Wednesday, January 24, 2024

मतदार राजा




     भारतात कोठेही असलास, कोणत्याही जाती धर्मातील असलास, कितीही गरीब अथवा श्रीमंत असलास तरी तुझी किंमत कमी होणार नाही. वरील कोणत्याही गोष्टीवरून किंमत कमी जास्त होणार नाही. किंवा एखाद्याला जास्त किंमत मिळणार नाही. हा सन्मान तुला लोकशाहीने दिला आहे. सरपंच ते लोकसभा सदस्य निवडणूक कोणतीही असो, उमेदवार तुझ्या दाराला येतो, तू गरीब आहेस किंवा खालच्या जातीतला आहेस म्हणून तो तुझा सन्मान करणार नाही असं नाही. गावातील गडगंज संपत्ती असलेला व्यक्ती असो अथवा प्रचलित स्वघोषित उच्च कुलीन जातीतील व्यक्ती असो अथवा फुटपाथवर आपल आयुष्य जगणारा सामान्य भिकारी असो, या सर्वांना समान स्थरावर आणणारी ताकद म्हणजे मताधिकार होय. 

       लोकशाहीत मताचा अधिकार तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य हे नशीब किंवा तळहातावरील रेषा ठरवण्याचा काळ 1956 सालीच नाहीसा झाला. एक नविन बळ तुमच्या एका बोटात संविधानाने दिलं तो अधिकार सन्मानाने बजावा. तुमचं भविष्य उज्वल घडवण्यासाठी हा मताधिकार आहे.

        भावकीतील उमेदवार आहे, एक कोंबडी आणि दारूची बॉटल आठ दिवस तुला भेटते म्हणून, धर्मासाठी ते मोठ मोठाले मंदिर बांधतील, धर्माच्या नावावर अन्नछत्र सुरू करतील, तुला फुकटच खायला देतील, तुला तुझ्या कुटुंबाला सबसिडी च्या नावावर पैसे देतील. हे असल सगळ तुला स्वतः कमवता येते, धर्माची श्रद्धास्थान निर्माण करणं हे धर्माचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे. ते उभारण्यासाठी आपण सक्षम होऊ एवढं कवण्याच सामर्थ्य आणि साधने उपल्ब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी असते हे तू ओळख आणि असे धर्म, मटण दारू, फुकटचे पैसे देणाऱ्या उमेदवाराला तू तुझ मत कधीचं देऊ नकोस.

       आज तू मला वर्षाला 12000, मोफत राशन मिळत आहे, मझ्या धर्मातील देवांचे मंदिरे बांधली जात आहेत, याची जाणीव ठेवून तू मतदान करशील तर तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श ठेवशील.

         आयुष्यात जन्म घ्यायचं सत्ताधारी जे फुकट देतील त्यावर जस जमेल तस आयुष्य जगायचं. स्वतः कष्ट करण्याच्या संधी ची मागणीच करायची नाही का ? देशात तरुण वर्ग म्हणून मिरवत असताना तो तरुण सोशल मीडियावर आपल नको ते मत व्यक्त करून वाद घडवून आणत असेल आणि त्यातच तो गुंग राहत असेल तर मग त्याच्या आयुष्यच काय होणार ? आज आई वडील म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत उचलाल पण त्यानंतर त्याच आणि त्याच्या कुटुंबाच काय होणार ? नशिबावर सोडून देणार का ?

        तुमच्या येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ द्यायचा नसतील, सन्मानच जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा. खाजगी शिक्षण नाही तर शासकीय शिक्षणाचे मार्ग खुले झाले पाहिजेत याकडे लक्ष द्या. शासनाने नागरिकांना फुकट काही देण्यापेक्षा त्यांच्यात  कमवण्याच बळ आलं पाहिजे. उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणानुसार रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण करण हे सर्व शासनच काम आहे. तुमच्या नशीबाचा यात काहीच दोष नाही. नशिबावर दोष देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम व्यवस्थेने केले आहे.

        या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्हाला शिक्षनापासून दूर ठेवलं जातं. शिक्षणात तुमच्या बुद्धीचा विकास होणार शिक्षण दिलं जातं नाही ? तुम्ही कारकुनी कर्मचारी व्हाल हीच व्यवस्था निर्माण केली जाते ? त्या व्यवस्थेत तुम्ही नशिबाला दोष देऊन मोकळे होता.

        असं होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तुमचं सन्मानाच आयुष्य जगायचं असेल तर आज संकल्प करूया, मी माझ मत कोणत्याही परिस्थिती विकणार नाही, मी माझं मत धर्माच्या नावावर कधीच देणार नाही, मी माझं मत त्याच उमेदवाराला देईल जो इथल्या नागरिकाच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबत त्याच्या साठी शिक्षणाच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल, कोणत्याही पद्धतीचं कोणतीही गोष्ट फुकट देणार नाही, वस्तूची किंमत चार रुपये ठेवून सबसिडी च्या नावावर एक रुपया देऊन आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाजारातील कोणतीही वस्तू योग्य त्याच दरात मिळेल, त्या वस्तूच्या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्याला योग्य दर दिल्या जाईल. देशातील कोणताही कामगार असो वर्ग एक ते वर्ग चार किंवा संघटित असंघटित कामगार असो या सर्वांना समान सन्मान देण्याची व्यवस्था जे शासन करेल त्यांनाच या मताधिकाराद्वारे निवडून देईल. अन्यथा त्या शासनाला मी सत्तेत संधी देणार नाही.

        असा विचार कराल तरच संविधानाने तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा सन्मान होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सन्मान मिळेल.  लोकशाहीची योग्य वाटचाल सुरु राहील. पर्यायाने समृद्ध भारत घडेल भारतातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगेल. भारतातील प्रत्येक नागरिक जर सन्मानाने जगाला तर देशाचा जि.डी.पी. उचावेल सोबतच दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल मग देश सुजलाम सुफलाम होण्यापासून कोण रोखेल ?

      हे सर्व घडण्यासाठी तुम्ही एक मतदार राजा आहात म्हणून तुम्ही तुमची योग्य जबाबदारी पार पाडा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Wednesday, January 17, 2024

स्वतःचा मेंदू वापरा

 




मित्रांनो,

जरा डोळस व्हा रे !

देव ही दुय्यम गरज आहे

जरा प्राथमिक गरज ओळखा रे.


अश्मयुगात समूहाने राहताना पोटाच्या भुकेनंतर

शारीरिक भुकेकडे लक्ष दिलं जायचं

अविकसित काळातील लोकांना समजलं

मग तुमच्या डोक्यात कधी यायचं ?


बुद्धिवान प्राणी म्हणून

विविध शोध लावत गेलो

कधी स्वतः वेडे ठरलो तर

कधी दुसऱ्यांना वेड्यात काढण्यास धन्य मानलो.


विविध शोध लागत असता

मनोरंजनावर येऊन ठेपलो

मानवी मनातील भीतीचा आधार घेत

देवाचा शोध लावून ठेवलो.


तो जर आहे तर,

जन्मावेळीच आपल्या मनात विचार टाकेल

त्याची आराधना करण्यासाठी

सगळे मार्ग आधीच सांगून टाकेल


मानवाने निर्मिलेल यंत्र सुद्धा

कमांड दिली तसेच काम करते

तशाच कमांड देवानेही आपल्यात दिल्या असत्या

हे तुम्हास का नाही उपजते ?


देव आहे हे मान्य करायचं

बिनधास्त करा ना रे !

त्या देवासाठी तुम्ही आप आपसात भांडता

हे तुमच्या देवाला तरी मान्य होईल का रे ?


देवाच्या नावावर तुम्हाला ईथ

एक मेकांत लढवल जात

ती लढाई चालू असताना

संविधानिक हक्क अधिकारापासून दूर ठेवलं जातं


हक्क अधिकारच मोल

तुम्हा कधीच समजू दिलं जात नाही

कारण, एखादी गोष्ट मिळत नसेल

तर रुजवलं जात की, "ते तुमच्या नशिबातच नाही."


त्या नशिबाचा निर्मिक(बनवणारा) देव असेल

तर तो देव चुकीचा आहे का ?

एखाद्याकडे गडगंज संपत्ती द्यावी आणि

दुसऱ्यास एकवेळच्या जेवणासाठी मोताज ठेवावं का ?


गडगंज संपत्तीवाला निडरपणे शेकडो चुका करतो

तरी त्याला त्याच्यावर देव कोपण्याची भीती नसते

पण सामान्य गरीब माणूस रस्त्यावरून चालताना

मुंगीवर पाय पडत असताना हजार वेळा विचार करतो.


शुद्ध निर्मळ अशा गरीब मनावर

देव तुमचा कोपतो का रे ?

गरिबांना तासो-न-तास रांगेत उभा करतो

आणि श्रीमंतांना सेकंदात दर्शन देतो असे का रे ?


अशा तुमच्या एका देवाच

भल मोठ मंदिर उभारल्या जातंय

ते मंदिर पूर्ण होण्याआधीच तिथं

म्हणे त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय


तिथे त्या देवाचा मोठेपणा करायचाय

का ? राजकारण्यांना मते मागायचीत ?

कारण ! प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर सुद्धा

कामाच्या कारणास्तव देव दर्शन बंद राहील

राजकारण्यांचाच जर असेल हा डाव

तर तुमच्या भावनेशी खेळणाऱ्यांना करून टाका पायचित


किती म्हणून त्या राजकारण्यांची बाजू घेत

तुमच्या विकासाचे मार्ग बंद करून घेणार

धर्माच्या नावावर तुमचा वापर करून घेऊन

ते तुमच्या पिढ्यांच वाटोळ करून टाकणार.


हेच बघा ना, तुम्ही आरक्षणासाठी लढत असताना

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून ते मोकळे झाले.

आरक्षण जरी तुम्हा दिले तर हे लक्षात घ्या

त्याच्या अंमलबजावणीचे सगळे रस्ते बंद केले.


त्यामुळं धर्माच्या नावावर होत असलेलं तांडव

थांबवण्यासाठी त्यांना विरोध करा रे

अन्यथा पुन्हा परकियांची

गुलामी स्विकाराया तयार व्हा रे.


त्यावेळी तुम्ही पुजलेला

कोणताही देव धावून येणार नाही

हे इतिहासावरून सिद्ध होतंय

मी मनाच काहीही सांगत नाही


इतिहासावर नजर टाकाल तर

मानवी क्रांत्याच निदर्शनास येतील

कोणत्याही देवाने तुमची सुटका केली नाही

याची पावलोपावली दाखले दिसतील


देव मानायचा का न मानायचा

हे तुमचं स्वातंत्र्य अवडीने जपा

देवाच्या नावावरील गोष्टीत स्वतःला किती गुंतवायच

हे ठरवण्यासाठी मात्र सदैव स्वतःचा मेंदू वापरा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड.)

           9552803980

Friday, January 12, 2024

हे तरुणा भवितव्य तुझ...

 




सत्याचा आव आणि संघर्षाचा घाव आहे तरुणाई, 

अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारा आवाज आहे तरुणाई, 

देशाचा स्वाभिमान व कणा आहे तरुणाई 

जर भेटली तरुणाईला योग्य वेळी योग्य साधने तर,

 देशाचा भविष्यकाळ सुवर्णाक्षरात लिहून टाकेल ही तरुणाई.


जगभरात मिरवतो आम्ही अभिमानाने

सर्वात तरुण देश आहोत म्हणून,

पण तरुणाई इथली भरकटली आहे

योग्य व अचूक दिशा नाही म्हणून.


धर्म-जात यांत गुरफटवल्या जातेय

इथल्या बहुतांश तरुणांना

मग मिशन 20-20 अधुरे राहिल्याचे

का दुःख होणार नाही कलामांना ?


तरुणाई भरकटण्यास राज्यव्यवस्था जबाबदार आहे

माँ साहेबांसारखा मार्ग दाखवण्याऐवजी

जात-धर्मा सोबत सोशल मीडियाची अफू

तरुणांना इथल्या पाजवल्या जात आहे.


त्यातूनच ही तरुणाई ठरत आहे अक्कलशुन्य व बिनडोक

सम्यक विचार गेले हे विसरून

सोशल मीडियाद्वारे मोबाईल डाटा वापरत 

पारंपरिक विषयात बसलेत आपले नाक खुपसून


अशा तरुणाईला कसे समजावे आदर्श ?

देशाचा स्वाभिमान व कणा ?

याची जाणीव तुज होईल का रे ? 

आयुष्यात कधी तरी तरुणा ?


तुला अस घडवण्यात जी व्यवस्था जबाबदार आहे

तिला प्रतिप्रश्न करायला शिकशील का ?

आजच्या युवा दिनी तरुण असण्याच भान ठेवून

व्यवस्थेला वाकवण्याची ताकद स्वतः मध्ये निर्माण करून घेशील का ?

२*२ च्या जागेत दिवस रात्र उद्याच्या उज्वल भविष्याचे

स्वप्न घेऊन पुस्तकांसोबतच जगणारा तू

त्याच भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या शासनाला 

का डोक्यावर घेऊन मिरवतोस तू .


अरे वेड्या !  धर्मप्रेमी असलेला तू,

तुला अजून कस नाही कळत ?

ते धर्मासाठी नाही स्वतः ला हव्या असलेल्या खुर्चीसाठी,

तूला गर्व असलेल्या धर्माचा वापर करतात.


त्या शासनाला जाब विचारण्यासाठी 

स्वतःला सक्षम बनवत रहा.

धर्माला लावून आग माणूस म्हणून जगण्यासाठी 

व्यवस्थेला धारेवर धरत रहा.


हे तरुणा,

धर्म तुला सन्मान देऊ शकत नाही रे !

त्यासाठी तुलाच उत्तम कर्तव्य करावे लागेल.

त्या उत्तम कर्तव्यासाठी 

संधी निर्माण करणे शासनाचे आहे कर्तव्य

ही बाब ओळखून व्यवस्थेला बोटावर नाचवण्याच

बळ तूला अंगीकाराव लागेल.


व्यवस्था निर्माण करण्याच सोडून देऊन 

तू व्यवस्थेत सामील होऊ नकोस रे !

व्यवस्थेचा गुलाम होऊन वागण्यापेक्षा

व्यवस्थेला झुकवायला शिक रे !


आयुष्यात कर्तव्य सगळ ठरवत असते,

नशिबाच काहीच नसत आपल्या आयुष्यात देण-घेण रे !

आवश्यक त्या संधी आणि आपले प्रयत्नच  

आपला विकास करतात हेच आपल नशीब रे !


:-  जी.संदीप(गोणार, नांदेड.)

९५५२८०३९८०

Monday, November 6, 2023


 पुजारी व्हायचं असेल तर तुम्ही ----- धर्माची दीक्षा घेतलेले असेलच पाहिजे. तरच तुम्हाला पुजारी होता येईल. हे अघोषित आरक्षण नव्हे का ? मुळात आरक्षणाची सुरुवात इथूनच तर झाली आहे ना. मग हे पिढ्यानपिढ्या स्वतःकडे ठेवलेलं आरक्षण दिसत नाही का ? 

        पुजारी व्हायचं असेल तर विशिष्ठ पद्धतीची पूजा करता आलीच पाहिजे, तरच पुजारी होता येईल. अन्यथा नाही, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाईल. पण तुम्ही विशिष्ठ धर्मातील विशिष्ठ जातीचे असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्या विशिष्ठ जातीतील असाल त्यासाठी आवश्यक काही पात्रता नसेल तरी ती तुमच्यात विकसित केली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ठ जातीत असल्याचे सिद्ध करावे लागेल.

        हे जे अघोषित आरक्षण आहे ते कशाच्या आधारावर आहे ? या भेदाचे कारणीभूत कोण आहेत ? एखाद्याला पूजा करता येत नाही पण त्याची इच्छा आहे ते काम करण्याची मग त्याला संधी मिळेल का ? तो धर्माने हिंदू आहे पण जात वेगळी आहे. त्याला संधी मिळेल का ? नाही मिळणार ना ? का नाही मिळणार ? या प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला आरक्षणाचे मूळ कुठे आहे ते कळेल. 

          आरक्षणामुळे काही समजातील विद्यार्थी विशिष्ठ नोकरीसाठी प्रशिक्षित नसताना त्यांना नोकरीवर घेतले जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षित केलं जातं. कारण त्या समाजाला सुद्धा अभिमानच जगणं बहाल करायचं असतं, भारतातील प्रत्येक नागरिक हा समान पातळीवर यावा त्यांना संधी मिळावी. ज्यांना संधी दिली जात नाही  त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आरक्षणाची वहिवाट निर्माण केली गेली आहे.

         तसेच आरक्षण या पुजाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असते पण त्याला जात आडवी येते. तुम्ही जर त्या विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला पुजारी होण्याचा काही एक अधिकार उरत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला ती संधी मिळणारच नाही. त्याच धर्मातील व्यक्तीकडे पात्रता नसेल, तरी सुद्धा त्याला ती संधी दिलीच जाते. पण इतर धर्मियांना ती संधी देणे शक्यच नाही. मग हे आरक्षण कोणासाठी आणि कशासाठी आहे ?

         या सर्व बाबींवर जर विचार केला तर सरळ एक मुद्दा लक्षात येतो की, आरक्षण हे आजचे किंवा संविधानातील नाही तर हे आरक्षण तुमच्या पारंपरिक संस्कृतीत रुजलेले आहे. संविधानाने दिलेल आरक्षण संपवायचे असेल तर आधी हे अघोषित आरक्षण संपवावे लागेल. मग कुठे या आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला  प्राप्त होईल. अन्यथा तुमच्या आरक्षण बंदीच्या गाजराच्या पुंग्या मोडून खाल्याविना कोणीच राहणार नाही हे लक्षात असू द्या.

शेवटी बोलायला भाग पाडलच तुम्ही !




काही मुद्दे, काही जणांची मानसिकता विचारात न घेता गप्प राहिलो होतो. आरक्षण म्हणाजे काही जणांना फक्त बौद्ध समाजचं दिसतो. पण हा चष्मा उतरवून टाका मित्रांनो. बौद्ध समाजाचा विकास होण्यास जेवढं आरक्षण कारणीभूत आहे त्यापेक्षा जास्त बाबासाहेबांनी दिलेला मानवतावादी विचारसरणीचा बुद्धांचा धम्म आणि  सन्मानाने जगण्याचा बाबासाहेबांनी दिलेला संदेश(आदेश). बुद्धांची विचारसरणी आणि बाबासाहेबांचा संदेश सोडला तर आरक्षण एससी संवर्गातील 59 जातींना आरक्षण आहे. 58 जातींना सुद्धा बौद्धाएवढेच आरक्षण आहे. पण त्यांचा विकास झाला नाही. मग आरक्षण ही एकच गोष्ट विकासात कारणीभूत आहे असे तुम्हाला वाटते का ? त्याबद्दल नक्कीच विचार व्हावा.

          *घोड्याच्या शर्यतीत गाढवे सुद्धा जिंकायला लागलीत, 2 रुपये किलो गहू आणि 2 रुपयाच्या तांदळासाठी नाही मागत आरक्षण.* आरक्षणाचा आणि राशन दुकानावर भेटणाऱ्या मालाचा काय संबंध हेच कळत नाही. या वाक्यावरून कीव येते तुमच्या त्या विद्वत्तेची 😅 

    पण त्या वाक्यातील द्वेषमूलक शब्द आहेत ना, त्यातून निदर्शनास येणाऱ्या तुमच्या मानसिकतेसाठी आरक्षणाची गरज आहे. संविधानात मिळालेलं आरक्षण हे सुद्धा 2 रुपये गहू आणि तांदळासाठी दिलं नव्हत एवढं सुद्धा तुम्हाला कळू नये. यावरून तुम्ही किती बे अक्कल अहात हे यातून सिद्ध करताय.

आणि तोंड वर वरून गुणवत्तेच्या थापा मारताय ? 

        गुणवत्ता काय असते हे आम्हाला विचारताय तुम्ही ? अरे घरच्याच शाळेत परीक्षा केंद्र असताना, शाळा सुद्धा घरचीच असताना एकही दिवस शाळेत न जाता, एवढंच काय परीक्षा केंद्रावर सुद्धा तुम्ही उपस्थित न राहता 90% मार्क्स घेणारे तुम्ही.  आम्हाला गुणवत्तेच्या गप्पा मारतात, सीईटी द्वारे मेडिकल ला प्रवेश नाही लागला. तर पैसे भरून शिक्षण घेणारे तुम्ही, कॉलेज उपस्थित नाही रहावं वाटल तर वडिलांच्या दबावाने पास होणारे तुम्ही, डी.एड साठी शासकीय फेरीतून घरा जवळच कॉलेज नाही भेटल तर हजारो रुपये डोनेशन भरून घराजवळच कॉलेज घेऊन कॉलेजला न जाणारे तुम्ही. शिक्षक म्हणून नोकरीवर जॉईन होऊन सुद्धा नोकरीला जाण्याची गरज पडणार नाही म्हणून घरच्याच संस्थेत घरी बसून पगार उचलणारे तुम्ही, मुलाखतीच्या नावाखाली भरतीत लाखो रुपये देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना डावलनारे तुम्ही ? आम्हाला गुणवत्तेची भाषा शिकवता काय ? 

       मान्य करूया की तुम्ही अक्कलवान आहात, मग इतके वर्ष तुम्हाला आरक्षण का मिळू शकलं नाही, याचं उत्तर तुम्ही मिळवू शकले नाही ? मित्रांनो आरक्षण हे 2 रुपये गहू आणि 2 रुपये तांदळासाठी आहे अस तुम्हाला वाटते यावरून कळते की तुम्ही किती अक्कलवान आहात.

         मित्रांनो कीव येते रे तुमची, तुमच्याकडे भरमसाट असताना सुद्धा जेव्हा दुसऱ्याच्या ताटात असलेलं  बघून तुमचा जीव तळमळ करतो. आज तुमच्यावर आरक्षण मागण्याची वेळ का आली ? शैक्षणिक संस्था या जास्तीतजास्त तुमच्याच आहेत ना ? मग त्या शैक्षणिक संस्थेत शिकण्यासाठी किती फिस आकारावी याबद्दल काहीच नियमावली नाही ? जो गब्बर येऊन पैसे देईल त्यालाच एडमिशन दिलं जाईल. ही स्थिती कोणी निर्माण केली रे मित्रा ? तुमच्यात काही गरीब आहेत, मान्य आहे. पण त्या गरीबांना वर आणण्यासाठी सोबतच्या समाजाने मदत करायला हवी ना ? सर्व सुविधा उपलब्ध असताना, आपल्या पाल्याला गुणवंत बनवून इतर ठिकाणी जॉब साठी पाठवून, त्याच ठिकाणी समाजातील अन्य गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी देऊ शकले असते ना ? पण तशी संधी दिली का ? तसे न करता आपला मुलगा कसाही वागला तरी त्याला त्याच स्वातंत्र्य देऊन स्वैराचाराला मार्ग मोकळा करून दिला. कुठे दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची काय गरज आपल्याच शैक्षणिक संस्थेत कामाला लावलं. त्या पाल्याच्या गुणवत्तेतून कितीही पिढ्या बरबाद झाल्या तरी काही संबंध नाही. यातून सर्व काही मलाच मिळालं पाहिजे ही मानसिकता दिसून येते. जर ही मानसिकता असेल तर समाज म्हणून सोबत राहण्याला अर्थ तरी काय उरतो ?

 मित्रांनो तुमच्याकडे चार पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती होती ना ? मग त्या संपत्तीचं योग्य नियोजन का करता आल नाही तुम्हाला ( आमच्या हातात ते काही नव्हतच आम्ही काय करणार?) अस म्हणून स्वतः ला त्या मानसिकतेतून दूर नेण्यात काही अर्थ नाही. कारण तिचं मानसिकता मित्रानो तुमच्यात सुद्धा रुजलेली आहे. त्यापेक्षा कैकपट जास्त स्वार्थी ही पिढी होत आहे. 

     मिञांनो जो समाज एकवेळच्या जेवणाला मोताज होता, तो समाज आज पंचपक्वान खातोय. सोबतच समाजासाठी आपला वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतोय, सोबतच येणाऱ्या पिढीसाठी शक्य तेवढी तजवीज करतोय.हा सर्व बदल कशामूळे झाला आहे अस तुम्हाला वाटत ?  फक्त आरक्षणामुळे ? नाही मिञांनो आरक्षणासोबतच त्यांचा आदर्श बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा सुद्धा तितकाच कारणीभूत आहे. मिञांनो ज्या सामजाच आरक्षण पाहून तुमच्या डोळ्यात खुपते ना त्या समजाकडे जेवढं काही होत, त्यापेक्षा कैकपट संपत्ती तुमच्याकडे होती. पण तुमचे नाद तुम्हाला गप्प राहू देतील तरच ना ? त्या नादातच तर आहे नाही ती संपत्ती गमवून बसलात. यासाठी खूप काह दाखले उपलब्ध आहेतच.

   काही जण म्हणतील की, कुटुंबाची विभागणी झाली म्हणून आम्ही गरीब झालोत, आमच्याकडे असलेल्या संपत्तीचं विभाजन झाल आणि आज आम्हाला शिक्षण घेण्यासाठी जास्त फिस द्यावी लागते आणि ती फिस देण्याची आमची ऐपत नाही. म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे असे जे ओरडताय ना ? ही भरमसाट फिस भरण्याची वेळ कोणी आणली रे ? मागासवर्गाने ही जास्त फिस(डोनेशन) ची प्रथा सुरू केली का ? मित्रांनो लाखो रुपये डोनेशन देऊन शिक्षण घ्यायला सुरुवात कोणी केली रे मित्रांनो ? मग मित्रानो ज्यांनी डोनेशन ची प्रथा सुरू केली त्यांच्या विरोधात तुमचा आवाज शांत का ? त्यांच्याविरोधात बोला ना.  त्यांना आरक्षण आहे तर आम्हालाही आरक्षण मिळाले पाहिजे, ते कमी पैशात शिक्षण घेतात मग आम्हाला पण कमी पैशात शिक्षण मिळालं पाहिजे हा असा द्वेष का ? आपल्याकडे जे नाही ते शासनाकडून प्राप्त कसे करून घेता येईल हे बघा ना. कारण ते शासन तिथे तुमच्या आमच्या विकासासाठी बसले आहे ना. मग तुमच्या विकासात येत असलेले अडथळे नाहीसे करण्यासाठी शासन काम करत नसेल तर त्या शासनाला जाब विचारायचा अधिकार आपणास आहेच ना ? हे शासन जर उत्तर देतच नसेल तर मग त्या शासनाला पुन्हा संधी न देण्याचा अधिकार सुद्धा तुमच्या हातात आहेच ना ? मग तुमच्या त्या ताकदीचा कधी वापर करणार आहात का नाही ? का फक्त समाजात तेढ वाढेल याचाच विचार करणार आहात ?

        मिञांनो महाराष्ट्रात एकूण  510 जाती आरक्षण घेतात. त्यापैकी फक्त एकच जात तुम्हाला दिसते का ? ज्या जातीबद्दल तुमच्या मनात आकस आहे ना त्या जतीसोबत  अन्य 58 जाती सुद्धा आरक्षण घेतात तरी त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही.  असा भेदभाव का बर मिञांनो ? त्यांनी तुमचं काही वैयक्तिक नुकसान केलं आहे का ? तुम्हाला कोणती हानी पोहचवली आहे का ? तुम्हाला किंवा तुमच्या पिढ्यांना काही शारीरिक, मानसिक त्रास दिला आहे का ? मग हा एव्हढा द्वेष का आणि कशासाठी ?

         त्या एकाच जातीतील लोक पुढं आले आणि स्वतः ला विकसित करून घेतले. कारण त्यांना त्यांच्या मार्गदात्याने सांगितलं होत की, बाबाहो तुम्ही शिका, तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची पुस्तके घ्या आणि एक रुपयाचा अन्य उपयोगी खर्च करा. त्या समाजाला माहीत होत की, आपला विकास करून घ्यायचा असेल तर दुसरा कोणीच येणार नाही. कोणताच देव येऊन त्यांचा विकास करणार नाही. या जाणिवेतून त्या समाजाने स्वतः ला झोकून देऊन आपल्याला हव्या त्या गोष्टीची पूर्तता करून घेतली. परिस्थिती नव्हती, पोटाला पीळ देऊन आई वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या रक्ताच पाणी केलं. परिस्थिती प्रतिकूल असताना स्वतः ला सावरत प्रत्येक गोष्टीवर मात करत तो समाज आज इथपर्यंत पोहचला.  तोच विकास अन्य 58 जातींना का प्राप्त करून घेता आलं नाही ? त्यांचा विकास झाला म्हणजे त्यांनी कोणाच्या ताटातील हिसकावून घेतले नाही, किंवा त्यांना आहे तर मला का नाही म्हणून आकांडतांडव केलं नाही. याचा नक्कीच विचार करावा.

       मिञांनो तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा वापर कुठे केला ? याचा विचार केला तर तुमच्या लेखी शिक्षणाला महत्वच नव्हत ना. ज्या काळी हा उपेक्षित समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला तेव्हा तुम्ही तुमच्या संपत्तीची उधळण करत होतात. आम्ही शिक्षण घेऊन दुसऱ्याची गुलामी करावी काय ?  या आविर्भावात तुम्ही वावरत होतात.  आज  त्याच मानसिकतेने तुम्हाला रस्त्यावर आणल आहे. अशीच मानसिकता ठेवाल इतरांबद्दल द्वेष मनात राहील तर ती मानसिकता उद्या कुठे नेऊन ठेवलं याचा विचार व्हावा.

         उद्या आरक्षण भेटल्यावर सुद्धा आरक्षणाबत आणि विशिष्ठ समाजाबद्दल तुमच्यात तीच मानसिकता टिकून राहिली तर येणारा काळ खूप घातक ठरेल. स्वतः ला आणि समजाला समोर न्यायचं असेल तर, धर्माची कट्टरता बाजूला ठेवावीच लागेल. जातीला बाजूला ठेवून जर तुम्ही पुढं याल आणि सर्व समाज हातात हात घालून सोबत पुढे गेला तर राज्याचा, राज्यातील प्रत्येक नागरिकांचा सर्वांगीण विकास होईल. 

        अशी कोणत्याही प्रकारची भीक शासनाकडे मागण्याची वेळ येणार नाही.  शासन आपल्याला हव्या त्या सुविधा नक्कीच निर्माण करेल. पण त्या सर्वांत आधी आप - आपसात जी धर्मांधतेची कट्टरता टिकून आहे ती नष्ट व्हावी लागेल तरच हे शक्य आहे. अन्यथा धर्म आणि जातीच्या नावावर राजकारणी आपली पोळी भाजून घेतली तुम्ही भीक मागत रस्त्यावर उतरत रहा. एवढीच आपली लायकी उरेल अन्य काहीही भेटणार नाही एवढं मात्र नक्की.

© जी.संदीप (गोणार,नांदेड.)

              9552803980

Tuesday, October 10, 2023

अन्यथा खुर्ची खाली करा...




 तुम्हाला पाच वर्ष संधी भेटते

त्यात अरोबोंची संपत्ती कमवता.

एक टर्म संपली की पुन्हा दुसऱ्या टर्म साठी,

तुम्ही जीवाचे रान करून निवडून येण्याचा प्रयत्न करता.


दुसरी च काय तिसरी आणि चौथी टर्म सुद्धा तुम्ही प्रयत्न करता

पण ज्यांच्या जीवावर ते सगळ धाडस करता

मग त्यांच्यासाठी काही उत्तम करायचे सोडून

त्यांच्याच तोंडातील घास हिसकून घेण्याचा करंटेपणा का करता ?


पाच वर्षातील तुमच्या मुळे जमा झालेल्या संपत्तीचं ऑडिट केलं तर

तुम्ही तोंड दाखविण्याच्या लायकीचे रहाल का ?

अस असताना खाजगिरकानाचा खेळ मांडून

मतदारांच्या आयुष्याशी खेळायला लाज नाही वाटत का ?


तुम्ही किती काळे कारनामे आणि अवैध धंदे करता,

त्याकडे जनता नजर अंदाज करते.

आणि तीच जनता रस्त्यावर उतरून भीक मागते,

तरी त्यांच्यासाठी आवश्यक त्या गोष्टी न करण्याचं तुमचं धाडस कस होते ?


मान्य आहे जनता बेअक्कल आहे,

मान्य आहे की ती निर्बुद्ध आहे.

पण तुम्ही अक्कलवान म्हणून तिथे असताना,

नियोजनपूर्वक अर्थनिती ढासळवली जात आहे ?

अशी परिस्थिती डोळे आणि मनाला का दिसत आहे ?


पाच वर्षासाठी जर इथ कंत्राटी भरती केली तर,

तुमची सुद्धा पाच वर्षेच मुदत राहू द्या अशी मागणी वाढाया लागेल.

त्या मागणीने तुम्हाला काहीही फरक पडणार नाही,

अशी मानसिकता म्हणजे तुमच्याबद्दलची उद्विग्नता ठरेल.


एवढं उद्विग्न व्हायला तुम्ही का भाग पाडता रे,

जनतेने त्यांच्या हितासाठी तुम्हाला निवडून दिलं

त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याचं सोडून

स्वतःची प्रॉपर्टी का वाढवत बसता रे ?


कमवलेल्या भ्रष्ट संपत्तीतील काही पैसे खर्च करून

करत असाल चमकोगिरीचे चार समाजातील कामे,

चमकोगिरी सोडून जनतेच्या करातून

जनतेसाठी काम करण्यासाठीच निवडून दिलेले असत रे त्याने 


याची जाण ठेवून देशातील नागरिकांसाठी काम कराल का ?

खाजगीकरणाचा जो विचार केलाय त्याला मूठ माती द्याल का ?

खाजगीकरणातूनच सर्व सुविधा घ्याव्या लागत असतील इथ,

तर मग देश विकून टाकूया का रे ?


आहे त्या आर्थिक स्थितीत जनतेसाठी

सरकारी सेवा देता येत नसतील तुम्हाला.

तर खुर्ची खाली करा ना, तिथच चीटकून बसायला

बापाची जायदाद नाही एवढं कस कळत नाही तुम्हाला ?


बापाच्या जायदादी वर हक्क दाखवल्याप्रमाणे

हे तुमचं अधिकारशाही वागणं बंद करा,

जनतेला काय हवं आणि काय नको याकडे लक्ष देऊन,

ते प्रत्येक द्या अन्यथा खुर्ची खाली करा.

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...