्य न्हवते, मग अशावेळी गावातील दोन-तीन तरुण सरांना पक्क्या रस्त्यापर्यंत सोडायला जात असत. सर व त्यांची बाईक सोडून पुन्हा वापस जात. असा पावसाळ्यातील नित्य दिनक्रम असतो.

          पाणी: हे मानवाला जीवनावश्यक बाब आहे. ती उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. शुद्ध पाणी पिण्यास नाही मिळाले तर नागरिकांच आरोग्य धोक्यात येते. शासनाचा आरोग्य विभाग पावसाळ्यात पाणी कस प्यावं हे सांगत असतो. पण हे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडत नाही. भटकंती करत जगणारे नागरिक जे भेटेल ते पाणी वापरत असतात. त्यातुन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
       भटकंती करणाऱ्यांच सोडा ग्रामीण भागात सुद्धा पाणी पुरवठा व्यवस्थित केला जात नाही, त्याच्या सोई नाहीत. माझ्याच गावच उदाहरण देतो, गोणार(ता.कंधार, जिल्हा नांदेड) काही वर्षांपूर्वी जुनी पाणीपुरवठा करणारी टाकी मोडकळीस आली म्हणून नविन पाणी पुरवठा योजना मंजूर करवून घेतल्या गेली. पण ती कागदावरच अंमलात सुद्धा आली. करोडो रुपयांचा घोटाळा केला गेला. तरी कोनीच काहीही बोलत नाही. आज ती मोडकळीस आलेली जुनी पाणीपुरवठा करणारी टाकी कोणाचा जीव घेण्यासाठी ऐतिहासिक वास्तू सारखी जतन केल्या जातेय का काय ? असा प्रश्न पडतो. गावाच्या शेजारून जाणाऱ्या नदीवरील छोट्याशा विहिरीतून गावाला डायरेक्ट अनियमितपणे पाणी पुरवठा केला जातो. 
     हा फक्त एक दाखला दिला असे खूप गावे आहेत. काही गावातील नागरिकांना हे सुद्धा माहित नाही की,गावात शासन पाणीपुरवठ्यासाठी निधी पुरवठा करतो. म्हणजे आलेला निधी परस्पर हडप करण्याचे काम सुद्धा काही अक्कलमंद सरपंच करत आहेत.
       तरी सुद्धा नागरिक म्हणून तुम्ही काहीच बोलणार नाही.
       घरे : देशातील सामान्य नागरिकांना आपल्या कमाईंनुसार घरे बांधणे होत नाही. अशांना घरकुल योजनेमार्फत घरे दिली जातात. यात स्थानिक शासनाच्या मार्फत अपहार करण्यात येतो. बनवलेली योजना उत्तम पण त्याची अमलबजावणी मात्र सदोष यामुळं या योजनांचा योग्य लाभ नागरिकांना मिळतच नाही. सरसकट गावातील गरजुंना घरकुल देण्याचा आदेश शासनाने जरी केला पन तरीह गरजुंना घरे मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
      घरकुलाच्या यादीत नाव येण्यासाठी पैसे, त्यानंतर घरकुलाच्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर पैसे, शेवटी काम केले म्हणून पार्टी देण्यासाठी खुशाली म्हणून पैसे. शासन आहेत का लुटारु हा प्रश्न मला पडतो.
         तरी सुद्धा नागरिक म्हणून तुम्ही काहीच बोलणार नाही.
    शिक्षण:-
          देशातील 06 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी शासन नियम बनवण्यात आला. पण यात दर्जेदार पणाचं नाही. त्यातल्या त्यात कहर पहा ना कि या वयोगटातील विद्यार्थ्यांना नापास करायचेच नाही. जर परीक्षा नसतील तर अभ्यास कोणी करेल का ? परीक्षेला पर्यायी मार्ग दिला पण यात पळवाटा काढायला कोणाला सांगावे लागते का ? माध्यमिक शिक्षणाचे सुद्धा तेच शिक्षण कशासाठी घेताय,तुम्ही अभ्यास कशासाठी करताय असा प्रश्न विद्यार्थ्यांना करावा तर सांगतात परीक्षेसाठी. म्हणजे शाळा हि परिक्षेसाठीच मर्यादित आहे का ? म्हणजे शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवणे असेल तर हे दर्जेदार शिक्षण आहे का ? 
          शिक्षित तरुण शिक्षणाचा उपयोग करून देशाच्या विकासात हातभार लावत असतो. पण या तरुणाला शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा व नोकरीसाठीच असते हि मानसिकता घेऊन वावरतोय. मग अशा शिक्षणातून दर्जेदार विद्यार्थी कसे घडतील, पर्यायाने देशाच्या विकासात हे तरुण हातभार लावू शकतील का ? 
      तरी सुद्धा नागरिक म्हणून तुम्ही काहीच बोलणार नाही.
      रोजगार :-
             शिक्षित तरुण रोजगाराच्या शोधात असतो, तसाच अशिक्षित तरुण सुद्धा रोजगाराच्या शोधात आहे. तो उपलब्ध करून देण्याचा काम शासमार्फत व्हायला पाहिजे, पण तसे होत नाही. अशिक्षित व अकुशल कामगारांसाठी स्वयंरोजगार योजना सुरु केली व वर्षातील 100 दिवस मागेल त्याला काम दिल्या जाईल अशी ग्वाही दिली. मागेल त्याला खरंच काम मिळते का ? मुद्दा बाजूला ठेवूया राज्यातील बऱ्याच गावातील नागरिकांनी कामासाठी पुणे-मुंबईला ला स्थलांतर केलं. या कामगारांच्या नावावर स्थानिकचा रोजगार सेवक व स्थानिक शासन मिळून पैसे उचलण्याचे काम करत आहेत.
या बेरोजगारांना जेव्हा हि बाब लक्षात येते तेव्हा त्यांना काहीतरी उडवा-उडवीची उत्तरे दिल्या जातात.  व या बेरोजगारांची टाळाटाळ केली जाते.
        शिक्षित बेरोजगारांच्या रोजगारावर तर आता मोठे संकटच आले आहे. गरजेपेक्षा कैकपट उत्पादन हे शासन करत आहे. महाविद्यालयांची खैरात वाटली  पण शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्यांच्या रोजगाराची काहीही दखल नाही. त्यात ded, polytechnic, engineering, केलेल्या विद्यर्थ्यांची काय स्थिती आहे हे आपणास माहीतच आहे. आता mbbs, bams, bhms च्या बिद्यार्थ्यांचीही तीच स्थिती होते का काय असा प्रश्न पडतोय. 
        या बाबीस देशातील शिक्षणाचे धोरण जबाबदार आहे. यातून विद्यार्थी आत्महत्या वाढत आहेत. ऑक्टो-नोव्हे 2019 मध्ये एक अहवाल आला होता त्यात स्पष्ट केलं होतं की, शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण वाढलेले आहे. विद्यार्थी आत्महत्येबाबत राज्य देशात एक नंबर वर आहे.
            तरी सुद्धा नागरिक म्हणून तुम्ही काहीच बोलणार नाही.
     आरोग्य:- 
           आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत मला काही बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. सध्या तुम्ही अनुभवत आहातच. तसंही या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी लिहिलच होत. त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज किती आहे व शासनाने ती किती प्रमाणात उपलब्ध करून दिली.
       वरील बाबिंचा मी जो उल्लेख केला त्या प्रत्येक नागरिकांशी संबंधित आहेत. या सुविधा पुरवण्याचं काम शासनाने करावं लागतं. मग हे शासन म्हणजे कोण आता आपल्या लक्षात आलं ना ? मग या शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात तुम्ही बोलणार नाही तर मग कोण बोलणार ? तुम्ही शांत बसायचं आणि काही जणांनी शासनाच्या विरोधात टार्गेट होऊन आवाज वाढवायचा का ?
         शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं खाजगी शाळांचे पेव फुटलं आणि आज त्याच शाळेत तुम्ही आपल्या पाल्याना शिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च करताय. जर तुम्ही या धोरणाला सुरुवातीलाच विरोध केला असता तर आज आपला पाल्य याच शाळेत शिकावा त्यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले तरी हरकत नाही. असे म्हणण्याची वेळ आली नसती. कारण उत्तम व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे, ती जबाबदारी शासन पार पाडत नाही हे कळल्यानंतर तुम्हाला शासनाला जाब विचारण्याचा अधिकार आहे हे का विसरता ?
     स्वच्छ पाणी, उत्तम रस्ते, मुबलक वीज, शिक्षणानुसार व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून देणं हे सुद्धा शासनाच काम आहे. पण ते व्यवस्थित करत नसतील तर त्याबद्दल आपणास जाब विचारावा लागेल. कारण ते आपले नोकर आहेत. देशातील प्रत्येक नागरिकांकडून कर स्वरूपात पैसा जमा करतात व तोच पैसा आपल्या साठी सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला जातो. पण आम्ही पागल लोक आम्हाला राजकारणाशी काहीही देणं-घेणं नाही म्हणून चार हात लांब पळतो. पण तुम्ही ज्याच्यापासून लांब पळता ते राजकारण नाही तर ते आहे तुमच्या सेवेसाठी कार्य करणारे शासन.निवडणुकीच्या काळातील जे राजकारण आहे त्यापासून दहा हात लांब रहा.( येथे ज्याला निवडून द्यायचंय त्याबद्दल मात्र योग्य काळजी घ्या.)पण निवडणूक झाल्यानंतर चा जो काळ आहे तो मात्र तुमच्या अधिकाराचा काळ आहे. तुम्ही मालक बनता त्यांचे. हे तुम्हाला कळत नाही का ? तुमची सेवा करण्यासाठी या प्रत्येक सदस्याला आपल्या कराच्या रूपातून जमा झालेल्या पैशातून पगार दिला जातो. राज्यातील आमदारांच्या पगारावर या संकटाच्या काळात सुद्धा 04 अब्ज 95 लाख 72 हजार रुपयांचा बोजा पडतो आहे. या व्यतिरिक्त माजी आमदारांचे पेन्शन वेगळेच. 30-35 वर्ष सेवा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला जेवढे पेन्शन भेटते साधारणपणे त्याच्या दुप्पट फक्त 05 वर्ष आमदार म्हणून निवडल्या गेलेल्या नोकराला भेटते.
           मग अशा वेळी तुमचे कर्तव्य आहे का नाही ? शासनाला जाब विचारण्याचे. येणाऱ्या काळात महागाई वाढणार आहे. नागरिकांकडे पैसे येणार नाहीत मग कसे करणार. विविध वस्तूंचे दामदुप्पट भाव वाढत आहेत. ते खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसा कुठून आणणार ? शासन तुमच्या पाल्याच्या शाळेत फिस देण्यासाठी सवलत देण्यात यावी असे आदेश देतंय. फिस वाढवायची नाही असं सांगतंय. पण सवलत म्हणजे काय ? तर ती टप्प्या-टप्प्याने भरन्यास संधी द्यावी. पण हे टप्प्या-टप्प्याने भरण्यासाठी प्रत्येकाकडे पैसे उपलब्ध होतीलच कशावरून ? शाळा आपली फिस वाढवणार नाहीत पण वाढीव खर्च कसा काढायचा त्यासाठी कोणती शक्कल लढवून पैसा उकळायचा हे शाळाव्यवस्थपकाना चांगले जमते त्याबद्दल तुम्ही निश्चित रहा.
         या सर्व बाबी घडत आहेत त्या तुमच्या-आमच्याशी संबंधित आहेत. याला जबाबदार शासन आहे. प्रत्येक शासन तसेच असते असे म्हणून हात वर करण्यापेक्षा जाब विचारून शासनाला अद्दल घडवणं गरजेचं आहे. तुम्ही जर जाब विचारला नाहीत तर नक्कीच प्रत्येक शासन सारखेच राहील. व तुम्हाला लुटत राहतील.
      अमेरिकेत वर्णवादावरून जो हिंसाचार घडला त्यात राष्ट्रध्यक्षाला लपून बसावे लागले. एवढी ताकद या लोकशाहीत नागरिकांना प्राप्त झाली आहे. या तुमच्या ताकदीचा तुम्हाला अंदाज येणार आहे का ? म्हणून आता सावरा स्वतःला आणि हे राजकारणापासून आम्ही दूर राहतो असं म्हणणं सोडून द्या. 
          तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी आता लढायची गरज नाही. फक्त शासन जे अमलबजावणी करत आहे. त्याबद्दल जागृत राहून शासनावर दबाव आणायचा आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाकडून परदेशी शिक्षणासाठी उत्पन्न मर्यादा लागू केली होती. आंदोलनानंतर ती स्थगित करण्यात आली. ती स्थगित झाली रद्द नाही. अशा प्रत्येक बाबीवर नागरिक म्हणून तुम्हाला तुमची भूमिका बजावावी लागणार आहे. स्वतःला सावरा आणि ठरवा खरंच तुम्ही राजकारणाबद्दल बोलताय का तुमच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या शासनाबद्दल ?

    ©️ जी.संदीप (गोणार,नांदेड)
               9552803980

Monday, June 1, 2020

आम्हाला मेड इन इंडिया हवंय ?



         " आम्हाला मेड इन इंडिया हवंय ? "

      #चीन मार्फत भारतात काही #कुरघोडी घडतात तेव्हा एकमताने बहुसंख्य नागरिकांचा एक सूर सोशल मीडियावर फिरायला लागतो. की चीनच्या वस्तूंची होळी करायची व भारतीय वस्तूंचा स्वीकार करायचा. तसंच काही वातावरण सध्या देशभर पसरलेलं आहे.
     जानेवारीत देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्यानंतर आपल्या चाचण्यांच प्रमाण कमी त्यामुळं त्यानंतर मार्च पर्यंत रुग्ण आढळले नाही. मार्च मध्ये रुग्ण संख्या वाढायला लागली, त्यातच हा व्हायरस चीनने प्रयोगशाळेत तयार केला अशी चर्चा सुरु झाली. मग काय चीन म्हटल्यावर तर आमची #आग भडकली व सुरु झाली आमची सोशल मीडियावर वरील #मोहीम
" #चिनी #वस्तू #नाकारा #स्वदेशीचा #स्वीकारकरा." हि मोहीम राबवणाऱ्यांना #वास्तवाचं काहीही भान नाही. राजकीय लोकांनी सांगितलं म्हणून निघाले हे #बोटाने टायपायला. 
        ज्या चीनच्या वस्तू नाकारायचे असं आपण म्हणतो त्या चीनचा आणि आपला व्यवहार कसा आहे हे थोडं पाहूया. देशातील सर्वात मोठा बाजार हा चीनने व्यापला आहे. त्याला #कारणीभूत कोण ? हे #सत्ताधारी. 2019 पर्यंतची चीन ची भारतातील #आयात व #निर्यातीचा आकडा देतो चीनच्या वस्तूंचा विरोध करणाऱ्यांनी तो खास करून लक्षात घ्यावा. 2019 ची चीनची भारतातील गुंतवणूक म्हणा किंवा आयात म्हणा ती आहे $ 74.72 billion (56,23,61,40,00,000 एवढे भारतीय रुपये) व त्याच वर्षीची निर्यात (म्हणजे भारताकडून चीनने खरेदी केली) $17.95 billion ( 13,51,23,11,25,000 भारतीय रुपये) जवळपास चार पट गुंतवणूक चीन भारतात करतो आणि तेही केंद्रशासनाच्या मदतीने.
        आपला मोबाईल चायना फ्री आहे का ? असा एक संदेश सध्या व्हायरल होतोय. त्यातून आपल्या #मोबाईल मध्ये चायना चे अँप आहेत का असतील तर ते डिलीट करावेत या साठी हि मोहीम राबवली जातेय असं समजत. पण ही मोहीम कोणी सुरु केली का केली याबद्दल काहीही कल्पना नाही. चीनच्या विरोधातील मुद्दा आहे तर करा सपोर्ट या भावनेनं तो संदेश पुढं पसरत जातोय. चीन च्या अँप ले विरोध करणाऱ्यांसाठी काही खास भारतीय अँप च्या आर्थिक गुंतवणूक दारांबद्दल खाली माहिती देत आहे. वाचून लक्षात घ्यावे.
           त्यासोबतच आपण ज्या #इंडियनकंपनीचा गवगवा करता त्यातील प्रमुख कंपन्यांमध्ये चीनमधील कंपन्यांचे शेयर्स आहेत.
त्यात,
01) पेटीएम-
               मुख्य कार्यालय: नोएडा
                संस्थापक।    :  विजय शेखर शर्मा
     चीन मार्फत गुंतवणूक : 625 मिलियन       
                                      डॉलर(alibaba)

02)हाईक-
               मुख्य कार्यालय : नवी दिल्ली
                संस्थापक       : कवीण भारती मित्तल
     चीन मार्फत गुंतवणूक   : 1.4 बिलियन डॉलर
                             
03) स्नॅपडील-
       मुख्य कार्यालय :  नवी दिल्ली
        संस्थापक       :  कुणाल बहाल,रोहित बन्सल         
 चीन मार्फत गुंतवणूक : 1.58 बिलियन डॉलर

04)ओला-
             मुख्य कार्यालय: बेंगलुर
              संस्थापक।    : भाविष अग्रवाल
     चीन मार्फत गुंतवणूक : 36.49%   
      (tangent & soft bank group)

05) मेकमाय ट्रिप ईबीबो
             मुख्य कार्यालय: गुरंगाव(हरियाणा)
              संस्थापक।    : दीप कालरा
     चीन मार्फत गुंतवणूक : दोन चिनी कम्पनी    
                                     मार्फत 91% गुंतवणूक.

            हि काही प्रमुख देशी कंपन्यांमधील चीनची गुंतवणूक. 
       हि झाली आकडेवारी पण चीन भारताला नेमकं काय विकते आणि काय घेऊन जाते त्त्यातील काही मुख्य वस्तूंची यादी पुढीलप्रमाणे: 
     भारताची आयात (म्हणजे चीनकडून घेतो) :  
* इलेक्ट्रॉनिक उपकरणे: billion 16 अब्ज
* मशीन्स, इंजिन, पंप: $9.8 अब्ज
* सेंद्रिय रसायने: .$6.3 अब्ज
* खतेः $ 2.7 अब्ज
* लोह आणि स्टील: $ 2.3 अब्ज
* प्लास्टिकः ics 1.7 अब्ज
* लोह किंवा स्टील उत्पादने: $ 1.4 अब्ज
* रत्ने, मौल्यवान धातू, नाणी: $ 1.3 अब्ज
* जहाजे, नौका: $ 1.3 अब्ज
* वैद्यकीय, तांत्रिक उपकरणे: billion १.२ अब्ज

भारताची निर्यात (चीनला देतो):

* कापूस: $ 3.2 अब्ज
* रत्ने, मौल्यवान धातू, नाणी: $ 2.5 अब्ज
* तांबे: $ 2.3 अब्ज
* ऑरेस, स्लॅग, राखः $ 1.3 अब्ज
* सेंद्रिय रसायने: $ 1.1 अब्ज
* मीठ, सल्फर, दगड, सिमेंटः $ 958.7 दशलक्ष
* मशीन्स, इंजिन, पंप: $ 639.7lmillion
* प्लास्टिकः $ 499.7 दशलक्ष
* इलेक्ट्रॉनिक उपकरणे: $ 440 दशलक्ष
* फोर्स्किन्स वगळता रॉ लपविला जातो: $ 432.7
                      (Source wikipedia

         आदी बाबी दिल्या आणि घेतल्या जातात.या सर्व बाबींचा विचार करता असे लक्षात येते की, आयात जास्त आणि निर्यात कमी आहे. भारत आणि चीन यांचा करार झाला आहे त्यानुसार हा व्यवहार चालू आहे. नियमित करारानुसार जर व्यवहार चालू असेल तर मग आपण कोणाचा विरोध करतोय ? देशात चिनी कम्पन्या आपले उत्पादन तयार करतात त्यावर made in india चा शिक्का असतो. मग हे उत्पादन स्वीकारणार का नाकारणार ? हा सर्व व्यवहार पाहून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे.
       आपण चिनी मालाचा विरोध करतो म्हणजे आपल्या व्यापाऱ्यांवर आपण संकट ओढवून घेतोय. देशात सीमेवरून माल #आयात झाला. त्याची #किंमत चीनला पोहचली. मग तो माल भारतात आल्यानंतर त्यामुळं होणारा नफा किंवा तोटा हा स्थानिक व्यापाऱ्यांना होणार. मग यात चीनचे काय नुकसान ? त्यामुळं स्थानिकांनी #चीनच्या वस्तू किंवा मालाला विरोध करण्या ऐवजी तो माल देशात येणार नाही. याबद्दल शासनावर #दबाव आणावा लागेल. तसं तुम्ही करणार नाही. कारण , राजकारणात आम्हाला इंटरेस्ट नाही म्हणून हात वर करणार. पण हे राजकारण नाही तर शासन आहे . या शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण हे सामान्यांचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने आम्हा सर्वांना दिला आहे तरी सुद्धा आम्ही त्याचा वापर करत नाही. आणि #लढत बसतो #स्थानिक स्तरावर. देशात चीनचा कोण-कोणता माल येतो हे आपण काही प्रमाणात। पाहिलं. एक खास मुद्दा सांगायचा म्हणजे देशातील चीनकडे 0.2% निर्यात कमी झाली. कारण काय तर भारताकडून दर्जेदार माल येत नाही. घ्या आता आपण चीनला दर्जेदार माल देत नाही. म्हणजे देशात केंद्रशासनाच्या परवानगीने येणारा माल हा  दर्जेदार आहे असं चीनच शासन म्हणते. आणी आपण मिरवतो कि, "चीनच्या मालाची काही खात्री नसते." त्यांनी तर तुम्हाला चुना लावला आणि तुम्ही इकडे खुश. 
        एक फोटो या सोबत शेयर केलाय. ते उत्पादन तयार करणारी कंपनी चीनची पण ते उत्पादन तयार झालं भारतात मग हे उत्पादन आपण खरेदी करायचं का ? कारण तुम्हाला "made in india"पाहिजे ना म्हणून विचारलं? नेमकं काय स्वीकारायचं हे आता तुम्हीच ठरवा.
        देशात तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. या तरुणाईला धर्म आणि जातीच्या नावावर लढायला भाग पडतोय इथला राजकारणी आणि विकासाला दूर लोटतोय. आधुनिक तंत्रज्ञान विदेशातून मागवतोय कच्चा माल त्यांना देतोय. पण जर भारतानेच कच्चा माल व  तरुणाई चा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य वापर करून घेतला तर देश बाजारपेठ का बनेल देश सुद्धा निर्यातदार होईल. याची जाणीव तुम्हा नागरिकांना होणं गरजेचं आहे. हे जेव्हा होईल तेव्हा शासन चिनी वस्तू नाकारेल व आपल्या निर्माण केलेल्या वस्तू निर्यात करेल. हे आपण करू शकतो. तेवढं मनुष्यबळ, आर्थिक रसद, आधुनिक तंत्रज्ञान, नवं-नव्या कल्पनांचा तरुण वर्ग देशात मुबलक प्रमाणात आहे. तरुणाईला दर्जेदार शिक्षण देऊन, धर्माच्या नावावर रस्त्यावर उतरवणे थांबले तर हे नक्कीच घडेल, पण असं जर घडलं तर येणाऱ्या काळात या राजकीय लोकांना कोण किंमत देईल ?
         या सर्व बाबींची जाण आजच्या तरुणाईने करून घ्यावी देव, धर्म किंवा जातीने आपला विकास होणार नाही. आपला विकास होण्यासाठी दर्जेदार शिक्षणाची गरज आहे. ते शिक्षण शासनाने उपलब्ध करून द्यावे यासाठी झगडा. सोशल मीडियावर धर्म, जातीच्या नावाने भांडण करत बसण्यापेक्षा मूलभूत हक्कांच्या संदर्भात लढाई सुरू करा. सोशल मीडिया हा टाइमपास करण्यासोबतच तुमचे आयुष्य आनंदी करण्यास व देशाच्या विकासात हातभार लावण्यास मदत करतो. त्यामुळं घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच बिनडोक पणे प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य-अयोग्य बाबीचा विचार करून आपले पाऊल उचलावे. व घडत असलेल्या गोष्टीत जर शासनाचा सहभाग असेल त्याचा जाब शासनाला विचारावा व या विदेशी मालाची होळी करण्याचा धंदा थांबवावा. हि वेळच आपल्यावर येणार नाही याची खबरदारी घ्यावी. तेव्हाच तुम्हाला #मेडईनइंडिया भेटेल. #अन्यथा मेड ईन इंडिया हे एक #सोंग ठरेल.

©️ जी.संदीप (गोणार,नांदेड)
           9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...