Sunday, June 4, 2023

हा आम्हाला एक व्हायचं नाही.

फोटो - गूगल साभार...


माझ मला दुकान सुरू करून,

माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा आहे.

माझा मला दबाव गट निर्माण करून,

माझी ताकद मला वाढवायची आहे.


समाजाच्या नावाने राजकारणात आणि प्रशासनात,

माझ्याबद्दल भीती निर्माण करायची आहे.

माझं कोणतेही काम नावावरून झालं पाहिजे

बाकी समाजाचं आणि माझं देणं घेणं काय आहे ?


समाजाच्याच नावावर मी येईल पुढं,

पण समाजाचं मला काही तेवढं देणं घेणं नाय,

ज्या समजाला बाबासाहेबांनी सगळ काही दिलेलं असताना,

त्यांच्यासाठी लढण्यात आता काही अर्थ उरला नाय.


तरुण मुलं मुली भरकटलीत रिल्स आणि प्रेमाच्या मागे

बेरोजगार धावतोय आपल्या नशिबाच्या मागे

मग आम्ही तरी कोणासाठी एक व्हायचं

ते पण नेमकं कोणाच्या मागे ?


आम्हाला आमचे दुकान थाटू द्या,

चार पैशासाठी बड्या राजकारण्यांची गुलामी करू द्या.

तुम्हाला जरी वाटत असल आम्ही त्यांची गुलामी करत आहोत,

तरी तुम्हाला बिनधास्त काहीही वाटू द्या.

कारण आमच्या आयुष्यात जे सुख येतंय, 

त्या पुढं त्या गुलामीला विसरून जाऊ द्या.


अन्याय अत्याचार घडले समाजातील कोणावर,

तर तिथं पुढं पुढं आम्हालाच राहू द्या.

अन्याय झालेल्या कुटुंबाची सहानुभूती,

आम्हाला जास्तीत जास्त कमवू द्या.


त्या कुटुंबाचं नंतर काय होईल,

त्यांचं पुनर्वसन आणि अन्य सर्व खड्ड्यात जाऊ द्या.

आम्ही त्याच सांत्वन करायला समोर होतो,

याच क्रेडिट आमच्या नावावर आम्हाला जमा करू द्या.


आमचा ठराविक असा उत्पन्नाचा स्त्रोत नसताना,

व्यवसाय क्षेत्रात आम्हाला जम बसवू द्या.

त्याच आलेल्या पैशातून चार पैसे पीडितांना देऊन,

समाजासाठी काम केल्याचा मान आम्हाला घेऊ द्या.


एकत्रित येण्यात काही नाही पडलंय,

एकत्रित येऊन कोणीतरी एखादाच मोठा होणार हे तुम्हाला नाही कळणार.

त्या पेक्षा असे विभागून राहिलेलं किती बरे आहोत हे आम्हीच जाणतो,

सगळे दलाली करून प्रत्येक दिवशी समाजाला विकूनच मोठे होणार.


त्यामुळं समाजावर अन्याय होत राहू द्या,

आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत,

तुम्हाला हवी असेल जरा आर्थिक मदत

ती आमच्या पध्दतीने आम्ही करायला तयार आहोत.


एकतेच्या नावाने एकत्रित येऊन बैठका घेऊ सदैव

पण एक होण्याचं स्वप्न पाहू नका तुम्ही कधीही,

एक होण्याचं नियोजन होऊ देणार नाही आम्ही,

अस सदैव घडतंच आल आहे या आधीही.


तुम्ही भोगत रहा अन्याय अत्याचार,

आम्ही आवाज उठवायला रस्त्यावर येऊ.

तुम्हाला न्याय मिळो अथवा ना मिळो,

आम्ही मात्र आमची पोळी शेकून घेत राहू.


एवढीच आमच्या विभागून राहण्याची चीड तुम्हाला येते तर,

कोणत्याही कार्यक्रमात बोलवून का आमचा मोठेपणा करता ?

आमच्या येण्याने मोठेपणा भेटतो अस समजून,

तुम्ही तुमचीच इज्जत चव्हाट्यावर आणता.


काही दिवसांसाठी आम्हाला डोक्यावर घेणं सोडून द्या,

कोणत्याही कार्यक्रमात बोलवन सोडून द्या,

असेल हिम्मत तर आम्ही आवाज दिल्यानंतर,

तुम्ही लगेच धावत येणं सोडून द्या.


मग बघा कस आम्ही एक व्हायला सुरुवात करू,

समाजासाठी प्रामाणिक पणे लढायला सुरुवात करू,

बाबासाहेबांनी जो रथ आणला आहे समाजाचा,

त्याला योग्य ठिकाणी पोहचवून त्याचा प्रवास संपवून टाकू.


पण तुम्हाला ते जमायचं नाही

कारण आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे मनी ठसवल आहे तुम्ही,

मनात भीती निर्माण झालीय तुमच्या की,

आम्हाला मोठेपणा नाही दिलं तर तुम्हाला सुद्धा विचारेल का कोणी ?


पण आमच्या वीणा तुमचं काही म्हणजे काहीच आडत नाही,

तरी तुमचा स्वभाव काही बदलत नाही.

गटागटाने आमच्या पाठीशी उभे राहणे तुम्ही काही सोडत नाही,

तरी लाजा वाटतात का नालयाकांनो तुम्हाला,

अस म्हणायला की आमच्या समाजात एकीच नाही.

आमच्या समाजात एकीच नाही.


© जी.संदीप ( गोणार, नांदेड.)

Saturday, June 3, 2023

हत्या झाली एवढं नक्की.

     


        दिनांक 01 जून महिन्याची सुरुवात झाली आणि अक्षयच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. हत्येचे कारण काय आहेत याबद्दल वेग वेगळ्या गोष्टी चर्चिल्या जात असल्या तरी ही हत्या एकांतात झाली नाही एवढं मात्र नक्की. या हत्येच्या कारणात शेतीच्या धुऱ्याचे भांडण नाही, शेजारी घर आहेत त्यामुळं काही नियमित वाद घडत होते त्यावरून वाद नाही किंवा भवकीचा प्रश्न नाही. हा वाद घडण्यामागे आमच्यापेक्षा कनिष्ठ जातीतील व्यक्ती चा आमच्यासोबत चा व्यवहार तो तसा आमच्याशी कसा वागू शकतो ?


        जात आणि धर्म या एकाच मानसिकतेने ही हत्या घडवून आणली. मग इथे दोषी कोणाला धरायचं ? प्रत्यक्ष खून करणारा व्यक्ती का जात का धर्मामुळ निर्माण झालेली मानसिकता ? यात गुन्हा करणारा  गुन्हेगार आहेच पण त्याच्या डोक्यात ती मानसिकता आणणारी जातीय आणि धर्मीय मानसिकता सर्वात जास्त दोषी आहे. या खुनी व्यक्तीला मृत्युदंड तर होणार नाहीच, पण जरी झाला मृत्युदंड तरी ही मानसिकता संपुष्टात येणार आहे का ?


            आजपर्यंत असे हजारो हल्ले झाले, त्या हल्ल्यात कैक बळी गेले, खैरलांजी प्रकरणात आपण न्याय मिळवू शकलो नाही, पीडित कुटुंबाचा प्रमुख भैय्यासाहेब भोतमांगे कालांतराने कालवश झाले पण न्यायासाठी शेवटपर्यंत झगडणे शक्य झाले नाही. मग अशा कैक प्रकरणात न्याय मिळेल याची अपेक्षा तरी कशी करणार ?


       हा खून सुद्धा जातीय मानसिकतेतून घडलेला आहे. ही मानसिकता अद्याप का संपत नाही हा मोठा प्रश्न आहे ? काही मित्र म्हणतील आता तेवढं जात मानली जात नाही मित्रा, अशा सर्व मित्रांना माझा एकच प्रश्न एका जातीच इतर जातीशी असलेल्या व्यवहाराचा विचार न करता एकाच जातीतील पोटजातीचा विचार करून तुम्ही स्वतः मनाला विचारा तुम्ही पोटजातीअंतर्गत बेटी व्यवहार कराल का ? (त्यात मुलगा आर्थिक परिस्थितीने जास्त सक्षम नसताना.) या एका प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधा आणि मग ठरवा की खरच जातीयवाद संपला आहे का ?


      जातीयवाद न संपल्याचे शेकडो उदाहरण देता येतील. शहरीभागात जातीयवाद संपला म्हणत असाल तर मित्रांनो बिगर बौद्ध वस्तीत बौद्ध विद्यार्थ्यांना राहण्यास रूम मिळत नाही, फॅमिली असेल तर किरायाने घर मिळत नाही. अजून एक खास बाब त्या त्या जाती धर्माच्या परिसरातच त्या त्या जातीधर्माचे लोक राहण्यासाठी घर किंवा रूम पाहतात. मग त्या परिसरात कोणतेही पाहुणे असो अथवा नसो. असे जातीयतेच्या टोकाला जाऊन कैक उदाहरण देता येतील, स्वतः चे अनुभव पण सांगता येतील पण ते तस काही शेयर करून बाजार मांडण्यात मला काही अर्थ वाटत नाही. म्हणून प्रत्येक जाती/धर्मातील कॉमन मानसिकतेचा विचार करून हे सगळ आपल्यासमोर मांडत आहे. मग त्यात ब्राम्हण असोत, मराठा असोत की अन्य कोणत्याही जाती असोत, हे आपापसात कधीही बेटी व्यवहार करताना खूप खोलवर जाऊन विचार करतील मगच  ते बेटी व्यवहार करण्यास तयार होतील.


        अशा अन्य जातीतील व्यक्ती जेव्हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींशी काही अपवादात्मक परिस्थितीत संपर्कात येतात, तेव्हा ते या जातीयतेचा कळस गाठतात आणि असे प्रकार घडून येतात. कोरोना काळात  शहरी भागातून गावाकडे आलेला ब्राम्हण आणि मराठा मित्र तेव्हा सांगत होता मित्रा अस्पृश्यता खूपच वाईट आहे रे. आतापर्यंत कसे सहन केले असतील त्या अस्पृश्य लोकांनी ? असे बोलत बोलत व्यक्त व्हायचे. पण तेच मित्र जेव्हा आज म्हणतात की जातीयता नाही रे भाऊ तेव्हा त्यांच्या कोरोणा काळातील मानसिकतेची कीव येते.


       जातीयता ही कधीही न संपणारी मानवी समजला लागलेली कीड आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात जातीयता संपवण्याची कितीही मार्ग अवलंबले तरी ती काही संपणार नाही. अन्यायी घटना घडल्यावर तिच्या विरोधात आंदोलन करणे निषेध नोंदवणे हे तुम्ही अन्याय सहन करू शकत नाही, आमच्यावर अन्याय करू नका हे दाखवून देण्याचं द्योतक आहे. पण तुमच्या आंदोलनाने निषेधाने हा जातीयवाद संपणार नाही. जातीयवाद हा चिरकाल टिकणारा रोग आहे. जातीयतेचे पद्धत बदलत जाईल पण ती कधीच संपणार नाही.


       अशा या जातीयतेचे लाखो बळी गेले इथून पुढे पण जातीलच यात काही गैर नाही फक्त फरक आहे की तो बळी जाण्याचे कारण वेळ आणि व्यक्ती परिस्थिती वेगळी असेल. या जातीयतेचे बळी जात असताना बळी जाणाऱ्या जमातीला स्वतः ती गोष्ट स्वीकारावी लागणार आहे. कायदा जरी तुमच्या बापाचा असला तरी न्याय मिळेल ही अपेक्षा कमीच, अट्रोसिटी सारख्या प्रकरणात किती अपराधी शिक्षा भोगत आहेत याचा विचार केल्यास प्रमाण अगदी नगण्य आहे. मग अशा प्रकरणात पुन्हा जातीय द्वेष वाढत जातो. ज्या जाती जातीयतेच्या शिकार होत आहेत, त्यांनी स्वतःच कुटुंबासह स्थलांतर करून स्वतः च पुनर्वसन करून घेणं गरजेचं आहे. तरुणाईने शिक्षण आणि स्वतः च्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जातीयता वाढत आहे म्हणून आपण आपल्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या च्या काळात शिक्षण हे कागदाची डिग्री मिळवण्या साठी घेतले जात आहे उच्चशिक्षणाच्या आकडा वाढीव दिसावा म्हणून उच्च शिक्षण विभागाकडून ते शिक्षण दिलं जातं आहे अशीच परिस्थिती सध्या राज्यात आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण देत असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा चा विचार केल्यास एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. 


         त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत पीडित समाजाने शिक्षण घेणे हेच आपले विकासाचे दार आहे, हे समजून घ्यावे. त्या पद्धतीने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबत कागदी डिग्रीच नाही तर त्या शिक्षणाचा वापर सुद्धा कसा करता येईल हे समजून घेऊन, आपला प्रत्येक दिवस पार पाडावा लागेल. त्यांनी एक बळी घेतला तर आम्ही दोन बळी घेऊ म्हणणे चालणार नाही. कारण तसे घडणार सुद्धा नाही. एखाद्यावर हल्ला होत असेल तर बाकीचे सगळे बघ्याची भूमिका घेतात. हल्ला रोखायला पुढे कोणीही येत नाही. त्यामुळं भावनिक होऊन त्यांनी एक बळी घेतला तर आपण दोन बळी घेण्याची वेळ आली आहे असे म्हणणे म्हणजे आपणच पुन्हा नवीन वादाला तोंड निर्माण करून देणे होय. असे काही घडू नये याची काळजी घेणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे.


        शेवटी हा जातीयतेचाच बळी होता, मग त्याला कारण कोणतेही असो. तशी वेळ अन्य कोणावरही न येवो  ही काळजी घेऊया.


भावपूर्ण श्रद्धांजली.


©जी.संदीप (गोणार, नांदेड.)

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...