Tuesday, September 22, 2020

जात आरक्षण आणि लोकशाही......




 बरेच दिवसापासून जात, आरक्षण या संदर्भाने चर्चा चालू आहे. काही जणांनी या संदर्भात काहीतर बोल अशी विनंती केली. पण हा विषय विचार करून नाही तर भावनेने मांडला जातो किंवा भावनेमुळं पुढं येतो. म्हणून मी टाळत होतो. पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला यावरून खूप चर्चा सुद्धा झाली. त्या व्हिडिओतील शब्द कदाचित त्या एकट्याचेच असते तर काही वाटलं नसत. पण ते शब्द खूप जणांच्या तोंडी दबून आहेत. त्यामुळं म्हटलं लिहावं काही तरी म्हणून हे लिखाण करत आहे.

       हा विषय भावनेचा आहे. या संदर्भात लिहीत असताना मी भावनिक होऊन लिहिणार नाही. काही बाजू मांडणार आहे. त्या आपण समजून घ्या. निरपेक्ष भावनेनं वाचा आणि समजून घ्या. काही शंका किंवा मतभेद असतील तर संवाद साधुयात.




           “जात” ही संकल्पना कधी सुरु झाली याबद्दल अद्यापर्यंत कोणत्याही जात संशोधकांबद्दल एकमत होऊ शकलं नाही. पण काही संशोधकांच्या आढाव्यावरून ई.स.पूर्वी झाली एवढं ग्राह्य धरूया. मग ही जात आहे काय ? हे जाणून घेण्यासाठी काही अभ्यासकांची मते पाहुयात.

      “जात ही अनुवंशिकतेच्या दृढ बंधनाची तत्वतः बांधलेली एक घनिष्ठ संस्था होय.- सेनार्ट(फ्रेंच तज्ञ)

       वर्ण व्यवस्थेची मूळ समाजात खोलवर रुजत गेली. त्यातून व्यक्तीचा वर्ण जन्मावरून ठरविला जाऊ लागला. चार वर्णाचे अनुलोम संकर व त्या संकराचे परत अनुलोम प्रतिलोम संकर यांच्यातून भारतात सुमारे 8064 जाती निर्माण झाल्या.” (डॉ. सुमंत यशवंत, डॉ.पुंडे दत्तात्रय [संपा.] महाराष्ट्रातील जातीसंस्थाविषयक विचार पान-117)

          वरील काही अभ्यासकांचे विचार आणि स्वतःच चिंतन यातून जात काय आहे, ती कधी अस्तित्वात आली. ती टिकून राहण्यास कोण आणि कसे जबाबदार आहेत. या प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तरे मिळतात. जात टिकून राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण कधीही जबाबदार न्हवते व राहणार सुद्धा नाही. त्यामुळं जात टिकून राहण्यास आरक्षण जबाबदार आहे म्हणाऱ्यांनी तो समज आधी डोक्यातून काढून टाकावा. जात टिकून राहण्यास आडनाव संस्कृती आणि विवाह संस्कृती जबाबदार आहे.(मुळात ही संस्कृती ज्या कारणाने सुरु झाली होती, त्या सोबतच हे परिणाम सुद्धा रुजायला लागले. कालांतराने मग जात दृढ होत गेली. विवाह संस्कृतीमुळं आणि आडनावाच्या संस्कृतीमुळं जात टिकून आहे. व राहील सुद्धा. ती नष्ट करायची असेल तर तुमची आडनाव संस्कृती नष्ट करावी लागेल. सोबतच मनात रुजलेली व्यक्तीबद्दलची दुय्यमता नष्ट व्हावी लागेल. तेव्हाच हे शक्य आहे. अन्यथा सर्व मलमपट्टी ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

      

       ई.स.पूर्वी सुरु झालेली ही जात टिकून राहण्यासाठी पारंपरिक व्यवस्था जबाबदार आहे. या व्यवस्थेत जात ही जन्मनुसार प्राप्त होते. प्राप्त जातीनुसारच व्यवसाय करावा लागतो. जातीअंतर्गतच विवाह संस्कार व अन्य संस्कार करण्याचे बंधन लादलेले आहेत. ते बंधन तोडून कोणीही काम करू शकत नाही. जर जातीविरोधी काम केलं तर त्याला जातीतून बहिष्कृत केलं जात. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा मानवी व्यवहार टाळल्या जातो. आंतरजातीय विवाह केले तर खून घडल्याचे कित्येक प्रकरण आपण ऐकले असतील.(आंतरजातीय विवाह करणारे वडिलांची जात होणाऱ्या अपत्या पुढं वापरून ती जात संस्कृती पुढं चालवत असतात.) निस्सीम प्रेम करणारे सुद्धा काहीजण जातीच्या, धर्माच्या खोट्या प्रतिष्टेपायी आपल्या प्रेमाचा त्याग करतील. पण प्रेमाला स्वीकारणार नाहीत. अशी ही स्थिती आहे जाती संदर्भातील.

     जातीनुसार विविध प्रथा, सण, व्यवसाय, मान-अपमान या गोष्टी ठरलेल्या आहेत. एवढंच नाही तर जातीनुरूप  मृत्यू पश्चात क्रिया सुद्धा वेग-वेगळ्या आहेत.

      म्हणजेच जात निर्माण होण्यास व ती टिकून राहण्यास सुद्धा पारंपरिक व्यवस्था जबाबदार आहे. या व्यवस्थेला तडा देण्याचा प्रयत्न कोणीही करत नाहीत. जे प्रयत्न करतील त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

        अशी भयंकर स्थिती या जातीबद्दल आहे. पण तरीही जात दृढ होण्यास आरक्षण ही संकल्पना कारणीभूत आहे अशी अर्धवट माहिती प्रसारित केल्या जाते. वरील काही माहितीचा विचार केल्यास आरक्षणाचा जातीशी काही संबंध आहे का ? हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. त्याचे उत्तर काय येते हे पहा. मग ठरवा की, आरक्षणाचा जात दृढ होण्यास काही हस्तक्षेप आहे का ? तुम्हाला कळून येईल की, तुम्ही जे वाद वाढवत आहात ते पूर्णपणे निरर्थक आहे. असे निरर्थक वाद पसरवून तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्वाचा वेळ वाया घालवत आहात हे लक्षात घ्या.

      जात दृढ होण्यास आरक्षण कारणीभूत आहे म्हणणाऱ्यांसाठी काही मुद्दे, आरक्षणाचा विचार करत असताना आरक्षण हे का आणि कशासाठी आहे. हे आधी समजून घेऊया.

         राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाचा कारभार हाती घेतल्यानंतर. समाजातील स्थितीचा आढावा आला. त्यातून त्यांनी समाजात प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला समान अधिकार मिळावेत, जातीनुसार काम नाही तर कौशल्यानुसार,बुद्धिमत्तेनुसार काम मिळावं यासाठी जो पारंपरिक व्यवस्थेने दुर्लक्षित केलेला समाज होता त्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी म्हणून 26 जुलै 1902 रोजी आरक्षणाचा जाहीरनामा काढून संस्थानात 50% आरक्षण लागू केले.

         त्या आरक्षणाचा व तत्सबंधीत परिस्थिती व बाबींचा अभ्यास करून संविधानामध्ये आरक्षणाचा समावेश करण्यात आला. आता ज्या आरक्षणाचा काही विशिष्ट लोक विरोध करत आहेत. ते आरक्षण संविधानाने दिलेले आहे. त्या संदर्भात असलेली पार्श्वभूमील लक्षात घ्याल तर तुम्ही कदाचित हा विरोध करणे सोडून द्याल. पण  ज्या आरक्षणाचा समावेश संविधानात झाला आहे. ते आरक्षण फक्त एका जातीसंदर्भातच आहे का ? हा प्रश्न यासाठी आहे की “आरक्षणाचा विरोध हा फक्त एका जातीच्या विकासमूळ होतोय असं लक्षात येतंय” हे वाक्य मी कोणत्याही पूर्वग्रहातून बोलत नाही. मी जेव्हा अनेकांशी विविध विषयांवर संवाद साधतो त्यातून ही बाब समोर आली म्हणून हा मुद्दा सरळ सरळ तुमच्यासमोर मांडलेला आहे.

         संविधानामार्फत आरक्षण देत असताना फक्त एका समुदायाला नाही तर विविध प्रवर्गाला आरक्षण दिल आहे. त्यात ST-07%, SC-13%, OBC-19% SBC-2%, VJNT(A)-3%, VJNT(B)-2.5%, VJNT(C)-3.5%, VJNT(D)-2% या सर्व प्रवर्गाचा विचार करता आरक्षण हे फक्त एका घटकाला नाही आहे. हा या आरक्षणासोबत बाबासाहेबानी दिलेल्या विचारसरणीचा स्वीकार करून एक समाज पुढं आला आणि आपला विकास करून घेत आहे. पण विकास पाहून आरक्षणामुळं घोडा आणि गाढवाच्या शर्यतीचा विचार करत असाल, तर मात्र आपणास आरक्षण जरी भेटले तरी सुधारणा अशक्य आहे. विकास अशक्य आहे. कारण उदाहरण तुमच्यासमोर आहेत. आरक्षणाचा फायदा घेऊन SC प्रवर्गातील 59 जातींपैकी किती जाती सुधारल्या आहेत. याचा विचार स्वतः करा. त्यामुळं आरक्षण हे तुम्ही म्हणत असलेल्या गव्हा तांदळासाठी कालही न्हवते आणि उद्याही राहणार नाही. ही बाब समजून घ्या. 

       संविधानामुळं जे आरक्षण लाभलं आहे. त्यांच्या आरक्षणावर  जर तुमच्याकडे विचार करण्याची कुवत असेल तर एक शब्द सुद्धा तुम्ही बोलणार नाहीत. कारण ते आरक्षण का आणि कशासाठी दिल हे तुम्हाला समजून येईल. त्यातून तुम्ही हा मतभेद करणार नाहीत. त्यामुळं आरक्षणाची बाब समजून घ्या त्याबद्दल गैरसमज पसरवू नका. समाजात तेढ वाढवू नका. आपल्या सर्वांचे नाते प्रेमाचे आहे ते नाते टिकून राहण्यासाठी अशा दम देणाऱ्या घटनांना खत-पाणी घालू नका. कोणाच्या डोक्यात अशा कल्पना येत असतील तर त्या व्यक्तीला समजावून सांगा. अशा कल्पना त्यांच्याच डोक्यात येतात जे बिनडोक पणे वावरत असतात. कोणत्याही बाबीचा विचार करत नाहीत.

        हा विषय निघण्यासाठी जी स्थिती कारणीभूत आहे ती म्हणजे “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती” या अरक्षणास अपील जे करण्यात आले. ते अपील कायदेशीर आहे म्हणून हा सर्व न्यायालयीन खेळ चालू आहे. आरक्षण देत असताना संविधानाच्या चौकटीसह अन्य बाबीचा विचार करून न दिल्यामुळं ही वेळ आलेली आहे. त्यामुळं न्यायालयीन कामकाजापेक्षा आपला रोष हा शासकीय प्रणालीबद्दल असायला हवा होता. निवडणुकीच्या पुढं हे आरक्षणाच गाजर मराठा समाजाला देऊन मते आपल्याकडे वळवण्याचं काम राजकारण्यांनी केलं. त्या स्थितीला आपण सर्वजण बळी सुद्धा ठरलात ही आपली खूप मोठी शोकांतिका आहे. आरक्षण हे कायद्यानुसारच आपणास हवं आहे. ते जर नसेल तर मग येणाऱ्या काळात कोणी जर अपील केलं असत. त्यानुसार मग हे आरक्षण रद्द झालं असत. तर त्याचे विपरीत परिणाम जे आरक्षणाचा फायदा घेऊन जॉब करत होते,त्यांच्या आयुष्यावर झाला असता. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्यावर जी स्थिती येत होती त्यास जबाबदार कोण राहील असत ? याचा विचार करणं गरजेचं आहे. हा जो न्यायालयीन लढा चालू आहे त्या लढ्याला यश आल्यानंतर आपणास जे आरक्षण भेटेल त्या आरक्षणाचा कोणत्याही व्यक्तीवर किंवा नागरिकांवर काहीही परिणाम होणार नाही. मग असे असताना या न्यायालयीन लढाईस विरोध करणे कितपत योग्य आहे याचा विचाहर करा.

        न्यायालयीन लढा म्हणजे ठोस आरक्षणासाठी दिलेला एकप्रकारचा तो लढाच आहे. तो लढा जर शासनाने जिंकला तर मग मिळत असलेल्या आरक्षणाबद्दल कधीही काहीही अडचण येणार नाही. याची जाणीव आपण करून घेणं गरजेचं आहे. आता दिल्या गेलेलं आरक्षण हे राजकीय स्वार्थापोटी दिलेलं आहे. ते संविधानाच्या चौकटीच्या बाहेर आहे. म्हणून ही न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. अन्यथा ही वेळ कधीही आली नसती.

        या सर्व बाबीचा विचार करा, संविधानात दिलेली नियमावली ही कोणत्याही एका समाजासाठी पोषक किंवा विरोधात नाही. संविधानाच्या प्रस्ताविकेतून जी मूल्य सामोरे येतात ते आपल्या जगण्याला आकार देतात. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ज्यांना संविधानाचे शिल्पकार संबोधनं गरजेचे आहे असे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील स्थितीचा अभ्यास करत प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ही नियमावली तयार करून देशातील प्रत्येक नागरिकाला हितकारक अशीच आहे. अडचण आहे ती फक्त आणि फक्त अंमलबजावणीची. देशातील संविधानाची अंमलबजावणी करणारा घटक हा राजकीय नेते आहेत.

        या राजकीय नेत्यांना निवडण्याचा अधिकार आपल्या सर्वांना समान आहे. पण हा अधिकार एका दिवसासाठी दारू आणि मटनामूळ गहाण ठेवता आणि त्यांनतर पाच वर्षे ओरडत बसता. अशा या आपल्या दुटप्पी वागण्याचा फायदा घेऊन हे राजकारणी आपल्याला लुटतात. मग आपण यांना दोष देत बसतो. 

      खरी चूक आपली असताना सुद्धा असं करण्यामुळं लोकशाहीचा उपभोग आपणास मिळत नाही. त्यामुळं मतदानादिवशी सजग राहून योग्य पद्धधतीने तुम्ही तुमचा मताधिकार गाजवा. मग बघा तुमचे रस्त्यावरचे आंदोलन समता, शिक्षण, बेरोजगारी,गरिबी,छळ आदींसह सर्व समस्या नाहीशा होतील व देश जगात महासत्ता होण्यास वाटचाल करू शकेल.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

         9552803980

Thursday, September 10, 2020

दुःखाचा वियोग होऊन जाईल....





कोण म्हटलं जन्म एकदाच भेटतो

जन्म रोज होत असतो

पण मृत्यू मात्र आयुष्यात

एकदाच भेटत असतो


रोज भेटत असलेल्या

नव्या जन्माचा वापर करत रहा

एकदा मिळणाऱ्या मृत्यूला

कवटाळण्या पासून दूर रहा


मृत्यूला कवटाळने म्हणजे

जगणं सोडून देणे होय

आयुष्यात भेटणाऱ्या अनुभवाला

कायमचे दूर करणे होय


आयुष्यात दुःख आले तरी

अनुभव त्याचे घेत चला

आयुष्य हे अनुभवांनी समृद्ध बनवणे

हीच खरी जीवन जगण्याची कला


दुःख मिळाले म्हणजे

कसे वागायचे नाही हे कळते

चुका करतच राहिलो तर

नियमित दुःख मिळतच राहते


कधी इतरांच्या चुकांमुळं सुद्धा 

आयुष्यात दुःख मिळत असते

सोडून देऊन तो दिवस,विषय,काळ

आयुष्य पुन्हा नव्याने सुरु करायचे असते.


क्षणिक निर्णयाने तुम्ही

आयुष्य गमावू नका

तो क्षण कायमचा नव्हे आयुष्यातील

हे समजून घेऊन जगणं सोडू नका.


सोडाल जगणं तुम्ही तर

दुःखी होतील काही काळ आप्तेष्ट

पण तुमच्या जाण्याने 

तुमचे आयुष्य कायमचे होईल नष्ट


आयुष्य नष्ट झाले तर दुःख

त्रासातून व्हाल नक्कीच मुक्त

पण आयुष्य हे जगायचे असते काही कामांसाठी खास

नव्हे वैयक्तिक आयुष्यासाठी फक्त


स्वतःसोबत इतरांसाठी जगत असताना

जगण्याचा आनंद येत राहील

त्यातून दुःख व वाईट अनुभवांचा

वियोग होऊन जाईल.


© जी.संदीप(गोणार,नांदेड)

         ९५५२८०३९८०

Tuesday, September 1, 2020

विचार बदलावा लागेल.

 



धर्म मंदिरासाठी लढण्यात

आम्ही आमचा वेळ घालवला

तिकडे शासनाने मात्र शिक्षणाचा

खेळखंडोबा करून टाकला


आताही ते आम्हाला 

धर्माचा अफू पाजवत राहतात

आम्ही लढतो आप-आपसात

ते खुशाल स्वार्थ साधून घेतात


धर्म देव-देवता संदर्भातील वादाला

देऊन कायमची मूठमाती

विकास करण्या प्रत्येक व्यक्तिचा

शासनाला आणावे लागेल वठणीवरती


कोणताही देव-धर्म येणार नाही

करण्या विकास आमचा

शासन प्रशासन आहे जबाबदार

अविकासास आम्हा सर्वांच्या


विचारून त्यांना जाब राबवूया

करून घेण्या विकास आपुला

हे शक्य होईल तेव्हाच

जेव्हा विचार बदलू आपण आपला.

(मंदिर हि संकल्पना प्रार्थना स्थळांसाठी वापरली आहे)

© जी.संदीप (गोणार,नांदेड)

      मो: ९५५२८०३९८०

Friday, August 14, 2020

हे स्वातंत्र्या !




गरिबांच्या झोपडीमध्ये,
मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये
श्रीमंतांच्या फ्लॅटमध्ये
अब्जोवधींच्या रो हाऊसेस,बंगलो मध्ये
हे स्वातंत्र्या, हर्षोल्हासात स्वागत आहे तुझं.

सुरक्षेच्या नावाखाली इथं
स्वातंत्र्य हिसकावून घेतल्या जातंय
आरोग्य संवर्धनाची भाषा करून
आर्थिक व मानसिक आरोग्य
बिघडवल्या जातंय.
या स्थितीतही हे स्वातंत्र्या तुझं आम्ही
हर्षोल्हासात स्वागत करतोय.

हे स्वातंत्र्या,
आमच्याही डोक्यात स्वातंत्र्य घुसेल का
स्वैराचार नव्हे हि भाषा ठीक आहे.
पण स्वातंत्र्य म्हणजे काय हे
आम्हाला कधी कळेल का ?
सत्ताधाऱ्यांमार्फत पिळवणूक होणे
हे कसे अयोग्य आहे.
हे त्यांनाही कधी कळेल का?

हे स्वातंत्र्या,
राजकीय स्वातंत्र्याचा सोहळा 
आज आम्ही साजरा करत असताना
कळलेच नाही कधी राजकीय गुलाम बनून गेलो,
निसर्गनियमांविरुद्ध वागून
राजकीयांमुळे पुन्हा पारतंत्र्यात गेलो.


हे स्वातंत्र्या !
कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन
आणि क्वारंटाईन मुळे
जगण्याचा हक्क हिरावल्या गेला
कैद्याला बंदिस्त केल्यासारखं
प्रत्येक नागरिक घरात डांबल्या गेला.

हे स्वातंत्र्या !
कारखानदारी व ईतर कामे बंद करून
उत्पन्नाच्या साधनांवर आमच्या बसवला लगाम
हे स्वातंत्र्या आताही आहोतच रे
आम्ही आमच्या राजकीयांचे गुलाम.

हे स्वातंत्र्या !
हे स्वातंत्र्य मुबारक हो 
तू या देशातील त्या सर्व नागरिकांना
ज्यांच्याकडे अर्थ नसतो
स्वातंत्र्य व पारतंत्र्याला....

✍️© जी.संदीप (गोणार,नांदेड)
               ९५५२८०३९८०

Thursday, August 6, 2020

विचारांचे हल्ले रोखून दाखवा

विचारांचे हल्ले रोखून दाखवा


प्रतिकांवर हल्ले काय चढवताय
धमक असेल तुमच्यात तर 
विचारांचे हल्ले रोखून दाखवा
आम्हीही मानू विजयाचे शिलेदार तुम्हाला
आमच्यासोबत खरी लढाई लढून तर दाखवा.


ऐपत नाही तुमची
विचारांच्या लढाईची
म्हणून नौटंकी करताय
असल्या भ्याड हल्ल्याची ?

तुमच्या असल्या हल्ल्याने होईल आमचे
आणि काही प्रमाणात वास्तुचें नुकसान
पण  बुद्ध विचारांशिवाय
मानव जात होईल सुनसान


बुद्ध विचार पेरणारा आंबेडकर
का सलतोय तुमच्या मनात ?
त्याने तुमच्या व्यवस्थेला हादरा दिला
हीच तर खंत नाही ना तुम्हा जणांत.

ती खंत तुम्ही निरर्थक पणे
मनात बाळगत बसू नका.
त्यांनी दिलेला मार्ग हा एकतेचा व
समानतेचा आहे हे जगाला सुद्धा सांगायला विसरू नका.

देशाचे प्रधानसेवक सुद्धा विविध
राष्ट्राध्यक्षांना देतात बुद्ध मूर्तीच भेट.
मग तुम्हीच ठरवा ईतर दैवतांपेक्षा
बुद्ध ठरलेत का नाही ग्रेट.


एवढी ताकद त्या विचारात आहे
म्हणून करू लागलेत काहीजण विरोध
आणि घडवून आणत आहेत
हल्ले मानवावर आणि प्रतिकांवर सुद्धा
पण हल्लेखोरांनो एक लक्षात घ्या
ती तुमची बुद्धी नाही आणि मानसिकता सुद्धा.

म्हणून हल्लेखोरांनो एखाद्याच्या दावणीला बांधून असे भ्याड कामे करू नका.
योग्य आयोग्याची जाणीव करून घेऊन.
सम्यक विचारांना समजून घेऊन एकोप्याने राहण्याचा निर्णय सोडू नका.


कोरोनांने माणसात माणुसकी
आल्याचं सोंग मिरवत बसू नका
माणूस कालही द्वेषयुक्त होता
आजही आहे आणि उद्याही राहील
त्यातून वाचायला कोरोना तर नाहीच
पण बुद्धशिवाय दुसरं काही आहे असं सांगू नका.


सुधारणेच सोंग घेणं
असत खूप सोपं
जेव्हा येते स्वतःवर वेळ
तेव्हा होते खूप दुःख मोठं.

या प्रतिकांवरच्या हल्ल्याने
बाबासाहेब संपणार नाही
तो एक असा घटक आहे
इथल्या प्रत्येकाच्या रक्तात
तो सापडल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळं आंबेडकराला
संपवण्याचे
स्वप्न तुम्ही सोडून द्या.
तुम्हीही तसा विचार अंगिकारा आणि
स्वतःच्या चौरंगी विकास करून घ्या.

© जी.संदीप(गोणार,नांदेड.)
       9552803980

Tuesday, August 4, 2020

व्हावीत स्मारके मानवी कल्याणाची




भगवान के घर देर है अंधेर नही म्हणत
देवासाठीच न्यायालयाचा कामी लावलं
वास्तविक पुराव्यांच्या आधारे न्हवे
तर भावणीकतेच्या बळावर न्यायदान केलं.

कोट्यवधी रुपयांचा खर्च
आम्ही आमच्या अस्मितेच्या नावावर करतोय
पण आपल्याच धर्मातील बांधवांच्या
आयुष्याचा तमाशा पाहत बसतोय.

अस्मितेच्या नावाखाली आज
सुरुवात करतोय पुन्हा उभारण्या मंदिर
मानवाच्या विकासात्मक गरजेसाठी आम्ही
कधीतरी होऊ का खंबीर ?

गरज आहे आम्हाला आमच्यासाठी
सार्वकालिक होण्याची खंबीर
आमच्या अडचणीत पूर्णपणे
कांमी आली नाहीत कधीच ही मंदिर.

मंदिरासाठी करोडो रुपयांचा
करण्यात खर्च व्यर्थ आहे
देवाच्या नावाखाली आतमध्ये
दाटलेला सगळा स्वार्थ आहे.

सामान्य लोक देतात घाम गाळलेल्या
कष्टाच्या पैशातून दान
श्रीमंत देतात करोडोने दानपेटीत
चुकवण्या शासकीय कराचे दान.

दोन नंबरच्या कमाईची होऊ नये चौकशी
म्हणून लपवतात पैसा मंदिराच्या तिजोरीत
तुमच्या भावनेचा आणि भीतीचा बाजार मांडून बसलेत
हे कधी घुसणार का तुमच्या खोपडीत ?

मंदिर बांधण्या नाही विरोध माझा
खुशाल संस्कृती संवर्धनासाठी स्मारके तयार व्हावीत
पण कोट्यवधी जनता दुःखात असताना
पैशाची उधळपट्टी कशासाठी करावीत.

सामान्य माणसांच्या विकासानंतर
खुशाल स्मारकाचे निर्माण व्हावे
भविष्यात मानवी कल्याणाचे दर्शन घडण्या
मंदिरासोबत ऐक्याचेही स्मारके तयार व्हावीत.

असाल सुज्ञ तुम्ही तर
समजून घ्याल माझं म्हणणं
अन्यथा चालू राहतील त्यांचे धंदे
आणि एक-मेकांबद्दल डोक्यात द्वेष पेरण.

© जी.संदीप (गोणार,नांदेड)
        9552803980

Saturday, July 18, 2020

.....मग धर्मांतराची अपेक्षा का ?



         1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केले व धर्मांतराच्या वाटचालीस सुरुवात झाली. लाखो लोकांच्या साथीने सुरु झालेली ती चळवळ अल्पशा प्रमाणात का असेना दरवर्षी चालू असते. त्यातच 2006 साली या चळवळीने भरारी घेतली, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड, संतोष पवार, सुषमाताई अंधारे यांच्या सहकार्याने तिला विस्तृत रूप प्राप्त झाले. व धर्मांतराच्या चळवळीने जोर धरला. सध्याच्या काळात जी.एस.दादा कांबळे यांनी या चळवळीला पुढं नेण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने त्यांचा अंत झाला. त्यांच्या नेतृत्वात सुरु झालेली चळवळ त्यांच्या नंतर कशी सुरु राहील याबद्दल शंकाच आहे.
           सामूहिक स्तरावरून बाबासाहेबानी सुरु केलेली ही चळवळ आजही सामूहिक व  वैयक्तिक स्तरावर सुरुच आहे. धर्मांतर करण्यामागे आम्हीही माणूस आहोत. आम्हालाही ईतर माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार आम्हाला मिळावा यासाठी हिंदू धर्मात राहून प्रयत्न केले. पण त्यामूळ तो अधिकार तिथे राहून मिळणार नाही असं वाटलं तेव्हा धर्मांतराचा निर्णय झाला. त्यांनतर सामुदायिक रित्या धर्मांतर केलं. जे यशस्वी झाल व त्या धर्मांतरित समाजाला बौद्धजनांमध्ये काहीही त्रास झाला नाही. त्यांना मूळ धर्मियांनी(हिंदू) काही प्रमाणात त्रास दिला तेवढंच, पण बौद्ध धर्मीयांकडून दुय्यम वागणूक भेटली असं काही नाही. पण या बौद्धांनी एकत्रित धर्मांतर केलं म्हणून हे शक्य झालं. त्यांच्या सोबतच्या सर्वांनी धर्मांतर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या हिंदू धर्मातील ज्या उपजाती होत्या त्या सोबत घेऊन आले. मग बौद्धधर्मांतर्गत उपजातींचा तोरा मिरवणे चालू झाले.
            सोमस, आंदवन,लंडवन,इनकर, ईतर असतील तर माहित नाही.( या फक्त ऐकिवातील म्हणून त्यांचा मी उल्लेख केला. यात कोणती वरिष्ठ कोणती कनिष्ठ याबद्दल मला काहीही माहित नाही व जाणून सुद्धा घ्यायचं नाही.) या उपजातीअंतर्गत एक-मेकांना दुय्यम वागणूक देऊ लागले. आता सुद्धा देतात, शहरात राहण्यासाठी ग्रामीण भागातील मूल आली तर त्यांच्या जाती-धर्माचा विचार होतोच पण उपजातींचा सुद्धा काहीवेळा विचार होतो. असे असताना सुद्धा आम्ही ईतर धर्मियांकडून धर्मांतराची अपेक्षा करतो. धर्मांतर कशासाठी ? जो उद्देश होता तो यशस्वी झाला का ? हिंदू धर्मातील विचारांपासून दूर जाऊन बुद्धांच्या विचाराने आमचं जीवन समृद्ध व्हावे यासाठी हा मार्ग बाबासाहेबानी आम्हाला दिला होता. हिंदू धर्मियांच्या विचारांपासून तर आमची सुटका झालीच नाही. मग जिथे आमच्यातच बुद्ध रुजले नाहीत तिथं इतरांमध्ये बुद्ध रुजावा हि अपेक्षा का आणि कशासाठी ?
             2006 ला धर्मांतराच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून. त्या प्रसंगी भटक्या विमुक्तांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठीची मोठी चळवळ सुरु झाली. हजारो लोकांनी तेव्हा धर्मांतर केलं. पुढं काय .....? ती चळवळ का थांबली ? त्या धर्मांतरित व्यक्तींच काय झालं ? याबद्दल कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात कधीच काही उल्लेख झाला नाही. किंवा मी कधी ऐकलं नाही. असं का ?
          काही वर्षांपूर्वी जी.एस. दादा कांबळे यांनी मातंग जातीअंतर्गत धर्मांतराची चळवळ सुरू केली.(मातंगांना व बौद्धांना काही प्रमाणात ख्रिश्चन धर्मांतरित करू पाहत असताना सुद्धा.) त्यांच्या नियोजनानुसार डिसेंम्बर 2019 पर्यंत माझ्या माहितीनुसार जवळपास साधारणपणे 10,000 नागरिकांनी धर्मांतर केले.या दरम्यान काहींना धर्मांतराचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूल-मुली उजवण्याचा प्रश्न निर्माण केला.अशी शंका त्यांच्या मनात का यावी ? (त्यामुळं हि संख्या एवढी झाली. कदाचित ती वाढू शकली असती. जर या चळवळीत मूळ बौद्धांनी सहभाग घेऊन जे प्रश्न निर्माण झालेत त्यांचं निरसन केलं असत तर.असं धर्मांतर चळवळीत काम करणाऱ्यांनी सांगितलं) 
           असे एक नाही अनेक प्रश्न नवं धर्मांरितांसमोर समोर आहेत. तरीही आम्ही मोठ्या मनाने आणि छाती ठोकून सांगत फिरतोय "जगाला बुद्धशिवाय पर्याय नाही." जगाला बुद्धशिवाय पर्याय नसेल तर मग जगाने बुद्ध स्वीकारावा यासाठी काय करताय ? 2006 ला ज्यांनी धर्मांतर केलं ती कुटुंबे कुठं आहेत ? त्यांच्याशी कोणी नाते जुळवले का ? ते शिक्षण प्रवाहात आलेत का ? त्यांना शासनाच्या सुविधेचा फायदा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय का ? त्यांच्याशी आमची बैठक वाढली का ? त्यांच्या मनात जी कमी पणाची भावना होती(कदाचित नसेल पण जुन्या बौद्धांमुळं ती निर्माण झाली असेल) ती नष्ट झालीय का ? किंवा ती नाहीशी व्हावी यासाठी आम्ही काय करतोय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळवावी लागतील. यातील काही प्रश्नांसंदर्भात बोलत असताना जाणवले की, त्यांना या प्रवाहात ज्यांनी आणलं ते त्यांच्या या समस्येकडे लक्ष देत आहेत. म्हणजे ज्याने सुरुवात केली त्यांनीच त्यांना सहकार्य करायचे असेल तर तुम्ही त्यांचा कशाला मोठेपणा मिरवत बसता. वर्तमान पत्रातून झळकणाऱ्या बातम्यांना सोशल मीडियावर व्हायरल कशाला करता ? बौद्ध म्हणून आपली भूमिका काय ? ज्यांनी प्रवाहात आणलं ते जर हे सर्व पाहणार असतील तर आपण का मिरवताय जगाला बुद्धांची गरज आहे म्हणून. जगाला बुद्धांची गरज आहे असं वाटत असेल तर तो बुद्ध स्वीकारण्यास एखाद्याला प्रवृत्त करणं, त्यांच्या विकासास हातभार लावणं किंवा त्याला प्रवाहात आणण या बाबीची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. ते स्वीकारणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. स्वतःला बौद्ध म्हणवून घेता आणि हिंदू धर्मातील पोटजातीला चिकटून बसता. मग नवधर्मांतरितांना कोणती पोटजात देणार. (हा मुद्दा एखादा सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर मटण रस्सा ढोसताना मांडत नाही. शांत बसून डोक्याने विचार करून मांडतोय. कार्यक्रम झाल्यानंतर मटण रस्सा, चिकन करी वर ताव मारत विनादाचा भाग म्हणून हे विषय हाताळले जातात आणि स्टेजवर गुळगुळीत शब्द बोलले जातात.) 
            अशा विषयांना आपण हात घालणार नसू तर कसे चालेल. 2006 च्या दरम्यान एक प्रश्न चर्चिला गेला. आता आमच्या मुलींचं काय होणार तिला तुम्ही स्वीकारणार का ? त्यावेळी भावनेच्या ओघात उत्तरे मिळायची आता आपण एकमेकांचे जावई होणार मग असा प्रश्न कशाला ? पण खरेच जावई बनवलात का ? 2006-2020 या 14 वर्षाच्या कालखंडात किती नवधर्मांतरीतांशी कौटुंबिक संबंध जुळले. आता सुद्धा धर्मांतरितांना आपले कौटुंबिक नाते हे हिंदू धर्मातील व्यक्तींशीच जोडावे लागते. म्हणजे आपण हरलोत उपसकानो. आपण बाबासाहेबांनी सांगितलेला बुद्ध पुढं नेऊ शकत नाही. आपली औकात नाही ती. जेव्हा औकात नसते तेव्हा स्टेजवरून मोठ्या-मोठ्या गोष्टी, ऐकणाऱ्याच्या मेंदूवर लादण्याचा अधिकार नसतो. हे सगळं थोतांड किती दिवस मांडत बसणार ?
         काही नव धर्मांतरित म्हणतात की, आम्ही धर्मांतर करून चूक केली. आम्हाला आता पुन्हा वाटत आहे की, "आम्ही मूळ धर्मात जावं." इथं मुद्दा कुठं राहायचं हा नाही तर मुद्दा हा आहे की असं का वाटलं ? मुळात धर्मांतर करत असताना त्यांनी तुम्हाला तसं विचारलं नाही की, आम्ही धर्मांतर करतो मग तुम्ही आमचे सोयरे व्हाल का ? त्यांनी व्यवसायाचा प्लॅन डोक्यात घेतलंच नाही. कारण, त्यांना वाटलं की, बुद्धांच्या विचाराचे पाईक असणाऱ्यांना असा प्रश्न करण्याची गरजच नाही. कारण बुद्धांनी समतेचा मार्ग दिला. मग जे समतेच्या मार्गावरचे वाटसरू आहेत. त्यांना असा प्रश्न करण्याची काय गरज ? त्यांनी बाबासाहेबांचा विचार आणि बुद्धांची शिकवण या बळावर धर्मांतर केलं. त्यातून आपण त्यांना खूप डोक्यावर सुद्धा घेतलं. पण यातून त्यांच्या समस्या दूर होणार होत्या का ? त्यांच्यासमोर ज्या समस्या होत्या त्यासंदर्भात आमचं नियोजन का काहीच न्हवत ? आपल्या घरी एखादा पाहूना आला तर त्याचे आदरातिथ्य करतो. आपल्या गावात एखादा शासकीय कर्मचारी राहण्यासाठी आला तर काय हवं काय नाही ते पाहतो. त्या कर्मचाऱ्यांना गावात काही त्रास होऊ नये याची दखल घेतो. पण या नवंधर्मांतरितांबद्दल काहीच नियोजन का न्हवते ? त्या दरम्यान भावनेच्या भरात धम्म-परिषदांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळण झाली. तोच निधी जर आम्ही नवधर्मीयांच्या विकासाच्या नियोजनासाठी वळवला असता तर ? 
          काही नागरिक धर्मांतर करून जेव्हा कागदोपत्री बौद्ध होतात तेव्हा. आपली (कागदोपत्री बौद्ध असलेले) जबाबदारी आहे की, त्यांच्याशी आपले नाते वाढवले पाहिजे. त्यांच्याशी आपुलकीचा व्यवहार केला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही.  म्हणून जुन्या नेतृत्वातील धर्मांतराची चळवळ थंड पडली आहे. जी.एस.दादा यांच्या नेतृत्वातील चळवळ निर्माण झाली त्यांची वाटचाल चालु आहे. त्यांना असे अनुभव येऊ नयेत. यासाठी आम्हला प्रयत्न करावे लागतील. खास म्हणजे ही धर्मांतराची चळवळ त्या-त्या जातीतील व्यक्तींनी सुरु केली तर त्या धर्मांतर चळवळीला जुन्या बौद्धांनी साथ देऊन तिला जातीच्या बाहेर न्यावं लागेल. भटक्या-विमुक्तांनी सुरु केलेली चळवळ हि भटक्या विमुक्तांपर्यंतच मर्यादित राहिली. त्यातून मातंगांनी नवी चळवळ निर्माण केली. ती चळवळ ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली. ते जी.एस दादा यांचं निधन झालं आणि ती चळवळ कुठंतरी काही प्रमाणात शांत झाली. 2006 ला जे पोषक वातावरण होत त्या वातावरणात हि चळवळ वाढू शकली असती. पण ध्येय उद्देशाविना निघालेले मार्गस्थ जसे भरकटत राहतात. तशी ती चळवळ भरकटली त्या दरम्यान ग्रामीण भागात बरेचसे वाद घडले. व ती चळवळ थंड झाली. जसं आकाशात सोडलेला एखादा उपग्रह नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर काय झालं हे कळत नाही तसं या चळवळीच झालं. 
              अशा बाबी जर घडत असतील तर आपले मिरवणे कोणासाठी आणि कशासाठी ? हा प्रश्न मला नेहमी सतावतो. जगाने बुद्ध स्वीकारावा असं आम्हाला वाटत पण आम्ही बुद्ध न अंगिकरताच ? आम्ही बुद्ध अंगिकरणार नाही पण जगाने तो स्वीकारावा. का ? तर तो शांतीचा, समतेचा आणि मानवी विकासाचा मार्ग आहे म्हणून. मग तो आम्ही का अंगिकारत नाही ? एखाद्याने बुद्ध धम्म अंगीकारला तर आम्ही त्याला आमच्या वस्तीत स्थान का देत नाही. आमची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी का बदलत नाही ? आम्हाला आमची दृष्टी बदलावी लागेल. धर्मांतरित उपसकांची अपेक्षा एवढीच असते की, आम्हाला समतेची वागणूक मिळाली पाहिजे. ज्या समतेच्या वागणुकीसाठी आम्ही हिंदू धर्म सोडला होता. ती समतेची वागणूक आम्ही एक-मेकांना देतोय का ? मग आम्ही कोणता बुद्ध स्वीकारलाय ? आम्ही कागदोपत्री तर बौद्ध बनू पाहत आहोत. पण मनाने आजही हिंदू महारच मग अशा कागदोपत्री बौद्ध लोकांकडून काय समतेची अपेक्षा करायची ? 
             आपण जशा हिंदू धर्मातील पोटजाती घेऊन आलात तसं या इतर जातीतील नागरिकांना आपली जात सोबत घेऊन येण्यास तुम्ही कारणीभूत ठरू नका. अशाने एखाद्या जातीने धर्मांतर करायचे असेल तर आपल्या जातीसमूहातील इतर नातेवाईकांना घेऊन यावं. आपले नाते संबंध त्यांच्यातच सांभाळावेत व वाढवावेत. कागदोपत्री बौद्ध जरूर व्हावं. बौद्ध झाल्यानंतर आम्ही तुमचा आदर सत्कार जरूर करू. पण नातेवाईक बनण्यासाठी आम्ही तयार नाही.त्यासाठी आप-आपल्या जातीसमूहात हि चळवळ वाढवा आणि तुमची एक बौद्ध धम्मात उपजात तयार करा. अशी ही मानसिकता दिसत आहे. बौद्ध धम्मात येऊन जर मग दुय्यम वागणूक भेटणार असेल तर मग त्यांनी बौद्ध धम्म का स्वीकारावा. काहीजण म्हणतील आम्ही कुठं त्यांना विनंती करतोय त्यांची इच्छा आहे ते स्वीकारत आहेत. ते येवोत किंवा जावोत त्यात आमचं काहीही नुकसान नाही. ते बौद्ध धम्मात आले तर त्यांचाच फायदा आहे. तर अशा व्यक्तींनी एक बाब लक्षात घ्यावी कि, बौद्ध धम्म चा मालक, वारसदार कोणी नाही. हा एक समूह आहे सम्यक विचारांचे आचरण करणाऱ्यांचा. मग या समूहात कोणीही कुठूनही आल्यानंतर तो समान असला पाहिजे, त्याला समान वागणूक दिली पाहिजे ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. हि जबाबदारी न स्वीकारता जर आपण हात वर करू तर मुळात आपणच बौद्ध नाही आहोत. कारण बाबासाहेबानी दिलेला बुद्ध विचार हा समतेचा आहे. पण आमच्या डोक्यातून विषमता संपली नाही. लग्नासाठी आम्ही पोटजातीतील नातेवाईक पाहतो. देशात आम्हाला दिल्या जाणाऱ्या विषमतेच्या वागणुकीसंदर्भात डांगोरा पिटतो व स्वतः विषमता युक्त वागतो.हे कधी संपणार ? 
          यासाठी आधी आम्हाला बौद्ध व्हावं लागेल. आम्हीच बौद्ध झालो नाहीतर आम्हाला काय अधिकार इतरांना दोष द्यायचा. आधी आम्ही आप-आपसातील विषमता संपवूया. बाबासाहेबानी बौद्ध धम्म आम्हाला दिला पण आम्ही त्याला गालबोट लावलं. त्याच्या मूळ विचारांनाच आम्ही तिलांजली दिली. आमच्याकडे स्त्री-पुरुष भेद आहे, पोटजातीअंतर्गत भेद आहे. त्यासोबतच नव धर्मांतरितांसंदर्भातील भेद वाढत आहेत. म्हणजे महारांनी बौद्ध धर्म बाटवला असच म्हणायची हि वेळ दिसतेय. आम्ही बौद्ध कागदोपत्री झालोत पण आता सुद्धा आमच्या मनात हिंदू धर्माचे विचार रुजून आहेत. हे संपवून नव-धर्मियांच्या स्वागताला तयार व्हावं लागणार आहे. तरच खरी समता आपण प्रस्थापित करण्याकडे वाटचाल करू. पोट जातीत विखुरलेला हिंदू महार या संकल्पनेला सोडून देऊन. बाबासाहेबानी दाखवलेला बुद्धांच्या मार्गावर येऊया. नव धर्मीत्यांच्या निर्माण होणाऱ्या प्रश्नांना पूर्णविराम देऊया. 2010 च्या नंतर थाम्बलेल्या धर्मांतराच्या चळवळीला गती देऊया.
            आहात का तुम्ही स्वतः तयार ? पोटजातिअंतर्गत व नवधर्मीतांशी नाते जोडायला. नवधर्मीतांशी नाते जोडणे म्हणजे धर्मांतराच्या चळवळीला गती देणे होय. आम्ही धर्मांतर केलं तर आमच्याशी कोणी नाते जोडतील का ? या प्रश्नांचा समाचार घेणे होय.
        आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जर असाल तयार तर या जातीनुसार सुरु असलेली धर्मांतर चळवळीला व्यापक स्वरूपाची करूया. जगाने बुद्ध धम्म स्वीकारावा यासाठी प्रयत्न करूया. व बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक पाऊल टाकूया. पिढी-दरपिढी हे पाऊल वाढत गेले तर नक्कीच भारत बौद्धमय होण्याकडे वाटचाल होऊ शकते.बौद्धमय होणे म्हणजे देशाच्या तळागाळातील व्यक्तीचा विकास होणे होय. असेल तयारी तर जरूर कळवा....

© जी.संदीप(गोणार,नांदेड.)
         9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...