Saturday, June 3, 2023

हत्या झाली एवढं नक्की.

     


        दिनांक 01 जून महिन्याची सुरुवात झाली आणि अक्षयच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. हत्येचे कारण काय आहेत याबद्दल वेग वेगळ्या गोष्टी चर्चिल्या जात असल्या तरी ही हत्या एकांतात झाली नाही एवढं मात्र नक्की. या हत्येच्या कारणात शेतीच्या धुऱ्याचे भांडण नाही, शेजारी घर आहेत त्यामुळं काही नियमित वाद घडत होते त्यावरून वाद नाही किंवा भवकीचा प्रश्न नाही. हा वाद घडण्यामागे आमच्यापेक्षा कनिष्ठ जातीतील व्यक्ती चा आमच्यासोबत चा व्यवहार तो तसा आमच्याशी कसा वागू शकतो ?


        जात आणि धर्म या एकाच मानसिकतेने ही हत्या घडवून आणली. मग इथे दोषी कोणाला धरायचं ? प्रत्यक्ष खून करणारा व्यक्ती का जात का धर्मामुळ निर्माण झालेली मानसिकता ? यात गुन्हा करणारा  गुन्हेगार आहेच पण त्याच्या डोक्यात ती मानसिकता आणणारी जातीय आणि धर्मीय मानसिकता सर्वात जास्त दोषी आहे. या खुनी व्यक्तीला मृत्युदंड तर होणार नाहीच, पण जरी झाला मृत्युदंड तरी ही मानसिकता संपुष्टात येणार आहे का ?


            आजपर्यंत असे हजारो हल्ले झाले, त्या हल्ल्यात कैक बळी गेले, खैरलांजी प्रकरणात आपण न्याय मिळवू शकलो नाही, पीडित कुटुंबाचा प्रमुख भैय्यासाहेब भोतमांगे कालांतराने कालवश झाले पण न्यायासाठी शेवटपर्यंत झगडणे शक्य झाले नाही. मग अशा कैक प्रकरणात न्याय मिळेल याची अपेक्षा तरी कशी करणार ?


       हा खून सुद्धा जातीय मानसिकतेतून घडलेला आहे. ही मानसिकता अद्याप का संपत नाही हा मोठा प्रश्न आहे ? काही मित्र म्हणतील आता तेवढं जात मानली जात नाही मित्रा, अशा सर्व मित्रांना माझा एकच प्रश्न एका जातीच इतर जातीशी असलेल्या व्यवहाराचा विचार न करता एकाच जातीतील पोटजातीचा विचार करून तुम्ही स्वतः मनाला विचारा तुम्ही पोटजातीअंतर्गत बेटी व्यवहार कराल का ? (त्यात मुलगा आर्थिक परिस्थितीने जास्त सक्षम नसताना.) या एका प्रश्नाचं उत्तर स्वतः शोधा आणि मग ठरवा की खरच जातीयवाद संपला आहे का ?


      जातीयवाद न संपल्याचे शेकडो उदाहरण देता येतील. शहरीभागात जातीयवाद संपला म्हणत असाल तर मित्रांनो बिगर बौद्ध वस्तीत बौद्ध विद्यार्थ्यांना राहण्यास रूम मिळत नाही, फॅमिली असेल तर किरायाने घर मिळत नाही. अजून एक खास बाब त्या त्या जाती धर्माच्या परिसरातच त्या त्या जातीधर्माचे लोक राहण्यासाठी घर किंवा रूम पाहतात. मग त्या परिसरात कोणतेही पाहुणे असो अथवा नसो. असे जातीयतेच्या टोकाला जाऊन कैक उदाहरण देता येतील, स्वतः चे अनुभव पण सांगता येतील पण ते तस काही शेयर करून बाजार मांडण्यात मला काही अर्थ वाटत नाही. म्हणून प्रत्येक जाती/धर्मातील कॉमन मानसिकतेचा विचार करून हे सगळ आपल्यासमोर मांडत आहे. मग त्यात ब्राम्हण असोत, मराठा असोत की अन्य कोणत्याही जाती असोत, हे आपापसात कधीही बेटी व्यवहार करताना खूप खोलवर जाऊन विचार करतील मगच  ते बेटी व्यवहार करण्यास तयार होतील.


        अशा अन्य जातीतील व्यक्ती जेव्हा अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींशी काही अपवादात्मक परिस्थितीत संपर्कात येतात, तेव्हा ते या जातीयतेचा कळस गाठतात आणि असे प्रकार घडून येतात. कोरोना काळात  शहरी भागातून गावाकडे आलेला ब्राम्हण आणि मराठा मित्र तेव्हा सांगत होता मित्रा अस्पृश्यता खूपच वाईट आहे रे. आतापर्यंत कसे सहन केले असतील त्या अस्पृश्य लोकांनी ? असे बोलत बोलत व्यक्त व्हायचे. पण तेच मित्र जेव्हा आज म्हणतात की जातीयता नाही रे भाऊ तेव्हा त्यांच्या कोरोणा काळातील मानसिकतेची कीव येते.


       जातीयता ही कधीही न संपणारी मानवी समजला लागलेली कीड आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात जातीयता संपवण्याची कितीही मार्ग अवलंबले तरी ती काही संपणार नाही. अन्यायी घटना घडल्यावर तिच्या विरोधात आंदोलन करणे निषेध नोंदवणे हे तुम्ही अन्याय सहन करू शकत नाही, आमच्यावर अन्याय करू नका हे दाखवून देण्याचं द्योतक आहे. पण तुमच्या आंदोलनाने निषेधाने हा जातीयवाद संपणार नाही. जातीयवाद हा चिरकाल टिकणारा रोग आहे. जातीयतेचे पद्धत बदलत जाईल पण ती कधीच संपणार नाही.


       अशा या जातीयतेचे लाखो बळी गेले इथून पुढे पण जातीलच यात काही गैर नाही फक्त फरक आहे की तो बळी जाण्याचे कारण वेळ आणि व्यक्ती परिस्थिती वेगळी असेल. या जातीयतेचे बळी जात असताना बळी जाणाऱ्या जमातीला स्वतः ती गोष्ट स्वीकारावी लागणार आहे. कायदा जरी तुमच्या बापाचा असला तरी न्याय मिळेल ही अपेक्षा कमीच, अट्रोसिटी सारख्या प्रकरणात किती अपराधी शिक्षा भोगत आहेत याचा विचार केल्यास प्रमाण अगदी नगण्य आहे. मग अशा प्रकरणात पुन्हा जातीय द्वेष वाढत जातो. ज्या जाती जातीयतेच्या शिकार होत आहेत, त्यांनी स्वतःच कुटुंबासह स्थलांतर करून स्वतः च पुनर्वसन करून घेणं गरजेचं आहे. तरुणाईने शिक्षण आणि स्वतः च्या विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जातीयता वाढत आहे म्हणून आपण आपल्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या च्या काळात शिक्षण हे कागदाची डिग्री मिळवण्या साठी घेतले जात आहे उच्चशिक्षणाच्या आकडा वाढीव दिसावा म्हणून उच्च शिक्षण विभागाकडून ते शिक्षण दिलं जातं आहे अशीच परिस्थिती सध्या राज्यात आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षण देत असलेल्या शिक्षण संस्थांचा दर्जा चा विचार केल्यास एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. 


         त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत पीडित समाजाने शिक्षण घेणे हेच आपले विकासाचे दार आहे, हे समजून घ्यावे. त्या पद्धतीने आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सोबत कागदी डिग्रीच नाही तर त्या शिक्षणाचा वापर सुद्धा कसा करता येईल हे समजून घेऊन, आपला प्रत्येक दिवस पार पाडावा लागेल. त्यांनी एक बळी घेतला तर आम्ही दोन बळी घेऊ म्हणणे चालणार नाही. कारण तसे घडणार सुद्धा नाही. एखाद्यावर हल्ला होत असेल तर बाकीचे सगळे बघ्याची भूमिका घेतात. हल्ला रोखायला पुढे कोणीही येत नाही. त्यामुळं भावनिक होऊन त्यांनी एक बळी घेतला तर आपण दोन बळी घेण्याची वेळ आली आहे असे म्हणणे म्हणजे आपणच पुन्हा नवीन वादाला तोंड निर्माण करून देणे होय. असे काही घडू नये याची काळजी घेणं आपल्या प्रत्येकाचं काम आहे.


        शेवटी हा जातीयतेचाच बळी होता, मग त्याला कारण कोणतेही असो. तशी वेळ अन्य कोणावरही न येवो  ही काळजी घेऊया.


भावपूर्ण श्रद्धांजली.


©जी.संदीप (गोणार, नांदेड.)

Tuesday, May 16, 2023

बाजार तुमच्या दुःखाचा



आम्ही साहित्यातून

मांडतो तुमचे दुःख,

त्याचा घेऊन फायदा आम्ही

संपवतो आमचे दुःख.


तुम्ही संपता त्या दुःखातच

कालांतराने नवीन पिढी येते

ती सुद्धा त्याच दुःखात

नशीब समजून जगत असते.


मग मांडणारा सुद्धा येतो नवीन

तोही मांडतो नवीन पद्धतीने,

पण दुःख येथेही संपत नाही

पण मांडणारा जगतो आनंदाने.


पण दुःख तुमचे संपत नाही

अशा इतरांच्या प्रयत्नाने.

तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील

येथे जगण्या आनंदाने


इथं भौतिक दुःख संपवायला

अजून कोणी पैदा झाला नाही

बुद्धाने सांगितलेल्या दुःख मुक्तीचा

मार्ग स्वीकारण्याची आमच्यात हिम्मत नाही.


होऊ नका खुश्श तुम्ही  तुमचे दुःख वेशीवर

टांगण्याच्या आमच्या पद्धधतीमुळं

तुम्हीच शोधा त्या दुःखाची कारणं व उपाय सुद्धा,

व स्वीकारा दुखमुक्तीचा मार्ग व्हाल दुःखमुक्त ज्यामुळ


व स्वतःच स्वतःला करा दुःख मुक्त

मग कोणी उरणार नाही

दुसऱ्याचे मांडून दुःख

आपले खिसे भरणार नाही

आणि येणारी पिढी

दुःखामध्ये जगणार नाही.

Wednesday, March 15, 2023

निवृत्तीनंतर जगण्याचं साधन : पेन्शन


      मागील दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपास काही जण विरोध करत आहेत. काल वर्तमानपत्रवरील संपाच्या विरोधातील बातम्या पण निदर्शनास आल्या आहेत. संपाला पाठिंबा नसाल देत तर नका देऊ पण विरोध कशासाठी ? तुम्ही काय तुमच्या खिशातून त्यांना पेन्शन देणार आहात का ? विरोध करणाऱ्यांचा विचार केला तर त्यात जास्तीत जास्त हे सत्ताधाऱ्यांचे समर्थकच आहेत असे निदर्शनास आले आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ येत असतील तर तसे झाले नाही पाहिजे यासाठी हा प्रयत्न. मागील सरकारच्या काळात एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनात काही मागण्या घेऊन आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. त्या मागण्या हे सत्ताधारी का लागू करत नाही ?  त्या आंदोलनादरम्यान केलेला सगळा अट्टाहास हा कशासाठी होता ? एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी का सत्तेसाठी ? असा प्रश्न उपस्थित होतो. पण तरीही राजकीय नेत्यांचे समर्थक एखाद्या राजकीय नेत्याने जी भूमिका घेतली तीच समर्थन करत फिरतात. राजकीय नेते हे निवडून येईपर्यंत एका राजकीय पक्षाचे असतात. पण जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते त्यांच्या मतदार संघातील प्रत्येक मतदारांचे प्रतिनिधी असतात मग निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा राहिलेला उमेदवार का असेना. ही बाजू समजून न घेता राजकीय नेत्यांचे तुम्ही समर्थन करत असाल तर मला वाटते की मलमुत्राचे पिवळे पाणी जर तुम्हाला मोसंबीचा ज्यूस म्हणून दिले तरी ते तुम्ही आनंदाने प्याल का काय असा प्रश्न पडतो ?

       या आंदोलनाला विरोध करत असताना एक मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला तो म्हणजे यांना कोणतेही काम करण्यासाठी त्या फाईल वर वजन ठेवावे लागते मग कशाला हवी आहे पेन्शन. फाईल वर वजन ठेवावे लागते म्हणून पेन्शन देऊ नये असा विचार करणाऱ्या विचारसरणीची कीव येते. हे तर अस झालं गरज आहे मला मी कसही काम करून घेईल पण चुकीचं काम केलं म्हणून काम करणाऱ्यांना दोष देईल. पण फाईल वर वजन ठेवायला कोण तयार असतो ? तर ज्याला माहीत आहे की  नियमानुसार आपल काम होणार नाही, मग ते काम होण्याची अपेक्षा करतो, त्या अपेक्षेतून स्वतः च त्या फाईल वर वजन ठेवतो. कालांतराने त्या वजनाची कर्मचाऱ्याला सवय होते आणि नवीन रुजू झालेला कर्मचारी सुद्धा त्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनतो. जर एखादा कर्मचारी व्यवस्थेचा भाग बनत नसेल तर त्याला काय त्रास होतो हे तोच जाणतो. अशा परिस्थिती प्रत्येक कर्मचारी लाच घेणारा आहे अस समजून जर विरोध करत असाल तर कीव येते तुमची आणि तुमच्या बुद्धिमत्तेची. लाच घेतली जाते हे तुम्हाला माहीत आहे तर मग लाचलुचपत विभागातील कर्मचाऱ्यांना कामाला लावता येत नाही का तुम्हाला ? सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटनाऱ्यानो स्वतःच्या डोक्यात मेंदू असेल आणि तुमचा आत्मसन्मान जागा असेल तर स्वतः ला काही प्रश्न विचारा. आयुष्यभर एका सरकारी क्षेत्रात काम कराल आणि रिटायरमेंट नंतर तुम्हाला दुसऱ्याच्या हाताकडे डोळे लावून रहावं लागतं असेल तर कस वाटेल ? रिटायरमेंट नंतर येणाऱ्या पैशात आयुष्यभरात काही पाहिलेली स्वप्न पूर्ण करावी लागत असतील (घर,गाडी,मुलांची काही स्वप्ने) त्यात तो पैसा खर्च होत असेल तर मग कर्मचाऱ्यांनी उतारवयात कोणाकडे पहायचं ? येणारी पिढी उतारवयात किती म्हणून साथ देईल हे कोणी शाश्वती देईल का ? चांगल्या संस्कारात वाढलेली एक मेकांचा आदर करावा माणुसकी जपावी या संस्कारात वाढलेली आजचीच पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवत आहेत. येणाऱ्या काळात काय होऊ शकेल याची शाश्वती तुम्हाला आहे काय ? 

       या सर्व गोष्टींचा विचार करून पेन्शन आंदोलनास होत असलेला विरोध हा चुकीचा वाटतो. लाच घेतल्या जाते, शासकीय कर्मचारी नियमानुसार काम करत नाहीत. या तक्रारींवर एकच उपाय आहे. जो कर्मचारी नियमानुसार काम करत नाही त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देणे.शासकीय किंवा प्रशासकीय  कर्मचारी हे नोकर आहेत त्यांना जनतेच्या सेवेसाठी तिथं पाठवलं आहे याची जाणीव निर्माण करून देऊन नागरिक म्हणून आपली भूमिका आपण पार पाडणे गरजेचे आहे. लाच देणारच नसाल तर कोणी लाच घेईलच कशाला ? देशातील कोणत्याही नागरिकाने माझ कोणतेही काम नियमाने होत असेल तरच करेल अन्यथा माझे काम नाही झाले तर मी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही. असा जर निर्णय घेतला तर कशाला कोणी भ्रष्टाचार करेल आणि कशाला कोणता शासकीय कर्मचारी व्यवस्थित काम करणे सोडेल. त्यामुळं या होत असलेल्या आंदोलनास विरोध करणे हा बालबुद्धीचा प्रकार वाटतो. या कर्मचाऱ्यांच्या संपामुळ नागरिकांना खूप त्रास होत आहे. तोच त्रास लक्षात घेऊन शासनाच्या विरोधात जनतेचा प्रक्षोभ झाला पाहिजे. शासकीय नोकरसोबतच अन्य क्षेत्रात काम करणारा प्रत्येक नागरिक हा पेन्शन चा हक्कदार आहे. देशातील प्रत्येक नागरिक आप आपल्या क्षेत्रात देशाच्या विकासात योगदान देत असतो. त्यामुळं उतारवयात सन्मानाने जगायचे असेल तर प्रत्येकाला याची जाणीव ठेवावीच लागेल. 


#माझा_पेन्शन_आंदोलनास_पाठिंबा_आहे.

Tuesday, February 7, 2023

डॉ.बाबासाहेब स्वाधार योजना 2023-24, नांदेड.





शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी. 


 त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:

२. वडिलांचे संपूर्ण नाव :

३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :

४. आधार कार्ड क्र. :

५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :

६. अर्जदाराचे वय :

७. अर्जदाराचे लिंग :

८. आईचे संपूर्ण नाव :

९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :

१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :

१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :

१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :

१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :

१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )

१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:

१७. अभ्यासक्रम :

१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :

१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :

२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):

२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:

२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.

• प्रवेश वर्ष / दिनांक

• उत्तीर्ण महिना / वर्ष

• प्राप्त गुण

• एकूण गुण

याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव

• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :

• शाखा

• खातेक्रमांक

• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो

२ अर्जदाराची सही

३ जातीचा दाखला

४ आधार कार्डाची प्रत

५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.

६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.

८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :

९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :

१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .

११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :

१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :

१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला

१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :

१५ शपथपत्र / हमीपत्र :

१६ भाडे करारनामा :

वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx


शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी दिनांक

10 फेब्रुवारी ते 04 मार्च 2023. पर्यंत समाजकल्याण कार्यालय नांदेड येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.








Sunday, December 18, 2022

राजकारण रंगाचे.

(हा लेख धर्माच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या पण तात्विक विचार करणाऱ्यांसाठी तात्विक विचार न करणाऱ्या मित्रांनी उगच वाद घालून स्वतः चा वेळ वाया घालवू नये.)


धर्माच्या नावावर विविध मुद्दे उपस्थित करून वाद निर्माण केला जात आहे. धर्म म्हणजे उत्तम आणि आनंदी माणूस म्हणून जगण्यासाठीची नियमावली अस मला वाटते.

        उत्तम माणूस व्हायचं असेल तर कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण व्हावा अशी परिस्थिती का निर्माण केली जात आहे. एकमेकांचा धर्म एकमेकांना योग्य वाटत असेल तर तुमचे धर्म माणसा-माणसात तेढ निर्माण करायला सांगतात का ? तुमचे धर्म असे माणसा-माणसात तेढ निर्माण करणारे असतील तर त्या धर्मांना आग लावा. माणूस म्हणून जगण्यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक घटकावर प्रेम करन त्यांचं संगोपन आणि संवर्धन करणं हे आद्य कर्तव्य आहे.

        एखाद्याने व्यक्तीने कोणाएकविरुद्धा चुकीचा व्यवहार केला असेल तर त्या व्यक्तीला लगेच त्याची चूक लक्षात आणून द्या. त्या एका व्यक्तीमूळ त्या धर्माला वेठीस धरणे योग्य नव्हे ना. हिंदू धर्म मुस्लिमांचा द्वेष करतो आणि मुस्लिम हिंदूंचा. असा द्वेष केल्याने साध्य काय होणार आहे ?

       *दिवसभरातील 24 तासात धर्माला आणि तुमच्या आदर्श देवाला बाजूला ठेवून पहा. मग कळेल जगण्यासाठी धर्माची खरच आवश्यकता आहे का ?* जगण्यासाठी धर्माची आवश्यकता नसेल तर मग धर्मामुळ एवढे वाद का वाढवत आहात ?

        धर्म तुमच्या पोटाची भूक भागवत नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात. मग ते खाजगी काम करन असो अथवा शासकीय काम असो. मग ते काम तुम्ही प्रामाणिक पने करत असता का ? चार पैशासाठी लाचारी करून चुकीचे काम करत असाल ते ते काम करण्यासाठी तुमचा धर्म तुम्हाला परवानगी देतो का ? मग अशावेळी तुमचा धर्म धोक्यात आहे अस वाटत नाही का ? 

        ठराविक रंगाचा वापर कुठेतरी करण्यात आला म्हणून तुमचा धर्म धोक्यात येतो ? रंगाचा आणि धर्माचा संबंधच काय एवढंच तुम्हाला रंगाचा राग येतो तर मग भगवा रंग जोडून दुसरे रंग जिथे जिथे वापरला गेला असेल ती प्रत्येक गोष्ट टाळा. आहे का हिम्मत ? प्रत्येक गोष्ट भगव्या रंगातच असेल तरच स्वीकार करा.  आणि भगवा रंग इतर कोणाला वापरूच देऊ नका, कारण त्याने तुमचा अपमान होईल ? या गोष्टीचा विचार केला तर असा प्रश्न पडतो की, तुमचा धर्म प्रतिकात आहे का ? तुमचा धर्म माणसाने माणसाशी कसे वागावे हे सांगत नाही का ? तुमचा धर्म प्रतिकांवरून वाद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म तुम्हाला जातीवरून मतभेद करायला शिकवतो का ? तुमचा धर्म एखाद्याच्या राहणीमानावरून वाद करायला शिकवतो का ?

       या सगळ्या गोष्टी करण्यास कोणताही धर्म सांगत नसेल अस मला वाटत. मग हे सगळ करायला सांगते कोण ? हे सगळ करायला सांगणारा त्या त्या धर्मातील विशिष्ट वर्ग आहे. ज्यात त्याला माणसा-माणसात मतभेद निर्माण करून इथे अशांतता असलेली पहायला आवडते. या अशंतातेतून  मानवाच्या मुख्य गरजा बाजूला राहतात. शासन म्हणून जनतेसाठी जबाबदारीने करावी लागणारी कामे न करता धर्माची संकल्पना वापरून मुख्य मुद्द्यापासून आपलं लक्ष धर्माच्या मुद्द्यावर वळवून ठेवतात. या धर्माच्या नशेत स्वतःला एवढं गुरफटून ठेवतो की आपण करतोय ते योग्य का अयोग्य हा विचारच डोक्यात येत नाही.

        लव्ह जिहाद ही संकल्पना हिंदू आणि मुस्लिम धर्मियातील प्रेमियुगलांसंदर्भात वापरली जाते. विशिष्ट जाती धर्मात जन्म घेणे हे काय तुमच्या माझ्या हातात असते का ? मग एखादा मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी एक मेकांच्या संपर्कात आले त्यांचा सहवास कित्येक वर्ष चालू राहिला ( कॉलेज किंवा काम करण्याचं क्षेत्र यापैकी काहीही कारण असू शकते) त्या संपर्कातून ते एकमेकांना हवे हवेसे वाटू लागले तर यात धर्माचा काय दोष ? माणूस माणसाला प्रिय होतो. निसर्गाने दिलेल्या शरीर रचनेनुसार वयानुरूप भिन्न लिंगी आकर्षण वाढत जाते. निसर्गाने दिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी तसा जोडीदार हवा असतो. तो जोडीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला निसर्गाने दिला आहे. निसर्गाने दिलेल्या त्या अधिकारावर मानवाने बंधने लादली. या बंधनातून दोन भिन्नलिंगी एक मेकांना आवडत असतील आणि त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणून त्याला विरोध करत असाल तर हे योग्य आहे का ?

           श्रद्धा वालकर प्रकरण जर पाहिले तर त्यात त्या आफताबची गुन्हेगारी मानसिकता तयार होण्यात धर्माचा काय हात ? त्याला तसा अमानवी गुन्हा करण्याची वेळ का आली ? त्याला तो गुन्हा करण्यासाठीच जे धाडस प्राप्त झालं ते कुठून झालं ? त्याने तो गुन्हा करत असताना जी साधने वापरली ती साधने कुठून घेतली ? तो गुन्हा केल्यानंतर त्या देहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्याने काय काय माहिती मिळवली ? ती माहिती त्याला कुठून मिळाली ? गुन्हा घडल्यानंतर आपल्यावर काय कार्यवाही होईल याचा अंदाज घेऊन त्या कार्यवाहीस सामोरे कसे जायचे याबद्दलची तयारी त्याने कुठून केली ? या सगळ्या घटना घडामोडीत त्याच्या धर्माचा किती टक्के रोल आहे ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कधी शोधून पाहाल का ?

         प्रेम हे विविध दोन जाती किंवा धर्मामधील मुला मुलींमध्ये झाले तर ते आम्हाला का पचत नाही. ऑनर किलिंग च्या घटना का घडतात ? श्रद्धा च्या प्रकरणात जसा आवाज चढला तसाच आवाज अन्य प्रकरणात का नाही चढत ? युपी मध्ये अन्यायग्रस्त मुलीचा अंत्यविधी पोलीस स्वतः ते पण रात्री केला जातो. अशावेळी तुमचा आवाज का वाढत नाही ? मंदिरात बलात्कार होतो आणि आरोपी मोकाट फिरतो, अशावेळी तुमचा आवाज शांत का असतो ? खैरलांजी घडते, उन्नाव, हाथरस, कठूवा घडते ( या प्रकरणात अन्यायाचा कळस गाठलेला असतो) पण तरी तुमचा आवाज दबलेला असतो ? अरे तुम्हाला जर एक दिवसासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही काय हैदोस घालाल याचा अंदाज आहे ना तुम्हाला ? मग तो हैदोस घालण्यास कोणता धर्म सांगतो ? असा माणसा - माणसात भेद घालणारा धर्म असेल तर त्या धर्माची गुणवत्ता आणि उपयोगिता किती असेल हे यावरून सिद्ध होते. त्यामुळं कोणताही धर्म आचरण करायचा असेल तर तो धर्म इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये.

         धर्माच्या अंधत्वाने तुमचा विकास होणार नाही. मनेवरील धर्माची जू बाजूला काढून ठेवून समान मानव म्हणून जगायचा प्रयत्न करुया एक मेकांसोबत राहून एक मेकांना विकास करण्यासाठी झगडूया काही जुन्या पारंपरिक कालबाह्य परंपरा नाहीशा करूया. शिक्षण, रोजगार, आरोग्य या सोबतच देशातील प्रत्येक नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी शासकीय आणि प्रशासकीय नोकर कसे राबवून घेता येतील. यासाठी प्रयत्न करुया. अन्यथा गुलाम आहात गुलामच रहा. धर्मा धर्मात वाद पेटवत रहा. शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी जसे सांगतील तेच करत रहा. देश गेला खड्ड्यात तरी चालेल देशातील नागरिक जिवंत नाही राहिले तरी चालेल. पण तुमचा धर्म तुम्ही जपून ठेवा. लख लाभ तुम्हाला तुमचा धर्म आणि तुमचं गुलामितील स्वातंत्र्य.

©जी.संदीप(गोणार,नांदेड)

      9552803980

Thursday, December 1, 2022

हे राजीनामा सत्र चालूच राहील....

 





          लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभअसलेल्या पत्रकारितेत एका चॅनल च नाव जनसामान्य हक्काने घेत होते. त्यातील एक आवाज होता रविश कुमार जो सत्ताधाऱ्यांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न विचारत होता ? वास्तव काय ते नागरिकांच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न करत होता. हाच आवाज सत्ताधाऱ्यांना बंद करायचा होता. पण तो बंद करणार कसा ? त्याला विकत तर घेऊ शकत नाही जस अन्य पत्रकारांना विकत घेऊ शकतो. त्याने आपला भाव कोणाला करूच दिला नाही कधी. मग त्याचा आवाज बंद कसा करायचा ? मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यावर एक शक्कल लढवली आणि त्या चॅनल मधील शेयर चा भाग विकत घेतला आणि तो आवाज दाबण्याचा अधिकचा समभाग विकत घेऊन तो प्रयत्न केला. पण तरी सुद्धा रवीश चा आवाज दबायला तयार नव्हता. त्या आवाजावर एव्हढा दबाव आला की, तो आवाज घुटमत राहिला. मग अशा सर्व परिस्थितीत त्या आवाजानेच निर्णय घेतला की, इथ घुटमत राहण्यापेक्षा दूर होण योग्य समजून शेवटी त्यांनी राजीनामा दिला. सत्ताधाऱ्यांचा मानस पूर्ण झाला.

        या घटनेमुळे काही जणांना खूप आनंद होतोय, जनसामान्यांचा आवाज दाबल्या गेला आणि सत्ताधाऱ्यांच्या गोष्टीला विरोध करणारा आवाज संपला. पण हा आवाज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता म्हणजे विरोधकांच्या सर्थनर्थ होता का ? हा आवाज संवैधानिक कामाच्या विरोधात होता का ? हा आवाज लोकशाहीच्या विरोधात होता का ? हा आवाज उथळपणे निर्माण झालेला होता का ? या सगळ्यांचा विचार एकदा आपण करून पहावा.

        हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता ना ?  मग हा आवाज सामान्य नागरिकांच्या हितासाठी होता तर त्या आवाजाच्या समर्थनार्थ आपल्याला उभे रहावे लागेल. कारण मागील काही वर्षापासून मीडियाच्या बाबतीत विचार केला तर नवीन चॅनल ला परवनगी नाही. जरी परवानगी दिली तरी ती स्वतंत्रपणे चालणारे चॅनल नाही. जे चॅनल सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यानुसार काम करतात त्या चॅनल ला सहकार्य केलं जातं. अन्य चॅनल वर बंदी आणली जाते किंवा त्यावर हवी तशी कार्यवाही केली जाते. अन्यथा जाहिरातींचा पुरवठा खंडित केला जातो मग त्या शासकीय असो अथवा खाजगी. अशावेळी ते चॅनल लवकरच बंद पडते आणि सत्ताधाऱ्यांचे मनसुबे साध्य होतात. अशावेळी नागरिक म्हणून आपल्याला आपली भूमिका कठोरपणे पार पाडावी लागणार आहे. जे चॅनल तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार नाही त्या चॅनल चा TRP वाढवून त्याला समर्थन देण्याऐवजी ते चॅनल पाहणे बंद करावेत. काही चॅनल तळवे चाटण्याच काम करत 24 तास लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून नाही तर एखाद्याची रखेल बनून प्रसारण करत असते. असे चॅनल डीटीएच च्या माध्यमातून फ्री मध्ये पुरवले जातात. आपण पैशाची चिंता करून ते फ्री चे चॅनल पाहत राहतो आणि त्या चॅनल वाल्यांचे खिसे भरतो. यातून सामान्य नागरिकांसाठी आवाज वाढवणारे चॅनल आर्थिक पाठबळ नसल्यामुळ बंद पडतात आणि सुरू होतो दर्जाहीन पत्रकारितेचा प्रवास.

       दर्जाहीन पत्रकारितेला रोखायच असेल दलाल आणि बिकावू मीडिया तयार होऊ नये अस वाटत असेल सामान्यांच्या आवाज होऊ पाहत असलेल्या प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक संघर्षात साथ देणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे हे असे राजीनामा सत्र थांबेल अन्यथा हे चालतच राहील.


© जी.संदीप (गोणार,नांदेड)

     9552803980

Saturday, March 12, 2022

बेरोजगार तरुणाला निराशेच्या काळात लढण्याचं बळ देणारी कादंबरी : अस्वस्थ नायक


अस्वस्थ नायक...











    या कादंबरीतील नायक प्रशांत आयुष्यात एक आदर्श शिक्षक व्हायचं हे एकच स्वप्न घेऊन जगणाऱ्या तरुणाची चित्तरकथा म्हणजे अस्वस्थ नायक.  आदर्श शिक्षक व्हायचं तर त्यासाठी डी.एड. करावं लागत. डी.एड. करायचं असेल तर शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा तर दोन लाखाच डोनेशन द्यावं लागत. तेवढं डोनेशन आणायचं तरी कुठून ? शेती आहे पण निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात काही पिकत नाही. शेतात पिकत नाही तर मग पैसा तरी कसा जमा होणार ? या सर्व अडचणींवर मात करून आनंदी आयुष्याच्या स्वप्नपूर्तीसाठी अल्प दरात शेती  विकून डोनेशन देऊन डी.एड. करायचं ठरते. तडजोड करून 50000 रुपये फिस भरून डी.एड चा प्रवास सुरू होऊन संपतो आणि कादंबरीचा खरा प्रवास सुरू होतो.

          आयुष्य जगण्यासाठी राहायला घर नाही आई - वडिलांचां सहारा नाही. गावी जायचं तर गावी काही सहारा नाही. अशा अवस्थेत शहरात एका मित्राच्या खोलीवर तिला खोली तरी कशी म्हणावं असा प्रश्न मनात निर्माण करणारी ती जुनी अडगळीतील वास्तू. पाहताक्षणीच त्यात कोणीही रहायला तयार होणार नाही अशा स्थितीत असलेल्या खोलीत, जिथे मानवाची कमी उंदीर आणि ढेकुनाची वस्ती जास्त अशा खोलीत राहून. शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत पोटाची भूक भागवण्यासाठी काहीतरी काम शोधणारा कादंबरीचा नायक प्रशांत.

कापडाच्या दुकानात काम मिळेल या आशेने विचारपूस करून सुरुवात करून, एका ग्रामीण भागात पैसे न घेता शिकवायला तयार होणारा आपण एक उत्तम शिक्षक होऊ या स्वप्नाने पछाडलेल्या तरुणाची ही कहाणी. 

        एकदा कादंबरी हातात घेतल्यानंतर पूर्ण संपवल्याविना तिला बाजूला ठेवावं असा विचार डोक्यात न येऊ देणारा नायकाचा प्रवास मनाला बधीर करून जातो. आपण बेरोजगार आहोत यात आपला दोष नसताना सुद्धा प्रत्येक स्थितीत स्वतःला सामावून घेत बेरोजगारी माणसाला काय काय करायला भाग पाडते याचे एक एक कंगोरे यात अतिशय समर्पक पणे मांडलेले आहेत.     

           कापडाच्या दुकानात काम करण्यासाठी प्रतिष्ठितांचे दाखले घेऊन दुकानात गेल्यानंतर गुंड, दादा, गुन्हेगार व्यक्तीचा दाखला दिसताच त्याला रोजगार नाकारणारा शेठ, सभ्य आणि होतकरू आहे अस समजून दवाखान्यात कंपाऊंडर चे काम मिळाले आणि आणि आता शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत आनंदाने जगता येईल या स्वप्नात जगत असतानाच तो जॉब सोडण्याचं आलेलं संकट.

       बेरोजगारीच्या अगतिकतेचा फायदा घेत समजशिक्षाची उपाधी देत धर्माचे ठेकेदार गंगाजल विकायचे काम करायला लावतात. ते काम किती पवित्र आहे. तू जर धर्माचे काम केलास तर तुला शिक्षकाची नोकरी नक्की लागेल अशा विचाराचा ठप्पा त्याच्या मेंदूवर मारतात.आपण आतापर्यंत धर्माचं काम न केल्यामुळ आपल्याला नोकरी मिळाली नाही हे काम जर केलं तर आपल्याला नक्कीच नोकरी मिळेल अशी मानसिकता घेऊन, एक आदर्श शिक्षक होता येईल या आशेवर धर्मांध गंगाजल विकण्याच काम म्हणजेच मार्केटिंग च काम करतो. पहिल्याच दिवशी दिलेलं टार्गेट पूर्ण करतो आणि फक्त पाणी पिऊन दिवस काढत असलेल्या पोटात समाधानाचे चार घास टाकतो. पण ही परिस्थिती तरी कुठ टिकून राहते. लगेच दुसऱ्याच दिवशी बाबरी मस्जिद पाडल्यामुळे देशभर दंगल माजते. हा जो काम करत होता ते सुद्धा त्याचाच भाग होता हे या नायकाला लक्षात सुद्धा येत नाही. दंगल सुरू झाल्यामुळे त्याच्या रोजगाराचा मार्ग पुन्हा बंद होतो. पुन्हा उपासमारीची वेळ येते पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते. दंगलीत सापडल्यानंतर पोलिसांचा मार पडल्यामूळ शरीर रक्तबंबाळ होते. त्याच स्थितीत पोलीस व्हॅन मध्ये टाकून दवाखान्यात admit करतात. तिथे उपचार घेत असताना चार दिवस सुखाने जातात. वेळेवर चहा नाश्ता जेवण मिळत असते. त्यामुळं नायकाला वाटते की, आपल्या शरीची मोठी हनी व्हायला पाहिजे होती. ज्यामुळे आपण जास्त दिवस इथे राहू शकलो असतो आणि पोटा पाण्याचा प्रश्न आला नसता. दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर जिथे त्याची राहण्याची सोय झाली होती आणि त्याच काही सामान जिथे ठेवलं होत त्या धर्मकार्यालयाकडे जातो. पण ते कार्यालय बंदच असते. शहरात दंगल चालूच असते. त्या दंगलीतून स्वतः ला वाचवण्यासाठी निवारा शोधतो. पण कुठेच सहारा मिळत नाही. अशा स्थितीत तो पोलीस स्टेशन गाठतो. तिथे काही वेळ आसरा मिळाल्यानंतर पोलीस व्हॅन मधूनच त्याला शहराच्या बाहेर सोडलं जातं. 

         शहराच्या बाहेर गेल्यानंतर एका चर्च च्या आश्रयाला काही दिवस राहतो. तिथली सेवा, शुश्रुषा पाहून प्रभावित होतो. पण एक आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीबद्दल चर्च मधील फादर च मत ऐकून तो तिथून जायला तयार होतो. त्यावेळी फादर आणि त्याच्यात झालेला युक्तिवाद हा बेरोजगार युवकाला धार्मिक ठेकेदार कसे प्रभावित करू पाहतात हे लक्षात आणून दिल्याशिवाय राहत नाही.

         हा सर्व प्रवास चालू असताना अशोक नावाचा व्यक्ती त्याला भेटत असतो. जो त्याची खडान - खडा माहिती मिळवत असतो. तो कुठे जातोय काय करतोय या सर्व गोष्टींवर त्याची नजर असते. दवाखान्यात कंपाऊंडर ची नोकरी करत असताना पेन विकणारा म्हणून तर कधी राखीव जागांच्या समर्थनातील आंदोलनात. यांच्या भेटी झालेल्या असतात.चर्च मधून बाहेर पडल्यानंतर तो थेट एका शिक्षणसंस्थेच्या सेक्रेटरी ला भेटायला जातो. नोकरीसाठी गयावया करतो पण पैशाअभावी निराशाच हाती येते. या सगळ्या आगतीकतेत तो कुठे जावं काय खावं हा विचार करत असताना त्याला अशोक ची आठवण होते. तोच जिव्हाळ्याचा माणूस त्याला वाटायला लागतो. अशोक ने दिलेला पत्ता आठवतो आणि त्याच्या दिलेल्या पत्त्यावर पोहचतो. अशोक रूम वरच असतो. दरम्यानच्या काळात काय काय घडलं ते सगळ सांगत असतो. संस्थेवरील भेटीबद्दल सुद्धा तो सांगतो आणि त्याला हे सुद्धा सांगून टाकतो की,  तू ज्या सेक्रेटरी कडे गेला होतास त्याच्याकडेच उद्या जाऊन तुझी ऑर्डर घे. ही बातमी ऐकताच जणू स्वर्गच प्राप्त झाला अशा आनंदात तो स्वतःला स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जातो.

         पण तो आनंद सुद्धा जास्त काळ टिकत नाही. का टिकत नाही ? पुन्हा कोणत संकट येते त्याच्यासमोर हे सगळ समजून घ्यायला, बेरोजगार तरुणाची वाताहत, त्याची जिद्दीने लढण्याची इच्छाशक्ती जाणून घ्यायला, शहरातील एका संस्थेत नोकरी मिळाली असताना सुद्धा ग्रामीण भागात मोफत शिकवण्याचा स्वीकार का करतो हे सर्व जाऊन घ्यायला मात्र कादंबरी नक्कीच वाचावी लागेल.


कादंबरीचे नाव : अस्वस्थ नायक

ले. उत्तम कांबळे

(जेष्ठ पत्रकार,संपादक,लेखक)

लेखन प्रकार:- कादंबरी.

प्रकाशन :- मनोविकास प्रकाशन पुणे.

पृष्ठ संख्या : 183

स्वागत मूल्य :- 200


परीक्षक : जी.संदीप(गोणार,नांदेड)

9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...