1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केले व धर्मांतराच्या वाटचालीस सुरुवात झाली. लाखो लोकांच्या साथीने सुरु झालेली ती चळवळ अल्पशा प्रमाणात का असेना दरवर्षी चालू असते. त्यातच 2006 साली या चळवळीने भरारी घेतली, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड, संतोष पवार, सुषमाताई अंधारे यांच्या सहकार्याने तिला विस्तृत रूप प्राप्त झाले. व धर्मांतराच्या चळवळीने जोर धरला. सध्याच्या काळात जी.एस.दादा कांबळे यांनी या चळवळीला पुढं नेण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. त्यांच्या नेतृत्वात सुरु झालेली चळवळ त्यांच्या नंतर कशी सुरु राहील याबद्दल शंकाच आहे.
सामूहिक स्तरावरून बाबासाहेबानी सुरु केलेली ही चळवळ आजही सामूहिक व वैयक्तिक स्तरावर सुरुच आहे. धर्मांतर करण्यामागे आम्हीही माणूस आहोत. आम्हालाही ईतर माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हाला मिळावा यासाठी हिंदू धर्मात राहून प्रयत्न केले. पण त्यामूळ तो अधिकार तिथे राहून मिळणार नाही असं वाटलं तेव्हा धर्मांतराचा निर्णय झाला. त्यांनतर सामुदायिक रित्या धर्मांतर केलं. जे यशस्वी झाल व त्या धर्मांतरित समाजाला बौद्धजनांमध्ये काहीही त्रास झाला नाही. त्यांना मूळ धर्मियांनी(हिंदू) काही प्रमाणात त्रास दिला तेवढंच, पण बौद्ध धर्मीयांकडून दुय्यम वागणूक भेटली असं काही नाही. पण या बौद्धांनी एकत्रित धर्मांतर केलं म्हणून हे शक्य झालं. त्यांच्या सोबतच्या सर्वांनी धर्मांतर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या हिंदू धर्मातील ज्या उपजाती होत्या त्या सोबत घेऊन आले. मग बौद्धधर्मांतर्गत उपजातींचा तोरा मिरवणे चालू झाले.
सोमस, आंदवन,लंडवन,इनकर, ईतर असतील तर माहित नाही.( या फक्त ऐकिवातील म्हणून त्यांचा मी उल्लेख केला. यात कोणती वरिष्ठ कोणती कनिष्ठ याबद्दल मला काहीही माहित नाही व जाणून सुद्धा घ्यायचं नाही.) या उपजातीअंतर्गत एक-मेकांना दुय्यम वागणूक देऊ लागले. आता सुद्धा देतात, शहरात राहण्यासाठी ग्रामीण भागातील मूल आली तर त्यांच्या जाती-धर्माचा विचार होतोच पण उपजातींचा सुद्धा काहीवेळा विचार होतो. असे असताना सुद्धा आम्ही ईतर धर्मियांकडून धर्मांतराची अपेक्षा करतो. धर्मांतर कशासाठी ? जो उद्देश होता तो यशस्वी झाला का ? हिंदू धर्मातील विचारांपासून दूर जाऊन बुद्धांच्या विचाराने आमचं जीवन समृद्ध व्हावे यासाठी हा मार्ग बाबासाहेबानी आम्हाला दिला होता. हिंदू धर्मियांच्या विचारांपासून तर आमची सुटका झालीच नाही. मग जिथे आमच्यातच बुद्ध रुजले नाहीत तिथं इतरांमध्ये बुद्ध रुजावा हि अपेक्षा का आणि कशासाठी ?
2006 ला धर्मांतराच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून. त्या प्रसंगी भटक्या विमुक्तांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठीची मोठी चळवळ सुरु झाली. हजारो लोकांनी तेव्हा धर्मांतर केलं. पुढं काय .....? ती चळवळ का थांबली ? त्या धर्मांतरित व्यक्तींच काय झालं ? याबद्दल कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात कधीच काही उल्लेख झाला नाही. किंवा मी कधी ऐकलं नाही. असं का ?
काही वर्षांपूर्वी जी.एस. दादा कांबळे यांनी मातंग जातीअंतर्गत धर्मांतराची चळवळ सुरू केली.(मातंगांना व बौद्धांना काही प्रमाणात ख्रिश्चन धर्मांतरित करू पाहत असताना सुद्धा.) त्यांच्या नियोजनानुसार डिसेंम्बर 2019 पर्यंत माझ्या माहितीनुसार जवळपास साधारणपणे 10,000 नागरिकांनी धर्मांतर केले.या दरम्यान काहींना धर्मांतराचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूल-मुली उजवण्याचा प्रश्न निर्माण केला.अशी शंका त्यांच्या मनात का यावी ? (त्यामुळं हि संख्या एवढी झाली. कदाचित ती वाढू शकली असती. जर या चळवळीत मूळ बौद्धांनी सहभाग घेऊन जे प्रश्न निर्माण झालेत त्यांचं निरसन केलं असत तर.असं धर्मांतर चळवळीत काम करणाऱ्यांनी सांगितलं)
असे एक नाही अनेक प्रश्न नवं धर्मांरितांसमोर समोर आहेत. तरीही आम्ही मोठ्या मनाने आणि छाती ठोकून सांगत फिरतोय "जगाला बुद्धशिवाय पर्याय नाही." जगाला बुद्धशिवाय पर्याय नसेल तर मग जगाने बुद्ध स्वीकारावा यासाठी काय करताय ? 2006 ला ज्यांनी धर्मांतर केलं ती कुटुंबे कुठं आहेत ? त्यांच्याशी कोणी नाते जुळवले का ? ते शिक्षण प्रवाहात आलेत का ? त्यांना शासनाच्या सुविधेचा फायदा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का ? त्यांच्याशी आमची बैठक वाढली का ? त्यांच्या मनात जी कमी पणाची भावना होती(कदाचित नसेल पण जुन्या बौद्धांमुळं ती निर्माण झाली असेल) ती नष्ट झालीय का ? किंवा ती नाहीशी व्हावी यासाठी आम्ही काय करतोय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळवावी लागतील. यातील काही प्रश्नांसंदर्भात बोलत असताना जाणवले की, त्यांना या प्रवाहात ज्यांनी आणलं ते त्यांच्या या समस्येकडे लक्ष देत आहेत. म्हणजे ज्याने सुरुवात केली त्यांनीच त्यांना सहकार्य करायचे असेल तर तुम्ही त्यांचा कशाला मोठेपणा मिरवत बसता. वर्तमान पत्रातून झळकणाऱ्या बातम्यांना सोशल मीडियावर व्हायरल कशाला करता ? बौद्ध म्हणून आपली भूमिका काय ? ज्यांनी प्रवाहात आणलं ते जर हे सर्व पाहणार असतील तर आपण का मिरवताय जगाला बुद्धांची गरज आहे म्हणून. जगाला बुद्धांची गरज आहे असं वाटत असेल तर तो बुद्ध स्वीकारण्यास एखाद्याला प्रवृत्त करणं, त्यांच्या विकासास हातभार लावणं किंवा त्याला प्रवाहात आणण या बाबीची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. ते स्वीकारणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. स्वतःला बौद्ध म्हणवून घेता आणि हिंदू धर्मातील पोटजातीला चिकटून बसता. मग नवधर्मांतरितांना कोणती पोटजात देणार. (हा मुद्दा एखादा सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर मटण रस्सा ढोसताना मांडत नाही. शांत बसून डोक्याने विचार करून मांडतोय. कार्यक्रम झाल्यानंतर मटण रस्सा, चिकन करी वर ताव मारत विनादाचा भाग म्हणून हे विषय हाताळले जातात आणि स्टेजवर गुळगुळीत शब्द बोलले जातात.)
अशा विषयांना आपण हात घालणार नसू तर कसे चालेल. 2006 च्या दरम्यान एक प्रश्न चर्चिला गेला. आता आमच्या मुलींचं काय होणार तिला तुम्ही स्वीकारणार का ? त्यावेळी भावनेच्या ओघात उत्तरे मिळायची आता आपण एकमेकांचे जावई होणार मग असा प्रश्न कशाला ? पण खरेच जावई बनवलात का ? 2006-2020 या 14 वर्षाच्या कालखंडात किती नवधर्मांतरीतांशी कौटुंबिक संबंध जुळले. आता सुद्धा धर्मांतरितांना आपले कौटुंबिक नाते हे हिंदू धर्मातील व्यक्तींशीच जोडावे लागते. म्हणजे आपण हरलोत उपसकानो. आपण बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध पुढं नेऊ शकत नाही. आपली औकात नाही ती. जेव्हा औकात नसते तेव्हा स्टेजवरून मोठ्या-मोठ्या गोष्टी, ऐकणाऱ्याच्या मेंदूवर लादण्याचा अधिकार नसतो. हे सगळं थोतांड किती दिवस मांडत बसणार ?
काही नव धर्मांतरित म्हणतात की, आम्ही धर्मांतर करून चूक केली. आम्हाला आता पुन्हा वाटत आहे की, "आम्ही मूळ धर्मात जावं." इथं मुद्दा कुठं राहायचं हा नाही तर मुद्दा हा आहे की असं का वाटलं ? मुळात धर्मांतर करत असताना त्यांनी तुम्हाला तसं विचारलं नाही की, आम्ही धर्मांतर करतो मग तुम्ही आमचे सोयरे व्हाल का ? त्यांनी व्यवसायाचा प्लॅन डोक्यात घेतलंच नाही. कारण, त्यांना वाटलं की, बुद्धांच्या विचाराचे पाईक असणाऱ्यांना असा प्रश्न करण्याची गरजच नाही. कारण बुद्धांनी समतेचा मार्ग दिला. मग जे समतेच्या मार्गावरचे वाटसरू आहेत. त्यांना असा प्रश्न करण्याची काय गरज ? त्यांनी बाबासाहेबांचा विचार आणि बुद्धांची शिकवण या बळावर धर्मांतर केलं. त्यातून आपण त्यांना खूप डोक्यावर सुद्धा घेतलं. पण यातून त्यांच्या समस्या दूर होणार होत्या का ? त्यांच्यासमोर ज्या समस्या होत्या त्यासंदर्भात आमचं नियोजन का काहीच न्हवत ? आपल्या घरी एखादा पाहूना आला तर त्याचे आदरातिथ्य करतो. आपल्या गावात एखादा शासकीय कर्मचारी राहण्यासाठी आला तर काय हवं काय नाही ते पाहतो. त्या कर्मचाऱ्यांना गावात काही त्रास होऊ नये याची दखल घेतो. पण या नवंधर्मांतरितांबद्दल काहीच नियोजन का न्हवते ? त्या दरम्यान भावनेच्या भरात धम्म-परिषदांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. तोच निधी जर आम्ही नवधर्मीयांच्या विकासाच्या नियोजनासाठी वळवला असता तर ?
काही नागरिक धर्मांतर करून जेव्हा कागदोपत्री बौद्ध होतात तेव्हा. आपली (कागदोपत्री बौद्ध असलेले) जबाबदारी आहे की, त्यांच्याशी आपले नाते वाढवले पाहिजे. त्यांच्याशी आपुलकीचा व्यवहार केला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. म्हणून जुन्या नेतृत्वातील धर्मांतराची चळवळ थंड पडली आहे. जी.एस.दादा यांच्या नेतृत्वातील चळवळ निर्माण झाली त्यांची वाटचाल चालु आहे. त्यांना असे अनुभव येऊ नयेत. यासाठी आम्हला प्रयत्न करावे लागतील. खास म्हणजे ही धर्मांतराची चळवळ त्या-त्या जातीतील व्यक्तींनी सुरु केली तर त्या धर्मांतर चळवळीला जुन्या बौद्धांनी साथ देऊन तिला जातीच्या बाहेर न्यावं लागेल. भटक्या-विमुक्तांनी सुरु केलेली चळवळ हि भटक्या विमुक्तांपर्यंतच मर्यादित राहिली. त्यातून मातंगांनी नवी चळवळ निर्माण केली. ती चळवळ ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली. ते जी.एस दादा यांचं निधन झालं आणि ती चळवळ कुठंतरी काही प्रमाणात शांत झाली. 2006 ला जे पोषक वातावरण होत त्या वातावरणात हि चळवळ वाढू शकली असती. पण ध्येय उद्देशाविना निघालेले मार्गस्थ जसे भरकटत राहतात. तशी ती चळवळ भरकटली त्या दरम्यान ग्रामीण भागात बरेचसे वाद घडले. व ती चळवळ थंड झाली. जसं आकाशात सोडलेला एखादा उपग्रह नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर काय झालं हे कळत नाही तसं या चळवळीच झालं.
अशा बाबी जर घडत असतील तर आपले मिरवणे कोणासाठी आणि कशासाठी ? हा प्रश्न मला नेहमी सतावतो. जगाने बुद्ध स्वीकारावा असं आम्हाला वाटत पण आम्ही बुद्ध न अंगिकरताच ? आम्ही बुद्ध अंगिकरणार नाही पण जगाने तो स्वीकारावा. का ? तर तो शांतीचा, समतेचा आणि मानवी विकासाचा मार्ग आहे म्हणून. मग तो आम्ही का अंगिकारत नाही ? एखाद्याने बुद्ध धम्म अंगीकारला तर आम्ही त्याला आमच्या वस्तीत स्थान का देत नाही. आमची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी का बदलत नाही ? आम्हाला आमची दृष्टी बदलावी लागेल. धर्मांतरित उपसकांची अपेक्षा एवढीच असते की, आम्हाला समतेची वागणूक मिळाली पाहिजे. ज्या समतेच्या वागणुकीसाठी आम्ही हिंदू धर्म सोडला होता. ती समतेची वागणूक आम्ही एक-मेकांना देतोय का ? मग आम्ही कोणता बुद्ध स्वीकारलाय ? आम्ही कागदोपत्री तर बौद्ध बनू पाहत आहोत. पण मनाने आजही हिंदू महारच मग अशा कागदोपत्री बौद्ध लोकांकडून काय समतेची अपेक्षा करायची ?
आपण जशा हिंदू धर्मातील पोटजाती घेऊन आलात तसं या इतर जातीतील नागरिकांना आपली जात सोबत घेऊन येण्यास तुम्ही कारणीभूत ठरू नका. अशाने एखाद्या जातीने धर्मांतर करायचे असेल तर आपल्या जातीसमूहातील इतर नातेवाईकांना घेऊन यावं. आपले नाते संबंध त्यांच्यातच सांभाळावेत व वाढवावेत. कागदोपत्री बौद्ध जरूर व्हावं. बौद्ध झाल्यानंतर आम्ही तुमचा आदर सत्कार जरूर करू. पण नातेवाईक बनण्यासाठी आम्ही तयार नाही.त्यासाठी आप-आपल्या जातीसमूहात हि चळवळ वाढवा आणि तुमची एक बौद्ध धम्मात उपजात तयार करा. अशी ही मानसिकता दिसत आहे. बौद्ध धम्मात येऊन जर मग दुय्यम वागणूक भेटणार असेल तर मग त्यांनी बौद्ध धम्म का स्वीकारावा. काहीजण म्हणतील आम्ही कुठं त्यांना विनंती करतोय त्यांची इच्छा आहे ते स्वीकारत आहेत. ते येवोत किंवा जावोत त्यात आमचं काहीही नुकसान नाही. ते बौद्ध धम्मात आले तर त्यांचाच फायदा आहे. तर अशा व्यक्तींनी एक बाब लक्षात घ्यावी कि, बौद्ध धम्म चा मालक, वारसदार कोणी नाही. हा एक समूह आहे सम्यक विचारांचे आचरण करणाऱ्यांचा. मग या समूहात कोणीही कुठूनही आल्यानंतर तो समान असला पाहिजे, त्याला समान वागणूक दिली पाहिजे ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. हि जबाबदारी न स्वीकारता जर आपण हात वर करू तर मुळात आपणच बौद्ध नाही आहोत. कारण बाबासाहेबानी दिलेला बुद्ध विचार हा समतेचा आहे. पण आमच्या डोक्यातून विषमता संपली नाही. लग्नासाठी आम्ही पोटजातीतील नातेवाईक पाहतो. देशात आम्हाला दिल्या जाणाऱ्या विषमतेच्या वागणुकीसंदर्भात डांगोरा पिटतो व स्वतः विषमता युक्त वागतो.हे कधी संपणार ?
यासाठी आधी आम्हाला बौद्ध व्हावं लागेल. आम्हीच बौद्ध झालो नाहीतर आम्हाला काय अधिकार इतरांना दोष द्यायचा. आधी आम्ही आप-आपसातील विषमता संपवूया. बाबासाहेबानी बौद्ध धम्म आम्हाला दिला पण आम्ही त्याला गालबोट लावलं. त्याच्या मूळ विचारांनाच आम्ही तिलांजली दिली. आमच्याकडे स्त्री-पुरुष भेद आहे, पोटजातीअंतर्गत भेद आहे. त्यासोबतच नव धर्मांतरितांसंदर्भातील भेद वाढत आहेत. म्हणजे महारांनी बौद्ध धर्म बाटवला असच म्हणायची हि वेळ दिसतेय. आम्ही बौद्ध कागदोपत्री झालोत पण आता सुद्धा आमच्या मनात हिंदू धर्माचे विचार रुजून आहेत. हे संपवून नव-धर्मियांच्या स्वागताला तयार व्हावं लागणार आहे. तरच खरी समता आपण प्रस्थापित करण्याकडे वाटचाल करू. पोट जातीत विखुरलेला हिंदू महार या संकल्पनेला सोडून देऊन. बाबासाहेबानी दाखवलेला बुद्धांच्या मार्गावर येऊया. नव धर्मीत्यांच्या निर्माण होणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम देऊया. 2010 च्या नंतर थाम्बलेल्या धर्मांतराच्या चळवळीला गती देऊया.
आहात का तुम्ही स्वतः तयार ? पोटजातिअंतर्गत व नवधर्मीतांशी नाते जोडायला. नवधर्मीतांशी नाते जोडणे म्हणजे धर्मांतराच्या चळवळीला गती देणे होय. आम्ही धर्मांतर केलं तर आमच्याशी कोणी नाते जोडतील का ? या प्रश्नांचा समाचार घेणे होय.
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जर असाल तयार तर या जातीनुसार सुरु असलेली धर्मांतर चळवळीला व्यापक स्वरूपाची करूया. जगाने बुद्ध धम्म स्वीकारावा यासाठी प्रयत्न करूया. व बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकूया. पिढी-दरपिढी हे पाऊल वाढत गेले तर नक्कीच भारत बौद्धमय होण्याकडे वाटचाल होऊ शकते.बौद्धमय होणे म्हणजे देशाच्या तळागाळातील व्यक्तीचा विकास होणे होय. असेल तयारी तर जरूर कळवा....
आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जर असाल तयार तर या जातीनुसार सुरु असलेली धर्मांतर चळवळीला व्यापक स्वरूपाची करूया. जगाने बुद्ध धम्म स्वीकारावा यासाठी प्रयत्न करूया. व बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकूया. पिढी-दरपिढी हे पाऊल वाढत गेले तर नक्कीच भारत बौद्धमय होण्याकडे वाटचाल होऊ शकते.बौद्धमय होणे म्हणजे देशाच्या तळागाळातील व्यक्तीचा विकास होणे होय. असेल तयारी तर जरूर कळवा....
© जी.संदीप(गोणार,नांदेड.)
9552803980
वाचा आणि आपलं मत कळवा....
ReplyDeleteकरण्या सुरुवात नव्या वाटचालीची.....
बुद्ध त्याचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध लोकांनी समजून घेत स्वीकारायला हवा, धर्मांतर करा किंवा कुणीही जाती पातीने असा, जर बुद्ध स्वीकारायचे ठरवले तर तो विचाराने, मनाने स्वीकारावा
ReplyDeleteखूपच छान लिखाण आहे .
ReplyDeleteहो आम्ही तयार आहोत पोटजातीअंर्तगत व नवधर्मितांशी नाते जोडायला
ReplyDeleteआपला परिचय कळवावा....
Deleteआज परिस्थिती अशी आहे की.. माझ्या समाजातील परिचयातील काही लोक (व्यवसायाने वकील आहेत) आहेत जे शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतात अजून ही करतात पण लग्न ठरवताना स्व जातीतील वधू - वर शोधत होते,,, आणि खुप उशिरा लग्न जुळले लग्न झाले पणं वधू स्व जातीतील च केली..!
ReplyDeleteमग चळवळीत काम करण्याचा अट्टाहास कशासाठी..?
काय चळवळीत सम विचारांचं अदान प्रदान झाले पाहिजे तसेच रोटी बेटी व्यवहार पणं झाला पाहिजे होता...!! उच्च नीच भाव दिसला असे म्हणावे लागेल...!!!