Friday, February 13, 2026

"प्रेम की व्यवहार? – तरुणाईसमोरील सामाजिक द्वंद्व"







 प्रेमाचा महिना सुरू झाला आणि चाहूल लागली सर्वांना शरीरात होणाऱ्या बदलातून भावनिक भुकेमधून एक साथीदार मिळवण्याची, मिळविण्यापेक्षा मला पण माझा साथीदार आहे हे गौरवाने सांगण्याची. आजच्या युगात (GenZ) relationship Single म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अशी मानसिकता तयार होत आहे. त्या मानसिकतेतून आयुष्याच्या 13-14 व्या वर्षापासून मला समजून घेणार, मला भावनिक साथ देणार, सोशल मीडियावर मित्रपरिवारात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विरुद्धलिंगी साथीदार हवाय ही मानसिकता आज दृढ होताना दिसत आहे. या मानसिकतेतूनच विरुद्धलिंगी आकर्षण होऊन त्यातून एक नात निर्माण होतंय त्याला बेस्ट फ्रेंड किंवा मग बॉय फ्रेंड असे नाव देऊन त्या नात्याला पुढे नेले जात त्यातून प्रेम भावना वाढत जाऊन आजची पिढी प्राथमिक गरजेप्रमाणे प्रेम करणारी व्यक्ती असलीच पाहिजे अशी दृढ भावना घेऊन वावरताना दिसत आहे.

            'प्रेम' ही मानसिक भावना आहे त्या प्रेम भावनेवरच हे जग टिकून राहू शकते कोणत्याही क्षणी केलेला राग द्वेष हा माणसाच्या विनाशाचे कारण आहे. "वैर जिंकावे प्रेमाने,युद्धाने वाढते युद्ध" या उक्तीनुसार प्रेमाने पूर्ण जग जिंकू शकतो. त्यामुळं मानवी जीवनात प्रेम ही भावना अतिशय महत्वाची आहेच. त्याविना माणूस जगूच शकत नाही. माणसाच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक घटकावर तो प्रेम करायला लागला तर तो नक्कीच समृद्ध नागरिक आणि निसर्ग घडवू शकतो. प्रेमाच्या भावनेविना मानवी जीवन हे दुःखमय होऊन जाईल त्यामुळं प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात असते आहे आणि राहीलच त्याविना मानवी जीवन जगणे अशक्यच. एखादा गुन्हेगार, दरोडेखोर जरी असला तरी तो आपल्या कामावर किंवा त्याच्या ध्येयावर प्रेम करतोच.

        पण किशोरवयात आकर्षणाची निर्माण होणारी भावना आणि त्या भावनेतून जे नाते निर्माण होते त्या नात्याला दिलेले प्रेम हे नाव यात जो गोंधळ होतो तो प्रत्येक पिढीने निर्माण केलेलं एक गूढ आहे. वयोमानानुसार शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे विरुद्धलिंगी आकर्षण आणि त्या आकर्षणातून मित्रपरिवारात स्वतःची वेगळी छाप पडण्यासाठी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत जुळलेलं नातं त्या नात्याला दिलेली प्रेमाची उपमा ते नाते वैयक्तिक पातळीवर टिकवत असताना ते काहीवेळा समाधानकारक टिकते पण बरेचदा ते काही महिन्यातच संपुष्टात येते. त्यामागे मुलगा आणि मुलींची अपेक्षा कारणीभूत आहेत. नात्याची सुरुवात करताना मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यावरून (अरे बघ ना ती तुझ्याकडेच बघतेय, अगं बघ ना तो तुझ्याकडेच बघत आहे) हे नाते जुळते, ते जुळवत असताना कोणत्याच बाबीचा विचार नसतो, दृष्टीकोन नसतो, सुरुवात केली जाते भविष्यात जे घडेल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहू अशा भूमिकेतून ते नाते पुढे येते काही वेळा फक्त शारीरिक गरजेसाठी काही महिन्यासाठीच नात टिकवलं जात आणि नंतर ते नात संपुष्टात येतं. 

          नात्याची सुरुवात प्रेम या भावनेने होत असेल तर, प्रेमाने जग पण जिंकता येते असे शब्द वारंवार कानावर येत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुलं/मुली प्रेमाच्या नात्याने एकत्रित येऊन पुन्हा ही दूर का जातात ? काही तरुण तरुणींचे प्रेमाचे नाते टिकतात पण सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भावनेच्या दबावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून आत्महत्या किंवा हत्या असे प्रकार घडत राहतात. NCRB अहवालानुसार दरवर्षी साधारणपणे 250-300 गुन्हे प्रेम प्रकरणातील हत्येचे घडतात.

          काही महिन्यापूर्वी नांदेड मधील देशभर गेलेला एक हत्येचा प्रकार त्या प्रेम प्रकरणात मुलीने घेतलेली भूमिका. या प्रकरणात चर्चिल्या गेलेले काही मुद्दे जातीच्या बाहेर जाऊन प्रेम कशाला करावं ?, गुन्हेगार पोराला कोणता बाप पोरगी देईल काय ?, या मुद्द्यांमधला दुसरा जे मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे गुन्हेगाराला कोणता बाप पोरगी देईल काय ? तो मुलगा गुन्हेगार घडण्यात काही अंशी मुलीच्या वडिलांचा हात होताच ना कारण तो मुलगा मुलीच्या वडिलासोबतच काम करत होता मुलीकडच्या कुटुंबातील भाऊ वडील हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते ना ? मग एक गुन्हेगार वडील त्या मुलाला सोबत घेऊन काम करतो तो गुन्हेगार मुलीच्या गुन्हेगार वडिलांसोबत राहतो तरी मग वडील त्या मुलाला मुलगी देईल का ? असा प्रश्न का ? राहिला प्रश्न जातीच्या बाहेर जाऊन प्रेम का केलं ?

          उच्च जातीचे समजले जाणाऱ्या जातीतील मूल जेव्हा त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलीसोबत प्रेम करून लग्न करण्याचा विचार करतील तेव्हा ते लग्न लावून दिलं जात का ? लग्न लावून दिलं जात नसेल तर मग त्या मुलासोबत अन्याय्य वागणूक होते का ? याचे उत्तर नाही असेच येईल. मग खालच्या जातीतील मुलाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केलं म्हणून त्याची हत्या करणे हा कोणता न्याय आहे ? प्रेम हे भावनेचा संबंध आहे ते होत असते नियोजनबद्ध केल्या जात नाही. कारण नियोजनबद्ध प्रेम करण्याची शिकवण देण्याएवढे प्रगल्भ विचाराचे आईवडिलांचे विचार नाहीत. जिथे आईवडील आपल्या मुलांमध्ये आपल्या परिसरात विचारांची प्रगल्भता निर्माण करत नाहीत तिथे स्वतःच्या मुलावर काय प्रगल्भतेचे विचार रुजवू शकतील ? पोटजातीत विवाह व्हावेत एवढी प्रगल्भता नसलेले पालक जाती अंतर्गत विवाहास कसे मंजुरी देतील. जातीअंतर्गत किंवा पोटजातीत विवाह करत असताना मुलगा किंवा मुलगी नोकरीने उच्च पदावर आहे का हे मात्र नक्की विचारत घेतलं जात आणि तिथे सगळे विरोध गळून पडतात. शेवटी प्रेम हरते आणि व्यवहार जिंकतो.

         या सर्व व्यवहाराचा विचार करताना आजच्या तरुणाईने आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक बाजू लक्षात घेऊन प्रेमाचा व्यवहार केला तर उत्तम राहील असे वाटते. प्रेम ही संकल्पना जरी भावनिक असली तरी त्या भावनेला व्यवहाराच्या तराजूत तोलून तुम्ही व्यवहार केला तर ते प्रेम नक्कीच तुमचे होईल अन्यथा तुमचे प्रेम हे परक्याचे झाल्याविना राहणार नाही.

        प्रेम करत असताना समोरच्याची जात, धर्म, त्यांची आर्थिक पातळी आणि सामाजिक दर्जा हे पाहूनच प्रेम करावं अशी सामाजिक विचारसरणी निर्माण होत आहे असे दिसते. तुमच प्रेम हे तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा कमवण्यात किंवा सामाजिक पातळीवर वरचा असेल. जात खालची असली आणि विचारसरणी प्रगल्भ आणि सोबत आर्थिक पातळी उच्च असली की लगेच तुमचे प्रेम समाजमान्य होऊ शकते समाजमान्य जरी नाही झाले तरी कुटुंबमान्य नक्कीच होऊ शकते त्यामुळं तरुणाईने प्रेमाच्या भावनेत त्या प्रवाहात जात असताना समोरच्याची जात, धर्म, आर्थिक पातळी पाहून प्रेमाच्या होडीत प्रवेश करावा तेव्हाच ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकू शकेल. अन्यथा प्रेम संपेल किंवा प्रेमात माणूस संपेल. प्रेम चिरंकाल टिकवायचे असेल या मानवी जन्माचा आनंद घेऊन स्वतःसोबत इतरांच्या आयुष्यासाठी काही करायचे असेल तर आजच्या तरुणाईने स्वतःला विशिष्ट शिस्त लावून घ्यावीच लागेल. तरच या प्रेमरूपी सुरुवातीला एक सुंदर वळण मिळून आयुष्य आनंदी होऊ शकते.

© जी.संदीप ( गोणार,नांदेड)

           9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...