पुजारी व्हायचं असेल तर तुम्ही ----- धर्माची दीक्षा घेतलेले असेलच पाहिजे. तरच तुम्हाला पुजारी होता येईल. हे अघोषित आरक्षण नव्हे का ? मुळात आरक्षणाची सुरुवात इथूनच तर झाली आहे ना. मग हे पिढ्यानपिढ्या स्वतःकडे ठेवलेलं आरक्षण दिसत नाही का ?
पुजारी व्हायचं असेल तर विशिष्ठ पद्धतीची पूजा करता आलीच पाहिजे, तरच पुजारी होता येईल. अन्यथा नाही, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर तुमची नियुक्ती केली जाईल. पण तुम्ही विशिष्ठ धर्मातील विशिष्ठ जातीचे असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही त्या विशिष्ठ जातीतील असाल त्यासाठी आवश्यक काही पात्रता नसेल तरी ती तुमच्यात विकसित केली जाईल. पण त्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ठ जातीत असल्याचे सिद्ध करावे लागेल.
हे जे अघोषित आरक्षण आहे ते कशाच्या आधारावर आहे ? या भेदाचे कारणीभूत कोण आहेत ? एखाद्याला पूजा करता येत नाही पण त्याची इच्छा आहे ते काम करण्याची मग त्याला संधी मिळेल का ? तो धर्माने हिंदू आहे पण जात वेगळी आहे. त्याला संधी मिळेल का ? नाही मिळणार ना ? का नाही मिळणार ? या प्रश्नांचे उत्तर जर तुम्ही शोधाल तर तुम्हाला आरक्षणाचे मूळ कुठे आहे ते कळेल.
आरक्षणामुळे काही समजातील विद्यार्थी विशिष्ठ नोकरीसाठी प्रशिक्षित नसताना त्यांना नोकरीवर घेतले जाते. त्यानंतर त्यांना प्रशिक्षित केलं जातं. कारण त्या समाजाला सुद्धा अभिमानच जगणं बहाल करायचं असतं, भारतातील प्रत्येक नागरिक हा समान पातळीवर यावा त्यांना संधी मिळावी. ज्यांना संधी दिली जात नाही त्यांना संधी देण्यासाठी म्हणून आरक्षणाची वहिवाट निर्माण केली गेली आहे.
तसेच आरक्षण या पुजाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा असते पण त्याला जात आडवी येते. तुम्ही जर त्या विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला पुजारी होण्याचा काही एक अधिकार उरत नाही. तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्हाला ती संधी मिळणारच नाही. त्याच धर्मातील व्यक्तीकडे पात्रता नसेल, तरी सुद्धा त्याला ती संधी दिलीच जाते. पण इतर धर्मियांना ती संधी देणे शक्यच नाही. मग हे आरक्षण कोणासाठी आणि कशासाठी आहे ?
या सर्व बाबींवर जर विचार केला तर सरळ एक मुद्दा लक्षात येतो की, आरक्षण हे आजचे किंवा संविधानातील नाही तर हे आरक्षण तुमच्या पारंपरिक संस्कृतीत रुजलेले आहे. संविधानाने दिलेल आरक्षण संपवायचे असेल तर आधी हे अघोषित आरक्षण संपवावे लागेल. मग कुठे या आरक्षणाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल. अन्यथा तुमच्या आरक्षण बंदीच्या गाजराच्या पुंग्या मोडून खाल्याविना कोणीच राहणार नाही हे लक्षात असू द्या.
No comments:
Post a Comment