भारतात कोठेही असलास, कोणत्याही जाती धर्मातील असलास, कितीही गरीब अथवा श्रीमंत असलास तरी तुझी किंमत कमी होणार नाही. वरील कोणत्याही गोष्टीवरून किंमत कमी जास्त होणार नाही. किंवा एखाद्याला जास्त किंमत मिळणार नाही. हा सन्मान तुला लोकशाहीने दिला आहे. सरपंच ते लोकसभा सदस्य निवडणूक कोणतीही असो, उमेदवार तुझ्या दाराला येतो, तू गरीब आहेस किंवा खालच्या जातीतला आहेस म्हणून तो तुझा सन्मान करणार नाही असं नाही. गावातील गडगंज संपत्ती असलेला व्यक्ती असो अथवा प्रचलित स्वघोषित उच्च कुलीन जातीतील व्यक्ती असो अथवा फुटपाथवर आपल आयुष्य जगणारा सामान्य भिकारी असो, या सर्वांना समान स्थरावर आणणारी ताकद म्हणजे मताधिकार होय.
लोकशाहीत मताचा अधिकार तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य हे नशीब किंवा तळहातावरील रेषा ठरवण्याचा काळ 1956 सालीच नाहीसा झाला. एक नविन बळ तुमच्या एका बोटात संविधानाने दिलं तो अधिकार सन्मानाने बजावा. तुमचं भविष्य उज्वल घडवण्यासाठी हा मताधिकार आहे.
भावकीतील उमेदवार आहे, एक कोंबडी आणि दारूची बॉटल आठ दिवस तुला भेटते म्हणून, धर्मासाठी ते मोठ मोठाले मंदिर बांधतील, धर्माच्या नावावर अन्नछत्र सुरू करतील, तुला फुकटच खायला देतील, तुला तुझ्या कुटुंबाला सबसिडी च्या नावावर पैसे देतील. हे असल सगळ तुला स्वतः कमवता येते, धर्माची श्रद्धास्थान निर्माण करणं हे धर्माचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे. ते उभारण्यासाठी आपण सक्षम होऊ एवढं कवण्याच सामर्थ्य आणि साधने उपल्ब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी असते हे तू ओळख आणि असे धर्म, मटण दारू, फुकटचे पैसे देणाऱ्या उमेदवाराला तू तुझ मत कधीचं देऊ नकोस.
आज तू मला वर्षाला 12000, मोफत राशन मिळत आहे, मझ्या धर्मातील देवांचे मंदिरे बांधली जात आहेत, याची जाणीव ठेवून तू मतदान करशील तर तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श ठेवशील.
आयुष्यात जन्म घ्यायचं सत्ताधारी जे फुकट देतील त्यावर जस जमेल तस आयुष्य जगायचं. स्वतः कष्ट करण्याच्या संधी ची मागणीच करायची नाही का ? देशात तरुण वर्ग म्हणून मिरवत असताना तो तरुण सोशल मीडियावर आपल नको ते मत व्यक्त करून वाद घडवून आणत असेल आणि त्यातच तो गुंग राहत असेल तर मग त्याच्या आयुष्यच काय होणार ? आज आई वडील म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत उचलाल पण त्यानंतर त्याच आणि त्याच्या कुटुंबाच काय होणार ? नशिबावर सोडून देणार का ?
तुमच्या येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ द्यायचा नसतील, सन्मानच जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा. खाजगी शिक्षण नाही तर शासकीय शिक्षणाचे मार्ग खुले झाले पाहिजेत याकडे लक्ष द्या. शासनाने नागरिकांना फुकट काही देण्यापेक्षा त्यांच्यात कमवण्याच बळ आलं पाहिजे. उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणानुसार रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण करण हे सर्व शासनच काम आहे. तुमच्या नशीबाचा यात काहीच दोष नाही. नशिबावर दोष देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम व्यवस्थेने केले आहे.
या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्हाला शिक्षनापासून दूर ठेवलं जातं. शिक्षणात तुमच्या बुद्धीचा विकास होणार शिक्षण दिलं जातं नाही ? तुम्ही कारकुनी कर्मचारी व्हाल हीच व्यवस्था निर्माण केली जाते ? त्या व्यवस्थेत तुम्ही नशिबाला दोष देऊन मोकळे होता.
असं होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तुमचं सन्मानाच आयुष्य जगायचं असेल तर आज संकल्प करूया, मी माझ मत कोणत्याही परिस्थिती विकणार नाही, मी माझं मत धर्माच्या नावावर कधीच देणार नाही, मी माझं मत त्याच उमेदवाराला देईल जो इथल्या नागरिकाच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबत त्याच्या साठी शिक्षणाच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल, कोणत्याही पद्धतीचं कोणतीही गोष्ट फुकट देणार नाही, वस्तूची किंमत चार रुपये ठेवून सबसिडी च्या नावावर एक रुपया देऊन आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाजारातील कोणतीही वस्तू योग्य त्याच दरात मिळेल, त्या वस्तूच्या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्याला योग्य दर दिल्या जाईल. देशातील कोणताही कामगार असो वर्ग एक ते वर्ग चार किंवा संघटित असंघटित कामगार असो या सर्वांना समान सन्मान देण्याची व्यवस्था जे शासन करेल त्यांनाच या मताधिकाराद्वारे निवडून देईल. अन्यथा त्या शासनाला मी सत्तेत संधी देणार नाही.
असा विचार कराल तरच संविधानाने तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा सन्मान होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सन्मान मिळेल. लोकशाहीची योग्य वाटचाल सुरु राहील. पर्यायाने समृद्ध भारत घडेल भारतातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगेल. भारतातील प्रत्येक नागरिक जर सन्मानाने जगाला तर देशाचा जि.डी.पी. उचावेल सोबतच दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल मग देश सुजलाम सुफलाम होण्यापासून कोण रोखेल ?
हे सर्व घडण्यासाठी तुम्ही एक मतदार राजा आहात म्हणून तुम्ही तुमची योग्य जबाबदारी पार पाडा.
©जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980
%20(7).jpeg)
%20(5).jpeg)
%20(4).jpeg)