आपल्या आनंदाला उधाण येण्याचा महिना जवळ येत आहे. ज्यांच्या जन्मामुळे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होतोय अशा महामानवाची जयंती जवळ येत आहे. हा सोहळा येणाऱ्या 14 एप्रिल रोजी विविध देशांमध्ये साजरा करण्यात येणार आहे असे अभिमानाचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जात आहेत. या बाबीचा एक भारतीय म्हणून मला नक्कीच गौरव राहील. आमच्या देशात जन्मलेल्या महापुरुषांची जयंती जगभर विविध स्वरूपात साजरी करण्यात येत आहे.
पण ही जयंती भारतात साजरी होत असताना तिचे स्वरूप काय ? त्याबद्दल मानसिकता काय ? ती साजरी करत असताना ध्येय धोरणे काय ? ती जयंती साजरी करण्यात बाबासाहेबांच्या स्वप्नांच काय ? अशी अनेक प्रश्न मनाला भेडसावत आहेत. यातील प्रश्नांच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने जेव्हा मी विचार करतो तेव्हा वरील सर्व बाबीच आम्हाला काहीच देणं घेण नाही असे दिसून येते याच कारण म्हणजे आम्ही बाबासाहेबांची जयंती हीच आमची खरी दिवाळी असे समजतो.
हिंदू धर्मातील धर्मांतरित म्हणून बौद्ध म्हणून 1956 साली धम्म स्वीकारल्यानंतर आपल्या सांस्कृतिक पर्यायाचे काय हा मोठा प्रश्न आपल्यापुढे निर्माण झाला. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर सुद्धा आपण हिंदू धर्माचेच सण साजरे करतो. हे सण साजरे करत असताना काही बौद्धजन विरोध करतात आणि पर्यायी सोहळ्याला हिंदू धर्माच्या सणाची उपाधी देतात. पण आपली सांस्कृतिक संस्कृती असताना किंवा कालपरत्वे सांस्कृतिक संस्कृती वृध्दिंगत करण्याकडे लक्ष न देता आहे तीच संस्कृती जोपासून किंवा हिंदूंचे सण साजरे करू नका हे सांगून आपण आपला वेळ आणि सांस्कृतिक संस्कृतीचे नुकसान करून घेत आहोत.
1956 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला म्हणून आपण बौद्ध झालो. पण काही दिवसातच बाबासाहेबांचे निधन झाले आणि आपण सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मार्गावर भरकटलो. अद्यापही आपल्याला कोणत्याच क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले नाही. बौद्धिक पातळीवर आपण किंवा आपल्यातले काही बांधव उच्चविद्याविभूषित होत आहेत पण त्यांच्या त्या ज्ञानाचा आपल्यासाठी किंवा समाजासाठी हवा तसा वापर होताना दिसत नाही.
ज्या डॉ.बाबासाहेबांच्या नावाने आपण सोहळा साजरा करतो जल्लोष करतो तो सोहळा नेमका कशासाठी असतो ? डॉ.बाबासाहेबांची जयंती साजरी केल्याने किंवा न केल्याने त्यांचे इतिहासातील स्थान कमी होणार नाही. तर मग आम्ही जयंती का साजरी करतो ? पुढील पिढ्यांना त्यांची जाणीव व्हावी बाबासाहेबांचं कार्य नवीन पिढीला कळत रहावे म्हणून ? का फक्त आम्हाला आमच्या आयुष्यात जल्लोष करायचा आहे म्हणून ?
वरील बाबीचा विचार करता पहिल्या बाजूने विचार केला आपण तर असा प्रश्न पडतो की ? बाबासाहेबांचा संघर्ष त्यांचा विचार येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा म्हणून आपण जर हा सोहळा साजरा करत असू तर, बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवून आपण आपल्या समाजासाठी काही योगदान देतोय का ? कुटुंब आधी मग समाज ही भावना कितपत आपल्यात आहे ? बाल भीमाला पुस्तकांची गोडी लागावी त्यांना शिक्षणात पुस्तकांची कमी पडू नये म्हणून काळजी घेणारा बाप रामजी जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण स्वतः बाप म्हणून आज आपल्या मुलांसाठी काय करतोय ? लहान वयात लेकरू रडत असेल तर जेवण करत नसेल तर त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला जेवायला भाग पाडणारे आपण मग बाबासाहेबांची भूमिका उद्देश येणाऱ्या पिढीपर्यंत कसे पोहचवू ? असे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे देता येतील ज्यामुळे आपल्या जयंती साजरी करण्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील.
दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यात फक्त जल्लोष हवा म्हणून. बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जयंतीचे स्वरूप बघितले तर सकाळी ध्वजारोहण, भोजनदान, DJ वरील रॅली आणि एखादा प्रबोधनात्मक कार्यक्रम. या स्वरूपातून जयंती साजरी करत असताना या जयंतीसाठीचे आर्थिक नियोजन पाहता या जयंतीसाठी शहरात बिगारी काम करणारा कामगार, मोलमजुरी करणारा मजूर, नोकरदार ते लोकप्रतिनिधी अशा सर्वांकडून निधी गोळा करून त्या निधीच्या माध्यमातून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येते. या सर्व टप्प्यांमध्ये जयंतीच्या स्वरूपाकडून ते जयंतीच्या आर्थिक नियोजनावर यात मांडणी करण्यात येणार आहे. जयंतीसाठी देणगी घेतल्यानंतर ध्वजारोहणासाठी सर्व अनुयायांनी समान देणगी दिलेली असताना सर्व अनुयायांना समान वागणूक दिली जाते का ? गरीब असेल तर त्याला दुय्यम वागणूक आणि जो आर्थिक सधन आहे त्याला उत्तम वागणूक. हा अवमान का ? गरीब आहे तो त्याला त्याची परिस्थिती आणि त्याचे विचार जबाबदार आहेत, पण त्याला समान पातळीवर आणण्याचा उद्देश तर बाबासाहेबांच्या विचारधारेचा आहे ना ? मग त्याला समनपातळीवर आणण्याचा विचार न करता त्याला दुय्यम वागणूक देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण यानिमित्ताने होत असेल तर अशा जयंती सोहळा साजरा होण्याला काही अर्थ उरेल का ?
बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने केली जाते पण विचार देणारा आणि घेणारा यांच्यात एकमत असते का ?
विचार देत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून विचार सांगत असतो, पण त्या विचारावर कृतिशील प्रयोग निर्माण होईल आपल्या विचारातून काही नवनिर्माण होईल ही मानसिकता कधीच निदर्शनास येत नाही. विचार देण्यासाठी जात असताना मानधनाची डिमांड असते एक दीड तास जेवढा वेळ शक्य आहे तेवढ्या वेळेत तत्वज्ञान सांगून आपल्या पुढील वाटचालीत ते गुंग होऊन जातात. अशाने बाबासाहेबांच्या कोणत्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे ? कोणते स्वप्न साकार होणार आहे ?
हे सर्व पाहता आपण करत असलेला हा कार्यक्रम एकप्रकाचे काही अनुयायांच शोषण आहे असे वाटते. कारण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देणगी देणारा प्रत्येक अनुयायी हा सारखा नाही. शहरात राहणारा असंघटित कामगार वर्गातील कामगार आणि ग्रामीण भागातील शेतीत राबणारा मजुरदार हा जयंती मंडळाने आकारलेल्या देणगी एवढीच देणगी देतो. जर काही वेळा एखाद्या कष्ट करणाऱ्या अनुयायाने देणगी देण्यास उशीर केल्यास त्यांना त्यांच्या तोंडावर बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव करून देऊन त्याला लाजिरवाणे करतो. हतबल होऊन तो शेवटी बाबासाहेबांच्या सोहळ्यासाठी म्हणून नाही तर बाबासाहेबांसाठी म्हणून देणगी देतो. पण दिलेल्या त्या देणगीचे आपण काय करतो ? त्याने दिलेल्या पैशाच मोल पैसेवान लोकांना नसेल पण त्याच्यासाठी ती रक्कम म्हणजे त्याच्या काही दिवसाच्या उपजिविकेची रक्कम असते तो उन्हाच्या या झळा सोसत काम करून आपल्या देणगीची पूर्तता करतो पण त्या देणगीचा योग्य विनियोग करणे हे समाजबांधव म्हणून आपली ती जबाबदारी असते. त्या जबाबदारीतून आपण त्या रक्कमेचा विनियोग करतो का ? या दृष्टिकोनातून जेव्हा जयंतीच्या जमा होणाऱ्या निधीकडे जेव्हा पाहतो तेव्हा मनाला चटका बसतो की, खरंच आपण करत असलेला विनियोग त्यातून बाबासाहेबांचे स्वप्न किंवा बाबासाहेबांचे विचार समजत रुजण्यास मदत होईल का ? उन्हाळा झळा सोसून काम करून देणगी देणारा उपासक 10 वर्षानंतर सुद्धा त्याच स्थितीत राहत असेल तर समाज म्हणून इथे आपली आणि डॉ बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांची हार आहे.
बाबासाहेबांनी समाजाला संघटित होऊन सर्वच पातळीवर लढा देण्याची शिकवण दिली होती. मग आम्ही संघटित होऊन आम्ही आमच्या सामाजिक, धार्मिक,आर्थिक बाबीवर लढा देत आहोत का ? जयंतीसाठी जमा झालेल्या निधीतून जयंतीसाठी आवश्यक काम करत असताना आपल्या पोटाला भूक लागली तर ती भूक मिटवण्यासाठी त्या जयंतीच्या खर्चातून पैसे खर्च केले जातात. समाजासाठी योगदान देत असताना वेळ देत असताना स्वतःची भूक भागवण्यासाठी आम्ही खिशातून पैसे का सारावेत हा प्रश्न उपस्थित केला जातो ? जयंतीच्या जमा झालेल्या रक्कमेमधून काही रक्कम शिल्लक राहिली तर तीच रक्कम आपापसात वाटून घेऊन स्वतःला चतुर समजणारे महाभाग आपल्या वस्तीत आपल्या समाजात वावरताना दिसतात.मग सांगा अशाने कोणता बाबासाहेबांचा आदर्श आपण पुढे नेणार आहोत पुढील पिढीला कोणता बाबासाहेब सांगणार आहोत ?
1956 साली बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्याचवेळी हिंदू धर्मातील सर्व प्रथांचा त्याग करणे ही आपली जबाबदारी आहे का नाही ? पण आम्ही तसे न करता हिंदू धर्मातील प्रत्येक सण साजरा करतो आणि ते करत असताना मजेशीर कारणे देतो की, आपण कुठं त्यांच्या देवाला जातो आपण कुठे काही करतो फक्त आनंद म्हणून ते सण साजरा करतो. लग्नप्रसंगी हळदीचा सोहळा असो की मार्च मध्ये साजरी होणारी रंगपंचमी असो, रंगपंचमी नंतर पौर्णिमेच्या दिवशी मटण खायला भेटावे म्हणून एक दिवस आधी पौर्णिमा पकडणारे अनुयायी सुद्धा आपल्याकडे काही कमी नाहीत. एवढे सगळे घडत असताना मग आपला हा जयंती साजरा करण्याचा उद्देश तरी काय ?
जयंती साजरा करण्याचा तुमचा उद्देश काहीही असला तरी एक बाब प्रकर्षाने जाणीव ठेवून यावेळची जयंती साजरी करा की, जयंतीसाठी जमा करण्यात येणारा निधी घेत असताना सर्वसामान्य उपासकांचा विचार करून निधी घ्या. त्यांच्या निधीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेऊन जल्लोष करण्याने आपली कोणतीही संस्कृती विकसित होणार नाही, किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामन्यांत रुजणार नाहीत. सध्याच्या पिढीला बाबासाहेब म्हणजे त्रास सहन करून आपल्याला हक्क मिळवून दिले ही फक्त शाब्दिक भावना राहिली आहे. जे चार दोन बाबासाहेबांना महत्व देऊन पुढे येत आहेत ते फक्त स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी बाबासाहेब नावाचं भांडवल करून आपली दुकानदारी लावण्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळं कोणताच बाबासाहेबांचा विचार भविष्याच्या विकासासाठी, सामाजिक सुधारणेसाठी, आर्थिक आपले धार्मिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वीकारल्या जात नाही. बाबासाहेब हे एक भांडवल आहे त्या भांडवलाचा वापर करून फक्त वैयक्तिक पातळीवर आपण आपला विकास करून घेत आहोत. यापलिकडे बाबासाहेबांचं कोणालाच काहीही देणंघेणं शिल्लक राहिलेलं नाही. बाबासाहेब आणि बाबासाहेबांचं स्वप्न याबद्दल मनात तळमळ असेल तर जातीच स्वरूप आणि जयंतीत होणारी पिळवणूक थांबवणे हे खूप महत्वाचे आहे. त्यातूनच येणारी पिढी बाबासाहेब समजून घेण्याकडे लक्ष देईल अन्यथा कागदोपत्री बौद्ध मनाने हिंदूच राहू, बाबासाहेबांच्या स्वप्नाला मात्र कायमची तिलांजली देऊ यात काहीच शंका नाही असे मला वाटते.
© जी.संदीप (गोणार,नांदेड)
9552803980

Super
ReplyDeleteSuper
ReplyDeleteसमाजाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न आहे
ReplyDeleteबरोबर आहे मास्तर त्यातल्या त्यात आजच्या बौद्ध धम्म परिषदा ह्या जागृती,परिवर्तनाचे, धम्मसंस्काराचे न राहता पैसा कमावण्याचे साधन झाल्या आहेत..
ReplyDeleteएकदम वास्तव विचार मांडल्या सर जयंतीच्या नावाने dj लावून कर्णकर्कश आवाज आणि धम्मपरिषद विचार नावालाच आहेत सुधारणा कुठेच दिसत नाही जरी एखादा काही सांगीतला तर आपलेच त्याला टार्गेट करून शिव्या देतात हे सगळं थांबायला हवे.
ReplyDeleteखूप छान लेख सर...
Deleteसत्य परिस्थिती वर जागरूकता निर्माण करणारा उत्कृष्ट लेख
ReplyDeleteअप्रतिम लेख आदरणीय संदीप गोणारकर सर
ReplyDeleteतुमचा लेख वाचून खूप काही शिकायला मिळालं सर
तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद आदरणीय संदीप सर
Respected SPREM JAY BHIMCH NAMO BUDDHAY JAY SANVIDHAN JAY BHARAT JAY MAHARASHTRA EVERYONE 💕