Friday, July 7, 2023
Convacation फॉर्म (डिग्री फॉर्म) कसा भरावा.
Sunday, June 4, 2023
हा आम्हाला एक व्हायचं नाही.
माझ मला दुकान सुरू करून,
माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवायचा आहे.
माझा मला दबाव गट निर्माण करून,
माझी ताकद मला वाढवायची आहे.
समाजाच्या नावाने राजकारणात आणि प्रशासनात,
माझ्याबद्दल भीती निर्माण करायची आहे.
माझं कोणतेही काम नावावरून झालं पाहिजे
बाकी समाजाचं आणि माझं देणं घेणं काय आहे ?
समाजाच्याच नावावर मी येईल पुढं,
पण समाजाचं मला काही तेवढं देणं घेणं नाय,
ज्या समजाला बाबासाहेबांनी सगळ काही दिलेलं असताना,
त्यांच्यासाठी लढण्यात आता काही अर्थ उरला नाय.
तरुण मुलं मुली भरकटलीत रिल्स आणि प्रेमाच्या मागे
बेरोजगार धावतोय आपल्या नशिबाच्या मागे
मग आम्ही तरी कोणासाठी एक व्हायचं
ते पण नेमकं कोणाच्या मागे ?
आम्हाला आमचे दुकान थाटू द्या,
चार पैशासाठी बड्या राजकारण्यांची गुलामी करू द्या.
तुम्हाला जरी वाटत असल आम्ही त्यांची गुलामी करत आहोत,
तरी तुम्हाला बिनधास्त काहीही वाटू द्या.
कारण आमच्या आयुष्यात जे सुख येतंय,
त्या पुढं त्या गुलामीला विसरून जाऊ द्या.
अन्याय अत्याचार घडले समाजातील कोणावर,
तर तिथं पुढं पुढं आम्हालाच राहू द्या.
अन्याय झालेल्या कुटुंबाची सहानुभूती,
आम्हाला जास्तीत जास्त कमवू द्या.
त्या कुटुंबाचं नंतर काय होईल,
त्यांचं पुनर्वसन आणि अन्य सर्व खड्ड्यात जाऊ द्या.
आम्ही त्याच सांत्वन करायला समोर होतो,
याच क्रेडिट आमच्या नावावर आम्हाला जमा करू द्या.
आमचा ठराविक असा उत्पन्नाचा स्त्रोत नसताना,
व्यवसाय क्षेत्रात आम्हाला जम बसवू द्या.
त्याच आलेल्या पैशातून चार पैसे पीडितांना देऊन,
समाजासाठी काम केल्याचा मान आम्हाला घेऊ द्या.
एकत्रित येण्यात काही नाही पडलंय,
एकत्रित येऊन कोणीतरी एखादाच मोठा होणार हे तुम्हाला नाही कळणार.
त्या पेक्षा असे विभागून राहिलेलं किती बरे आहोत हे आम्हीच जाणतो,
सगळे दलाली करून प्रत्येक दिवशी समाजाला विकूनच मोठे होणार.
त्यामुळं समाजावर अन्याय होत राहू द्या,
आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत,
तुम्हाला हवी असेल जरा आर्थिक मदत
ती आमच्या पध्दतीने आम्ही करायला तयार आहोत.
एकतेच्या नावाने एकत्रित येऊन बैठका घेऊ सदैव
पण एक होण्याचं स्वप्न पाहू नका तुम्ही कधीही,
एक होण्याचं नियोजन होऊ देणार नाही आम्ही,
अस सदैव घडतंच आल आहे या आधीही.
तुम्ही भोगत रहा अन्याय अत्याचार,
आम्ही आवाज उठवायला रस्त्यावर येऊ.
तुम्हाला न्याय मिळो अथवा ना मिळो,
आम्ही मात्र आमची पोळी शेकून घेत राहू.
एवढीच आमच्या विभागून राहण्याची चीड तुम्हाला येते तर,
कोणत्याही कार्यक्रमात बोलवून का आमचा मोठेपणा करता ?
आमच्या येण्याने मोठेपणा भेटतो अस समजून,
तुम्ही तुमचीच इज्जत चव्हाट्यावर आणता.
काही दिवसांसाठी आम्हाला डोक्यावर घेणं सोडून द्या,
कोणत्याही कार्यक्रमात बोलवन सोडून द्या,
असेल हिम्मत तर आम्ही आवाज दिल्यानंतर,
तुम्ही लगेच धावत येणं सोडून द्या.
मग बघा कस आम्ही एक व्हायला सुरुवात करू,
समाजासाठी प्रामाणिक पणे लढायला सुरुवात करू,
बाबासाहेबांनी जो रथ आणला आहे समाजाचा,
त्याला योग्य ठिकाणी पोहचवून त्याचा प्रवास संपवून टाकू.
पण तुम्हाला ते जमायचं नाही
कारण आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे मनी ठसवल आहे तुम्ही,
मनात भीती निर्माण झालीय तुमच्या की,
आम्हाला मोठेपणा नाही दिलं तर तुम्हाला सुद्धा विचारेल का कोणी ?
पण आमच्या वीणा तुमचं काही म्हणजे काहीच आडत नाही,
तरी तुमचा स्वभाव काही बदलत नाही.
गटागटाने आमच्या पाठीशी उभे राहणे तुम्ही काही सोडत नाही,
तरी लाजा वाटतात का नालयाकांनो तुम्हाला,
अस म्हणायला की आमच्या समाजात एकीच नाही.
आमच्या समाजात एकीच नाही.
© जी.संदीप ( गोणार, नांदेड.)
Saturday, June 3, 2023
हत्या झाली एवढं नक्की.
दिनांक 01 जून महिन्याची सुरुवात झाली आणि अक्षयच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. हत्येचे कारण काय आहेत याबद्दल वेग वेगळ्या गोष्टी चर्चिल्या जात असल्या तरी ही हत्या एकांतात झाली नाही एवढं मात्र नक्की. या हत्येच्या कारणात शेतीच्या धुऱ्याचे भांडण नाही, शेजारी घर आहेत त्यामुळं काही नियमित वाद घडत होते त्यावरून वाद नाही किंवा भवकीचा प्रश्न नाही. हा वाद घडण्यामागे आमच्यापेक्षा कनिष्ठ जातीतील व्यक्ती चा आमच्यासोबत चा व्यवहार तो तसा आमच्याशी कसा वागू शकतो ?
जात आणि धर्म या एकाच मानसिकतेने ही हत्या घडवून आणली. मग इथे दोषी कोणाला धरायचं ? प्रत्यक्ष खून करणारा व्यक्ती का जात का धर्मामुळ निर्माण झालेली मानसिकता ? यात गुन्हा करणारा गुन्हेगार आहेच पण त्याच्या डोक्यात ती मानसिकता आणणारी जातीय आणि धर्मीय मानसिकता सर्वात जास्त दोषी आहे. या खुनी व्यक्तीला मृत्युदंड तर होणार नाहीच, पण जरी झाला मृत्युदंड तरी ही मानसिकता संपुष्टात येणार आहे का ?
आजपर्यंत असे हजारो हल्ले झाले, त्या हल्ल्यात कैक बळी गेले, खैरलांजी प्रकरणात आपण न्याय मिळवू शकलो नाही, पीडित कुटुंबाचा प्रमुख भैय्यासाहेब भोतमांगे कालांतराने कालवश झाले पण न्यायासाठी शेवटपर्यंत झगडणे शक्य झाले नाही. मग अशा कैक प्रकरणात न्याय मिळेल याची अपेक्षा तरी कशी करणार ?
हा खून सुद्धा जातीय मानसिकतेतून घडलेला आहे. ही मानसिकता अद्याप का संपत नाही हा मोठा प्रश्न आहे ? काही मित्र म्हणतील आता तेवढं जात मानली जात नाही मित्रा, अशा सर्व मित्रांना माझा एकच प्रश्न एका जातीच इतर जातीशी असलेल्या व्यवहाराचा विचार न करता एकाच जातीतील पोटजातीचा विचार करून तुम्ही स्वतः मनाला विचारा तुम्ही पोटजातीअंतर्गत बेटी व्यवहार कराल का ? (त्यात मुलगा आर्थिक परिस्थितीने जास्त सक्षम नसताना.) या एका प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधा आणि मग ठरवा की खरच जातीयवाद संपला आहे का ?
जातीयवाद न संपल्याचे शेकडो उदाहरण देता येतील. शहरीभागात जातीयवाद संपला म्हणत असाल तर मित्रांनो बिगर बौद्ध वस्तीत बौद्ध विद्यार्थ्यांना राहण्यास रूम मिळत नाही, फॅमिली असेल तर किरायाने घर मिळत नाही. अजून एक खास बाब त्या त्या जाती धर्माच्या परिसरातच त्या त्या जातीधर्माचे लोक राहण्यासाठी घर किंवा रूम पाहतात. मग त्या परिसरात कोणतेही पाहुणे असो अथवा नसो. असे जातीयतेच्या टोकाला जाऊन कैक उदाहरण देता येतील, स्वतः चे अनुभव पण सांगता येतील पण ते तस काही शेयर करून बाजार मांडण्यात मला काही अर्थ वाटत नाही. म्हणून प्रत्येक जाती/धर्मातील कॉमन मानसिकतेचा विचार करून हे सगळ आपल्यासमोर मांडत आहे. मग त्यात ब्राम्हण असोत, मराठा असोत की अन्य कोणत्याही जाती असोत, हे आपापसात कधीही बेटी व्यवहार करताना खूप खोलवर जाऊन विचार करतील मगच ते बेटी व्यवहार करण्यास तयार होतील.
अशा अन्य जातीतील व्यक्ती जेव्हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींशी काही अपवादात्मक परिस्थितीत संपर्कात येतात, तेव्हा ते या जातीयतेचा कळस गाठतात आणि असे प्रकार घडून येतात. कोरोना काळात शहरी भागातून गावाकडे आलेला ब्राम्हण आणि मराठा मित्र तेव्हा सांगत होता मित्रा अस्पृश्यता खूपच वाईट आहे रे. आतापर्यंत कसे सहन केले असतील त्या अस्पृश्य लोकांनी ? असे बोलत बोलत व्यक्त व्हायचे. पण तेच मित्र जेव्हा आज म्हणतात की जातीयता नाही रे भाऊ तेव्हा त्यांच्या कोरोणा काळातील मानसिकतेची कीव येते.
जातीयता ही कधीही न संपणारी मानवी समजला लागलेली कीड आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात जातीयता संपवण्याची कितीही मार्ग अवलंबले तरी ती काही संपणार नाही. अन्यायी घटना घडल्यावर तिच्या विरोधात आंदोलन करणे निषेध नोंदवणे हे तुम्ही अन्याय सहन करू शकत नाही, आमच्यावर अन्याय करू नका हे दाखवून देण्याचं द्योतक आहे. पण तुमच्या आंदोलनाने निषेधाने हा जातीयवाद संपणार नाही. जातीयवाद हा चिरकाल टिकणारा रोग आहे. जातीयतेचे पद्धत बदलत जाईल पण ती कधीच संपणार नाही.
अशा या जातीयतेचे लाखो बळी गेले इथून पुढे पण जातीलच यात काही गैर नाही फक्त फरक आहे की तो बळी जाण्याचे कारण वेळ आणि व्यक्ती परिस्थिती वेगळी असेल. या जातीयतेचे बळी जात असताना बळी जाणाऱ्या जमातीला स्वतः ती गोष्ट स्वीकारावी लागणार आहे. कायदा जरी तुमच्या बापाचा असला तरी न्याय मिळेल ही अपेक्षा कमीच, अट्रोसिटी सारख्या प्रकरणात किती अपराधी शिक्षा भोगत आहेत याचा विचार केल्यास प्रमाण अगदी नगण्य आहे. मग अशा प्रकरणात पुन्हा जातीय द्वेष वाढत जातो. ज्या जाती जातीयतेच्या शिकार होत आहेत, त्यांनी स्वतःच कुटुंबासह स्थलांतर करून स्वतः च पुनर्वसन करून घेणं गरजेचं आहे. तरुणाईने शिक्षण आणि स्वतः च्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जातीयता वाढत आहे म्हणून आपण आपल्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या च्या काळात शिक्षण हे कागदाची डिग्री मिळवण्या साठी घेतले जात आहे उच्चशिक्षणाच्या आकडा वाढीव दिसावा म्हणून उच्च शिक्षण विभागाकडून ते शिक्षण दिलं जातं आहे अशीच परिस्थिती सध्या राज्यात आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण देत असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा चा विचार केल्यास एक मोठा प्रश्न उपस्थित होतो.
त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत पीडित समाजाने शिक्षण घेणे हेच आपले विकासाचे दार आहे, हे समजून घ्यावे. त्या पद्धतीने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबत कागदी डिग्रीच नाही तर त्या शिक्षणाचा वापर सुद्धा कसा करता येईल हे समजून घेऊन, आपला प्रत्येक दिवस पार पाडावा लागेल. त्यांनी एक बळी घेतला तर आम्ही दोन बळी घेऊ म्हणणे चालणार नाही. कारण तसे घडणार सुद्धा नाही. एखाद्यावर हल्ला होत असेल तर बाकीचे सगळे बघ्याची भूमिका घेतात. हल्ला रोखायला पुढे कोणीही येत नाही. त्यामुळं भावनिक होऊन त्यांनी एक बळी घेतला तर आपण दोन बळी घेण्याची वेळ आली आहे असे म्हणणे म्हणजे आपणच पुन्हा नवीन वादाला तोंड निर्माण करून देणे होय. असे काही घडू नये याची काळजी घेणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे.
शेवटी हा जातीयतेचाच बळी होता, मग त्याला कारण कोणतेही असो. तशी वेळ अन्य कोणावरही न येवो ही काळजी घेऊया.
भावपूर्ण श्रद्धांजली.
©जी.संदीप (गोणार, नांदेड.)
Tuesday, May 16, 2023
बाजार तुमच्या दुःखाचा
आम्ही साहित्यातून
मांडतो तुमचे दुःख,
त्याचा घेऊन फायदा आम्ही
संपवतो आमचे दुःख.
तुम्ही संपता त्या दुःखातच
कालांतराने नवीन पिढी येते
ती सुद्धा त्याच दुःखात
नशीब समजून जगत असते.
मग मांडणारा सुद्धा येतो नवीन
तोही मांडतो नवीन पद्धतीने,
पण दुःख येथेही संपत नाही
पण मांडणारा जगतो आनंदाने.
पण दुःख तुमचे संपत नाही
अशा इतरांच्या प्रयत्नाने.
तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील
येथे जगण्या आनंदाने
इथं भौतिक दुःख संपवायला
अजून कोणी पैदा झाला नाही
बुद्धाने सांगितलेल्या दुःख मुक्तीचा
मार्ग स्वीकारण्याची आमच्यात हिम्मत नाही.
होऊ नका खुश्श तुम्ही तुमचे दुःख वेशीवर
टांगण्याच्या आमच्या पद्धधतीमुळं
तुम्हीच शोधा त्या दुःखाची कारणं व उपाय सुद्धा,
व स्वीकारा दुखमुक्तीचा मार्ग व्हाल दुःखमुक्त ज्यामुळ
व स्वतःच स्वतःला करा दुःख मुक्त
मग कोणी उरणार नाही
दुसऱ्याचे मांडून दुःख
आपले खिसे भरणार नाही
आणि येणारी पिढी
दुःखामध्ये जगणार नाही.
Wednesday, March 15, 2023
निवृत्तीनंतर जगण्याचं साधन : पेन्शन
मागील दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपास काही जण विरोध करत आहेत. काल वर्तमानपत्रवरील संपाच्या विरोधातील बातम्या पण निदर्शनास आल्या आहेत. संपाला पाठिंबा नसाल देत तर नका देऊ पण विरोध कशासाठी ? तुम्ही काय तुमच्या खिशातून त्यांना पेन्शन देणार आहात का ? विरोध करणाऱ्यांचा विचार केला तर त्यात जास्तीत जास्त हे सत्ताधाऱ्यांचे समर्थकच आहेत असे निदर्शनास आले आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ येत असतील तर तसे झाले नाही पाहिजे यासाठी हा प्रयत्न. मागील सरकारच्या काळात एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनात काही मागण्या घेऊन आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. त्या मागण्या हे सत्ताधारी का लागू करत नाही ? त्या आंदोलनादरम्यान केलेला सगळा अट्टाहास हा कशासाठी होता ? एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी का सत्तेसाठी ? असा प्रश्न उपस्थित होतो. पण तरीही राजकीय नेत्यांचे समर्थक एखाद्या राजकीय नेत्याने जी भूमिका घेतली तीच समर्थन करत फिरतात. राजकीय नेते हे निवडून येईपर्यंत एका राजकीय पक्षाचे असतात. पण जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक मतदारांचे प्रतिनिधी असतात मग निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा राहिलेला उमेदवार का असेना. ही बाजू समजून न घेता राजकीय नेत्यांचे तुम्ही समर्थन करत असाल तर मला वाटते की मलमुत्राचे पिवळे पाणी जर तुम्हाला मोसंबीचा ज्यूस म्हणून दिले तरी ते तुम्ही आनंदाने प्याल का काय असा प्रश्न पडतो ?
या आंदोलनाला विरोध करत असताना एक मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला तो म्हणजे यांना कोणतेही काम करण्यासाठी त्या फाईल वर वजन ठेवावे लागते मग कशाला हवी आहे पेन्शन. फाईल वर वजन ठेवावे लागते म्हणून पेन्शन देऊ नये असा विचार करणाऱ्या विचारसरणीची कीव येते. हे तर अस झालं गरज आहे मला मी कसही काम करून घेईल पण चुकीचं काम केलं म्हणून काम करणाऱ्यांना दोष देईल. पण फाईल वर वजन ठेवायला कोण तयार असतो ? तर ज्याला माहीत आहे की नियमानुसार आपल काम होणार नाही, मग ते काम होण्याची अपेक्षा करतो, त्या अपेक्षेतून स्वतः च त्या फाईल वर वजन ठेवतो. कालांतराने त्या वजनाची कर्मचाऱ्याला सवय होते आणि नवीन रुजू झालेला कर्मचारी सुद्धा त्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनतो. जर एखादा कर्मचारी व्यवस्थेचा भाग बनत नसेल तर त्याला काय त्रास होतो हे तोच जाणतो. अशा परिस्थिती प्रत्येक कर्मचारी लाच घेणारा आहे अस समजून जर विरोध करत असाल तर कीव येते तुमची आणि तुमच्या बुद्धिमत्तेची. लाच घेतली जाते हे तुम्हाला माहीत आहे तर मग लाचलुचपत विभागातील कर्मचाऱ्यांना कामाला लावता येत नाही का तुम्हाला ? सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटनाऱ्यानो स्वतःच्या डोक्यात मेंदू असेल आणि तुमचा आत्मसन्मान जागा असेल तर स्वतः ला काही प्रश्न विचारा. आयुष्यभर एका सरकारी क्षेत्रात काम कराल आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे डोळे लावून रहावं लागतं असेल तर कस वाटेल ? रिटायरमेंट नंतर येणाऱ्या पैशात आयुष्यभरात काही पाहिलेली स्वप्न पूर्ण करावी लागत असतील (घर,गाडी,मुलांची काही स्वप्ने) त्यात तो पैसा खर्च होत असेल तर मग कर्मचाऱ्यांनी उतारवयात कोणाकडे पहायचं ? येणारी पिढी उतारवयात किती म्हणून साथ देईल हे कोणी शाश्वती देईल का ? चांगल्या संस्कारात वाढलेली एक मेकांचा आदर करावा माणुसकी जपावी या संस्कारात वाढलेली आजचीच पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहेत. येणाऱ्या काळात काय होऊ शकेल याची शाश्वती तुम्हाला आहे काय ?
या सर्व गोष्टींचा विचार करून पेन्शन आंदोलनास होत असलेला विरोध हा चुकीचा वाटतो. लाच घेतल्या जाते, शासकीय कर्मचारी नियमानुसार काम करत नाहीत. या तक्रारींवर एकच उपाय आहे. जो कर्मचारी नियमानुसार काम करत नाही त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देणे.शासकीय किंवा प्रशासकीय कर्मचारी हे नोकर आहेत त्यांना जनतेच्या सेवेसाठी तिथं पाठवलं आहे याची जाणीव निर्माण करून देऊन नागरिक म्हणून आपली भूमिका आपण पार पाडणे गरजेचे आहे. लाच देणारच नसाल तर कोणी लाच घेईलच कशाला ? देशातील कोणत्याही नागरिकाने माझ कोणतेही काम नियमाने होत असेल तरच करेल अन्यथा माझे काम नाही झाले तर मी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही. असा जर निर्णय घेतला तर कशाला कोणी भ्रष्टाचार करेल आणि कशाला कोणता शासकीय कर्मचारी व्यवस्थित काम करणे सोडेल. त्यामुळं या होत असलेल्या आंदोलनास विरोध करणे हा बालबुद्धीचा प्रकार वाटतो. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळ नागरिकांना खूप त्रास होत आहे. तोच त्रास लक्षात घेऊन शासनाच्या विरोधात जनतेचा प्रक्षोभ झाला पाहिजे. शासकीय नोकरसोबतच अन्य क्षेत्रात काम करणारा प्रत्येक नागरिक हा पेन्शन चा हक्कदार आहे. देशातील प्रत्येक नागरिक आप आपल्या क्षेत्रात देशाच्या विकासात योगदान देत असतो. त्यामुळं उतारवयात सन्मानाने जगायचे असेल तर प्रत्येकाला याची जाणीव ठेवावीच लागेल.
#माझा_पेन्शन_आंदोलनास_पाठिंबा_आहे.
Tuesday, February 7, 2023
डॉ.बाबासाहेब स्वाधार योजना 2023-24, नांदेड.
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी.
त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती
१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.
बँकेची माहिती
• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
• शाखा
• खातेक्रमांक
• IFSC code
अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :
वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी दिनांक
10 फेब्रुवारी ते 04 मार्च 2023. पर्यंत समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.
Sunday, December 18, 2022
राजकारण रंगाचे.
(हा लेख धर्माच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या पण तात्विक विचार करणाऱ्यांसाठी तात्विक विचार न करणाऱ्या मित्रांनी उगच वाद घालून स्वतः चा वेळ वाया घालवू नये.)
धर्माच्या नावावर विविध मुद्दे उपस्थित करून वाद निर्माण केला जात आहे. धर्म म्हणजे उत्तम आणि आनंदी माणूस म्हणून जगण्यासाठीची नियमावली अस मला वाटते.
उत्तम माणूस व्हायचं असेल तर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती का निर्माण केली जात आहे. एकमेकांचा धर्म एकमेकांना योग्य वाटत असेल तर तुमचे धर्म माणसा-माणसात तेढ निर्माण करायला सांगतात का ? तुमचे धर्म असे माणसा-माणसात तेढ निर्माण करणारे असतील तर त्या धर्मांना आग लावा. माणूस म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर प्रेम करन त्यांचं संगोपन आणि संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आहे.
एखाद्याने व्यक्तीने कोणाएकविरुद्धा चुकीचा व्यवहार केला असेल तर त्या व्यक्तीला लगेच त्याची चूक लक्षात आणून द्या. त्या एका व्यक्तीमूळ त्या धर्माला वेठीस धरणे योग्य नव्हे ना. हिंदू धर्म मुस्लिमांचा द्वेष करतो आणि मुस्लिम हिंदूंचा. असा द्वेष केल्याने साध्य काय होणार आहे ?
*दिवसभरातील 24 तासात धर्माला आणि तुमच्या आदर्श देवाला बाजूला ठेवून पहा. मग कळेल जगण्यासाठी धर्माची खरच आवश्यकता आहे का ?* जगण्यासाठी धर्माची आवश्यकता नसेल तर मग धर्मामुळ एवढे वाद का वाढवत आहात ?
धर्म तुमच्या पोटाची भूक भागवत नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. मग ते खाजगी काम करन असो अथवा शासकीय काम असो. मग ते काम तुम्ही प्रामाणिक पने करत असता का ? चार पैशासाठी लाचारी करून चुकीचे काम करत असाल ते ते काम करण्यासाठी तुमचा धर्म तुम्हाला परवानगी देतो का ? मग अशावेळी तुमचा धर्म धोक्यात आहे अस वाटत नाही का ?
ठराविक रंगाचा वापर कुठेतरी करण्यात आला म्हणून तुमचा धर्म धोक्यात येतो ? रंगाचा आणि धर्माचा संबंधच काय एवढंच तुम्हाला रंगाचा राग येतो तर मग भगवा रंग जोडून दुसरे रंग जिथे जिथे वापरला गेला असेल ती प्रत्येक गोष्ट टाळा. आहे का हिम्मत ? प्रत्येक गोष्ट भगव्या रंगातच असेल तरच स्वीकार करा. आणि भगवा रंग इतर कोणाला वापरूच देऊ नका, कारण त्याने तुमचा अपमान होईल ? या गोष्टीचा विचार केला तर असा प्रश्न पडतो की, तुमचा धर्म प्रतिकात आहे का ? तुमचा धर्म माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही का ? तुमचा धर्म प्रतिकांवरून वाद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म तुम्हाला जातीवरून मतभेद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म एखाद्याच्या राहणीमानावरून वाद करायला शिकवतो का ?
या सगळ्या गोष्टी करण्यास कोणताही धर्म सांगत नसेल अस मला वाटत. मग हे सगळ करायला सांगते कोण ? हे सगळ करायला सांगणारा त्या त्या धर्मातील विशिष्ट वर्ग आहे. ज्यात त्याला माणसा-माणसात मतभेद निर्माण करून इथे अशांतता असलेली पहायला आवडते. या अशंतातेतून मानवाच्या मुख्य गरजा बाजूला राहतात. शासन म्हणून जनतेसाठी जबाबदारीने करावी लागणारी कामे न करता धर्माची संकल्पना वापरून मुख्य मुद्द्यापासून आपलं लक्ष धर्माच्या मुद्द्यावर वळवून ठेवतात. या धर्माच्या नशेत स्वतःला एवढं गुरफटून ठेवतो की आपण करतोय ते योग्य का अयोग्य हा विचारच डोक्यात येत नाही.
लव्ह जिहाद ही संकल्पना हिंदू आणि मुस्लिम धर्मियातील प्रेमियुगलांसंदर्भात वापरली जाते. विशिष्ट जाती धर्मात जन्म घेणे हे काय तुमच्या माझ्या हातात असते का ? मग एखादा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एक मेकांच्या संपर्कात आले त्यांचा सहवास कित्येक वर्ष चालू राहिला ( कॉलेज किंवा काम करण्याचं क्षेत्र यापैकी काहीही कारण असू शकते) त्या संपर्कातून ते एकमेकांना हवे हवेसे वाटू लागले तर यात धर्माचा काय दोष ? माणूस माणसाला प्रिय होतो. निसर्गाने दिलेल्या शरीर रचनेनुसार वयानुरूप भिन्न लिंगी आकर्षण वाढत जाते. निसर्गाने दिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तसा जोडीदार हवा असतो. तो जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला निसर्गाने दिला आहे. निसर्गाने दिलेल्या त्या अधिकारावर मानवाने बंधने लादली. या बंधनातून दोन भिन्नलिंगी एक मेकांना आवडत असतील आणि त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्याला विरोध करत असाल तर हे योग्य आहे का ?
श्रद्धा वालकर प्रकरण जर पाहिले तर त्यात त्या आफताबची गुन्हेगारी मानसिकता तयार होण्यात धर्माचा काय हात ? त्याला तसा अमानवी गुन्हा करण्याची वेळ का आली ? त्याला तो गुन्हा करण्यासाठीच जे धाडस प्राप्त झालं ते कुठून झालं ? त्याने तो गुन्हा करत असताना जी साधने वापरली ती साधने कुठून घेतली ? तो गुन्हा केल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने काय काय माहिती मिळवली ? ती माहिती त्याला कुठून मिळाली ? गुन्हा घडल्यानंतर आपल्यावर काय कार्यवाही होईल याचा अंदाज घेऊन त्या कार्यवाहीस सामोरे कसे जायचे याबद्दलची तयारी त्याने कुठून केली ? या सगळ्या घटना घडामोडीत त्याच्या धर्माचा किती टक्के रोल आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधून पाहाल का ?
प्रेम हे विविध दोन जाती किंवा धर्मामधील मुला मुलींमध्ये झाले तर ते आम्हाला का पचत नाही. ऑनर किलिंग च्या घटना का घडतात ? श्रद्धा च्या प्रकरणात जसा आवाज चढला तसाच आवाज अन्य प्रकरणात का नाही चढत ? युपी मध्ये अन्यायग्रस्त मुलीचा अंत्यविधी पोलीस स्वतः ते पण रात्री केला जातो. अशावेळी तुमचा आवाज का वाढत नाही ? मंदिरात बलात्कार होतो आणि आरोपी मोकाट फिरतो, अशावेळी तुमचा आवाज शांत का असतो ? खैरलांजी घडते, उन्नाव, हाथरस, कठूवा घडते ( या प्रकरणात अन्यायाचा कळस गाठलेला असतो) पण तरी तुमचा आवाज दबलेला असतो ? अरे तुम्हाला जर एक दिवसासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही काय हैदोस घालाल याचा अंदाज आहे ना तुम्हाला ? मग तो हैदोस घालण्यास कोणता धर्म सांगतो ? असा माणसा - माणसात भेद घालणारा धर्म असेल तर त्या धर्माची गुणवत्ता आणि उपयोगिता किती असेल हे यावरून सिद्ध होते. त्यामुळं कोणताही धर्म आचरण करायचा असेल तर तो धर्म इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.
धर्माच्या अंधत्वाने तुमचा विकास होणार नाही. मनेवरील धर्माची जू बाजूला काढून ठेवून समान मानव म्हणून जगायचा प्रयत्न करुया एक मेकांसोबत राहून एक मेकांना विकास करण्यासाठी झगडूया काही जुन्या पारंपरिक कालबाह्य परंपरा नाहीशा करूया. शिक्षण, रोजगार, आरोग्य या सोबतच देशातील प्रत्येक नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासकीय आणि प्रशासकीय नोकर कसे राबवून घेता येतील. यासाठी प्रयत्न करुया. अन्यथा गुलाम आहात गुलामच रहा. धर्मा धर्मात वाद पेटवत रहा. शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी जसे सांगतील तेच करत रहा. देश गेला खड्ड्यात तरी चालेल देशातील नागरिक जिवंत नाही राहिले तरी चालेल. पण तुमचा धर्म तुम्ही जपून ठेवा. लख लाभ तुम्हाला तुमचा धर्म आणि तुमचं गुलामितील स्वातंत्र्य.
©जी.संदीप(गोणार,नांदेड)
9552803980
"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”
मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...
-
तमाम भारतवासीयांना मानाचा स्वाभिमानाचा जयभीम, आपल्या आनंदाला उधाण येण्याचा महिना जवळ येत आहे. ज्यांच्या जन्मामुळे आपल्या जगण्याला ...
-
विविध प्रश्नांसाठी ही उपयुक्त माहिती... तो ऑफलाइन भरावा का ? फॉर्म कसा भरावा ? कागदपत्रे काय लागतील ? प्रमाणपत्र ऑनलाइन भेटेल का ऑफलाइन ? ...
-
काय आहे ABC I'd आणि ती कशी काढायची ? पुढील वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होत आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये गुण आणि ग्रेड...















