अस्वस्थ नायक...
या कादंबरीतील नायक प्रशांत आयुष्यात एक आदर्श शिक्षक व्हायचं हे एकच स्वप्न घेऊन जगणाऱ्या तरुणाची चित्तरकथा म्हणजे अस्वस्थ नायक. आदर्श शिक्षक व्हायचं तर त्यासाठी डी.एड. करावं लागत. डी.एड. करायचं असेल तर शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा तर दोन लाखाच डोनेशन द्यावं लागत. तेवढं डोनेशन आणायचं तरी कुठून ? शेती आहे पण निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात काही पिकत नाही. शेतात पिकत नाही तर मग पैसा तरी कसा जमा होणार ? या सर्व अडचणींवर मात करून आनंदी आयुष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अल्प दरात शेती विकून डोनेशन देऊन डी.एड. करायचं ठरते. तडजोड करून 50000 रुपये फिस भरून डी.एड चा प्रवास सुरू होऊन संपतो आणि कादंबरीचा खरा प्रवास सुरू होतो.
आयुष्य जगण्यासाठी राहायला घर नाही आई - वडिलांचां सहारा नाही. गावी जायचं तर गावी काही सहारा नाही. अशा अवस्थेत शहरात एका मित्राच्या खोलीवर तिला खोली तरी कशी म्हणावं असा प्रश्न मनात निर्माण करणारी ती जुनी अडगळीतील वास्तू. पाहताक्षणीच त्यात कोणीही रहायला तयार होणार नाही अशा स्थितीत असलेल्या खोलीत, जिथे मानवाची कमी उंदीर आणि ढेकुनाची वस्ती जास्त अशा खोलीत राहून. शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी काहीतरी काम शोधणारा कादंबरीचा नायक प्रशांत.
कापडाच्या दुकानात काम मिळेल या आशेने विचारपूस करून सुरुवात करून, एका ग्रामीण भागात पैसे न घेता शिकवायला तयार होणारा आपण एक उत्तम शिक्षक होऊ या स्वप्नाने पछाडलेल्या तरुणाची ही कहाणी.
एकदा कादंबरी हातात घेतल्यानंतर पूर्ण संपवल्याविना तिला बाजूला ठेवावं असा विचार डोक्यात न येऊ देणारा नायकाचा प्रवास मनाला बधीर करून जातो. आपण बेरोजगार आहोत यात आपला दोष नसताना सुद्धा प्रत्येक स्थितीत स्वतःला सामावून घेत बेरोजगारी माणसाला काय काय करायला भाग पाडते याचे एक एक कंगोरे यात अतिशय समर्पक पणे मांडलेले आहेत.
कापडाच्या दुकानात काम करण्यासाठी प्रतिष्ठितांचे दाखले घेऊन दुकानात गेल्यानंतर गुंड, दादा, गुन्हेगार व्यक्तीचा दाखला दिसताच त्याला रोजगार नाकारणारा शेठ, सभ्य आणि होतकरू आहे अस समजून दवाखान्यात कंपाऊंडर चे काम मिळाले आणि आणि आता शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत आनंदाने जगता येईल या स्वप्नात जगत असतानाच तो जॉब सोडण्याचं आलेलं संकट.
बेरोजगारीच्या अगतिकतेचा फायदा घेत समजशिक्षाची उपाधी देत धर्माचे ठेकेदार गंगाजल विकायचे काम करायला लावतात. ते काम किती पवित्र आहे. तू जर धर्माचे काम केलास तर तुला शिक्षकाची नोकरी नक्की लागेल अशा विचाराचा ठप्पा त्याच्या मेंदूवर मारतात.आपण आतापर्यंत धर्माचं काम न केल्यामुळ आपल्याला नोकरी मिळाली नाही हे काम जर केलं तर आपल्याला नक्कीच नोकरी मिळेल अशी मानसिकता घेऊन, एक आदर्श शिक्षक होता येईल या आशेवर धर्मांध गंगाजल विकण्याच काम म्हणजेच मार्केटिंग च काम करतो. पहिल्याच दिवशी दिलेलं टार्गेट पूर्ण करतो आणि फक्त पाणी पिऊन दिवस काढत असलेल्या पोटात समाधानाचे चार घास टाकतो. पण ही परिस्थिती तरी कुठ टिकून राहते. लगेच दुसऱ्याच दिवशी बाबरी मस्जिद पाडल्यामुळे देशभर दंगल माजते. हा जो काम करत होता ते सुद्धा त्याचाच भाग होता हे या नायकाला लक्षात सुद्धा येत नाही. दंगल सुरू झाल्यामुळे त्याच्या रोजगाराचा मार्ग पुन्हा बंद होतो. पुन्हा उपासमारीची वेळ येते पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते. दंगलीत सापडल्यानंतर पोलिसांचा मार पडल्यामूळ शरीर रक्तबंबाळ होते. त्याच स्थितीत पोलीस व्हॅन मध्ये टाकून दवाखान्यात admit करतात. तिथे उपचार घेत असताना चार दिवस सुखाने जातात. वेळेवर चहा नाश्ता जेवण मिळत असते. त्यामुळं नायकाला वाटते की, आपल्या शरीची मोठी हनी व्हायला पाहिजे होती. ज्यामुळे आपण जास्त दिवस इथे राहू शकलो असतो आणि पोटा पाण्याचा प्रश्न आला नसता. दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर जिथे त्याची राहण्याची सोय झाली होती आणि त्याच काही सामान जिथे ठेवलं होत त्या धर्मकार्यालयाकडे जातो. पण ते कार्यालय बंदच असते. शहरात दंगल चालूच असते. त्या दंगलीतून स्वतः ला वाचवण्यासाठी निवारा शोधतो. पण कुठेच सहारा मिळत नाही. अशा स्थितीत तो पोलीस स्टेशन गाठतो. तिथे काही वेळ आसरा मिळाल्यानंतर पोलीस व्हॅन मधूनच त्याला शहराच्या बाहेर सोडलं जातं.
शहराच्या बाहेर गेल्यानंतर एका चर्च च्या आश्रयाला काही दिवस राहतो. तिथली सेवा, शुश्रुषा पाहून प्रभावित होतो. पण एक आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीबद्दल चर्च मधील फादर च मत ऐकून तो तिथून जायला तयार होतो. त्यावेळी फादर आणि त्याच्यात झालेला युक्तिवाद हा बेरोजगार युवकाला धार्मिक ठेकेदार कसे प्रभावित करू पाहतात हे लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाही.
हा सर्व प्रवास चालू असताना अशोक नावाचा व्यक्ती त्याला भेटत असतो. जो त्याची खडान - खडा माहिती मिळवत असतो. तो कुठे जातोय काय करतोय या सर्व गोष्टींवर त्याची नजर असते. दवाखान्यात कंपाऊंडर ची नोकरी करत असताना पेन विकणारा म्हणून तर कधी राखीव जागांच्या समर्थनातील आंदोलनात. यांच्या भेटी झालेल्या असतात.चर्च मधून बाहेर पडल्यानंतर तो थेट एका शिक्षणसंस्थेच्या सेक्रेटरी ला भेटायला जातो. नोकरीसाठी गयावया करतो पण पैशाअभावी निराशाच हाती येते. या सगळ्या आगतीकतेत तो कुठे जावं काय खावं हा विचार करत असताना त्याला अशोक ची आठवण होते. तोच जिव्हाळ्याचा माणूस त्याला वाटायला लागतो. अशोक ने दिलेला पत्ता आठवतो आणि त्याच्या दिलेल्या पत्त्यावर पोहचतो. अशोक रूम वरच असतो. दरम्यानच्या काळात काय काय घडलं ते सगळ सांगत असतो. संस्थेवरील भेटीबद्दल सुद्धा तो सांगतो आणि त्याला हे सुद्धा सांगून टाकतो की, तू ज्या सेक्रेटरी कडे गेला होतास त्याच्याकडेच उद्या जाऊन तुझी ऑर्डर घे. ही बातमी ऐकताच जणू स्वर्गच प्राप्त झाला अशा आनंदात तो स्वतःला स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जातो.
पण तो आनंद सुद्धा जास्त काळ टिकत नाही. का टिकत नाही ? पुन्हा कोणत संकट येते त्याच्यासमोर हे सगळ समजून घ्यायला, बेरोजगार तरुणाची वाताहत, त्याची जिद्दीने लढण्याची इच्छाशक्ती जाणून घ्यायला, शहरातील एका संस्थेत नोकरी मिळाली असताना सुद्धा ग्रामीण भागात मोफत शिकवण्याचा स्वीकार का करतो हे सर्व जाऊन घ्यायला मात्र कादंबरी नक्कीच वाचावी लागेल.
कादंबरीचे नाव : अस्वस्थ नायक
ले. उत्तम कांबळे
(जेष्ठ पत्रकार,संपादक,लेखक)
लेखन प्रकार:- कादंबरी.
प्रकाशन :- मनोविकास प्रकाशन पुणे.
पृष्ठ संख्या : 183
स्वागत मूल्य :- 200
परीक्षक : जी.संदीप(गोणार,नांदेड)
9552803980
No comments:
Post a Comment