Saturday, March 28, 2026

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”


     


मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. एवढेच नाही तर गुगल ला सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये तेच नाव आहे. एवढ सगळ कशामुळे तो व्यक्ती खरंच चुकीचा वागला का ? तर त्याचे उत्तर आहे हो तो 100% चुकीच वागला. स्वतःची पत्नी असताना स्वतःच एक अस्तित्व असताना हिंदू संस्कृतीनुसार एक पत्नित्व हे आदर्शवाद असताना तो इतर महिलांशी असे असभ्य कृत्य करतो म्हणून तो गुन्हेगारच आहे. पण हा गुन्हा करण्यास त्याला सुरुवातीपासून पाठबळ देणारे किंवा त्याला अप्रत्यक्षरित्या मोठ करणारेही तितकेच गुन्हेगार आहेत त्याचं काय ?

       तो खरात जेव्हा सुरुवातीला हे भोंदूगिरीच दुकान मांडला तेव्हा त्याला समर्थन देऊन त्याच्याकडे आपल्या ओळखीतले लोक पाठवणारे गुन्हेगार नव्हेत का ? संविधान विज्ञानाची कास धरा हे सांगत असताना अशा भोंदूगिरीच्या मागे लागून अनर्थ होतो हे समजत नसेल तर त्या खरात ला दोषी ठरवून काय साध्य होणार आहे ? पुरोगामी महाराष्ट्र म्हणून शिव,फुले,शाहू,आंबेडकरांचे नाव रोज घेत असताना या चारही महापुरुषांनी कधी अशा गोष्टींना थारा दिला का ? शिवराय युद्धासाठी कोणती वेळ चांगली आहे हे बघण्यासाठी कधी कोणत्या ज्योतिषाकडे गेले काय ? स्वतःला मूल होत नाही म्हणून महात्मा फुले कधी कोणत्या बाबा बुवाकडे गेले काय ? देशावर इंग्रजांच आक्रमण असताना ते देशासाठी घातक आहे त्यांना देशाच्या बाहेर हाकलून द्यायचे असेल तर राज्यातील ज्योतिषांना बोलवून शाहू राजांनी कधी मुहूर्त पाहिला काय ? राज्यातील जनतेच्या सन्मानाच्या वागणुकीसाठी प्रयत्न करत असताना पारंपरिक रीतीरीवाज मोडून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करत असताना कधी मुहूर्त पाहिला का ? किंवा कोणत्या बाबा बुवाकडे गेले का ? बाबासाहेबांनी तर उभ्या आयुष्यात कधीच अशा गोष्टींना थारा दिलाच नाही त्याच्याहीपुढे एक पाऊल जाऊन सांगायचे म्हणजे बाबासाहेबांनी देव ही संकल्पनाच नाकारून सर्व देवच नाकारले.देवाच अस्तित्वच जर बाबासाहेबांनी नाकारलं असेल तर मग तुमच्या भीतीच भांडवल करून देवाच्या नावाने दुकान मांडून बसणाऱ्यांची दुकानदारी कायमची बंदच होईल ना ? ती दुकानदारी कायमची बंद व्हायलाच हवी होती अद्याप पर्यंत पण तसे न घडता असे खरात घडत आहेत. आधी आसाराम झाला त्यानंतर रामरहिम झाला आता हा खरात असे एक नाही हजारो भोंदू या देशात आनंदाने जगत आहेत. कारण ते तुमच्या भीतीच भांडवल करत आहेत. तुमच्या मनातून एखाद्या बाह्य शक्तीने आपलं वाईट होतेय ही भावना नाहीशी होईल तेव्हाच हे असले धंदे बंद होतील अन्यथा एक जाईल तर दुसरा तयार होईल.

          खरात च्या निमित्ताने जो मुद्दा पुढ आला आहे तो अतिशय महत्वाचा आहे की, महिलांच्या मनातील अंधश्रद्धेची आत्मियता कधी कमी होईल ? ज्या बाबाकडे तुम्ही जाता तो तुमचं शारीरिक शोषण करत असताना ते झालेलं शोषण स्वतःच्या पतीला सुद्धा सांगत नाही. ते गप्प गुमान सहन करता आणि काही कालावधीनंतर जेव्हा तुम्हाला सहन होण्याच्या पलीकडे जाईल त्यावेळी त्याबद्दल तक्रार करता. एवढा संयम बाळगायची गरजच का ? घरात एखादेवेळी सासू सासऱ्यांनी काही बोलले तर त्यांच्या तोंडावर लगेच त्यांचा अवमान करता. नवऱ्याला त्यांच्यापासून दूर करून स्वतः वेगळ राहण्याचा निर्णय घेता मग इतक्या असंवेदनशील वेळी मात्र गप्प का ? ते शांत राहणे म्हणजे तो गुन्हा करायला दिलेली तुमची मूक संमती तर नव्हे ना ?

         महिलांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून प्रबोधन सुरू असलेल्या या काळात तुम्ही स्वतःच पूर्ण शरीर त्या भोंदूच्या स्वाधीन करत असाल तर इथे दोष नेमका द्यावा कोणाला महिलांना? मानसिकतेला ? का संस्कृतीचा गवगवा करणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या प्रवृत्तीला ?

          डोक्यातून भीतीचे भूत जोपर्यंत उतरणार नाही, महिलेला मूल नाही झालं तर तिला देण्यात येणाऱ्या वागणुकीत जोपर्यंत बदल होणार नाही, तोपर्यंत असे अनगिनत भोंदू तयार होतील आणि समाजात सन्मानाने वावरतील गोष्टी उघडकीस नाहीच आल्या तर त्याच सन्मानाने ते मातीमोल सुद्धा होतील. त्यामुळं परंपरेनुसार चालत येणारी विचारसरणी बदलून जोपर्यंत प्रगल्भ विज्ञानवादी विचारसरणीच्या महिला तयार होणार नाहीत तोपर्यंत हा विध्वंस होतच राहणार यात निसर्ग नियमानुसार माफी नाहीच. वाईट कर्म कराल तर त्याचे भोग भोगावे लागतील असा गैरसमज बाळगण्याची आता तसूभरही गरज नाही. कारण खरात सारख्याच देव काहीच करू शकला नाही त्याला संविधानिक बलाने त्याला त्याची शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर देवाच्या भरोशावर सोडून दिलं असतं तर आज आसाराम आणि राम रहीम जेल मध्ये दिसले नसते. ते मुक्तपणे कैक महिलांचा आस्वाद घेत राहिले असते. त्यामुळं देव वाईट कर्माचे फळ देतो देवच आपल्या आयुष्याच चांगलं वाईट ठरवतो हा विचार डोक्यातून काढून टाकून जर एखादा भविष्य सांगणारा आलाच तुमच्या मनात भीतीची मानसिकता तयार करत असेलच तर त्याला आधी त्याची जागा दाखवा आणि असे भोंदू लोकांची मानसिकता जागेवरच ठेचून काढा.

                          © जी.संदीप (गोणार,नांदेड)

Sunday, March 8, 2026

"जयंतीचा जल्लोष की सामाजिक जबाबदारी?”


 तमाम भारतवासीयांना मानाचा स्वाभिमानाचा जयभीम,

         आपल्या आनंदाला उधाण येण्याचा महिना जवळ येत आहे. ज्यांच्या जन्मामुळे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतोय अशा महामानवाची जयंती जवळ येत आहे. हा सोहळा येणाऱ्या 14 एप्रिल रोजी विविध देशांमध्ये साजरा करण्यात येणार आहे असे अभिमानाचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात आहेत. या बाबीचा एक भारतीय म्हणून मला नक्कीच गौरव राहील. आमच्या देशात जन्मलेल्या महापुरुषांची जयंती जगभर विविध स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.

         पण ही जयंती भारतात साजरी होत असताना तिचे स्वरूप काय ? त्याबद्दल मानसिकता काय ? ती साजरी करत असताना ध्येय धोरणे काय ? ती जयंती साजरी करण्यात बाबासाहेबांच्या स्वप्नांच काय ? अशी अनेक प्रश्न मनाला भेडसावत आहेत. यातील प्रश्नांच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने जेव्हा मी विचार करतो तेव्हा वरील सर्व बाबीच आम्हाला काहीच देणं घेण नाही असे दिसून येते याच कारण म्हणजे आम्ही बाबासाहेबांची जयंती हीच आमची खरी दिवाळी असे समजतो.

          हिंदू धर्मातील धर्मांतरित म्हणून बौद्ध म्हणून 1956 साली धम्म स्वीकारल्यानंतर आपल्या सांस्कृतिक पर्यायाचे काय हा मोठा प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सुद्धा आपण हिंदू धर्माचेच सण साजरे करतो. हे सण साजरे करत असताना काही बौद्धजन विरोध करतात आणि पर्यायी सोहळ्याला हिंदू धर्माच्या सणाची उपाधी देतात. पण आपली सांस्कृतिक संस्कृती असताना किंवा कालपरत्वे सांस्कृतिक संस्कृती वृध्दिंगत करण्याकडे लक्ष न देता आहे तीच संस्कृती जोपासून किंवा हिंदूंचे सण साजरे करू नका हे सांगून आपण आपला वेळ आणि सांस्कृतिक संस्कृतीचे नुकसान करून घेत आहोत.

        1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला म्हणून आपण बौद्ध झालो. पण काही दिवसातच बाबासाहेबांचे निधन झाले आणि आपण सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मार्गावर भरकटलो. अद्यापही आपल्याला कोणत्याच क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले नाही. बौद्धिक पातळीवर आपण किंवा आपल्यातले काही बांधव उच्चविद्याविभूषित होत आहेत पण त्यांच्या त्या ज्ञानाचा आपल्यासाठी किंवा समाजासाठी हवा तसा वापर होताना दिसत नाही.

            ज्या डॉ.बाबासाहेबांच्या नावाने आपण सोहळा साजरा करतो जल्लोष करतो तो सोहळा नेमका कशासाठी असतो ? डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी केल्याने किंवा न केल्याने त्यांचे इतिहासातील स्थान कमी होणार नाही. तर मग आम्ही जयंती का साजरी करतो ? पुढील पिढ्यांना त्यांची जाणीव व्हावी बाबासाहेबांचं कार्य नवीन पिढीला कळत रहावे म्हणून ? का फक्त आम्हाला आमच्या आयुष्यात जल्लोष करायचा आहे म्हणून ?

          वरील बाबीचा विचार करता पहिल्या बाजूने विचार केला आपण तर असा प्रश्न पडतो की ? बाबासाहेबांचा संघर्ष त्यांचा विचार येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा म्हणून आपण जर हा सोहळा साजरा करत असू तर, बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आपण आपल्या समाजासाठी काही योगदान देतोय का ? कुटुंब आधी मग समाज ही भावना कितपत आपल्यात आहे ? बाल भीमाला पुस्तकांची गोडी लागावी त्यांना शिक्षणात पुस्तकांची कमी पडू नये म्हणून काळजी घेणारा बाप रामजी जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण स्वतः बाप म्हणून आज आपल्या मुलांसाठी काय करतोय ? लहान वयात लेकरू रडत असेल तर जेवण करत नसेल तर त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला जेवायला भाग पाडणारे आपण मग बाबासाहेबांची भूमिका उद्देश येणाऱ्या पिढीपर्यंत कसे पोहचवू ? असे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे आपल्या जयंती साजरी करण्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील.

        दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त जल्लोष हवा म्हणून. बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जयंतीचे स्वरूप बघितले तर सकाळी ध्वजारोहण, भोजनदान, DJ वरील रॅली आणि एखादा प्रबोधनात्मक कार्यक्रम. या स्वरूपातून जयंती साजरी करत असताना या जयंतीसाठीचे आर्थिक नियोजन पाहता या जयंतीसाठी शहरात बिगारी काम करणारा कामगार, मोलमजुरी करणारा मजूर, नोकरदार ते लोकप्रतिनिधी अशा सर्वांकडून निधी गोळा करून त्या निधीच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते. या सर्व टप्प्यांमध्ये जयंतीच्या स्वरूपाकडून ते जयंतीच्या आर्थिक नियोजनावर यात मांडणी करण्यात येणार आहे. जयंतीसाठी देणगी घेतल्यानंतर ध्वजारोहणासाठी सर्व अनुयायांनी समान देणगी दिलेली असताना सर्व अनुयायांना समान वागणूक दिली जाते का ? गरीब असेल तर त्याला दुय्यम वागणूक आणि जो आर्थिक सधन आहे त्याला उत्तम वागणूक. हा अवमान का ? गरीब आहे तो त्याला त्याची परिस्थिती आणि त्याचे विचार जबाबदार आहेत, पण त्याला समान पातळीवर आणण्याचा उद्देश तर बाबासाहेबांच्या विचारधारेचा आहे ना ? मग त्याला समनपातळीवर आणण्याचा विचार न करता त्याला दुय्यम वागणूक देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण यानिमित्ताने होत असेल तर अशा जयंती सोहळा साजरा होण्याला काही अर्थ उरेल का ?

          बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने केली जाते पण विचार देणारा आणि घेणारा यांच्यात एकमत असते का ? 

       विचार देत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून विचार सांगत असतो, पण त्या विचारावर कृतिशील प्रयोग निर्माण होईल आपल्या विचारातून काही नवनिर्माण होईल ही मानसिकता कधीच निदर्शनास येत नाही. विचार देण्यासाठी जात असताना मानधनाची डिमांड असते एक दीड तास जेवढा वेळ शक्य आहे तेवढ्या वेळेत तत्वज्ञान सांगून आपल्या पुढील वाटचालीत ते गुंग होऊन जातात. अशाने बाबासाहेबांच्या कोणत्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे ? कोणते स्वप्न साकार होणार आहे ?

         हे सर्व पाहता आपण करत असलेला हा कार्यक्रम एकप्रकाचे काही अनुयायांच शोषण आहे असे वाटते. कारण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देणगी देणारा प्रत्येक अनुयायी हा सारखा नाही. शहरात राहणारा असंघटित कामगार वर्गातील कामगार आणि ग्रामीण भागातील शेतीत राबणारा मजुरदार हा जयंती मंडळाने आकारलेल्या देणगी एवढीच देणगी देतो. जर काही वेळा एखाद्या कष्ट करणाऱ्या अनुयायाने देणगी देण्यास उशीर केल्यास त्यांना त्यांच्या तोंडावर बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव करून देऊन त्याला लाजिरवाणे करतो. हतबल होऊन तो शेवटी बाबासाहेबांच्या सोहळ्यासाठी म्हणून नाही तर बाबासाहेबांसाठी म्हणून देणगी देतो. पण दिलेल्या त्या देणगीचे आपण काय करतो ? त्याने दिलेल्या पैशाच मोल पैसेवान लोकांना नसेल पण त्याच्यासाठी ती रक्कम म्हणजे त्याच्या काही दिवसाच्या उपजिविकेची रक्कम असते तो उन्हाच्या या झळा सोसत काम करून आपल्या देणगीची पूर्तता करतो पण त्या देणगीचा योग्य विनियोग करणे हे समाजबांधव म्हणून आपली ती जबाबदारी असते. त्या जबाबदारीतून आपण त्या रक्कमेचा विनियोग करतो का ? या दृष्टिकोनातून जेव्हा जयंतीच्या जमा होणाऱ्या निधीकडे जेव्हा पाहतो तेव्हा मनाला चटका बसतो की, खरंच आपण करत असलेला विनियोग त्यातून बाबासाहेबांचे स्वप्न किंवा बाबासाहेबांचे विचार समजत रुजण्यास मदत होईल का ? उन्हाळा झळा सोसून काम करून देणगी देणारा उपासक 10 वर्षानंतर सुद्धा त्याच स्थितीत राहत असेल तर समाज म्हणून इथे आपली आणि डॉ बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांची हार आहे.

         बाबासाहेबांनी समाजाला संघटित होऊन सर्वच पातळीवर लढा देण्याची शिकवण दिली होती. मग आम्ही संघटित होऊन आम्ही आमच्या सामाजिक, धार्मिक,आर्थिक बाबीवर लढा देत आहोत का ? जयंतीसाठी जमा झालेल्या निधीतून जयंतीसाठी आवश्यक काम करत असताना आपल्या पोटाला भूक लागली तर ती भूक मिटवण्यासाठी त्या जयंतीच्या खर्चातून पैसे खर्च केले जातात. समाजासाठी योगदान देत असताना वेळ देत असताना स्वतःची भूक भागवण्यासाठी आम्ही खिशातून पैसे का सारावेत हा प्रश्न उपस्थित केला जातो ? जयंतीच्या जमा झालेल्या रक्कमेमधून काही रक्कम शिल्लक राहिली तर तीच रक्कम आपापसात वाटून घेऊन स्वतःला चतुर समजणारे महाभाग आपल्या वस्तीत आपल्या समाजात वावरताना दिसतात.मग सांगा अशाने कोणता बाबासाहेबांचा आदर्श आपण पुढे नेणार आहोत पुढील पिढीला कोणता बाबासाहेब सांगणार आहोत ?

         1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्याचवेळी हिंदू धर्मातील सर्व प्रथांचा त्याग करणे ही आपली जबाबदारी आहे का नाही ? पण आम्ही तसे न करता हिंदू धर्मातील प्रत्येक सण साजरा करतो आणि ते करत असताना मजेशीर कारणे देतो की, आपण कुठं त्यांच्या देवाला जातो आपण कुठे काही करतो फक्त आनंद म्हणून ते सण साजरा करतो. लग्नप्रसंगी हळदीचा सोहळा असो की मार्च मध्ये साजरी होणारी रंगपंचमी असो, रंगपंचमी नंतर पौर्णिमेच्या दिवशी मटण खायला भेटावे म्हणून एक दिवस आधी पौर्णिमा पकडणारे अनुयायी सुद्धा आपल्याकडे काही कमी नाहीत. एवढे सगळे घडत असताना मग आपला हा जयंती साजरा करण्याचा उद्देश तरी काय ?

       जयंती साजरा करण्याचा तुमचा उद्देश काहीही असला तरी एक बाब प्रकर्षाने जाणीव ठेवून यावेळची जयंती साजरी करा की, जयंतीसाठी जमा करण्यात येणारा निधी घेत असताना सर्वसामान्य उपासकांचा विचार करून निधी घ्या. त्यांच्या निधीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेऊन जल्लोष करण्याने आपली कोणतीही संस्कृती विकसित होणार नाही, किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामन्यांत रुजणार नाहीत. सध्याच्या पिढीला बाबासाहेब म्हणजे त्रास सहन करून आपल्याला हक्क मिळवून दिले ही फक्त शाब्दिक भावना राहिली आहे. जे चार दोन बाबासाहेबांना महत्व देऊन पुढे येत आहेत ते फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी बाबासाहेब नावाचं भांडवल करून आपली दुकानदारी लावण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळं कोणताच बाबासाहेबांचा विचार भविष्याच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणेसाठी, आर्थिक आपले धार्मिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वीकारल्या जात नाही. बाबासाहेब हे एक भांडवल आहे त्या भांडवलाचा वापर करून फक्त वैयक्तिक पातळीवर आपण आपला विकास करून घेत आहोत. यापलिकडे बाबासाहेबांचं कोणालाच काहीही देणंघेणं शिल्लक राहिलेलं नाही. बाबासाहेब आणि बाबासाहेबांचं स्वप्न याबद्दल मनात तळमळ असेल तर जातीच स्वरूप आणि जयंतीत होणारी पिळवणूक थांबवणे हे खूप महत्वाचे आहे. त्यातूनच येणारी पिढी बाबासाहेब समजून घेण्याकडे लक्ष देईल अन्यथा कागदोपत्री बौद्ध मनाने हिंदूच राहू, बाबासाहेबांच्या स्वप्नाला मात्र कायमची तिलांजली देऊ यात काहीच शंका नाही असे मला वाटते.

            © जी.संदीप (गोणार,नांदेड)

                    9552803980

Friday, February 13, 2026

"प्रेम की व्यवहार? – तरुणाईसमोरील सामाजिक द्वंद्व"







 प्रेमाचा महिना सुरू झाला आणि चाहूल लागली सर्वांना शरीरात होणाऱ्या बदलातून भावनिक भुकेमधून एक साथीदार मिळवण्याची, मिळविण्यापेक्षा मला पण माझा साथीदार आहे हे गौरवाने सांगण्याची. आजच्या युगात (GenZ) relationship Single म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अशी मानसिकता तयार होत आहे. त्या मानसिकतेतून आयुष्याच्या 13-14 व्या वर्षापासून मला समजून घेणार, मला भावनिक साथ देणार, सोशल मीडियावर मित्रपरिवारात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विरुद्धलिंगी साथीदार हवाय ही मानसिकता आज दृढ होताना दिसत आहे. या मानसिकतेतूनच विरुद्धलिंगी आकर्षण होऊन त्यातून एक नात निर्माण होतंय त्याला बेस्ट फ्रेंड किंवा मग बॉय फ्रेंड असे नाव देऊन त्या नात्याला पुढे नेले जात त्यातून प्रेम भावना वाढत जाऊन आजची पिढी प्राथमिक गरजेप्रमाणे प्रेम करणारी व्यक्ती असलीच पाहिजे अशी दृढ भावना घेऊन वावरताना दिसत आहे.

            'प्रेम' ही मानसिक भावना आहे त्या प्रेम भावनेवरच हे जग टिकून राहू शकते कोणत्याही क्षणी केलेला राग द्वेष हा माणसाच्या विनाशाचे कारण आहे. "वैर जिंकावे प्रेमाने,युद्धाने वाढते युद्ध" या उक्तीनुसार प्रेमाने पूर्ण जग जिंकू शकतो. त्यामुळं मानवी जीवनात प्रेम ही भावना अतिशय महत्वाची आहेच. त्याविना माणूस जगूच शकत नाही. माणसाच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक घटकावर तो प्रेम करायला लागला तर तो नक्कीच समृद्ध नागरिक आणि निसर्ग घडवू शकतो. प्रेमाच्या भावनेविना मानवी जीवन हे दुःखमय होऊन जाईल त्यामुळं प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात असते आहे आणि राहीलच त्याविना मानवी जीवन जगणे अशक्यच. एखादा गुन्हेगार, दरोडेखोर जरी असला तरी तो आपल्या कामावर किंवा त्याच्या ध्येयावर प्रेम करतोच.

        पण किशोरवयात आकर्षणाची निर्माण होणारी भावना आणि त्या भावनेतून जे नाते निर्माण होते त्या नात्याला दिलेले प्रेम हे नाव यात जो गोंधळ होतो तो प्रत्येक पिढीने निर्माण केलेलं एक गूढ आहे. वयोमानानुसार शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे विरुद्धलिंगी आकर्षण आणि त्या आकर्षणातून मित्रपरिवारात स्वतःची वेगळी छाप पडण्यासाठी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत जुळलेलं नातं त्या नात्याला दिलेली प्रेमाची उपमा ते नाते वैयक्तिक पातळीवर टिकवत असताना ते काहीवेळा समाधानकारक टिकते पण बरेचदा ते काही महिन्यातच संपुष्टात येते. त्यामागे मुलगा आणि मुलींची अपेक्षा कारणीभूत आहेत. नात्याची सुरुवात करताना मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यावरून (अरे बघ ना ती तुझ्याकडेच बघतेय, अगं बघ ना तो तुझ्याकडेच बघत आहे) हे नाते जुळते, ते जुळवत असताना कोणत्याच बाबीचा विचार नसतो, दृष्टीकोन नसतो, सुरुवात केली जाते भविष्यात जे घडेल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहू अशा भूमिकेतून ते नाते पुढे येते काही वेळा फक्त शारीरिक गरजेसाठी काही महिन्यासाठीच नात टिकवलं जात आणि नंतर ते नात संपुष्टात येतं. 

          नात्याची सुरुवात प्रेम या भावनेने होत असेल तर, प्रेमाने जग पण जिंकता येते असे शब्द वारंवार कानावर येत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुलं/मुली प्रेमाच्या नात्याने एकत्रित येऊन पुन्हा ही दूर का जातात ? काही तरुण तरुणींचे प्रेमाचे नाते टिकतात पण सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भावनेच्या दबावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून आत्महत्या किंवा हत्या असे प्रकार घडत राहतात. NCRB अहवालानुसार दरवर्षी साधारणपणे 250-300 गुन्हे प्रेम प्रकरणातील हत्येचे घडतात.

          काही महिन्यापूर्वी नांदेड मधील देशभर गेलेला एक हत्येचा प्रकार त्या प्रेम प्रकरणात मुलीने घेतलेली भूमिका. या प्रकरणात चर्चिल्या गेलेले काही मुद्दे जातीच्या बाहेर जाऊन प्रेम कशाला करावं ?, गुन्हेगार पोराला कोणता बाप पोरगी देईल काय ?, या मुद्द्यांमधला दुसरा जे मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे गुन्हेगाराला कोणता बाप पोरगी देईल काय ? तो मुलगा गुन्हेगार घडण्यात काही अंशी मुलीच्या वडिलांचा हात होताच ना कारण तो मुलगा मुलीच्या वडिलासोबतच काम करत होता मुलीकडच्या कुटुंबातील भाऊ वडील हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते ना ? मग एक गुन्हेगार वडील त्या मुलाला सोबत घेऊन काम करतो तो गुन्हेगार मुलीच्या गुन्हेगार वडिलांसोबत राहतो तरी मग वडील त्या मुलाला मुलगी देईल का ? असा प्रश्न का ? राहिला प्रश्न जातीच्या बाहेर जाऊन प्रेम का केलं ?

          उच्च जातीचे समजले जाणाऱ्या जातीतील मूल जेव्हा त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलीसोबत प्रेम करून लग्न करण्याचा विचार करतील तेव्हा ते लग्न लावून दिलं जात का ? लग्न लावून दिलं जात नसेल तर मग त्या मुलासोबत अन्याय्य वागणूक होते का ? याचे उत्तर नाही असेच येईल. मग खालच्या जातीतील मुलाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केलं म्हणून त्याची हत्या करणे हा कोणता न्याय आहे ? प्रेम हे भावनेचा संबंध आहे ते होत असते नियोजनबद्ध केल्या जात नाही. कारण नियोजनबद्ध प्रेम करण्याची शिकवण देण्याएवढे प्रगल्भ विचाराचे आईवडिलांचे विचार नाहीत. जिथे आईवडील आपल्या मुलांमध्ये आपल्या परिसरात विचारांची प्रगल्भता निर्माण करत नाहीत तिथे स्वतःच्या मुलावर काय प्रगल्भतेचे विचार रुजवू शकतील ? पोटजातीत विवाह व्हावेत एवढी प्रगल्भता नसलेले पालक जाती अंतर्गत विवाहास कसे मंजुरी देतील. जातीअंतर्गत किंवा पोटजातीत विवाह करत असताना मुलगा किंवा मुलगी नोकरीने उच्च पदावर आहे का हे मात्र नक्की विचारत घेतलं जात आणि तिथे सगळे विरोध गळून पडतात. शेवटी प्रेम हरते आणि व्यवहार जिंकतो.

         या सर्व व्यवहाराचा विचार करताना आजच्या तरुणाईने आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक बाजू लक्षात घेऊन प्रेमाचा व्यवहार केला तर उत्तम राहील असे वाटते. प्रेम ही संकल्पना जरी भावनिक असली तरी त्या भावनेला व्यवहाराच्या तराजूत तोलून तुम्ही व्यवहार केला तर ते प्रेम नक्कीच तुमचे होईल अन्यथा तुमचे प्रेम हे परक्याचे झाल्याविना राहणार नाही.

        प्रेम करत असताना समोरच्याची जात, धर्म, त्यांची आर्थिक पातळी आणि सामाजिक दर्जा हे पाहूनच प्रेम करावं अशी सामाजिक विचारसरणी निर्माण होत आहे असे दिसते. तुमच प्रेम हे तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा कमवण्यात किंवा सामाजिक पातळीवर वरचा असेल. जात खालची असली आणि विचारसरणी प्रगल्भ आणि सोबत आर्थिक पातळी उच्च असली की लगेच तुमचे प्रेम समाजमान्य होऊ शकते समाजमान्य जरी नाही झाले तरी कुटुंबमान्य नक्कीच होऊ शकते त्यामुळं तरुणाईने प्रेमाच्या भावनेत त्या प्रवाहात जात असताना समोरच्याची जात, धर्म, आर्थिक पातळी पाहून प्रेमाच्या होडीत प्रवेश करावा तेव्हाच ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकू शकेल. अन्यथा प्रेम संपेल किंवा प्रेमात माणूस संपेल. प्रेम चिरंकाल टिकवायचे असेल या मानवी जन्माचा आनंद घेऊन स्वतःसोबत इतरांच्या आयुष्यासाठी काही करायचे असेल तर आजच्या तरुणाईने स्वतःला विशिष्ट शिस्त लावून घ्यावीच लागेल. तरच या प्रेमरूपी सुरुवातीला एक सुंदर वळण मिळून आयुष्य आनंदी होऊ शकते.

© जी.संदीप ( गोणार,नांदेड)

           9552803980

Saturday, August 16, 2025

स्वातंत्र्य हे असे कसे ?







#Sunday_specil



एका दिवसाच्या स्वातंत्र्य दिनानातून जर बाहेर आले असाल तर या गोष्टीकडे जरा लक्ष द्या देशावर जर खरच प्रेम असेल तर स्वातंत्र्यदिनीच काय घडलं आहे याकडे पण मेंदू उघडा ठेवून पहा जरा.

        पहिले चित्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीएकमहिन्यापासून आंदोलन सुरू असते त्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही म्हणून आंदोलक स्वातंत्र्य दिनी आपले म्हणणे राजकीय नेत्याकडे घेऊन जाऊ पाहतो पण त्या आंदोलकाला स्वातंत्र्य दिनी(स्वदेशीयांच्या सत्तेत) सुद्धा अशी लाथ कमरेत बसते. प्रश्न घेऊन समोर येणे हा गुन्हा आहे ? ब्रिटिशांची सत्ता असताना असा त्रास स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्रयोध्दांना दिला जायचा पण परवाच हा प्रसंग कोणत्या गुर्मीत भारतीय जनतेला भोगावा लागला हे कळायला मार्ग नाही. मग या जनतेने आता कोणते चलेजाव चे आंदोलन करायचे आणि कोणाच्या विरोधात ? आंदोलक चुकला असेल त्याने काही चूक केली असेलच पण म्हणून या स्वातंत्र्यात त्याच्या सन्मालाला अशी लाथ घालाल काय ? ते पण त्याच्या चिमुरड्या बालकासमोर ? अरे नालायकांनो किती वर्ष स्वातंत्र्याचा उपभोग न घेता फक्त स्वातंत्र्याची गोडवे गात बसायची ? गरिबीतून वर आलेला प्रशासकीय अधिकारी सुद्धा असा गुर्मीत वागायला लागला तर लोकशाही कधीच या देशात रुजणार नाही. फक्त कागदोपत्री काही प्रमाणात चालू राहील.

         दुसरे चित्र शेतकरी आंदोलनाची दखल घेतली जात नाही हे लक्षात येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आंदोलक नदीत उडी मारून आपला जीव गमावतो. स्वातंत्र्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांसमोर जर असे करण्याची वेळ येत असेल तर या स्वातंत्र्याचा अंमल किती योग्य मार्गाने सुरू आहे यावर विचार करण्याएवढी लायकी असेलच तुमची. 

         तिसरे चित्र स्वातंत्र्य दिनादिवशीच राष्ट्रध्वज जमिनीवर रेखाटून त्यावर विशिष्ट ध्वज उभा केला जातो.(हे चित्र कुठले आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.कोणाकडे सविस्तर माहिती असेल तर कळवावे). स्वातंत्र्य दिनी अशा घटना उघडकीस येतात आणि त्यावर काहीच कार्यवाही होत नसेल तर तुमच्यात देशभक्ती किती आहे हे आपण दाखवून देताय. असा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून  ईतर कोणत्याही रंगाचा ध्वज वर असता तर हेच देशभक्तीच्या नावाने  पिपाणी वाजवणारे आज आकाश पाताळ एक केले असते. पण आज जेव्हा देशभक्तीचे ज्ञान पाजणारेच जेव्हा अक्कल गहाण ठेवतात आणि आपल्या रक्तात किती देशभक्ती आहे हे सिद्ध करतात तेव्हा मात्र त्यांच्या देशभक्तीची कीव येते.

       ऐन स्वातंत्र्यदिनी या गोष्टी घडत असताना आम्ही कोणता स्वातंत्र्य दिन साजरा केला मग ? नैतिकस्वातंत्र्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतंत्र हे काडीमोलच आहे. स्वातंत्र्याचा प्रभावीपणे अंमल व्हावा म्हणून लोकशाही स्वीकारली पण या लोकशाहीत मतदान सुद्धा धमक्या देऊन घेतले जाते. वोटर लिस्ट मध्ये मतदार दाखवून मतदार बूथ वरील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन त्यांना बाजूला सारून हवं त्या उमेदवाराला मतदान करून घेतल्या जाते. मतदानाबद्दलच हे सत्य कोणीही नाकारणार नाहीच. तरीसुद्धा प्रत्येक जण शांत राहून पाहत बसतो लोकशाहीत कोणीही निवडून आले तरी आमची चूल चालवण्यासाठी आम्हालाच कष्ट करावे लागतात असे म्हणत नशिबाला दोष देऊन बाजूला होतो.

       नशीब आणि आपली चूल चालवायला आपल्यालाच कष्ट करावे लागतात हे जेव्हा या सामन्यांच्या डोक्यातून जाईल तेव्हाच लोकशाही रुजण्यास खरी सुरुवात होईल. तुमची चूल चालवायची असेल तर त्यासाठी तुमच्या हाताला रोजगार हवा, तो रोजगार कोणता करावा यासाठीच दर्जेदार शिक्षण हवं शिक्षण. या दोन्ही गोष्टी करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. यात तुमच्या नशिबाचा काहीही हात नाही. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. हे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच आहे असे म्हणावे लागेल.

© जी.संदीप.(गोणार,नांदेड.)

         9552803980

Friday, February 14, 2025

नक्कीच असावं कुणीतरी !

 नक्कीच असावं कोणीतरी !


नक्कीच असावं कोणीतरी...

तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची

जाणीव करून देऊन

तुमचा सन्मान वाढवणार.


नक्कीच असावं कोणीतरी...

तुमच्यातील भीतीला/कमीपणाला नाहीस करून

संघर्षमय आयुष्यासाठी

तुमचं मनोबल वाढवणार


नक्कीच असावं कोणीतरी...

प्राण्यांप्रमाणे जीवन जगण्याऐवजी

प्रत्येकाला सन्मानाने जगता याव

यासाठी आयुष्याचे क्षण वेचणारं


नक्कीच असावं कोणीतरी...

मनात कल्पनेचे महाल न बांधता

संघर्षमय वास्तवाच्या झोपडीत

आयुष्याचा प्रवास आनंदाने करणार


नक्कीच असावं कोणीतरी...

पारंपरिक प्रथांना छेद देऊन

माणूस म्हणून जगण्यासोबतच

इतरांनाही तशीच प्रेरणा देणार.

              © संदीप गोणारकर..✍️ ❤️ 

                   9552803980


नक्कीच असावं कुणीतरी 

भरकट लेल्या मनाला आधार देणार 

चुकलेल्या वाटेला मार्गस्थ करणार 

सुख दुःखात प्रेमाने कुरवाळणार


                    -जगदीश गोणारकर


नक्कीच असावं कुणीतरी,

सुकलेल्या मनाला फुलवणार,

नैराश्यात बुडालेल्या अंतकरणाला

आशेचा दीपक दाखवणारं.....

                      _संजीवनी काळे


कुणीतरी असावं आपल्याला आपल म्हणणार,

आपल म्हणताना आपल्यातलं आपलेपण जपणार

कुणी तरी असावं, साद घालणार

साद घालताना हळूच लपणार...

कुणी तरी असावं.....😊

                           -विशाखा वाघमारे...


असावं कुणी तरी,


जगाने नाकारल्यावर,

आपल्याला स्वीकारनारं..!

जगाने पाठ फिरविल्यावर,

पाठीशी उभं राहणारं..!


असावं कुणी तरी,


स्वार्थाला नाकारून,

निःस्वार्थ प्रेम करणारं...

आयुष्याच्या काळरात्री,

हातात हात धरणारं...!


असावं कुणी तरी,


दबलेल्या भावनांना,

वाट मोकळी करणारं..!

फुटलाच जर अश्रूंचा बांध,

तेव्हा घट्ट मिठी मारणारं..!


खरचं असावं कुणी तरी..!


                      - उमेश राजभोज❤️✍️


नक्कीच कुणी तरी असावं

"काय झालं" आपुलिने विचारणार

सुखात दुःखात साथ देणार

कोणत्याही परिस्थितीत सोबत राहणार


नक्कीच असावं कोणीतरी...


                                 -जीवन ढगे


" नक्की च असावा कोणी तरी 


तु चल पुढ मी आहे म्हणून

हातात हात घेऊनी बळ देणारे 


नक्की च असाव कोणी तरी

संघर्षात डोळे पुसून 

यशात अभिमान बाळगणार " 

📚♥️💫


                 - प्रतीक्षा धडेकर


नक्कीच कुनितरी असाव .॥

व्याकुळलेल्या मनाला अलगद सावरण्याला

अन बेधुंद झालेल्या जगण्याला आवरायला .

नक्कीच कुनितरी असाव॥

मनातील चार गोष्टी एकायला 

अन मनातील चार गोष्टी सांगायला

नक्कीच कोनीतरी असाव

हळव्या मनाला सावरायला

अन बावळ्या मनाला आवरायला ।

नक्कीच कोनितरी असाव

                      - विलास राऊत


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या छोट्या यशावर

मनापासून आनंद मानणारं

आणि अपयशातही तुम्हाला

सांभाळून घेणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

जीवनाच्या वाटचालीत

प्रेरणा देणारं,

तुमच्या स्वप्नांना बळ देणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या सुखात सहभागी होणारं

आणि दु:खातही हात द्यायला

समोर उभं राहणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

ज्याच्याशी मन मोकळं

करता येईल,

आणि तो तुमचं ऐकून

समजून घेईल...


*प्रा.जयपाल कांबळे*

संशोधक विद्यार्थी

नांदेड

Tuesday, February 13, 2024

14 फेब्रुवारी ..?

 



आम्ही फक्त गुन्हा घडला की,
त्यावर हळहळ व्यक्त करतो.
तो का घडला, कोणी घडवला
याकडे मात्र कानाडोळा करतो.

पुलवामा घडला, अथवा असो घडवला गेला ?
पण त्यात मारले गेले आमचे सैनिक
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहने
एवढेच शिल्लक आहे का आमचे कर्तव्य नैतिक ?

त्यांच्या नावाने प्रेम दिनाच्या दिवशीच
काळा दिन साजरा केला जातो
अशा प्रतीद्वंदी दिवस साजरा करण्याने
फक्त द्वेशच मनात साठवला जातो.

नसेल साजरा करायचा प्रेम दिन
नका करू कोण तुम्हाला सक्ती केलंय ?
पण सैनिकांच्या नावाखाली
काळा दिन साजरा करण्याने काय प्राप्त केलंय ?

प्रत्येक वर्षी काळा दिन साजरा करून
सैनिकांसाठी काही हासिल झालंय का ?
काळा दिनाचा हट्ट सोडून दोषींना सजा देण्याचा विचार
कधीच डोक्यात येत नाही तुमच्या, अस का ?

सैनिकांच्या जीवांचा खरचं कळवळा आहे की
फक्त एक दिवसाची सहानुभूती दाखवायची ?
पारंपरिक संस्कृतीच्या नावाखाली,
घडत असलेल्या प्रसंगात आपली दंडेलशाही पुढं आणायची ?

ज्यांच्या बळावर हे असले थेर तुम्ही करताय
त्यांना एकदा विचारून बघा.
त्या रोड वर तेवढा शस्त्रसाठा आला कसा ?
नाही मिळणार उत्तर, पण त्यांच्या तोंडावरचे भाव नक्की बघा

मग तुम्ही समजून घ्या की,
काळा दिन किती दिवस साजरा करायचा ?
उगाच एखाद्या बाबीला विरोध करण्यासाठी,
निरर्थक का आग्रह धरायचा ?

अरे तुम्ही या दिनाला विरोध करण्याचं कारण हे तर नाही ना,
तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रियशी न असणे ?
असल काही असल तर सावरा जरा स्वतःला.
आयुष्यात प्रेमाविना काहीही टिकन अशक्य आहे,
हे समजावून सांगा मेंदू आणि मनाला.

हा प्रेम व्यक्त करण्यात त्यांचं चुकत असेल खूप काही,
म्हणून काय मग त्या दिनाला विरोध करायचा का ?
एवढाच तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवडत नसेल
तर अन्य मार्गाचा वापर करायचा ना ?

© जी.संदीप (गोणार,नांदेड)
         9552803980

Friday, February 2, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती 23-24 नांदेड.

 





शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी. 


 त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:

२. वडिलांचे संपूर्ण नाव :

३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :

४. आधार कार्ड क्र. :

५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :

६. अर्जदाराचे वय :

७. अर्जदाराचे लिंग :

८. आईचे संपूर्ण नाव :

९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :

१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :

१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :

१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :

१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :

१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )

१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:

१७. अभ्यासक्रम :

१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :

१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :

२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):

२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:

२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.

• प्रवेश वर्ष / दिनांक

• उत्तीर्ण महिना / वर्ष

• प्राप्त गुण

• एकूण गुण

याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव

• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :

• शाखा

• खातेक्रमांक

• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो

२ अर्जदाराची सही

३ जातीचा दाखला

४ आधार कार्डाची प्रत

५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.

६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.

८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :

९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :

१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .

११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :

१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :

१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला

१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :

१५ शपथपत्र / हमीपत्र :

१६ भाडे करारनामा :



रीनिवल अर्जासाठी :-

०१) चालू वर्षाचे बोनाफाईड

०२) मागील वर्षाचे गुणपत्रक

०३) जातीचा दाखला

०४) चालू वर्षाचे उत्पंनाचे प्रमाणपत्र

०५) बँक पासबुक

०६) भाडे करारनामा

०७) रूमचा जिओग्रफिकल लोकेशन असलेला फोटो

०८) मेस/भोजनालय बिलाची पावती

०९) रीनीवल अर्ज सादर करत असताना हमीपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx


शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दिनांक

1 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024. पर्यंत  महाविद्यालयात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.



फॉर्म भरण्याची दिनांक वाढवण्यात आली आहे, वाढीव दिनांक 15 मार्च 2024 आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.





प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरावा. तो भरत असताना आपल्या आपल्या मागील वर्षी दिलेल्या परीक्षेचा मार्कमेमो सोबत जोडावा.



"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...