Sunday, January 3, 2021

ध्येय पूर्ण करणार का फक्त सोहळा साजरा करणार...?





      आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, तस लिहिण्यासारखं खूप काही आहे पण लिहायची ईच्छा होत नाही. पण दुपारी एका विद्यार्थ्याने मॅसेज केला आणि सांगितलं की,"अस काहीतरी पोस्ट,व्हिडिओ सेंड करा जे काळजाला भिडाव" मी काही वेळ स्तब्ध झालो. सर्व बाजूला ठेऊन काल दुपारी लिहायला घेतलं पण ते रात्रीपर्यंत पूर्ण करू शकलो नाही. आज ते पूर्ण झालं. ते अपल्यासर्वांपुढं ठेवत आहे. वाचावे व काही लक्षात आले तर कळवावे. 


#सडेतोड

#नवनिर्माण 

       एखादी समस्या जाणून घेऊन त्या समस्येवर उपाय काढणारे त्या काळातील समाजसुधारक म्हणून फुले दाम्पत्यांचं नाव घेतलं जातं. म्हणजेच आम्हाला शिकण्याचा अधिकार नसताना आमच्यासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच काम फुले दाम्पत्याने केले. हे काम करत असताना त्यात महत्वाचा वाटा जो होता तो म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा.

       हे ऐकून वाचून आम्हाला गुळ-गुळीत झालेले शब्द आहेत. त्यातून जी प्रेरणा भेटायला पाहिजे ती आम्हाला भेटत नाही. म्हणजे आम्हाला या शब्दातील भाव काढून टाकून फक्त अक्षर आहेत तेवढेच वाचतोय आणि त्यातून आम्हाला काहीही प्रेरणा मिळत नाही अस झालंय.

      कोणत्याही महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी असेल तर, आलेला वक्ता काय बोलेल याचा अंदाज श्रोता वर्ग लावत आहे. म्हणजे आपण काय सांगणार हे आता ऐकणाऱ्याला कळत आहे. मग हा घोटीव इतिहास किती वर्षे सांगायचा. सावित्रीबाईंनी स्वतःच्या अंगावर शेण,दगड, गोटे यांचा मारा सहन केला आणि आमच्यासाठी शिकवण्याचा काम चालूच ठेवले. या शब्दातून आम्हाला फक्त काहीवेळा ऊर्जा मिळते, पण त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला कामे करावी लागतील. हा गुण आम्ही कधी डोक्यात घेणार आहोत का ?

      जर आम्हाला खरचं कामे करायची असतील तर, परिस्थितीला बदलवायचे असेल तर, इतिहासावर नाही तर वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागते. आम्ही इतिहास सांगत असताना फक्त इतिहासावरच लक्ष केंद्रित करतोय भविष्याबद्दल आमच्याकडे काहीही प्लॅन नाही असं दिसतंय. अशाने आमची अधोगती, व अस्तित्वात असलेला द्वेषभाव व विषमता नष्ट होणारच नाही. आम्हाला जर खरंच या देशात समतामुलक व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला इतिहास जरूर सांगावा लागेल. पण तो ईतिहास सांगत असताना ज्या शिक्षणाची गरज फुले कुटुंबियांना जाणवली, ज्यामुळं शिक्षण दानाच काम त्यांनी सुरु केलं त्याचा उद्देश पूर्ण झाला का ? नसेल झाला तर मग आम्ही कुठे आणि का कमी पडतोय ? याच चिंतन आम्ही का करत नाही ?

      याचा जेव्हा विचार करतो तेव्हा अशी शंका येते की आम्हाला राजकीय पोळ्या भाजून पोट भरायची आहेत. त्यामुळं आम्ही अस काहीही करत नाही. कदाचित ही शंका प्रत्येक वेळी लागू होणार नाही. पण ही शंका जर खरी नसेल तर त्याच स्पष्टीकरण द्या... जर असेल खरी तर ही शंका नाहीशी करण्यासाठी काम करा.

     आज प्रत्येक स्त्री शिक्षण घ्यावी म्हणून आपण धडपड करतोय पण ही शिकलेली स्त्री समतेच जीवन जगत आहे का ? तिला समाजात सन्मानाची वागणूक भेटते का ? समाजात स्त्री शिकली ते फक्त आणि फक्त आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी म्हणून. पण कमावणाऱ्या स्त्रीने कधी फुले दाम्पत्याच्या त्यागाचा किंवा ध्येय उद्दिष्टांचा विचार केलाय का ? जर ही स्त्री अशा कोणत्याही गोष्टीचा विचार करत नसेल तर तुम्हाला आज जयंती साजरी करण्याचा काय अधिकार आहे ?

      तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असेल तर डॉक्टर तुम्हाला तो पदार्थ तुम्ही खाऊ नका अस सांगतात आणि आपण ऐकतो सुद्धा. काही काळासाठी होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून आपण जसे पदार्थ टाळतो, तसेच पण आयुष्याभर आम्हाला काही चालीरितींमुळे त्रास होतो पण तरीही आम्ही त्या चालीरीती सतत चालूच ठवतो. या विचारांमुळे होणाऱ्या ऍलर्जी साठी तुम्ही कोणत्या गोष्टी करणं थांबवलं ?

     म्हणजे आम्हाला शिक्षण भेटलं, उच्च शिक्षणाच्या जोरावर आम्हाला नोकरी भेटली, पण तरीही नोकरी करत असताना आमच्यात सन्मान आला नाही, आमच्या सन्मानाचे काय ? मग आम्ही शिकलेल्या शिक्षणाचा फायदा काय ? आपण शिकल्यानंतर आपल्यात वैचारिक परिवर्तन व्हायला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे.

     आजची स्थिती बघता आज आम्हाला कोणत्याही संजसुधारकांची गरज नाही. कारण ज्ञानाचे दरवाजे आमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आम्हाला हवे तेव्हा हवे ते ज्ञान मिळत आहे. म्हणजे आम्हाला आता कोणतेही कार्य करण्यासाठी ज्ञान उपलब्ध होत आहे. फक्त गरज आहे ती एका चिंगारीची आणि ती चिंगारी निर्माण करणारा शब्द आहे  "का ?" हा एक शब्द जर वापरत गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यासोबत घडत असलेल्या अन्यायाला वाचा फोडता येते. मग तो स्त्रीवरील किंवा पुरुषावरील असो. त्यामुळं आज आम्हाला आमचा विकास करण्यासाठी कोणत्याही त्रयस्थाची मदत लागणार नाही यातून महापुरुषांना अपेक्षित समाज घटक होऊ व आदर्श समाज घडवू. समतेच आयुष्य प्रत्येकजण जगेल.

✍️✍️@ जी.संदीप (नांदेड)

            9552803980

Wednesday, October 21, 2020

१४ ऑक्टोबर का विजयादशमी ?


       आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला माणसासारखी वागणूक का मिळत नाही ? या एका प्रश्नाने क्रांतीचा प्रवास सुरु झाला. आम्हीही माणसे आहोत माणसासारखे जगण्याचा अधिकार आहे मग तो अधिकार आम्हाला का दिल्या जात नाही. तो अधिकार माझ्या समाजाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. हा संकल्प करून डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरु केली.

       १९२६ साली मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य बनले व  १९२७ च्या दरम्यान अस्पृश्यता निवारण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते सी.के. बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात एक ठराव पास करून घेतला. त्यानुसार "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केलेली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी दिली आहे. म्हणजेच सगळ्या नागरिकांना शासकीय संपत्तीचा वापर करण्यास अनुमती देण्यात आली. यानुसार महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यासाठी खुले करण्यात आले. परंतु स्पृश्यांनी अस्पृश्यांना पाणी भरण्याची संधी दिली नाही.

      म्हणजेच हिंदू धर्माच्या नियमानुसार अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवेशाला मज्जाव करण्यात आला होता. ही बाब बाबासाहेबांच्या लक्षात येताच अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निश्चय केला. त्यानुसार १९ व २० मार्च रोजी १९२७ रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा परिषद आयोजित करण्यात आली. यात चार ठराव पास करण्यात आले. जे हिंदू धर्मातील अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठीच्या होत्या त्यात, ०१)नोकरितील स्थान, २)स्पृश्यांनी अस्पृश्यांना त्याचे नागरिकत्वाचे अधिकार बजावण्यास मदत करावी

 ३)मृत जनावरे ज्यांची त्यांनी ओढावी, ४)स्पृश्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.

       या परिषदेच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांनी आपला मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वात चवदार तळ्याकडे वळवला. सर्व सहभागी आंदोलकांनी चवदार तळ्याचे पाणी पिले व आम्ही मानव असल्याची जाणीव स्पृश्यांना करून दिली. ही बातमी स्थानिकच्या स्पृश्याना कळली व त्यानंतर आंदोलकांवर हल्ला करण्यात आला. यात बरेच अस्पृश्य जखमी झाले.

      २६ जून, १९२७ रोजी अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ.बाबासाहेबानी लढा सुरु केला.  दादासाहेब खापर्डे यांच्या प्रवेश मिळवून देण्याचा आश्वासनाने हा  लढा थांबवण्यात आला. अमरावती नंतर पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर खुले करण्यासाठी पुण्यातील एम.एम.जोशी, ना.ग.गोरे, र.के.खाडिलकर, विनायक भुस्कुटे, स्वामी योगानंद यांच्यासह अन्य स्त्री पुरुषांसह बाबासाहेबांनी हा लढा १३ ऑक्टो १९२७ रोजी हा लढा सुरु केला.

      चवदार तळ्याचा सत्याग्रह, मंदिर सत्यागृहानंतर सुद्धा अस्पृश्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीत बदल झाला न्हवता म्हणून नीलकंठ सहस्रबुद्धे, गंगाधर या ब्राह्मण सहकाऱ्यांच्या सोबतीने २५ डिसेम्बर १९२७ रोजी दहनभूमी तयार करून, अस्पृश्याना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

        या नंतर सुद्धा हिंदू धर्मातील लोकांची मानसिकता बदलत न्हवती, अस्पृश्याना अस्पृश्य म्हणूनच वागणूक दिल्या जात होती. चवदार तळे सत्यगृहाप्रसंगी घेतलेल्या निर्णयामुळं तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायात वाढच झाली होती.

      या स्थितीत बाबासाहेबानी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतच होते. त्यातूनच नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्यात आला. ०२ मार्च १९३० रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी निश्चित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष केशव वर्धेकर तर सचिव म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली. नाशिक येथील शंकरराव गायकवाड यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.  अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी दिलेला हा सर्वात मोठा लढा होता असे दिसून येते. या लढ्यात साधारणपणे ८००० आंदोलकांचा सहभाग होता. तत्कालीन जिल्हाधिकारी गार्डन यांनी रामकुंडावर येऊन आंदोलकांची भेट घेऊन त्यांना राममंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले.

         या सर्व आंदोलनानंतर सुद्धा स्पृश्यांच्या मनातील अस्पृश्यांबद्दलची मानसिकता बदलत न्हवती. स्पृश्याना हीन आणि तुच्छतेची वागणूक देतच होते. आता पर्यंत केलेलं मंदिर सत्यागृह हे देव पावेल किंवा देव आमचं भलं करेल या उद्देशाने केलेले न्हवते तर आम्ही ही माणसे आहोत त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे. तो हक्क बजावण्यासाठी म्हणून हा सर्व प्रयत्न होता. पण तरीही तशी वागणूक मिळत न्हवती म्हणून येवले येथे धर्मांतरा संदर्भात घोषणा केली.

       हिंदू धर्मात राहून आम्हास मानवी वागणूक दिल्या जात न्हवती, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करून सुद्धा हिंदू मानसिकता आम्हाला सन्मान आणि मानव म्हणून वागणूक देण्यास तयार न्हवती. मग धर्मांतर हा शेवटचा पर्याय शिल्लक राहिला. मग धर्मांतर करण्याचा निर्णय स्वतः बाबासाहेबानी घेतला. तो निर्णय १९५६ साली बाबासाहेबांनी अंमलात सुद्धा आणला. ज्यामुळं आज आमचा आर्थिक, मानसिक, सामाजिक विकास होत आहे. राजकीय व सामाजिक स्तरावर आमी पूर्णपणे विकसित होऊ शकलो असतो, पण आमची वैयक्तिक अशी संस्कृती निर्माण होऊ शकली नाही. हे यामागचं मुख्य कारण आहे असं मला वाटत. मग बौद्ध म्हणून आपली एक संस्कृती नसल्यामुळंच आमचा बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतर सोहळा साजरा करण्यासंदर्भात वाद निर्माण होत आहेत. त्यात १४ ऑक्टो का अशोक विजया दशमी असा वाद निर्माण होऊन. काही उपासक १४ ऑक्टो तर काही उपासक अशोक विजया दशमी दिनी या सोहळा साजरा करतात. असं घडण्यामाग कोण कारणीभूत आहे. याचे कारण काही जण देत असतात. काही जण या वादासंदर्भात म्हणतात की, आम्हाला विचार पुढं पोहचवायचे आहेत. त्यामुळं १४ ऑक्टो ला केला काय ? किंवा अशोक विजया दशमीला केला काय ? काहीही फरक पडत नाही. दोन्ही दिनाच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार उपसकांपर्यंत पोहचतो हे मह्त्वाचं आहे.

        धर्मांतर सोहळ्यासंदर्भातील दोन्ही मुद्दे पाहिले तर एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आम्ही धार्मिक स्तरावर आमचा विकास करण्यास कुठं तरी कमी पडत आहोत. (त्या धर्मास धम्म म्हणू किंवा अन्य कोणता शब्द असला तरी तो सुद्धा वापरू शकता. त्याबद्दल काहीही आक्षेप नाही.) आपला धम्म आला म्हणजे आमची संस्कृती आली. ती संस्कृती आहे का आमची ? आम्हाला हिंदू धर्माचे सण साजरे करू नका असे सांगितले जात. पण धम्मातील सर्व मानवांना एकत्रित आणणारा असा कोणता सोहळा आहे ? थकलेल्या मानवी मनाचा विरंगुळा करण्यासाठी कोणता आधार किंवा काय उपाययोजना आहेत आमच्याकडे ? प्रत्येक पौर्णिमा, बुद्धजयंती, बाबासाहेब जयंती. अशी उदाहरणे आपण द्याल. पण हे सोहळे आमच्या आयुष्यात रूढ झालेत का ? तर याच उत्तर नकारात्मक प्राप्त होते. बाबासाहेब आंबेडकर जयंती ही धार्मिक स्तरावर करायचा सोहळा नाही तर सामाजिक स्तरावरील सोहळा आहे. पण धार्मिक स्तरावर आमचा एकही सोहळा नाही. मग असे असताना आम्ही धार्मिक स्तरावर अविकसित आहोत असं आपणास वाटत नाही का ? जिथं धार्मिक स्तरावर आमची संस्कृती विकसित नाही. तिथं १४ ऑक्टो का अशोक विजयादशमी हा वाद निर्माण होणारच.

         असा वाद असताना दोन्ही दिवशी बाबासाहेबांच्या विचारांच्या देवाण-घेवाण होते. त्यामुळं कोणत्याही दिवशी साजरा केला तर त्यात गैर काय ? असा प्रश्न करणाऱ्यां विद्वानांनी समजाला उत्तर द्यावे की, येणाऱ्या पिढीसाठी धार्मिक संस्कृती म्हणून आपण काय देऊ शकाल ? किंवा काय दिल ?  हे सोहळे साजरे करत असताना काय घडते यातून किती विचार समाजपर्यंत पोहचतात याच वास्तव सर्वाना माहित आहे. त्यामुळं आपलं अपयश झाकण्यासाठी काहीतरी मलमपट्टी करून बाजूला होण्याने आपली संस्कृती विकसित होणार नाही.

        बुद्धांची विचारसरणी ही मानवाला आनंदी जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवणारी आहे. उपासक आणि भिक्खू या दोन विभागात यातील घटक विभागलेले आहेत. भिक्खू साठी जीवनपद्धती ही खूप बंदिस्त नियमावली आहे, तर उपासकांसाठी त्यात शिथिलता देण्यात आली आहे. मग या उपसकांसाठी आपली संस्कृती निर्माण करणं हे धार्मिक अभ्यासक व बौद्ध भिक्खू वर्गाचं कर्तव्य आहे का नाही ? संस्कृती निर्माण करत असताना, त्या-त्या धार्मिक व्यक्ती प्रमुखांच्या जन्म दिवस व वर्षाला सुरुवात मानून पुढील कालगणना केली जाते. अशी काल गणना करत असताना, बौद्ध धम्मात पौर्णिमेला महत्व आहे. म्हणजेच बौद्ध संस्कृती ही चांद्रकालगननेशी निगडित राहील अस मला वाटत. म्हणजेच आमच्या कोणत्याही धार्मिक संस्कृती चा विचार केल्यास आमची संस्कृती ही चांद्रगणनेशी निगडीतच रहायला हवी. तसे असेल तर धम्मचक्र प्रवर्तन दिन सुद्धा हा तारखेनुसार नव्हे तर मग चंद्राच्या स्थितीनुसारच आम्हास साजरा करावा लागेल.

         बाबासाहेबांनी धर्मांतराची दिनांक निवडत असताना मुळात सध्या प्रचलित कालगनेनुसार दिनांक निवडली नव्हती तर तो एक प्रसंग होता. ज्या दिवशी सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धम्म अंगीकारला/स्वीकारला होता. तो मुहूर्त(मुहूर्त यासाठी त्या काळात दिनांक हा उल्लेख न्हवता म्हणून) म्हणजे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दहावा दिवस म्हणजेच अश्विन शुक्ल दशमी. जो १९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी आला होता. म्हणजेच धर्मांतर करत असताना बाबासाहेबानी दिनांक निवडली न्हवती, ही बाब आम्हाला इथं लक्षात घेणे गरजेचं आहे. व त्यानुसारच आम्हाला हा धर्मांतराचा सोहळा साजरा करणे गरजेचे आहे.

        धर्मांतराचा सोहळा म्हणजे नवधर्मांतरीत किंवा आधुनिक भारतातील एक मोठी धार्मिक चळवळ आहे. ही चळवळ विकसीत करायची असेल तर दिनांक नाही तर ती तिथ महत्वाची ठरेल.

        ही बाब जर आम्ही लक्षात घेतली तर आमच्या लक्षात येते की, बौद्ध धम्माचा सूर्य कालगननेशी नव्हे तर चांद्र कालगननेशी संबंध जुळल्या जातो. मग असे असताना आम्ही १४ ऑक्टो चा अट्टाहास का धरायचा ? किंवा दोन्हीही दिवशी साजरा केला तर काय फरक पडतो हा युक्तिवाद का करायचा ? धार्मिक बाबीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत. त्या चांद्रकालगननेशी संबंधित आहेत. त्यामुळं त्यानुसारच चाललो तर एक संस्कृती निर्माण होऊ शकते. तशी संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे. तसे घडत नाही म्हणूनच तर आमच्या डोक्यातून हिंदू संस्कृती नाहीशी होऊ शकली नाही. हिंदू संस्कृतला पर्याय म्हणून बौद्ध संस्कृती स्वीकारायची किंवा निर्माण करायची नाही तर मानवी विकासासाठी गरजेची बाब आहे म्हणून ही संस्कृती निर्माण करणं गरजेचं आहे.

        सामाजिक राजकीय स्तरावर जसे आम्ही अयशस्वी आहोत तसेच धार्मिक स्तरावर सुद्धा अयशस्वी ठरत आहोत. हे यावरू। लक्षात येत. त्यामुळं धम्मातील भिक्खू संघाने, विद्वान मंडळी, धार्मिक संघटनाने एक बौद्ध संस्कृती विकसित करणे गरजेचे आहे. ती जो पर्यंत निर्माण होत नाही. तोपर्यंत आमच्या आचरणात बौद्ध तत्वज्ञान येऊ शकत नाही. हिंदू धर्म जरी त्यागाला तरी हिंदू संस्कृती त्यागली नाही. त्या संस्कृतीचा त्याग करायचा असेल तर आम्हाला पर्यायी बौद्ध संस्कृती द्यावीच लागेल. आपली म्हणावी अशी बौद्ध संस्कृती नही म्हणून हे सर्व वाद वाढत आहेत. येणाऱ्या पिढीला काही देणं ही आमची जबाबदारी आहे. मग ही जबाबदारी लक्षात घेऊन आपण यावर काम करावं आणि पूर्ण धर्मांतरितांना नवं संस्कृतीच्या मार्गावर नेणं कितपत गरजेचं आहे. हे जाणून घेऊन कामाला लागाव.

      येणाऱ्या काळात धार्मिक बाबीमध्ये कोणत्याही प्रकारचा तिथ का दिनांक हा वाद निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. १४ ऑक्टोबर चा मुद्दा इथंच थांबवून अश्विन शुक्ल दशमी(अशोक विजया दशमी) लाच हा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा व्हावा. प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या मनात बौद्ध संस्कृती रुजवावी. ज्यातून बौद्ध धम्मसंस्कृती म्हणून रुजण्यास सुरुवात होईल आणि या असल्या वादाला पूर्णविराम मिळेल.


©जी.संदीप (गोणार,नांदेड)

      ९५५२८०३९८०




Sunday, October 18, 2020

परिधान कर तू.....


 

दरवर्षी आम्ही सांगतो तुम्हा

उपवास वृत्त वैकल्य सोडून ज्ञान अंगिकारा

नवरात्रीचा विचार डोक्यातून काढून टाकून

स्वतःच्या सम्यक प्रगतीचा मार्ग धरा


आज नवरात्रांत तुला सन्मान देणारे

उद्या शरीराचे तुझ्या लचके तोडतील

तुला देवीसमान दर्जा देऊन इथं

तुझ्यावरच चरित्राचा आळ घेतील


तुला दिल्या जाईल मानाची वागणूक आज

देवीसमान समजून कुठल्यातरी मंडपात

उद्या तुलाच बनवून त्यांची शिकार

रमून जातील ते तुझ्यासह भोग-विलासात


कदाचित तुही असशील कारणीभूत

पण पुरुषही त्याला जबाबदार असतात

स्वतः होऊन निष्कलंक बाजूला

तुझ्या चरित्रावर थुंकत बसतात


चरित्रावर तुझ्या प्रश्न करणाऱ्यांना

या जन्मात सवाल तू करशील का ?

ही पिढी जरी नसली तरी येणाऱ्या पिढीच्या

सन्मानासाठी जबाबदार तू ठरशील का ?


किती वर्षे सांगायचं तुला आम्ही 

हा असला नाद सोडून दे

सावित्रीच्या स्वप्नांचा विचार करून

स्वतःच्या जीवनाला आकार दे


हे बघ बाई, वृत्त वैकल्याने

भलं होईल ही जर असलं तुझी आस

मग तूच ठरशील कारणीभूत

तुझं आयुष्य होण्या भकास


नऊ रंगाची साडी नऊ दिवस घालू नको

असं आम्ही तुला आता का सांगावं

तू आवश्यक शिक्षण घेतलेले असताना

तुझं हित तुला का न उमजावं


स्वतःच्या आत्मसन्मानासाठी

उचल पाऊल आणि तोड त्या बेड्या

झुगारून देऊन या परंपरेला

परिधान कर तू अस्मितेच्या साड्या...

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

     ९५५२८०३९८०

Tuesday, October 13, 2020

....म्हणून गरज समन्वयाची.



       मानवाचा विकास होत असताना स्त्री आणि पुरुष या दोन भावनेतून प्रत्येक जण वाढत होता. त्यासोबतच तो आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध प्रयोग करत होता. त्या प्रयोगातून स्वतःच्या विकासासाठी योग्य तो बदल निसर्गात करत होता. या सर्व बाबीत माणूस माणसावर बळाचा वापर करायला शिकला आणि माणसालाच गुलाम बनवून त्यांच्याकडून कामे करवून घेऊ लागला.

         त्यातून गट तयार झाले, त्यानंतर मग जागेचे वाद वाढू लागले. मग समूहाने राहत असताना बळाचा वापर करून आपल्या गरजेनुसार वृक्ष कापून राहण्यासाठी जागा तयार करू लागले. यातून अंतरा-अंतराने मानवी वस्त्या वाढू लागल्या. त्यातून वस्तीचा नायक/प्रमुख हि संकल्पना निर्माण झाली. यात प्रमुख आला म्हणजे दुय्यम सुद्धा आलेच. यातून मानवा-मानवात भेदभावाला सुरुवात झाली.

        कालांतराने स्त्री-पुरुष भेद, गुलाम-मालक, कामगार असे गट तयार झाले. यातून वाद वाढत जात मतभेद निर्माण होत. त्यासाठी सलोख्याचे भूमिका घेणारा प्रमुख किंवा मुखिया असत. तो जो न्याय देईल तो न्याय प्रत्येक जणांवर बंधनकारक असायचा. न्याय अन्यायबद्दल अशी कोणतीही मानसिकता सुरुवातीला न्हवती, पण कालांतराने मानवामध्ये स्वार्थी वृत्ती विकसित होऊ लागली. त्यातून स्वतःच्या हिताकडे माणूस लक्ष देऊ लागला. मग त्यातून दुसऱ्या माणसाला त्रास झाला तरीही त्याला काहीच वाटेनासे झाले. स्वार्थी वृत्ती वाढत असताना आपल्या मताशी सहमत असणाऱ्यांनाच माणूस आपलं म्हणू लागला आणि त्याला मदत सुद्धा करू लागला. आपण वागतोय किंवा जे करतोय ते चुकीचं आहे असं सांगणाऱ्याला माणूस दूर करू लागला. यातून टोळी, प्रदेश, राज्य या बाबी निर्माण झाल्या आणि आज जे पृथ्वीवर काही प्रादेशिक विभाग पाहत आहोत त्याची निर्मिती झाली.

       हे सर्व घडत असताना काही वेळा न्याय अन्यायाच्या बाबी दूर ठेवून आप-आपल्या पद्धधतीने मानवाशी व्यवहार सुरु झाला. त्यातूनच भारत या प्रदेशावर विविध परकीयांनी आक्रमण करून राज्य केलं. पण परकीयांच आक्रमण होण्याआधी इथं खूप मतभेद पेरल्या गेले होते. मानवा-मानवात भेद केल्या गेले होते. काही स्वार्थसाधु लोकांमुळे धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होते. 

        तशीच स्थिती सध्या आपल्या राज्यात पहायला मिळत आहे. त्याला कारणेही तसेच आहेत. पण हे करणे धार्मिक नव्हेत तर ही कारणे न्यायालयीन व संविधानिक प्रक्रियेशी संबंधित आहेत. पण याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न इथल्या काही बिनडोक व स्वार्थसाधु, राजकीय व स्वतःला कट्टर धार्मिक समजणाऱ्यांनी केला आहे. तो मुद्दा म्हणजे आरक्षण हा आहे. या मुद्द्यांसंदर्भात यापूर्वीच्या दोन लेखांमध्ये काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. या लेखात त्यासंदर्भातील घडलेल्या बाबी व आपल्याला काय भूमिका घेत गरजेचं आहे. या संदर्भातील काही मुद्दे पाहूया.

         राज्यसरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण ते संविधानिक नाही असं समजून त्या निर्णयाविरोधात एका वकिलाने अपील केलं. त्या वकिलाची जात पाहून या प्रकरणास जातीचं आवरण घालण्याच काम काही अतिशहाण्या लोकांनी केलं. तिथून सुरु झाली सध्याच्या मतभेदाची सुरुवात. पण हे दोन जातीतीतील मतभेद आजचे नाही आहेत. या मतभेदाची सुरुवात जेव्हा जातीनुसार कामाची विभागणी केल्या गेली तेव्हापासूनच झाली. पण सध्या या मतभेदास वेगळेपण प्राप्त झालं आहे. याला काहीजण विकासामुळं निर्माण झालेली द्वेषभावना असं समजतात तर काहीजण जातीय द्वेष समजतात. कारणे काहीही असोत जे स्वतःला कट्टर धर्मवादी(धार्मिक नव्हे) समजतात त्याच लोकांच्या मनात अशा गोष्टी येतात. मग तेच लोक त्यांच्या डोक्यातील विचारांना इतरांमध्ये पसरवतात. इतर लोक त्याबद्दल शहानिशा न करता त्याला पुढं चालू ठेवतात. अशा पद्धधतीने हे द्वेषाच राजकारण चालू आहे. पण आपण देशाचा नागरिक म्हणून स्वतःला कधी प्रश्न केलात का ? की वकिलांनी जे अपील केलं होतं ते संविधानिक पद्धधतीने केलेलं अपील आहे. त्या अपिलाचा निर्णय जर आरक्षणाच्या विरोधात लागला तर होणाऱ्या नुकसानीस तुम्ही कोणाला जबाबदार धरले असते ? ते एक प्रकारे चांगलंच झालं असं समजा की ते अपील वकिलांनी दोन वर्षानंतर केलं नाही. कारण नंतर जर असे घडले असते तर ते कायदेशीर रित्या चुकीचं ठरवून त्या आरक्षणानुसार मिळालेल्या नियुक्त्या रद्द झाल्या असत्या, हे तुम्हाला कळते का ? जर हे कळत असेल तर मग ज्या यडपड आणि बिनडोक व्यक्तीने अपील करणाऱ्यांची जात पाहून त्या जातीला सोशल मिडियावर टार्गेट केलं, ट्रोल केलं त्या जातीचा यात काही दोष आहे का ? किंवा त्या व्यक्तीचा सुद्धा यात काही दोष आहे का ? मग हा निरर्थक वाद का वाढवताय ?

       हा वाद वाढवण्यात काही व्यक्ती सराईतपणे आपली भूमिका बजावत आहेत. त्यात खासदार उदयनराजे भोसले हे इथल्या नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण राज्यसभेवर जातात तेव्हा त्यांना एका प्रवर्गाच्या हितासाठी नाही तर सर्वांगीण हितासाठी विचार करावा लागतो. जरी ते आरक्षित जागेवरून एका विशिष्ट समुदायातून निवडून गेलेले असते तरीसुद्धा. त्यांना देशातील प्रत्येक नागरिकांच्या हिताचा विचार करावा लागतो. हे याना कोणी सांगण्याची गरज आहे का ? आरक्षित जागेतून निवडून गेलेल्या प्रतिनिधीने त्या समुदायाचा तेव्हाच विचार करावा जेव्हा त्या समुदायावर अन्याय होत आहे असे जाणवेल. अन्यथा आरक्षित जागेवर निवडून गेलेला प्रतिनिधीला सुद्धा देशातील प्रत्येक नागरिकांच्या हिताचाच विचार करावा लागतो. असे असताना ईतर नागरिकांना असलेल्या सुविधा आम्हाला मिळत नसतील तर इतरांच्या सुविधा सुद्धा रद्द करा. असा म्हणण्याचा कोणत्याही लोकप्रतिनिधीला अधिकार नाही. तरीही तसे वक्तव्य लोकप्रतिनिधी करत असतील तर त्या मानसिकतेचा विरोध करणे हे लोकशातील प्रत्येक नागरिकांच कर्तव्य आहे. हे आपणास समजते का ?

      मग त्यांच्या या विधानाचा  एखाद्या राजकीय व्यक्तीने विधानाचा विरोध केला, त्यांच्या मानसिकतेबद्दल व पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला, त्यांच्या विधानाबद्दल काही बोलले तर त्यांना लगेच ट्रोल करायचं ? त्यांच्याबद्दल खालच्या भाषेत जाऊन टीका-टिपण्णी करायची ? म्हणजे आज सुद्धा तुमच्यात समतेची भावना रुजली नाही ही बाब लक्षात येते. तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर त्याचा विरोध करता. हीच आहे का शिवरायांची शिकवण ?  “खबरदार जर टाच मारून जाल पुढे तर चिंधड्या उडवीन राई-राई एवढ्या.” अशी धमकी देण्याची ताकद शिवरायांच्या राज्यात होती. ती धमकी कोणाला दिली होती हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे ज्या शिवरायांच्या गाडीचे वारसदार म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलले तर तुम्ही इतरांना त्रास देता. धमक्या देता, त्यांच्या बद्दल अर्वाच्य भाषेत टीका-टिपण्णी करता. हे पाहत असताना मला प्रश्न पडतो की, हे असं करणाऱ्यांना खरंच शिवराय कळालेत का ? कारण स्वतः शिवरायांच्या राज्यात शिवरायांना नुकासणीबद्दल धमकी देण्याचं क एक मुलगा करतो म्हणजे काय मानसिकता होती ती हे कळते का ? असे असताना अशी खालच्या थरावर जाऊन टीका-टिपण्णी करण्याचा अधिकार दिलाच कोणी तुम्हाला ? मान्य आहे लोकशाही आहे लोकशाहीत सर्वाना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण व्यक्त होत असताना कशाबद्दल व्यक्त होतोय. काय मत व्यक्त करतोय याच सुद्धा भान आम्हाला राहू नये का ? आम्ही या देशातील नागरिकांच्या हितासाठी राजकारणाची स्वप्न बघतोय आणि आम्हालाच कळत नाही की, आम्ही कशाबद्दल काय बोलावे, तर मला सांगा. हा नेता या लोकशाहीत तुमचा विकास करू शकेल का ? त्यांची लायकी आहे का ? तुमचा विकास करण्याची ? ही जाणीव आम्ही करून घेणार आहोत का ? मानवी विकासाच्या सुरुवातीला जसे वाद होऊन मानवा-मानवात भेद भाव झाले आणि शांती समृद्धी कमी झाली. तशीच अवस्था आम्ही करून घेत आहोत असं आपणास वाटत नाही का ?

      बाळासाहेबांच्या स्टेटमेंटनंतर स्वतः संभाजीराजेंच स्टेटमेंट आहे की, बाळासाहेबांचं काहीही चुकलं नाही. मग मला सांगा बाळासाहेबांच्या विधानावर उदयनराजेच्या ज्या समर्थकांनी सोशल मीडियावर वाद घातला अर्वाच्य भाषेत टीका-टिपण्णी केली. त्यांच्यावर आज पोलीस केसेस होत आहेत. त्या पोलीस केसेस लढण्यासाठी तुम्हाला तुमचा राजकीय नेता मदत करणार नाही. सुरुवातीला काही वेळा फॉर्मलिटी म्हणून धीर देण्यासाठी काही शब्द बोलेल पण त्यानंतर भोगाव्या लागणाऱ्या परिणामास तुम्हाला स्वतःला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षित असाल तर कायमचे शिक्षणाच्या होणाऱ्या सर्व फायद्याना मुकावे लागणार आहे. 

          त्यामुळं हे असं राजकीय व्यक्तींच्या टीका-टिपण्णीची किती प्रमाणात दखल घ्यायची याची जाणीव स्वतःत निर्माण करून घ्या मित्रानो. तुम्हाला जर काही झालं तर येणाऱ्या काळात तुमच्या कर्तृत्वाचे परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावे लागतील. तुम्ही शिक्षित असताना सुद्धा तुमचे सर्व कागदपत्रे निष्क्रिय होतील. कोणत्याही प्रकारचा फायदा तुम्हाला होणार नाही. आयुष्यात वडिलांच्या कमाईवर घेतलेल्या शिक्षणाचा फायदा तुम्हाला होऊ शकणार नाही. तुमच्या त्या एका चुकीमुळं सर्व वाटोळं होऊन जाईल. जे अशिक्षित आहेत. त्यांनी सुद्धा या प्रकरणात कधीच पडू नये. यामुळं सुरु होणाऱ्या कोर्ट कचेरीत पैसा वाया घालवण्याची तुमची ऐपत असलं तर तोच पैसा कुठंतरी सत्कारणी लावा.

       मराठा आणि बौद्ध समाजातील नेत्यांचे ते वाद नसतानाही त्याला या दोन जातीतील वाद आहेत अशी मानसिकता तयार करून घेऊन आजची तरुणाई गरळ ओकत आहे. याचा दुष्परिणाम असा होतोय की, मराठा आणि बौद्ध समाजातील व्यक्तींमध्ये जे सलोख्याचे बंधन तयार होत होते. त्यात अडथळे येत आहेत. जे सोबत राहत होते. त्यांच्यातील काही जणांमध्ये वाद निर्माण होत आहेत. असे असताना मराठा आणि बौद्ध समाजातील तरुणांनी घडत असलेल्या घटनेचा विचार करावा मगच व्यक्त व्हावे. शहरी भागातील तरुण जातीबद्दल बोलून मोकळं होतात. पण याचे परिणाम ग्रामीण भागात खूप खोलवर रुजतात. त्यातून द्वेषभावना वाढत जाते. मग सुरु होतो जातीय द्वेषाचा प्रकार. सध्या उदयनराजे आणि बाळासाहेब आंबेडकर असा वाद निर्माण करून त्याला जातीय स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम काही तरुणांनी केलं आहे. पण मित्रानो तुम्हाला एवढंच सांगायचं की, तुम्ही तुमच्या नेत्यांचा विचार करत ज्या समाजविरोधात बोलता त्या समाजातील तुमचे काही चांगले मित्र आहेत. मग तुमच्या अशा बोलण्याने तुमचे नाते टिकेल का ? तुम्हाला तुमचे संबंध टिकवायचे आहेत का ? ज्या नेत्यामुळे तुमचा काहीही फायदा होणार नाही, अशा नेत्यासाठी हे नाते वाईट बनवायचे आहे. त्या नेत्यांचा कधीच प्रत्यक्ष संबंध येणार नाही. पण ग्रामीण भागात शहरातील काही नगरात मराठा आणि बौद्धांचा प्रत्यक्ष संबंध येतो. मग या संबंधात तुम्ही विष कालवत आहात असं तुम्हाला वाटत नाही का ? असे जर घडत गेले तर धार्मिक वाद वाढत जाऊन मराठा-बौद्ध यात जी द्वेषभावना आहे. ती वाढतच जाईल. मग अशा वेळी आपल्या आपण माणूस असण्याला काहीही अर्थ प्राप्त होत नाही.

        खरं पाहता राजकीय नेत्यांना अशा बाबी मध्ये स्वतः चर्चा करून त्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यायला हवा. तो घेत असताना जनतेच्या हिताचाच राहील याची खात्री स्वतः बालगावी. जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देऊन असे काही मुद्दे उकरून काढून जर तुम्ही शांत राहत असाल तर तुमच्या उद्दिष्टाबद्दल आम्ही प्रश्नचिन्ह का उपस्थित करू नये ? तो उपस्थित करन हा इथल्या प्रत्येक नागरीकाचा हक्क आहे.

      मित्रानो खाजदार, आमदार हे आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण पाठवलेलं नोकर असतात. या नोकरांनी जर त्यांची भूमिका योग्य पद्धधतीने पार पाडली नाही तर त्याबद्दल त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण पार पाडत नाही. म्हणून आज आम्हाला बेरोजगारीच्या नावाने ओरडावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नावाने ओरडावे लागत आहे, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या नावाने ओरडावे लागत आहे. एवढंच नाही ते ज्या ब्राम्हण समुदायाला प्रगत समजत होतो तो ब्राम्हण समुदाय सुद्धा आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्यांच्या न्याय हक्कसाठी सुद्धा तो झगडत आहे. त्यात सत्य किती ही बाब वेगळी. म्हणजे इथे प्रत्येक घटकांच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आहे. असा जर आपल्याला आवाज उठवावा लागत असेल तर मग आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून यांना निवडूनच कशाला देतोय ?

          देशात घडत असलेल्या घटना पाहत असता, राजकीय नेता आमच्या हितासाठी झटत आहे असं वाटत नाही. प्रत्येक राजकीय नेता वैयक्तिक पातळीवर स्वार्थसाधु वृत्तीने काम करत आहेत. यांच्यामध्ये वैयक्तिक आयुष्याबाबतीत चांगले संबंध आहेत. पण राजकीय पातळीला हे कट्टर का होतात ? राजकीय पातळीला सुद्धा यांनी चांगले संबंध जपणे गरजेचं आहे. कोणत्याही बाबी करत असताना त्यात प्रत्येक नागरिकांच्या हिताची गोष्ट लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हाच हे असले वाद थांबण्यास मदत होईल. निरर्थक वाद वाढवण्यासाठी आपण त्यांना तिथे पाठवत नाही. ते नीटपणे काम करावेत म्हणून करोडो रुपयांच्या सोयी सुविधा त्यांना दिल्या जातात. त्यामुळं त्यांना कामाला लावायचं असेल तर त्यांच्यावर दबाव आणावा लागेल. आपल्या न्याय, हक्क, अधिकारासाठी एकत्रित यावं लागेल. या सर्व बाबी राजकीय व्यक्तींनी स्वतःत समन्वय साधून देशातील नागरिकांच हित घडवलं नाही, तर आम्हाला जाती धर्माचे वलय सोडून देऊन, आमच्या विकासासाठी कोणतीही जात किंवा धर्म कामाला येत नाहीत या बाबी लक्षात घेऊन ते मतभेद सोडून देऊन आप-आपसात समन्वयाची भूमिका घ्यावी लागेल.

©जी.संदीप(गोणार, नांदेड)

       9552803980


Saturday, October 10, 2020

सुरुवात पुन्हा अनर्थाची....



 गेली कित्येक दिवस झाले देशात विविध स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. कोरोना, लॉकडाऊन, कामगारांचे स्थलांतर, अनलॉक, बेरोजगारी, कामगार कपात, खाजगीकरण, नोकरभरती बंद, GDP ने निच्छांक गाठणे,सुशांतसिंह आत्महत्या, रिचा चक्रवर्ती, ड्रग प्रकरण, कंगना राणावत, कामगार धोरण, शेतकरी धोरण, मराठा आरक्षण, मराठा आरक्षणावरून सर्व अरक्षणासंदर्भातील मत. आदी मुद्द्यांसंदर्भात लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ यांची भूमिका व नागरिक म्हणून तरुण व सामान्यांची भूमिका याबद्दलच विश्लेषण.....


         जगात 31 डिसेंबर रोजी कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर 11 फेब्रु रोजी कोव्हिडची ओळख जगाला जागतिक आरोग्य संघटनेनं करून दिली. कोरोनाची लक्षणे लक्षात घेऊन प्रत्येक देशाने आपल्या सोयीनुसार लॉकडाऊन ची घोषणा केली. पण भारत मात्र शांत होता. भारताला या रोगाच गांभीर्य कळालं न्हवत का असा साधा प्रश्न आमच्या मनाला का पडला नाही. मग मला वाटलं की जागतिक आरोग्य संघटना 21 जानेवारी पासून दररोज जागतिक स्तरावरील कोरोनाबाधितांचा रिपोर्ट जाहीर करत होती. तरीही आमच्या प्रधानमंत्र्याला, आरोग्य विभागाला इतकेच काय देशातील जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीला याबद्दल कोणतेच गांभीर्य कसे वाटले नाही ? हा प्रश्न आम्हाला का पडत नाही ? आम्ही आमच्याबद्दल एवढे निष्काळजी कसे राहू शकतो. कोरोनाची वाढ चालू असतानाच. गुजरात मध्ये “नमस्ते ट्रम्प” नावाचा कार्यक्रम एक लाख नागरिकांच्या सहभागात घेतला जातो. ते सुद्धा कोरोनाची लक्षणे लक्षात घेऊन त्याचं नामकरण झाल्या तिसऱ्या दिवशीच.

       चीन मध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला होता हे जगाला माहित झाले. त्यात तिथे मृत्यच प्रमाण सुद्धा वाढतच होत. त्यामुळं चीन ने 19 जानेवारी पासून लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर जगाचा लॉकडाऊनकडील प्रवास सुरु झाला. पण भारत मात्र त्या तुलनेत कुठेही सजग दिसत न्हवता. 

         नमस्ते ट्रम्प सोबतच, मध्यप्रदेश मध्ये केंद्रसरकारच्या पक्षाच राजकारण चालू होत. या सर्व गोंधळात जनता मात्र वाऱ्यावर होती. कोरोनाची भयंकर स्थिती आहे हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब कार्यवाही न करता देशातील नागरिकांना संकटात ठेवून तुम्ही लाखो लोकांना एकत्रित करता, एखाद्या राज्यात राजकारण करत बसता, त्यासोबतच विदेशातून देशात बोलवलेल्या नागरिकांच्या विलगीकरनाची सोय न करता त्यांना सरळ सरळ आप-आपल्या जबाबदारीवर सोडून देता. म्हणजे आम्ही सामान्य नागरिकांनी काय समजावे ? विदेशातून आलेले नागरिक जर ज्यांच्या त्यांच्या जबाबदारीने वागले असते तर आज आमचे प्रधानमंत्री म्हणून सध्याचे प्रधानमंत्री राहिले नसते हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. इथल्या नागरिकांना कोणत्या प्रसंगी कसे वागावे याचे भान नसते म्हणून तर सरकारला लॉकडाऊन चा खेळ करावा लागला. नागरिक जर जबाबदारीने वागला असता तर हा लॉकडाऊन चा खेळ सुरू झाला नसता. यामुळं होत असलेला परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागला नसता.

        लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. कोरोना हा एकमेव विषाणू याना दिसला. पण हा विषाणू ज्यांच्या वर प्रभाव करतोय त्या नागरिकांबद्दल काहीही काळजी नाही ? कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांच्यासाठी तुम्ही उपचार सुरु केलेत पण कोरोना पसरू नये म्हणून जे नागरिकांचे काम बंद केलीत, त्याबद्दल काहीच का उपाययोजना केल्या नाहीत. हे न झाल्यामुळेच मोठ्या प्रमाणात कामगारांनी स्थलांतर केलं. हे स्थलांतर होत असताना कोरोनाच कमी पण उपासमारीची भीती जास्तीची वाटत होती. त्यातून मृत्यूचे प्रमाण सुद्धा खूप समोर आले आहेत. औरंगाबाद परिसरातील रेल्वेरुळावरील घडलेला प्रसंग असो की घरापासून काही किलोमीटर अंतरावर असताना उपसमारीमुळं झालेला अंत असो की घरी जाऊन रोजी-रोटीची काय सोय होणार या चिंतेने केलेली आत्महत्या असो. अशा अनेक प्रकारातून मृत्यूचं प्रमाण वाढतच आहे. हे एवढं होत असताना सुद्धा आम्ही षंढासारखे का आहोत ?

        या दरम्यान लोकशाहीचा चौथा स्तंभ सुद्धा हा नागरिकांच्या बाजूने न्हवता. राहील तरी कसा ? कारण तुम्ही सामान्य नागरिक त्यांना त्यांचे दुकान चालवण्यासाठी आर्थिक साहाय्य थोडीच करता. याचाच परिणाम म्हणून का काय ? या मीडियाने सामान्य नागरिकांच्या समस्येला कधीही आपल्या वार्तांकणात स्थान दिले नाही. काही मीडियाने फक्त जेवणात जसे लोणचे वापरतात तसं स्थान दिल असेल ही बाब वेगळी. तशाने सामान्यांच्या प्रश्नबाबत शासनाला जाग येत नाही किंवा नागरिक आपल्या समस्येबाबत जागृत होत नाहीत.

        या मीडियाने केलं तर काय मग ? तर या मीडियाने कोरोनाच्या काळात दाखवला फक्त कोरोना. जगात कोरोना कसा वाढतोय, देशात कोरोना वाढण्याचा प्रमाण कस कमी आहे. कोरोना होऊ नये म्हणून काय-काय उपाय आहेत. जे वैद्यकीय नाही तर राजकीय लोक सांगत आहेत ते उपाय. पालघर हत्याकांड, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, रिया चक्रवर्ती, ड्रग प्रकरण, कंगना राणावत, कामगार धोरण, शेतकरी धोरण, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर मीडियाने जोर देऊन आपला टीआरपी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

        हे करत असताना टीआरपी वाढवून घेण्याचे कालचे प्रकरण आपल्यासाठी ताजे आहे. टीआरपी काय आहे व तो का वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. याचा विचार करता चॅनेल पाहण्याची दर्शक संख्या म्हणजे टीआरपी. हे मोजतात कशासाठी किंवा याचा फायदा काय ? तर त्याचा फायदा असा की, ज्या चॅनेल चा टीआरपी जास्त त्या चॅनेलला जाहिराती जास्तीच्या मिळणार व सोबतच त्यांचे दर सुद्धा इतर चॅनेल पेक्षा जास्त राहणार. म्हणजे ज्या चॅनेल चा टीआरपी जास्त ते चॅनेल जास्तीचा पैसा कमवणार. मग हा टीआरपी जास्तीचा मिळावा म्हणून काही चॅनेल वाल्यानी ग्राहकांनी आपले चॅनेल चालू ठेवावे म्हणून पैसे दिले. यातून मोठा घोटाळा समोर आला. ज्यात दोन मराठी चॅनेलसह त्या अर्णव गोस्वामी ज्या चॅनेल वर आहे. त्या चॅनेल ला सुद्धा समन्स पाठवण्यात आले आहेत. हा सर्व खेळ म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी केलेला हा खेळ आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जो नागरिकांच्या हितासाठी, न्याय हक्कासाठी आवाज उठवण्याच काम करतो. पण तो मिडियासुद्धा काही पैशासाठी दलाल व रखैल बनून गेला. त्यामुळं सामान्य नाहरिकांचा आवाज दाबल्या गेला.

       या सामान्य नागरिकांना आनंदी आयुष्य जगता यावे, त्यांच्या न्याय, हक्काच्या बाजूने उभे राहण्याची जबाबदारी मीडियावर असते पण तसे कोणतेही काम मीडिया करताना दिसत नाही. म्हणून या कोरोनाच्या नावाखाली आमच्या आयुष्यात अनर्थ घडायला सुरुवात झाली आहे. पण कोणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही. का ? तर त्याचा आमच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही असं समजून. पण खरे पाहता या बाबीचा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंध आहे. आपल्या आयुष्यावर या बाबीचा प्रत्यक्ष फरक पडतो. हे आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आमचा अनर्थ ओढवून घेतो.

       तो संबंध आहे तरी कसा हे आपण समजून घेऊया ; देशातील नागरिक म्हणून प्रत्येकाच्या सुखकारक व सुविधापूर्ण आयुष्य जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो अधिकार इथे प्रत्यकाला प्राप्त होतोय का याबद्दल मीडिया कोणत्याही प्रकारे आवाज उठवत नाही.  लॉकडाऊन ची सुरुवात झाल्यानंतर देशभरात कोरोनाची काय स्थिती आहे हे सांगत असताना कोरोनामुळं नागरिकांची काय स्थिती झाली याबद्दल कोणत्याही चॅनेल किंवा वृत्तपत्राने शोधपत्रकारिता का केली नाही ? सर्वाना घरी बसवत असताना त्यांच्या रोजगाराचे काय याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. रोजगार नाही म्हणजे पैसा नाही. पैसे नसतील तर माणसाने आयुष्य कसे जगायचे गरजा कशा पूर्ण करायच्या याबद्दल मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा होता. पण कोणत्याही प्रश्नाला मीडियाने हात घातला नाही. अनलॉक ची प्रक्रिया सुरु झाली असताना व्यवहार सुरळीत सुरु होत आहेत. पण गरजेच्या वस्तू खरेदीकरण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. काम बंद आहेत. कारखान्यात कामगार कपात होत आहे. सोबतच कामगारांना कंत्राटी पद्धधतीने राबवून घेण्याची मुभा सरकारने कारखानदारांना दिली. यातून रोजगाराच्या दुनियेत एक नवं संकट उभा राहणार आहे. याबद्दल सुद्धा कोणताच मीडिया काहीही बोलत नाही.

       आम्ही सुद्धा शांत आहोत. संकटाची वेळ असताना सरकार सरकारी कंपन्यांना खाजगी क्षेत्राकडे वळवण्यासाठी गुंतलेलं आहे. या अडचणीच्या वेळी नागरिकांना सुविधा देण्यासाठी खाजगी क्षेत्राचे अधिग्रहण करण्याऐवजी शासन जर सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करत असेल तर हा नागरिकांच्या आयुष्याशी केलेला खेळ नव्हे का ? हा प्रश्न तुम्हाला का पडत नाही ? समर्थक असो अथवा विरोधक कोणीही असो तुमच्या पाल्याला दर्जेदार प्राथमिक शिक्षण मोफत देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. हे तुम्हाला कळते का ? असे असताना काही ठराविक लोकांची कमाई आहे म्हणून जर तुम्ही खाजगी संस्थांचे तण इथे वाढवत असाल तर इथल्या करोडो गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर तुम्ही गदा आणत आहात हे तुमच्या लक्षात येतय का ?

       आज गरीब लोक त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून गरीब नाहीत तर त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याचा योग्य वापर होत नाही, झाला तर त्याचा मोबदला मिळत नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे. ते पैसा आहे तसाच साठवून ठेवत आहेत(गोठवणूक). देशातील पहिल्या दहा श्रीमंत लोकांकडे 218 बिलियन डॉलर संपत्ती जमा आहे. ही झाली अधिकृत अनधिकृत किती असेल याबद्दल कोणीही सांगू शकणार नाही. देशातील संपत्ती जर काही ठराविक लोकांकडे जमा राहिली तर देश विकसित कसा होईल ? देशातील गरिबांची गरिबी कशी नष्ट होईल ? 

         देश विकसित करायचा असेल तर देशातील फक्त काही लोकांकडे संपत्ती किंवा सुख-सुविधा असेल तर काही कामाचे नव्हे. अशाने देश विकसीत होत नाही. हा देश विकसित होण्याचे स्वप्न मात्र या मूर्ख नागरिकांना नक्की दाखवता येतात. देशातील गरिबी हटवायची  असेल तर हा पैसा मार्केट मध्ये गुंतवणे गरजेचं आहे. हा पैसा मार्केट मध्ये गुंतवण्यासाठी  विविध प्रकारची शासकीय कामांची सुरुवात करावी लागेल. नागरिकांसाठी आवश्यक गरजांची व सोयीची कामे सुरू केलीत तर, नागरिकांना काम मिळेल त्यातून बेरोजगारी नाहीशी होण्यास मदत होईल. कामगारांकडे पैसा आला तर बाजार मध्ये पैसा येईल. त्यातून व्यापाऱ्यांचा व्यापार वाढेल. व्यापाऱ्यांचा व्यापार वाढला म्हणजे सरकारी तिजोरीत टॅक्स जमा होईल. त्यातून तोट्यात असलेल्या प्रत्येक शासकीय सेवांमध्ये आवश्यक ती सुविधा वाढवली तर नागरिकांचा कल शासकीय सुविधा सोडून सरकारी सेवा कंपन्यांकडे राहील. शासकीय शाळेत उत्तम शिक्षण मिळत नाही म्हणून ज्याप्रमाणे खाजगी शाळेकडे पालकांचा कल वाढला आहे. त्याचप्रमाणे या शासकीय सुविधेबाबतीत सुद्धा होत आहे.

       म्हणून रोजगार निर्माण करायचा असेल, गरिबी हटवायची असेल, देश जागतिक स्तरावर विकसित च्या ऐवजी देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास करायचा असेल तर खाजगीकरण हा पर्याय नाही. तर खाजगी सेवा क्षेत्रांचे अधिगृहन करून नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी सक्षम बनणे हाच पर्याय आहे. अन्यथा लोकशाही आणि गरिबी हटाव, नागरिकांचा विकास या सुंदर कल्पनेखाली केलेला हा नागरिकांशी खेळलेला खेळ ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

        असे का होत आहे. तर लॉकडाऊन च्या खाली शासन विविध बाबींच खाजगीकरण करत असताना नागरिक म्हणून आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा विरोध करत नाही. त्यांना जाब विचारत नाही. आम्ही त्या कामासाठी रस्त्यावर उतरत नाही. आम्ही उतरतो रस्त्यावर कशासाठी तर जातीवाचक प्रश्नासाठी. धर्माच्या अभिमानाच्या नावाखाली. पण आमचे जीवन सुखी व आनंदी व्हायचे असेल तर आम्हाला ज्या सोयी सुविधा हव्या आहेत त्या देण्यासाठी कधीच शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरत नाही.

       आपल्याला कोणतीही गोष्ट मुफ्त मध्ये हवी नाही. विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षण, व्ययसायिक शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय मिळणे, शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतल्यानंतर त्यांच्या मालाला भाव मिळणे, शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम नाही का ? याबद्दल आम्ही एक शब्द सुद्धा काढत नाही. तुम्ही म्हणाल शासन काय-काय तरी करेल ? असं म्हणाऱ्यांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावे, अन्न, वस्त्र,निवारा आणि शिक्षण देण्यासाठी शासनाने काळानुरूप काय केलं ? अशा प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर येतो का ? तर याचे उत्तर नाकारात्मकच मिळेल. मग मला सांगा तुमच्या आयुष्यात आवश्यक बाबीसाठी तुम्ही लढत नसाल तर मग हा अनर्थ नव्हे का ?

       ही अनर्थाची सुरुवात नव्हे का ? याबाबीचा आपण विचार करणं गरजेचं आहे अन्यथा. शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यात, जातीच्या नावावर लढा देण्यातच आमच्या पिढ्या बरबाद होऊन जातील. जात, धर्म यासाठी लढल्याने आमचा काहीही फायदा होणार नाही. ते प्रश्न आमचा आर्थिक विकास करणार नाहीत. धर्म,जात नसेल तर आम्ही काय मरणार नाहीत. त्यामुळं योग्य-अयोग्य बाबी ओळखून त्यासाठी लढा देऊयात. शासनाला जाब विचारुयात तरच आमच्या विकासाला सुरुवात होईल. अन्यथा विविध मार्गाने आमचा अनर्थ अटळ आहे एवढं नक्की.


©जी.संदीप (गोणार,नांदेड.)

      9552803980

Tuesday, September 29, 2020

व्यथा खैरलांजीची...



खैरलांजीचा तो प्रसंग आठवता

येतात आजही अंगावर शहारे

प्राण्यासारखे तो प्रसंग प्रत्यक्ष

पाहण्यास तुम्हा लाज कशी वाटली नाही रे ?


पाहत होता शेकडोंचा समुदाय

हैवाण प्राण्यासारखा निर्बुद्धपणे

करत होते अत्याचार आणि हत्या

मानव असून सैतानाप्रमाणे


क्रूरपणे हत्या होत असतानाही

शेकडोंचा समुदाय षंढपणे पाहत राहतो

न्याय मिळण्याच सोडा इथे

जगण्याचा हक्कच हिरावून घेतल्या जातो.


अजून किती वर्षे जातीच्या

नावाखाली बळी घेत राहणार

पूर्ण कुटुंब संपले न्यायाच्या प्रतिक्षेतच

मग सांगा गुन्हेगारांना सजा कधी देणार.


त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी

वैगरे आम्हाला न्याय हवा नाही.

पुन्हा गुन्हेगार घडू नयेत यासाठी

कठोर शिक्षेशिवाय पर्याय नाही.


देहदंडाच्या शिक्षने न्याय इथे

त्यांना व आम्हा मिळणार नाही

ते जिवंत राहून जेव्हा भोगतील सजा

त्याविना अशी मानसिकता बदलणार नाही.


रास्ता रोको, निषेध, कॅडलं, अशा लढल्याने

तात्कालिक समाधान आम्हा मिळेल न्याय नाही.

न्यायाच्या प्रतिक्षेतच 14 वर्षच काय

कित्येक पिढ्या गेल्याविना राहणार नाही.


असेल माणुसकी जिवंत तर एकदा

प्रत्येकाने चढवला पाहिजे आवाज सजेसाठी

मग आम्हाला कशाला राहील गरज

प्रत्यक्ष उतरण्याची रस्त्यावर न्यायासाठी


©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Monday, September 28, 2020

.......तर खुशाल आरक्षण रद्द करूयात




          गेली कित्येक वर्षे आरक्षणाच्या नावावरून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. आरक्षणामुळं गुणवत्ताधारकांना संधी मिळत नाही. असं एकमेव कारण देऊन खुल्याप्रवर्गातील काही नागरिक आरक्षणाचा विरोध करतात. पण ते रद्द करण्यासोबतच आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी सुद्धा काही जण करत आहेत. काल परवा तर एका खासदाराने स्टेटमेंट दिले की, “आम्हाला आरक्षण देऊ शकत नसाल, तर सर्वच आरक्षण रद्द करा.”

           या सर्व बाबींचा आढावा घेत असताना आरक्षणाचे समर्थक आरक्षण रद्द करण्याचा मागणीवर नेहमी एक युक्तिवाद करत आलेत. तो युक्तिवाद म्हणजे, आरक्षण रद्द करायचे असेल तर नक्की करा, पण देशात जी स्थावर मालमत्ता आहे त्या मालमत्तेच समान वाटप करा. समान नागरी कायदा लागू करा. असा मुद्दा आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या वर्गांपैकी एक वर्ग म्हणतो. बाकी सर्वजण शांत राहतात. खरे पाहता या दोन्ही बाबी होतील असे कधी वाटत नाही. 

         मुळात आरक्षण देत असताना ज्या अटींचा विचार करण्यात आला. त्यात पारंपारिक व्यवस्थेने मानवा मध्ये भेद करायला सुरुवात केली. तो भेद करत असताना जात हा घटक पुढं आणल्या गेला. मग जातीनुरूप काम करण्याची बंधने लादली. कोणत्या जातीच्या व्यक्तीने कोणती कामे करायची याची कठोर नियमावली व्यवस्थेने लादून दिली. या नियमावलीचा परिणाम म्हणून कौशल्य असतील तरी सुद्धा आपणास आपल्या जातीबाहेरील कामे करता येत नाहीत. जातीअंतर्गत ठरवून दिलेलं काम शिकणे व तेच काम करत राहणे अशी सक्ती करण्यात आली. संपत्ती साठवण्याचा अधिकार सुद्धा विशिष्ट जातीलाच होता. सेवेच्या बदल्यात धान्य देणे म्हणजे एकप्रकारे सेवाकऱ्यांना संपत्ती बाळगण्यापासून दूर ठेवणेच न्हवे का ? यासोबतच लादून दिलेल्या बंधनासंदर्भात कोणत्याही प्रकारचा विरोध करण्याचा अधिकार सुद्धा कोणालाही न्हवता. त्यामुळं झालं असं की आहे ती स्थिती मागील जन्माचे कर्म म्हणून स्वीकारण्याची मानसिकता उपेक्षित वर्गात तयार झाली. धर्माचे ठेकेदार जे सांगतील ते खरेच आहे. असे मानण्याची वृत्ती तयार झाली. धर्माच्या ठेकेदारांना या गुलामांनी आदर्श मानले होते. धर्माचे ठेकेदार हे देवाचे दूत आहेत असे मानायचे त्यामुळं गुलामांमध्ये विरोध करण्याची मानसिकता निर्माण झाली नाही. याचा परिणाम असा झाला की, ठेकेदार जे सांगतील ते खरं आहे असं समजून त्याप्रमाणे ते वागत असत.

        त्यातून ते दररोजच्या कामाचा जो मोबदला मिळत त्यावर गुजराण करत. अडी-अडचणीला ते सवर्ण आपणास सहकार्य करतील अशी भावना त्यांच्या मनात रहायची. उपकार केल्यासारखी मदत हे सधन व ठेकेदार लोक करत असत. खरं तर श्रम करणाऱ्यांचा तो अधिकार असताना सुद्धा त्यांच्यावर उपकार केल्याप्रमाणे गरजेएवढी नाहीतर तुटपुंजी मदत देत असत. त्यातून काम करणारा गुलाम वर्ग त्यातच धन्य मानून समाधानी राहू लागला. व सवर्णांनी खूप उपकार केल्यासारखी भावना मनात ठेवून ते त्यांच्याशी अदबीने वागु लागला. त्यांच्या कोणत्याही बाबीला विरोध करणे नाही, हक्क मागणे नाही, तुम्हीच का श्रेष्ठ ? असा सवाल सुद्धा नाही. फक्त गुलाम बनून सहन करणे हा एकमेव उपाय व्यवस्थेने त्यांच्यावर लादला होता. हे व्यवस्थेचे गुलाम बनून त्याप्रमाणे ते वागत होते.

         कालांतराने परकीयांच्या सत्ता भारतावर आक्रमण करून राज्य करू लागल्या. त्यामुळं गुलामांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली. माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक बाबींची जाणीव होऊ लागली. जाती बाहेरील ईतर बाबी करण्याच्या संधी मिळू लागल्या. पण त्या फक्त आणि फक्त परकीय आक्रमकांमुळं. माणूस म्हणून जगण्यासाठी स्वाभिमान हा गरजेचा असतो. याबद्दल जाणीव तयार होऊ लागली. आपल्या या गुलामीच्या जगण्यास मागील जन्माचे कर्म किंवा कोणतीही दैवीशक्ती कारणीभूत नाही. अशी मानसिकता तयार होऊ लागली. त्यातून जातीतील बंधने मोडून शिक्षण घेण्यासाठी पुढं येऊ लागले. मग घेतलेल्या शिक्षणाचा वापर करत पारंपारिक व्यवस्थेला खिंडार पाडण्याचं काम नवशिक्षित वर्ग करू लागला. (याचे उदाहरण म्हणून विविध समाजसुधारकांची नवे घेता येतील.)यामुळं पारंपरिक व्यवस्थेचे धाबे दणाणले. त्यांच्यात चल-बिचल सुरु झाली. त्यांच्या स्वामीत्वावर गदा येणार होती. तसे होऊ नये म्हणून हे धडपडत होते. पण तरीही त्यांना नको तेच घडत होते.

       न्याय हक्काची मागणी ही परकीय आक्रमकांकडे केल्या जाऊ लागली. देशातील व्यवस्थेच्या प्रमुखापैकी कोणत्याही प्रमुखाने स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क, अधिकार सर्वात महत्वाचे म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची भाषा केली नाही.

        आज जे आरक्षणाचा विरोध करत आहेत. त्यांचेच वंशज या बाबीस कारणीभूत आहेत. या पारंपरिक व्यवस्थेमुळं विकासापासून दूर लोटल्या गेलेल्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विशेष सुविधा देणं गरजेचं होतं. ही बाब लक्षात घेऊनच या आरक्षणाची सुरुवात झाली. परकीय आक्रमकांनी उपेक्षितांना त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संधी देऊ केल्या. पण त्या संधीचा लाभ इथल्या पारंपरिक व्यवस्थेने घेऊ दिलाच नाही. याच उदाहरण म्हणजे, सार्वजनिक पाणवठ्यावर सर्व समाजाला पाणी पिण्याचा हक्क आहे. अस्पृश्य सुद्धा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिऊ शकतात. असा ठराव झालेला असताना सुद्धा चवदार तळ्याच्या सत्यगृहावेळी काय घडले हे आपना सर्वाना ज्ञात आहेच. मग अशा स्थितीत अस्पृश्य समजल्या गेलेल्या नांगरिकांना समान दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर आपण काय केलं असत ? तुम्ही माणसे आहात तुमच्यासोबत राहणारे इतर सुद्धा मानवच आहेत. मग असे असताना सोबत राहणाऱ्या जातीतील माणसांना व इतर जातीतील माणसांना वेगळी वागणूक का ? ही माणुसकी आहे का ? आमचा धर्म आम्हाला अशी दुय्यम  वागणूक द्यायला शिकवतो का ? असा प्रश्न तुमच्या डोक्यात कधी तरी आला का ? नसेल आला तर मग तुम्हाला आरक्षणावर बोलण्याचा काय अधिकार आहे ?

         आरक्षण हे यासाठी आहे की, पारंपरिक व्यवस्थेने ज्या लोकांवर अन्याय केला आहे. ज्यांना न्याय हक्कापासून दूर ठेवलं आहे. माणूस असून सुद्धा काही जातीतील माणसांना दुय्यम वागणूक दिल्या जाऊ लागली. तशा नागरिकांना प्रवाहात आणण्यासाठी विशेष सवलत देणे हा एकमेव मार्ग आहे. आरक्षण देण्यासंदर्भात शाहू राजांनी दिलेलं उदाहरण आपणास माहित नसेल तर ते माहित करून घ्यावे. परंपरावादी लोकांची मानसिकता, जातीने कनिष्ठ ठरवल्या गेलेल्या नागरिकांना प्रवाहात आणण्याची न्हवती. म्हणून हा आरक्षणाचा मार्ग अवलंबवण्यात आला. 

          आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा आजमितीस ती मानसिकता संपुष्टात आलीच नाही. याचे काही दिवसांपूर्वी घेतलेलं उदाहरण मी तुमच्याशी शेयर करतो. वन व टू बीएचके किरायाने देणे असल्याची जाहिरात वर्तमान पत्रात आली होती. शाकाहारी व सवर्ण व्यक्तींनाच देण्यात येईल अशी अट टाकण्यात आली. जाहिरात मला एका मित्राने पाठवली होती. जाहिरात बघून मी त्यातील नं वर कॉल केला. साधारणपणे बोलणं झालं. रूम पाहण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याचं ठरलं. वेळ वैगरे फिक्स झाली. मग मी शेवटी त्यांनी जाहिरातीत उल्लेख केलेल्या सवर्ण आणि शाकाहारी या शब्दाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की, हिंदू संस्कृतीनुसार जे सवर्ण आहेत त्यांनाच फक्त द्यायची आहे. तुमचं आडनाव काय ? मी सांगितलं मग त्या म्हणाल्या काही हरकत नाही या तुम्ही. ठरलेल्या वेळेवर. नंतर त्यांना प्रश्न केला. त्यावर काही जातींची नवे घेतली. त्यांना देणार नाही असं त्या व्यक्तीने म्हटलं.

        त्यासोबतच उत्तम उदाहरण म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील ज्या काही संस्था आहेत त्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा,  बारावीचे कॉलेजेस, पदवी-पदविकेची कॉलेजस, विविध कारखाने. शैक्षणिक क्षेत्र वगळता कारखादारी मध्ये आरक्षण नसल्यामुळं मर्जीनुसार नोकरदारांची भरती केली जाते. शैक्षणिक क्षेत्रातील भरतीमध्ये आरक्षित जागा वगळता किती अनारक्षित जागेवर मागासवर्गीयांना संधी दिली आहे ? याचे उत्तर शोधाल का ? जर तुमची मानसिकता आजसुद्धा परंपरावादी असेल तर मग तुमच्याकडून न्याय्य वागणुकीची अपेक्षा कशी करायची ? 

         आज आपण खुशाल आरक्षण रद्द करण्याची मागणी करताय ? त्या मागणीच आम्ही समर्थन सुद्धा केलं असत. पण तुम्ही करत असलेल्या मागणीच आम्ही समर्थन करावं याच एखादं ठोस कारण द्याल का ? आरक्षणामुळं गुणवत्ताधारकांवर अन्याय होतोय. असं तुमचं म्हणणं आहे. जरा सांगाल का ? की कोणत्या गुंवत्ताधारकांवर अन्याय झाला आहे ? शैक्षणिक संस्थेत पैसे नाहीत म्हणून नोकरी वर ज्याला तुम्ही रुजू करून घेतलं नाहीत तो गुंवत्ताधारकांवर केलेला अन्याय नव्हे का ? सरकारी नोकरी लागायची असेल तर अनेक ठिकाणी पैसा भरावा लागायचा गुणवत्ता असून सुद्धा पैसे भरण्याची कुवत नव्हती म्हणून नोकरीला मुकावे लागलं. तो गुंवत्ताधारकांवर केलेला अन्याय नव्हे का ?

         गुणवत्ताधारक व कौशल्य असताना सुद्धा कमी दर्जाची कामे करावी लागणे हा गुणवत्ताधारकांवर अन्याय नव्हे का ? शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून रुजू असताना संस्थाचालकांच्या मर्जीने सेवकाची कामे करावी लागणे, संस्थाचालकांच्या घरची कामे करावी लागणे हा  गुणवत्ताधारकांवर अन्याय नव्हे का ? असे किती अन्याय सांगायचे जे आरक्षण लागू झाल्यानंतर शासकीय व खाजगी क्षेत्रात सुरु झालेत. मग या गुणवत्ताधारकांवर होणाऱ्या  अन्यायाबद्दल तुमची जीभ गप्पा का ?

       एका खासदाराने आरक्षणाबद्दल असे बेजबाबदार वक्तव्य करणे म्हणजे स्वतःच्या कुवतीवर नागरिकांना प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास संधी उपलब्ध करून देणे होय. अशी अपेक्षा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या एका घटकडून घडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुमच्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक समान आहे. मग प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणे हे तुमचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार न पाडत असताना मतभेद निर्माण करत असाल तर तुमच्या कार्यप्रणाली बद्दल कोणताही सामान्य नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित नक्कीच करेल. एका समाजाच्या हितासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय करण्याचा अधिकार इथे कोणालाही नाही.

          त्यामुळं देशातील प्रत्येक नागरिकांना समान न्याय, हक्क आणि वागणूक मिळेल यासाठी प्रत्येक खासदाराने काम करणे गरजेचे आहे. पण इथे जात धर्म पाहून राजकारण आणि विकासाच्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे तुम्हाला जिथे स्वतंत्र्य आहे तिथे मागास घटकांना डावलण्याच काम करत आहात. शहरी भागात जर कधी फेरफटका मारला तर असे निदर्शनास येते की, मागासवर्गीयांच्या वस्तीत दुर्गंधी चे खच सापडतील कचरा भरणारी गाडी आठ दिवसातून एकदा येईल(भलेही ते काम करणारा मागासवर्गीय असला तरीसुद्धा) पण खुल्या प्रवर्गाच्या गल्लीतून फेरफटका मारत असताना स्वच्छताच स्वच्छता दिसून येईल. पाण्याच्या सोयींसंदर्भात सुद्धा तीच गत. अशा प्राथमिक सुविधांबाबत दुय्यम वागणूक देण्याची मानसिकता आपल्यात रुजलेली असताना, आपण आरक्षण जर हटवले तर समान वागणूक कशी देऊ शकाल ? जिथे आरक्षणाच्या जोरावर मागासवर्गीय नोकरी करतात तिथे  तुम्ही तुमच्या सोयीचे उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करणार. मग पुन्हा मागासवर्गीय मागासवर्गीयच राहणार. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीस तुम्ही जबाबदार ठरणार. मुळात मागासवर्गीयांवर ही स्थिती येण्यास तुम्ही नाही तर तुमचे पूर्वज जबाबदार आहेत. आरक्षण हटवण्याचा विचार डोक्यात ठेऊन तुम्ही येणाऱ्या पिढीच्या हलाखीच्या स्थितीस जबाबदार ठरू पाहत आहात. ती स्थिती तुम्ही तुमच्यावर ओढवून घेणार नाहीत ही अपेक्षा.

         आरक्षण रद्द करत असताना मागस्वर्गीयांच म्हणणं आहे की, “संपत्तीचे समान वाटप व्हावे.” जे कधीही शक्य नाही. ते तुम्हाला तुम्ही जेवढे कष्ठ केले तेवढा मोबदला दिला नाही. कामानुसार मोबदला जर दिला असता तर आज आरक्षणाची गरज सुद्धा राहिली नसती. पण त्याच्याने हे शक्य नाही. त्यामुळं हे आरक्षण सर्व मागासवर्गीयांचा हक्क आहे. तो टिकवून ठेवावाच लागेल. नवीन आरक्षणासाठी जो समाज धडपडत आहे. त्यास त्यांच्या गरजेनुसार संविधानिक प्रकारे आरक्षण देण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न करावेत. अशी बडबड करून समाजात तेढ निर्माण करू नये.

      समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात समान वागणुकीची भावना जेव्हा येईल/रुजेल तेव्हा खुशाल आरक्षण रद्द करण्यात यावे. तेव्हा आम्हाला कोणताही आक्षेप राहणार नाही. आम्ही सुद्धा खुशाल रीतीने आरक्षणाला नाकारू. अन्यथा तुमच्या विरोधिवृत्तीस योग्य तसा लढा नक्कीच देऊ. हे सुद्धा लक्षात असू द्यावे.

 ©जी.संदीप(गोणार,नांदेड)

       9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...