Friday, February 13, 2026

"प्रेम की व्यवहार? – तरुणाईसमोरील सामाजिक द्वंद्व"







 प्रेमाचा महिना सुरू झाला आणि चाहूल लागली सर्वांना शरीरात होणाऱ्या बदलातून भावनिक भुकेमधून एक साथीदार मिळवण्याची, मिळविण्यापेक्षा मला पण माझा साथीदार आहे हे गौरवाने सांगण्याची. आजच्या युगात (GenZ) relationship Single म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे अशी मानसिकता तयार होत आहे. त्या मानसिकतेतून आयुष्याच्या 13-14 व्या वर्षापासून मला समजून घेणार, मला भावनिक साथ देणार, सोशल मीडियावर मित्रपरिवारात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी विरुद्धलिंगी साथीदार हवाय ही मानसिकता आज दृढ होताना दिसत आहे. या मानसिकतेतूनच विरुद्धलिंगी आकर्षण होऊन त्यातून एक नात निर्माण होतंय त्याला बेस्ट फ्रेंड किंवा मग बॉय फ्रेंड असे नाव देऊन त्या नात्याला पुढे नेले जात त्यातून प्रेम भावना वाढत जाऊन आजची पिढी प्राथमिक गरजेप्रमाणे प्रेम करणारी व्यक्ती असलीच पाहिजे अशी दृढ भावना घेऊन वावरताना दिसत आहे.

            'प्रेम' ही मानसिक भावना आहे त्या प्रेम भावनेवरच हे जग टिकून राहू शकते कोणत्याही क्षणी केलेला राग द्वेष हा माणसाच्या विनाशाचे कारण आहे. "वैर जिंकावे प्रेमाने,युद्धाने वाढते युद्ध" या उक्तीनुसार प्रेमाने पूर्ण जग जिंकू शकतो. त्यामुळं मानवी जीवनात प्रेम ही भावना अतिशय महत्वाची आहेच. त्याविना माणूस जगूच शकत नाही. माणसाच्या सभोवताली असलेल्या प्रत्येक घटकावर तो प्रेम करायला लागला तर तो नक्कीच समृद्ध नागरिक आणि निसर्ग घडवू शकतो. प्रेमाच्या भावनेविना मानवी जीवन हे दुःखमय होऊन जाईल त्यामुळं प्रेम ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात असते आहे आणि राहीलच त्याविना मानवी जीवन जगणे अशक्यच. एखादा गुन्हेगार, दरोडेखोर जरी असला तरी तो आपल्या कामावर किंवा त्याच्या ध्येयावर प्रेम करतोच.

        पण किशोरवयात आकर्षणाची निर्माण होणारी भावना आणि त्या भावनेतून जे नाते निर्माण होते त्या नात्याला दिलेले प्रेम हे नाव यात जो गोंधळ होतो तो प्रत्येक पिढीने निर्माण केलेलं एक गूढ आहे. वयोमानानुसार शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे विरुद्धलिंगी आकर्षण आणि त्या आकर्षणातून मित्रपरिवारात स्वतःची वेगळी छाप पडण्यासाठी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत जुळलेलं नातं त्या नात्याला दिलेली प्रेमाची उपमा ते नाते वैयक्तिक पातळीवर टिकवत असताना ते काहीवेळा समाधानकारक टिकते पण बरेचदा ते काही महिन्यातच संपुष्टात येते. त्यामागे मुलगा आणि मुलींची अपेक्षा कारणीभूत आहेत. नात्याची सुरुवात करताना मित्र मैत्रिणींच्या म्हणण्यावरून (अरे बघ ना ती तुझ्याकडेच बघतेय, अगं बघ ना तो तुझ्याकडेच बघत आहे) हे नाते जुळते, ते जुळवत असताना कोणत्याच बाबीचा विचार नसतो, दृष्टीकोन नसतो, सुरुवात केली जाते भविष्यात जे घडेल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहू अशा भूमिकेतून ते नाते पुढे येते काही वेळा फक्त शारीरिक गरजेसाठी काही महिन्यासाठीच नात टिकवलं जात आणि नंतर ते नात संपुष्टात येतं. 

          नात्याची सुरुवात प्रेम या भावनेने होत असेल तर, प्रेमाने जग पण जिंकता येते असे शब्द वारंवार कानावर येत असताना ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली मुलं/मुली प्रेमाच्या नात्याने एकत्रित येऊन पुन्हा ही दूर का जातात ? काही तरुण तरुणींचे प्रेमाचे नाते टिकतात पण सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भावनेच्या दबावाखाली नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून आत्महत्या किंवा हत्या असे प्रकार घडत राहतात. NCRB अहवालानुसार दरवर्षी साधारणपणे 250-300 गुन्हे प्रेम प्रकरणातील हत्येचे घडतात.

          काही महिन्यापूर्वी नांदेड मधील देशभर गेलेला एक हत्येचा प्रकार त्या प्रेम प्रकरणात मुलीने घेतलेली भूमिका. या प्रकरणात चर्चिल्या गेलेले काही मुद्दे जातीच्या बाहेर जाऊन प्रेम कशाला करावं ?, गुन्हेगार पोराला कोणता बाप पोरगी देईल काय ?, या मुद्द्यांमधला दुसरा जे मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे गुन्हेगाराला कोणता बाप पोरगी देईल काय ? तो मुलगा गुन्हेगार घडण्यात काही अंशी मुलीच्या वडिलांचा हात होताच ना कारण तो मुलगा मुलीच्या वडिलासोबतच काम करत होता मुलीकडच्या कुटुंबातील भाऊ वडील हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते ना ? मग एक गुन्हेगार वडील त्या मुलाला सोबत घेऊन काम करतो तो गुन्हेगार मुलीच्या गुन्हेगार वडिलांसोबत राहतो तरी मग वडील त्या मुलाला मुलगी देईल का ? असा प्रश्न का ? राहिला प्रश्न जातीच्या बाहेर जाऊन प्रेम का केलं ?

          उच्च जातीचे समजले जाणाऱ्या जातीतील मूल जेव्हा त्यांच्यापेक्षा खालच्या जातीच्या मुलीसोबत प्रेम करून लग्न करण्याचा विचार करतील तेव्हा ते लग्न लावून दिलं जात का ? लग्न लावून दिलं जात नसेल तर मग त्या मुलासोबत अन्याय्य वागणूक होते का ? याचे उत्तर नाही असेच येईल. मग खालच्या जातीतील मुलाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केलं म्हणून त्याची हत्या करणे हा कोणता न्याय आहे ? प्रेम हे भावनेचा संबंध आहे ते होत असते नियोजनबद्ध केल्या जात नाही. कारण नियोजनबद्ध प्रेम करण्याची शिकवण देण्याएवढे प्रगल्भ विचाराचे आईवडिलांचे विचार नाहीत. जिथे आईवडील आपल्या मुलांमध्ये आपल्या परिसरात विचारांची प्रगल्भता निर्माण करत नाहीत तिथे स्वतःच्या मुलावर काय प्रगल्भतेचे विचार रुजवू शकतील ? पोटजातीत विवाह व्हावेत एवढी प्रगल्भता नसलेले पालक जाती अंतर्गत विवाहास कसे मंजुरी देतील. जातीअंतर्गत किंवा पोटजातीत विवाह करत असताना मुलगा किंवा मुलगी नोकरीने उच्च पदावर आहे का हे मात्र नक्की विचारत घेतलं जात आणि तिथे सगळे विरोध गळून पडतात. शेवटी प्रेम हरते आणि व्यवहार जिंकतो.

         या सर्व व्यवहाराचा विचार करताना आजच्या तरुणाईने आर्थिक,सामाजिक आणि धार्मिक बाजू लक्षात घेऊन प्रेमाचा व्यवहार केला तर उत्तम राहील असे वाटते. प्रेम ही संकल्पना जरी भावनिक असली तरी त्या भावनेला व्यवहाराच्या तराजूत तोलून तुम्ही व्यवहार केला तर ते प्रेम नक्कीच तुमचे होईल अन्यथा तुमचे प्रेम हे परक्याचे झाल्याविना राहणार नाही.

        प्रेम करत असताना समोरच्याची जात, धर्म, त्यांची आर्थिक पातळी आणि सामाजिक दर्जा हे पाहूनच प्रेम करावं अशी सामाजिक विचारसरणी निर्माण होत आहे असे दिसते. तुमच प्रेम हे तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा कमवण्यात किंवा सामाजिक पातळीवर वरचा असेल. जात खालची असली आणि विचारसरणी प्रगल्भ आणि सोबत आर्थिक पातळी उच्च असली की लगेच तुमचे प्रेम समाजमान्य होऊ शकते समाजमान्य जरी नाही झाले तरी कुटुंबमान्य नक्कीच होऊ शकते त्यामुळं तरुणाईने प्रेमाच्या भावनेत त्या प्रवाहात जात असताना समोरच्याची जात, धर्म, आर्थिक पातळी पाहून प्रेमाच्या होडीत प्रवेश करावा तेव्हाच ते प्रेम आयुष्यभरासाठी टिकू शकेल. अन्यथा प्रेम संपेल किंवा प्रेमात माणूस संपेल. प्रेम चिरंकाल टिकवायचे असेल या मानवी जन्माचा आनंद घेऊन स्वतःसोबत इतरांच्या आयुष्यासाठी काही करायचे असेल तर आजच्या तरुणाईने स्वतःला विशिष्ट शिस्त लावून घ्यावीच लागेल. तरच या प्रेमरूपी सुरुवातीला एक सुंदर वळण मिळून आयुष्य आनंदी होऊ शकते.

© जी.संदीप ( गोणार,नांदेड)

           9552803980

Saturday, August 16, 2025

स्वातंत्र्य हे असे कसे ?







#Sunday_specil



एका दिवसाच्या स्वातंत्र्य दिनानातून जर बाहेर आले असाल तर या गोष्टीकडे जरा लक्ष द्या देशावर जर खरच प्रेम असेल तर स्वातंत्र्यदिनीच काय घडलं आहे याकडे पण मेंदू उघडा ठेवून पहा जरा.

        पहिले चित्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वीएकमहिन्यापासून आंदोलन सुरू असते त्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही म्हणून आंदोलक स्वातंत्र्य दिनी आपले म्हणणे राजकीय नेत्याकडे घेऊन जाऊ पाहतो पण त्या आंदोलकाला स्वातंत्र्य दिनी(स्वदेशीयांच्या सत्तेत) सुद्धा अशी लाथ कमरेत बसते. प्रश्न घेऊन समोर येणे हा गुन्हा आहे ? ब्रिटिशांची सत्ता असताना असा त्रास स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्रयोध्दांना दिला जायचा पण परवाच हा प्रसंग कोणत्या गुर्मीत भारतीय जनतेला भोगावा लागला हे कळायला मार्ग नाही. मग या जनतेने आता कोणते चलेजाव चे आंदोलन करायचे आणि कोणाच्या विरोधात ? आंदोलक चुकला असेल त्याने काही चूक केली असेलच पण म्हणून या स्वातंत्र्यात त्याच्या सन्मालाला अशी लाथ घालाल काय ? ते पण त्याच्या चिमुरड्या बालकासमोर ? अरे नालायकांनो किती वर्ष स्वातंत्र्याचा उपभोग न घेता फक्त स्वातंत्र्याची गोडवे गात बसायची ? गरिबीतून वर आलेला प्रशासकीय अधिकारी सुद्धा असा गुर्मीत वागायला लागला तर लोकशाही कधीच या देशात रुजणार नाही. फक्त कागदोपत्री काही प्रमाणात चालू राहील.

         दुसरे चित्र शेतकरी आंदोलनाची दखल घेतली जात नाही हे लक्षात येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आंदोलक नदीत उडी मारून आपला जीव गमावतो. स्वातंत्र्यात प्रशासनातील कर्मचाऱ्यांसमोर जर असे करण्याची वेळ येत असेल तर या स्वातंत्र्याचा अंमल किती योग्य मार्गाने सुरू आहे यावर विचार करण्याएवढी लायकी असेलच तुमची. 

         तिसरे चित्र स्वातंत्र्य दिनादिवशीच राष्ट्रध्वज जमिनीवर रेखाटून त्यावर विशिष्ट ध्वज उभा केला जातो.(हे चित्र कुठले आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.कोणाकडे सविस्तर माहिती असेल तर कळवावे). स्वातंत्र्य दिनी अशा घटना उघडकीस येतात आणि त्यावर काहीच कार्यवाही होत नसेल तर तुमच्यात देशभक्ती किती आहे हे आपण दाखवून देताय. असा राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून  ईतर कोणत्याही रंगाचा ध्वज वर असता तर हेच देशभक्तीच्या नावाने  पिपाणी वाजवणारे आज आकाश पाताळ एक केले असते. पण आज जेव्हा देशभक्तीचे ज्ञान पाजणारेच जेव्हा अक्कल गहाण ठेवतात आणि आपल्या रक्तात किती देशभक्ती आहे हे सिद्ध करतात तेव्हा मात्र त्यांच्या देशभक्तीची कीव येते.

       ऐन स्वातंत्र्यदिनी या गोष्टी घडत असताना आम्ही कोणता स्वातंत्र्य दिन साजरा केला मग ? नैतिकस्वातंत्र्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वतंत्र हे काडीमोलच आहे. स्वातंत्र्याचा प्रभावीपणे अंमल व्हावा म्हणून लोकशाही स्वीकारली पण या लोकशाहीत मतदान सुद्धा धमक्या देऊन घेतले जाते. वोटर लिस्ट मध्ये मतदार दाखवून मतदार बूथ वरील कर्मचाऱ्यांना धमकी देऊन त्यांना बाजूला सारून हवं त्या उमेदवाराला मतदान करून घेतल्या जाते. मतदानाबद्दलच हे सत्य कोणीही नाकारणार नाहीच. तरीसुद्धा प्रत्येक जण शांत राहून पाहत बसतो लोकशाहीत कोणीही निवडून आले तरी आमची चूल चालवण्यासाठी आम्हालाच कष्ट करावे लागतात असे म्हणत नशिबाला दोष देऊन बाजूला होतो.

       नशीब आणि आपली चूल चालवायला आपल्यालाच कष्ट करावे लागतात हे जेव्हा या सामन्यांच्या डोक्यातून जाईल तेव्हाच लोकशाही रुजण्यास खरी सुरुवात होईल. तुमची चूल चालवायची असेल तर त्यासाठी तुमच्या हाताला रोजगार हवा, तो रोजगार कोणता करावा यासाठीच दर्जेदार शिक्षण हवं शिक्षण. या दोन्ही गोष्टी करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आहे. यात तुमच्या नशिबाचा काहीही हात नाही. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. हे स्वातंत्र्य असून नसल्यासारखेच आहे असे म्हणावे लागेल.

© जी.संदीप.(गोणार,नांदेड.)

         9552803980

Friday, February 14, 2025

नक्कीच असावं कुणीतरी !

 नक्कीच असावं कोणीतरी !


नक्कीच असावं कोणीतरी...

तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची

जाणीव करून देऊन

तुमचा सन्मान वाढवणार.


नक्कीच असावं कोणीतरी...

तुमच्यातील भीतीला/कमीपणाला नाहीस करून

संघर्षमय आयुष्यासाठी

तुमचं मनोबल वाढवणार


नक्कीच असावं कोणीतरी...

प्राण्यांप्रमाणे जीवन जगण्याऐवजी

प्रत्येकाला सन्मानाने जगता याव

यासाठी आयुष्याचे क्षण वेचणारं


नक्कीच असावं कोणीतरी...

मनात कल्पनेचे महाल न बांधता

संघर्षमय वास्तवाच्या झोपडीत

आयुष्याचा प्रवास आनंदाने करणार


नक्कीच असावं कोणीतरी...

पारंपरिक प्रथांना छेद देऊन

माणूस म्हणून जगण्यासोबतच

इतरांनाही तशीच प्रेरणा देणार.

              © संदीप गोणारकर..✍️ ❤️ 

                   9552803980


नक्कीच असावं कुणीतरी 

भरकट लेल्या मनाला आधार देणार 

चुकलेल्या वाटेला मार्गस्थ करणार 

सुख दुःखात प्रेमाने कुरवाळणार


                    -जगदीश गोणारकर


नक्कीच असावं कुणीतरी,

सुकलेल्या मनाला फुलवणार,

नैराश्यात बुडालेल्या अंतकरणाला

आशेचा दीपक दाखवणारं.....

                      _संजीवनी काळे


कुणीतरी असावं आपल्याला आपल म्हणणार,

आपल म्हणताना आपल्यातलं आपलेपण जपणार

कुणी तरी असावं, साद घालणार

साद घालताना हळूच लपणार...

कुणी तरी असावं.....😊

                           -विशाखा वाघमारे...


असावं कुणी तरी,


जगाने नाकारल्यावर,

आपल्याला स्वीकारनारं..!

जगाने पाठ फिरविल्यावर,

पाठीशी उभं राहणारं..!


असावं कुणी तरी,


स्वार्थाला नाकारून,

निःस्वार्थ प्रेम करणारं...

आयुष्याच्या काळरात्री,

हातात हात धरणारं...!


असावं कुणी तरी,


दबलेल्या भावनांना,

वाट मोकळी करणारं..!

फुटलाच जर अश्रूंचा बांध,

तेव्हा घट्ट मिठी मारणारं..!


खरचं असावं कुणी तरी..!


                      - उमेश राजभोज❤️✍️


नक्कीच कुणी तरी असावं

"काय झालं" आपुलिने विचारणार

सुखात दुःखात साथ देणार

कोणत्याही परिस्थितीत सोबत राहणार


नक्कीच असावं कोणीतरी...


                                 -जीवन ढगे


" नक्की च असावा कोणी तरी 


तु चल पुढ मी आहे म्हणून

हातात हात घेऊनी बळ देणारे 


नक्की च असाव कोणी तरी

संघर्षात डोळे पुसून 

यशात अभिमान बाळगणार " 

📚♥️💫


                 - प्रतीक्षा धडेकर


नक्कीच कुनितरी असाव .॥

व्याकुळलेल्या मनाला अलगद सावरण्याला

अन बेधुंद झालेल्या जगण्याला आवरायला .

नक्कीच कुनितरी असाव॥

मनातील चार गोष्टी एकायला 

अन मनातील चार गोष्टी सांगायला

नक्कीच कोनीतरी असाव

हळव्या मनाला सावरायला

अन बावळ्या मनाला आवरायला ।

नक्कीच कोनितरी असाव

                      - विलास राऊत


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या छोट्या यशावर

मनापासून आनंद मानणारं

आणि अपयशातही तुम्हाला

सांभाळून घेणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

जीवनाच्या वाटचालीत

प्रेरणा देणारं,

तुमच्या स्वप्नांना बळ देणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

तुमच्या सुखात सहभागी होणारं

आणि दु:खातही हात द्यायला

समोर उभं राहणारं...


नक्कीच असावं कुणीतरी

ज्याच्याशी मन मोकळं

करता येईल,

आणि तो तुमचं ऐकून

समजून घेईल...


*प्रा.जयपाल कांबळे*

संशोधक विद्यार्थी

नांदेड

Tuesday, February 13, 2024

14 फेब्रुवारी ..?

 



आम्ही फक्त गुन्हा घडला की,
त्यावर हळहळ व्यक्त करतो.
तो का घडला, कोणी घडवला
याकडे मात्र कानाडोळा करतो.

पुलवामा घडला, अथवा असो घडवला गेला ?
पण त्यात मारले गेले आमचे सैनिक
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहने
एवढेच शिल्लक आहे का आमचे कर्तव्य नैतिक ?

त्यांच्या नावाने प्रेम दिनाच्या दिवशीच
काळा दिन साजरा केला जातो
अशा प्रतीद्वंदी दिवस साजरा करण्याने
फक्त द्वेशच मनात साठवला जातो.

नसेल साजरा करायचा प्रेम दिन
नका करू कोण तुम्हाला सक्ती केलंय ?
पण सैनिकांच्या नावाखाली
काळा दिन साजरा करण्याने काय प्राप्त केलंय ?

प्रत्येक वर्षी काळा दिन साजरा करून
सैनिकांसाठी काही हासिल झालंय का ?
काळा दिनाचा हट्ट सोडून दोषींना सजा देण्याचा विचार
कधीच डोक्यात येत नाही तुमच्या, अस का ?

सैनिकांच्या जीवांचा खरचं कळवळा आहे की
फक्त एक दिवसाची सहानुभूती दाखवायची ?
पारंपरिक संस्कृतीच्या नावाखाली,
घडत असलेल्या प्रसंगात आपली दंडेलशाही पुढं आणायची ?

ज्यांच्या बळावर हे असले थेर तुम्ही करताय
त्यांना एकदा विचारून बघा.
त्या रोड वर तेवढा शस्त्रसाठा आला कसा ?
नाही मिळणार उत्तर, पण त्यांच्या तोंडावरचे भाव नक्की बघा

मग तुम्ही समजून घ्या की,
काळा दिन किती दिवस साजरा करायचा ?
उगाच एखाद्या बाबीला विरोध करण्यासाठी,
निरर्थक का आग्रह धरायचा ?

अरे तुम्ही या दिनाला विरोध करण्याचं कारण हे तर नाही ना,
तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रियशी न असणे ?
असल काही असल तर सावरा जरा स्वतःला.
आयुष्यात प्रेमाविना काहीही टिकन अशक्य आहे,
हे समजावून सांगा मेंदू आणि मनाला.

हा प्रेम व्यक्त करण्यात त्यांचं चुकत असेल खूप काही,
म्हणून काय मग त्या दिनाला विरोध करायचा का ?
एवढाच तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला आवडत नसेल
तर अन्य मार्गाचा वापर करायचा ना ?

© जी.संदीप (गोणार,नांदेड)
         9552803980

Friday, February 2, 2024

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती 23-24 नांदेड.

 





शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून स्वधार फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरून त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालय येथे निर्धारित तारखेपर्यंत सबमिट करावे लागणार आहेत. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसणाऱ्या ऑनलाईन अर्ज या पर्यायावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तयार झालेल्या आयडी पासवर्ड च्या साहाय्याने लॉगिन करून पुढील प्रक्रिया करावी. 


 त्यासाठी आवश्यक असलेली विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:

२. वडिलांचे संपूर्ण नाव :

३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :

४. आधार कार्ड क्र. :

५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :

६. अर्जदाराचे वय :

७. अर्जदाराचे लिंग :

८. आईचे संपूर्ण नाव :

९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :

१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र

११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :

१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :

१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :

१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :

१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )

१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:

१७. अभ्यासक्रम :

१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :

१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :

२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):

२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:

२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.

• प्रवेश वर्ष / दिनांक

• उत्तीर्ण महिना / वर्ष

• प्राप्त गुण

• एकूण गुण

याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव

• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :

• शाखा

• खातेक्रमांक

• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो

२ अर्जदाराची सही

३ जातीचा दाखला

४ आधार कार्डाची प्रत

५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.

६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र

७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.

८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :

९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :

१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .

११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :

१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :

१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला

१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :

१५ शपथपत्र / हमीपत्र :

१६ भाडे करारनामा :



रीनिवल अर्जासाठी :-

०१) चालू वर्षाचे बोनाफाईड

०२) मागील वर्षाचे गुणपत्रक

०३) जातीचा दाखला

०४) चालू वर्षाचे उत्पंनाचे प्रमाणपत्र

०५) बँक पासबुक

०६) भाडे करारनामा

०७) रूमचा जिओग्रफिकल लोकेशन असलेला फोटो

०८) मेस/भोजनालय बिलाची पावती

०९) रीनीवल अर्ज सादर करत असताना हमीपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

वेबसाईट :- syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx


शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दिनांक

1 फेब्रुवारी ते 01 मार्च 2024. पर्यंत  महाविद्यालयात आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जमा करावे.



फॉर्म भरण्याची दिनांक वाढवण्यात आली आहे, वाढीव दिनांक 15 मार्च 2024 आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.





प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म भरावा. तो भरत असताना आपल्या आपल्या मागील वर्षी दिलेल्या परीक्षेचा मार्कमेमो सोबत जोडावा.



Wednesday, January 24, 2024

मतदार राजा




     भारतात कोठेही असलास, कोणत्याही जाती धर्मातील असलास, कितीही गरीब अथवा श्रीमंत असलास तरी तुझी किंमत कमी होणार नाही. वरील कोणत्याही गोष्टीवरून किंमत कमी जास्त होणार नाही. किंवा एखाद्याला जास्त किंमत मिळणार नाही. हा सन्मान तुला लोकशाहीने दिला आहे. सरपंच ते लोकसभा सदस्य निवडणूक कोणतीही असो, उमेदवार तुझ्या दाराला येतो, तू गरीब आहेस किंवा खालच्या जातीतला आहेस म्हणून तो तुझा सन्मान करणार नाही असं नाही. गावातील गडगंज संपत्ती असलेला व्यक्ती असो अथवा प्रचलित स्वघोषित उच्च कुलीन जातीतील व्यक्ती असो अथवा फुटपाथवर आपल आयुष्य जगणारा सामान्य भिकारी असो, या सर्वांना समान स्थरावर आणणारी ताकद म्हणजे मताधिकार होय. 

       लोकशाहीत मताचा अधिकार तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य हे नशीब किंवा तळहातावरील रेषा ठरवण्याचा काळ 1956 सालीच नाहीसा झाला. एक नविन बळ तुमच्या एका बोटात संविधानाने दिलं तो अधिकार सन्मानाने बजावा. तुमचं भविष्य उज्वल घडवण्यासाठी हा मताधिकार आहे.

        भावकीतील उमेदवार आहे, एक कोंबडी आणि दारूची बॉटल आठ दिवस तुला भेटते म्हणून, धर्मासाठी ते मोठ मोठाले मंदिर बांधतील, धर्माच्या नावावर अन्नछत्र सुरू करतील, तुला फुकटच खायला देतील, तुला तुझ्या कुटुंबाला सबसिडी च्या नावावर पैसे देतील. हे असल सगळ तुला स्वतः कमवता येते, धर्माची श्रद्धास्थान निर्माण करणं हे धर्माचे अनुयायी म्हणून आपली जबाबदारी आहे. ते उभारण्यासाठी आपण सक्षम होऊ एवढं कवण्याच सामर्थ्य आणि साधने उपल्ब्ध करून देणं हे त्यांची जबाबदारी असते हे तू ओळख आणि असे धर्म, मटण दारू, फुकटचे पैसे देणाऱ्या उमेदवाराला तू तुझ मत कधीचं देऊ नकोस.

       आज तू मला वर्षाला 12000, मोफत राशन मिळत आहे, मझ्या धर्मातील देवांचे मंदिरे बांधली जात आहेत, याची जाणीव ठेवून तू मतदान करशील तर तुझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय आदर्श ठेवशील.

         आयुष्यात जन्म घ्यायचं सत्ताधारी जे फुकट देतील त्यावर जस जमेल तस आयुष्य जगायचं. स्वतः कष्ट करण्याच्या संधी ची मागणीच करायची नाही का ? देशात तरुण वर्ग म्हणून मिरवत असताना तो तरुण सोशल मीडियावर आपल नको ते मत व्यक्त करून वाद घडवून आणत असेल आणि त्यातच तो गुंग राहत असेल तर मग त्याच्या आयुष्यच काय होणार ? आज आई वडील म्हणून तुम्ही त्याची जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत उचलाल पण त्यानंतर त्याच आणि त्याच्या कुटुंबाच काय होणार ? नशिबावर सोडून देणार का ?

        तुमच्या येणाऱ्या पिढ्या दुबळ्या होऊ द्यायचा नसतील, सन्मानच जीवन जगायचं असेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणा. खाजगी शिक्षण नाही तर शासकीय शिक्षणाचे मार्ग खुले झाले पाहिजेत याकडे लक्ष द्या. शासनाने नागरिकांना फुकट काही देण्यापेक्षा त्यांच्यात  कमवण्याच बळ आलं पाहिजे. उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणानुसार रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण करण हे सर्व शासनच काम आहे. तुमच्या नशीबाचा यात काहीच दोष नाही. नशिबावर दोष देऊन तुम्हाला गुलाम ठेवण्याचं काम व्यवस्थेने केले आहे.

        या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्हाला शिक्षनापासून दूर ठेवलं जातं. शिक्षणात तुमच्या बुद्धीचा विकास होणार शिक्षण दिलं जातं नाही ? तुम्ही कारकुनी कर्मचारी व्हाल हीच व्यवस्था निर्माण केली जाते ? त्या व्यवस्थेत तुम्ही नशिबाला दोष देऊन मोकळे होता.

        असं होऊ द्यायचं नसेल तुम्हाला तुमचं सन्मानाच आयुष्य जगायचं असेल तर आज संकल्प करूया, मी माझ मत कोणत्याही परिस्थिती विकणार नाही, मी माझं मत धर्माच्या नावावर कधीच देणार नाही, मी माझं मत त्याच उमेदवाराला देईल जो इथल्या नागरिकाच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करेल, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबत त्याच्या साठी शिक्षणाच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करेल, कोणत्याही पद्धतीचं कोणतीही गोष्ट फुकट देणार नाही, वस्तूची किंमत चार रुपये ठेवून सबसिडी च्या नावावर एक रुपया देऊन आम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करणार नाही. बाजारातील कोणतीही वस्तू योग्य त्याच दरात मिळेल, त्या वस्तूच्या कच्च्या मालाची निर्मिती करणाऱ्याला योग्य दर दिल्या जाईल. देशातील कोणताही कामगार असो वर्ग एक ते वर्ग चार किंवा संघटित असंघटित कामगार असो या सर्वांना समान सन्मान देण्याची व्यवस्था जे शासन करेल त्यांनाच या मताधिकाराद्वारे निवडून देईल. अन्यथा त्या शासनाला मी सत्तेत संधी देणार नाही.

        असा विचार कराल तरच संविधानाने तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकाराचा सन्मान होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सन्मान मिळेल.  लोकशाहीची योग्य वाटचाल सुरु राहील. पर्यायाने समृद्ध भारत घडेल भारतातील प्रत्येक नागरिक सन्मानाने जगेल. भारतातील प्रत्येक नागरिक जर सन्मानाने जगाला तर देशाचा जि.डी.पी. उचावेल सोबतच दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल मग देश सुजलाम सुफलाम होण्यापासून कोण रोखेल ?

      हे सर्व घडण्यासाठी तुम्ही एक मतदार राजा आहात म्हणून तुम्ही तुमची योग्य जबाबदारी पार पाडा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड)

9552803980

Wednesday, January 17, 2024

स्वतःचा मेंदू वापरा

 




मित्रांनो,

जरा डोळस व्हा रे !

देव ही दुय्यम गरज आहे

जरा प्राथमिक गरज ओळखा रे.


अश्मयुगात समूहाने राहताना पोटाच्या भुकेनंतर

शारीरिक भुकेकडे लक्ष दिलं जायचं

अविकसित काळातील लोकांना समजलं

मग तुमच्या डोक्यात कधी यायचं ?


बुद्धिवान प्राणी म्हणून

विविध शोध लावत गेलो

कधी स्वतः वेडे ठरलो तर

कधी दुसऱ्यांना वेड्यात काढण्यास धन्य मानलो.


विविध शोध लागत असता

मनोरंजनावर येऊन ठेपलो

मानवी मनातील भीतीचा आधार घेत

देवाचा शोध लावून ठेवलो.


तो जर आहे तर,

जन्मावेळीच आपल्या मनात विचार टाकेल

त्याची आराधना करण्यासाठी

सगळे मार्ग आधीच सांगून टाकेल


मानवाने निर्मिलेल यंत्र सुद्धा

कमांड दिली तसेच काम करते

तशाच कमांड देवानेही आपल्यात दिल्या असत्या

हे तुम्हास का नाही उपजते ?


देव आहे हे मान्य करायचं

बिनधास्त करा ना रे !

त्या देवासाठी तुम्ही आप आपसात भांडता

हे तुमच्या देवाला तरी मान्य होईल का रे ?


देवाच्या नावावर तुम्हाला ईथ

एक मेकांत लढवल जात

ती लढाई चालू असताना

संविधानिक हक्क अधिकारापासून दूर ठेवलं जातं


हक्क अधिकारच मोल

तुम्हा कधीच समजू दिलं जात नाही

कारण, एखादी गोष्ट मिळत नसेल

तर रुजवलं जात की, "ते तुमच्या नशिबातच नाही."


त्या नशिबाचा निर्मिक(बनवणारा) देव असेल

तर तो देव चुकीचा आहे का ?

एखाद्याकडे गडगंज संपत्ती द्यावी आणि

दुसऱ्यास एकवेळच्या जेवणासाठी मोताज ठेवावं का ?


गडगंज संपत्तीवाला निडरपणे शेकडो चुका करतो

तरी त्याला त्याच्यावर देव कोपण्याची भीती नसते

पण सामान्य गरीब माणूस रस्त्यावरून चालताना

मुंगीवर पाय पडत असताना हजार वेळा विचार करतो.


शुद्ध निर्मळ अशा गरीब मनावर

देव तुमचा कोपतो का रे ?

गरिबांना तासो-न-तास रांगेत उभा करतो

आणि श्रीमंतांना सेकंदात दर्शन देतो असे का रे ?


अशा तुमच्या एका देवाच

भल मोठ मंदिर उभारल्या जातंय

ते मंदिर पूर्ण होण्याआधीच तिथं

म्हणे त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली जातेय


तिथे त्या देवाचा मोठेपणा करायचाय

का ? राजकारण्यांना मते मागायचीत ?

कारण ! प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर सुद्धा

कामाच्या कारणास्तव देव दर्शन बंद राहील

राजकारण्यांचाच जर असेल हा डाव

तर तुमच्या भावनेशी खेळणाऱ्यांना करून टाका पायचित


किती म्हणून त्या राजकारण्यांची बाजू घेत

तुमच्या विकासाचे मार्ग बंद करून घेणार

धर्माच्या नावावर तुमचा वापर करून घेऊन

ते तुमच्या पिढ्यांच वाटोळ करून टाकणार.


हेच बघा ना, तुम्ही आरक्षणासाठी लढत असताना

कंत्राटी भरतीचा शासन निर्णय काढून ते मोकळे झाले.

आरक्षण जरी तुम्हा दिले तर हे लक्षात घ्या

त्याच्या अंमलबजावणीचे सगळे रस्ते बंद केले.


त्यामुळं धर्माच्या नावावर होत असलेलं तांडव

थांबवण्यासाठी त्यांना विरोध करा रे

अन्यथा पुन्हा परकियांची

गुलामी स्विकाराया तयार व्हा रे.


त्यावेळी तुम्ही पुजलेला

कोणताही देव धावून येणार नाही

हे इतिहासावरून सिद्ध होतंय

मी मनाच काहीही सांगत नाही


इतिहासावर नजर टाकाल तर

मानवी क्रांत्याच निदर्शनास येतील

कोणत्याही देवाने तुमची सुटका केली नाही

याची पावलोपावली दाखले दिसतील


देव मानायचा का न मानायचा

हे तुमचं स्वातंत्र्य अवडीने जपा

देवाच्या नावावरील गोष्टीत स्वतःला किती गुंतवायच

हे ठरवण्यासाठी मात्र सदैव स्वतःचा मेंदू वापरा.

©जी.संदीप (गोणार,नांदेड.)

           9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...